निरीश्वरवाद : (एथिइझम). सर्वसामान्य ईश्वराचे अस्तित्व नाकारणारी विचारसरणी निरीश्वरवादी म्हणून ओळखली जाते. ईश्वराच्या अस्तित्वावर वा ईश्वराच्या संकल्पनेवर ती खरी संकल्पना म्हणून श्रद्धा ठेवणारे ते ईश्वरवादी व ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा वा ईश्वराची संकल्पना नाकारणारे ते निरीश्वरवादी होत. म्हणूनच ‘निरीश्वरवाद’ ह्या संज्ञेचा अर्थ जो ⇨ ईश्वरवाद (थिइझम) नाकारण्यात येतो, त्या ईश्वरवादावर बराचसा अवलंबून आहे. सर्व शक्तिमान म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती व नाश यांचा कर्ता, सर्वज्ञ व जीवात्म्याला मोक्ष देणारा ईश्वर, असे एकेश्वरवादी व विश्वात्मक देववादी मानतात. विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति-नाशात्मक प्रक्रियेचे कर्तृत्व अनेक देवदेवतांमध्ये विभागलेले आहे, असेही अनेकदेववादी धर्म मानतात. सर्वसामान्यतः तीन पारंपारिक अर्थांनी ‘निरीश्वरवाद’ ही संकल्पना वापरली जाते. हे तीन अर्थ असे : (१) धर्मातील ईश्वर नावाची कुठलीही सत्ता वा शक्ती व तसेच तिच्याविषयीची श्रद्धा नाकारणे. (२) एखाद्या संस्कृतीत मान्यता पावलेली एखाद्या देवतेविषयीची श्रद्धा नाकारणारी प्रवृत्ती. (३) कधीकधी फक्त व्यावहारिक पातळीवरच ईश्वर नाकारणे किंवा ईश्वर संकल्पनेकडे दुर्लक्ष करणे, उपेक्षा करणे. एकाद्या चर्चेतील युक्तिवादांत ह्या संज्ञेच्या ह्या तीन अर्थांचा नेहमीचा गोंधळ होतो. संज्ञेतील संदिग्धतेचे बोलके उदाहरण म्हणजे सतराव्या शतकातील तत्त्ववेत्ता बारूक स्पिनोझा (१६३२–७७) यास ‘ईश्वरामुळे भारावून गेलेला माणूस’ तसेच ‘एक निरीश्वरवादी’ अशा दोन्हीही प्रकारे संबोधिले जाई. येथे ‘निरीश्वरवाद’ ह्या संज्ञेतील काहीसा आवश्यक असा अंश म्हणजे त्यातील काहीतरी महत्त्वाचे नाकारण्याचा, अमान्य करण्याचा जो दुसरा अर्थ आहे तो होय. केवळ ⇨ संशयवाद (स्केप्टिसिझम) वा ⇨ अज्ञेयवाद (ॲग्नॉस्टिसिझम) या स्वरूपाचा अर्थ निरीश्वरवादात नाही.

प्राचीन तात्त्विक विचारधारेत निरीश्वरवादाची स्पष्ट व पद्धतशीर मांडणी झाल्याचे दिसत नाही. कारण कुठल्याही प्रकारच्या ईश्वरवादाचीच पद्धतशीर मांडणी प्राचीन काळात झालेली नसल्यामुळे त्याच्या विरोधी अशा निरीश्वरवादाचीही काटेकोर मांडणी होऊ शकली नाही. असे असले, तरी निरीश्वरवादी किंवा तत्‌सदृश काही विचार प्राचीन धर्मांमध्ये व्यक्त झालेले आहेत. उदा., कन्फ्यूशस वा ताओ मतांना निरीश्वरवादी धार्मिक मते म्हटल्याचे काही उल्लेख आढळतात. अर्थातच प्राचीन चीनमधील लोकप्रिय धर्मात अनेकदेवतावादावर विश्वास होता. गौतम बुद्धाने प्रवर्तित केलेला मूळ बौद्ध धर्मही निरीश्वरवादीच होता. ईश्वरवादी वैदिक धर्मावरील, विशेषतः पारलौकिक कल्याणार्थ करावयाच्या कर्मकांडावरील प्रतिक्रिया म्हणून बौद्ध धर्माचा उदय झाला. एका अर्थी ईश्वरवादाच्या विरोधी अशी ही निरीश्वरवाद प्रतिपादन करणारी प्रतिक्रिया म्हणता येईल.

ग्रीसमध्ये सॉक्रेटीसवर निरीश्वरवादी म्हणून आरोप ठेवला गेला. डीमॉक्रिटस हा परमाणुवादी ग्रीक विचारवंत तसेच एपिक्यूरस मताचे विचारवंत हे अंतराळात मध्यभागी देवांचे अस्तित्व मानत असले, तरी त्यांनी विश्वाची जडवादी उपपत्तीच प्रतिपादन केली. ह्या उपपत्तीत देवतांना स्थान नव्हते व त्यांचा प्रभावही मान्य नव्हता.

बायबलमध्ये केवळ निरीश्वरवादाचा उल्लेखही आढळत नाही. नंतरच्या काळात मात्र रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचे लोक निरीश्वरवादी समजले गेले. कारण त्यांनी साम्राज्यात प्रचलित असलेल्या धर्मातील विविध देवतांचे अस्तित्व नाकारले होते. बायबलमधील भविष्यकथनाची (प्रॉफिसी) जी परंपरा आहे, तीच ख्रिस्ती धर्मातही सुरू राहिली आणि तिच्यातूनच निरीश्वरवादी विचारसरणीचा प्रथम आविष्कार झाल्याचे सर्वसामान्यपणे समजले जाते. मूर्तिपूजेला विरोध म्हणून ही भविष्यवाणी अवतरली आणि तिने निसर्ग व राज्य यांचे निर्देवताकरण केले. निसर्ग व राज्य हे उपासनेचे दोन सर्वसामान्य विषय होते. उपासनाविषयांतील उर्वरित पर्याय हे अतिशायी (ट्रॅन्सेन्डन्ट) देवावर केंद्रित झालेला नवा एकेश्वरवाद किंवा निरीश्वरवाद हे होते.

आधुनिक पाश्चात्त्य जगात सर्वंकष व पद्धतशीर असा निरीश्वरवाद सनातन ख्रिस्ती धर्मावरील प्रतिक्रिया म्हणूनच उदयास आला. या संदर्भात निरीश्वरवादाचे जे दोन प्रकार संभवतात त्यांत फरक करणे आवश्यक आहे. हे दोन्हीही प्रकार पुष्कळ वेळा परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया करताना अथवा एकमेकांत मिसळलेले दिसतात. त्यामुळे त्यांत भेद करणे कठीण होते. त्यांच्या प्रेरणांमध्ये व विकासातही तफावत आढळते. हे दोन प्रकार म्हणजे (१) बुद्धिवादी निरीश्वरवाद व (२) स्वभाववादी वा भावनावादी (रोमँटिक) निरीश्वरवाद हे होत.

बुद्धिवादी निरीश्वरवाद : या प्रकारच्या निरीश्वरवादाचा उदय वैज्ञानिक शोधांच्या व बुद्धीच्या आधारेच ह्या विश्वातील सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देता येते, ह्यावरील विश्वासातून झाला. ह्या निरीश्वरवादाने धार्मिक अंधश्रद्धा टाकावू ठरविल्या. ⇨ प्रबोधनकालात आणि प्रबोधनोत्तर काळात ही चळवळ उगम पावून अठराव्या शतकातील ⇨ ज्ञानोदय (एन्लाइटन्‌मेंट) चळवळीत ती खूपच विकसित झाली. या प्रकारातील अनेक कडवे निरीश्वरवादी विचारवंत फ्रेंच आणि ब्रिटिश ⇨ निर्मातृदेववादी परंपरेतील होते. व्हॉल्तेअर, ऑलबाक, जॉन टोलँड इ. विचारवंतांनी या निरीश्वरवादाचा पुरस्कार केला.

भावनावादी निरीश्वरवाद : एकोणिसाव्या शतकात ह्या प्रकाराचा उगम झाला. मानवी सामर्थ्य व नीतिमत्तेचा शत्रू ईश्वर असून त्याला विरोध म्हणून हा निरीश्वरवाद पुढे आला. डॉस्टोव्हस्कीचे एक पात्र इव्हान करमझोव याने ईश्वराला नैतिक भूमिकेतून विरोध केला आणि नंतर शून्यवादी प्रश्नही विचारले. ईश्वर नसेल तर सर्वच गोष्टी, मन मानेल त्या प्रकारे, करण्याची मुभा असेल काय ? असे तो विचारतो.

मध्यंतरीच्या काळात ⇨ लूटव्हिख फॉइरबाख (१८०४–७२) याने ह्या बुद्धिवादी व भावनावादी निरीश्वरवादाचा समन्वय साधला. त्याचा भावनावादी निरीश्वरवाद, त्याने धर्मविद्येचे परिवर्तन मानवशास्त्रात करण्याच्या व त्याद्वारे मानवाचे भावनिक उच्चतम अस्तित्व प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, त्यात दिसून येतो. त्याचा बुद्धिवादी निरीश्वरवाद त्याच्या निसर्गवादपर जडवादातून व्यक्त होतो. त्याने आपल्या निसर्गवादपर जडवादातून ईश्वर हे मानवी मनाचेच प्रक्षेपण आहे, असे प्रतिपादन केले. हाच प्रक्षेपणकल्पनेचा धागा पुढे ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) याने आपल्या मनोविश्लेषणात खूपच विकसित केला.

फॉइरबाख याच्याच परंपरेतील प्रमुख विचारवंत ⇨ कार्ल मार्क्स  (१८१८–८३) होय. त्याच्या निरीश्वरवादास अनेक बाजू आहेत. एका दृष्टीने तो भावनावादी – मानवतावादी होता आणि मानवाची बाजू घेण्यासाठी ईश्वरकल्पनेस त्याचा विरोध होता. दुसऱ्या दृष्टीने तो बुद्धिवादी होता आणि वैज्ञानिक जडवादाच्या भूमिकेतून तो ईश्वरकल्पना खोडून काढू पहात होता. ह्या दोन्हीही दृष्टिकोनांच्या योगे त्याचा धर्मालाच विरोध होता. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ हे त्याचे विधान प्रसिद्धच आहे. बूर्झ्वांबाबतचा वैचारिक पूर्वग्रह म्हणून तो धर्माकडे पहात होता.

बुद्धिवादाचा स्पर्श न झालेला भावनावादी निरीश्वरवादाचा दृष्टिकोन ⇨ फ्रिड्रिख नीत्शे(१८४४–१९००) याच्या विचारांत पुन्हा अवतीर्ण झालेला दिसतो. नीत्शेच्या गूढ लेखनात तो त्याच्या ‘मॅडमॅन’ कडून असे वदवितो, की ‘ईश्वर मरण पावला, ईश्वर मृतच झाला आहे व आपणच त्याला मारले आहे’. नीत्शेच्या मते ईश्वराचा वध हे फार भयानक कृत्य आहे आणि त्याचे परिमार्जन माणसांनी स्वतःच ईश्वर बनल्यावाचून होणार नाही. नीत्शेने मानवाचे स्थान उन्नत ठेऊन ईश्वरविषयक सर्व प्रकारची श्रद्धा ही अनैतिक आहे, असे प्रतिपादन केले. नीत्शेच्या ह्या विचारातील सूत्र बुद्धिवादी पठडीतील विसाव्या शतकातील काही अस्तित्ववादी प्रकारांत उचलून धरलेले दिसते. उदा., ⇨ झां पॉल सार्त्र (१९०५ –  ) प्रणीत अस्तित्ववाद. सार्त्रच्या मते ईश्वराची संकल्पना ही आत्मविसंगत आहे आणि त्यामुळे ती स्वीकारता येत नाही. ईश्वर नसल्यामुळे मनुष्यच स्वतःच्या मूल्यांचा निर्माता आहे आणि म्हणूनच त्याने चांगले काय आहे, याचा निर्णय स्वतःच्या निर्णयबुद्धीस अनुसरून घेतला पाहिजे. ⇨ आल्बेअर काम्यू (१९१३–६०) याच्या मते ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यात मानवी बुद्धी अथवा विवेक नाकारणे अनुस्यूत आहे. अस्तित्ववादी विचारसरणी ही मूलतः ईश्वरवादी वा निरीश्वरवादी नाही. ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी अशा दोन्हीही प्रकारांतील विचारवंत अस्तित्ववादाचे प्रमुख अध्वर्यू होत. ⇨ आग्यॅस्त काँत (१७९८–१८५७) आणि नंतरच्या प्रत्यक्षार्थवादी विचारवंतांनी ईश्वरविषयक संकल्पना झुगारून देण्याचा प्रयत्न केला. तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी ईश्वरसंकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या निकषणक्षम नसल्यामुळे अनावश्यक आणि निरर्थक असल्याचे मत मांडून ती निकालात काढली. जे. एस्. मिलनेही ईश्वर हा कारणरहित आद्यकारण आहे, ह्या सिद्धांताविरुद्ध मत व्यक्त केले. ईश्वर ही अनिवार्य गोष्ट आहे, याचा नेमका अर्थ काय ? हे समजत नाही, असे बर्ट्रंड रसेलने म्हटले आहे. रसेलने निरीश्वरवादाऐवजी अज्ञेयवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेतील ड्यूईप्रभृती फलप्रामाण्यवादी तत्त्वज्ञांच्या मते मानवी व्यक्तिमत्त्वातील मूल्यांना व स्वयंपूर्णतेला परमोच्च स्थान असलेल्या मानवतावादानुसार ईश्वराचे अस्तित्व अप्रस्तुत ठरते. जे. एन्. फिंडलेने व इतर काही विचारवंतांनी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, हे साधार दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

धर्मश्रद्धा व निरीश्वरवाद : धर्मश्रद्धा व निरीश्वरवाद ही दोन परस्परविरोधी टोके मानण्याचे कारण नाही. डॉस्टोव्हस्कीच्या लिखाणात ह्या दोन्हींचेही मिश्रण आढळते. विसाव्या शतकातील अनेक धर्मविद्यावेत्त्यांनी निरीश्वरवादी विचारांचे मोठ्या उत्स्फूर्तपणे आपल्या लिखाणातून स्वागत केले आहे. मार्टिन बूबर (१८७८–१९६५), निकोलाई ब्यरद्यायेव्ह (१८७४–१९४८), ⇨ झाक मारीतँ (१८८२ –  ), पाउल टिलीख (१८८६–१९६५), डीट्रिख बॉनहॉफर इ. विचारवंतांचा ह्या स्वागत करणाऱ्यांत समावेश आहे. मारीतँ याने तर गुळमुळीत निरीश्वरवाद्यांना विरोध करताना कडव्या निरीश्वरवाद्यांना ख्रिस्ती संतांच्या मालिकेत नेऊन बसविले. अशा कडव्या निरीश्वरवाद्यांमध्ये मानाचा मोठेपणा व औदार्य असते, असे तो जगातील दुष्टतेस वा अशिवास (ईव्हिल) विरोध करताना म्हणतो.

श्रद्धावंतांकडून मान्यता पावलेल्या निरीश्वरवादी विचारसरणीचा एक प्रकार म्हणजे १९६० च्या सुमाराच्या ‘ईश्वराचा-मृत्यू’ (डेथ ऑफ गॉड थिऑलॉजीज) प्रकारातील धर्माविद्या होत. त्यांच्या प्रतिपादनातील नाट्यमय भाषा बाजूला ठेवली, तरी त्यांतील अनेक धर्मविद्या ह्या कृतक (स्यूडो) निरीश्वरवादी असल्याचे सिद्ध झाले आहे. ईश्वर नाकारणे आणि ख्रिस्ताचे अस्तित्व ठामपणे मान्य करणे, यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न हा मुळातच टिकण्यासारखा नाही. अशा धर्मविद्या सर्वसामान्यतः पुन्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ईश्वरसंकल्पनेकडे वळलेल्या दिसतात. ह्या धर्मविद्यांनी एका बाबतीत तरी मूळ बायबलमधील पारंपरिकता पुनरुज्जीवित केल्याचे दिसते. ही पारंपरिकता म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या कुठल्याही विचारसरणीत ईश्वराच्या अनुपस्थितीच्या अनुभवाचा विचार करावाच लागेल आणि ईश्वराचे कुठल्याही प्रकारचे संकल्पनीकरण हे त्याच्या प्रतिमाकरणाकडे जी माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते, त्यापासून मुक्त असावयासच हवे.

कडवा निरीश्वरवाद आता फारसा आढळत नाही तथापि अज्ञेयवाद मात्र अधिक प्रमाणात आढळतो कारण अज्ञेयवादास फारशा सिद्धतेची आवश्यकता असत नाही. मार्क्सवादी पूर्व यूरोपातही पारंपरिक निरीश्वरवादाची प्रवृत्ती अज्ञेयवादाच्या दिशेने चिकित्सा करताना दिसते. अज्ञेयवादात नेहमीच व्यावहारिक जीवनाशी बांधीलकी आवश्यक असल्यामुळे त्यात नेहमीच आपली बांधीलकी आणि धार्मिक श्रद्धा यांच्यातील संबंधांबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते.

भारतीय विचार : सगुण वा निर्गुण अशा दोन्हीही स्वरूपातील ईश्वराची संकल्पना नाकारणारी सैद्धांतिक मते निरीश्वरवादी म्हणता येतील. सगुण ब्रह्म व निर्गुण ब्रह्म अशा स्वरूपाची सत्ता नाकारणारी सैद्धांतिक भूमिका म्हणजेही निरीश्वरवादच होय.

प्राचीन भारतातील चार्वाक वा ⇨ लोकायत दर्शन हे संपूर्णपणे निरीश्वरवादी दर्शन म्हणून सांगता येईल. हे दर्शन उघडच जडवादी दर्शन असून नियतीच्या अंकित असणाऱ्या जडवस्तूच जगाचे नियामक तत्त्व असल्याचे त्यात प्रतिपादन केले आहे. म्हणूनच स्रष्टा वा निर्माता आणि शास्ता ईश्वर त्यात नाकारला आहे. जैन दर्शनातही ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. सृष्टी ही कोणी निर्माण केलेली नाही व तिचा कोणी नाशही करीत नाही. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार आपोआप फळ मिळत असते, असे हे दर्शन मानते. जैनांना सृष्टिकर्ता ईश्वर मान्य नसला, तरी पाप-पुण्य, स्वर्ग-नरक व बंध-मोक्ष ते मानतात आणि मोक्षप्राप्त्यर्थ इंद्रियनिग्रह, महाव्रताचरण, ध्यानधारणा इत्यादींचे पालन ते आवश्यक मानतात. कर्मांचा नाश करून केवलज्ञानप्राप्ती होऊन मोक्षप्राप्ती करून घेतलेला प्रत्येक जीव ‘परमात्मा’च आहे व तो आदर्श व पूज्यही आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. तीर्थंकरादी सिद्ध जीवांचा ते अशा जीवांत अंतर्भाव करतात. सृष्टिकर्त्या ईश्वराविषयी त्यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत. [⟶ जैन दर्शन जैन धर्म].

प्राचीन बौद्ध दर्शनातही ईश्वराचे अस्तित्व हे मोक्षप्राप्त्यर्थ अप्रस्तुत असल्याचे म्हटले आहे. हीनयान पंथात ईश्वररहित धर्मच प्रतिपादन केला आहे परंतु महायान पंथात प्रत्यक्ष बुद्धालाच परमेश्वर मानले. [⟶ बौद्ध दर्शन बौद्ध धर्म].

कपिलाचे मूळ ⇨ सांख्यदर्शन हीनिरीश्वरवादीच आहे. नित्यस्वरूपी आत्म्यावर (पुरुषावर) त्यांची श्रद्धा असली, तरी हे आत्मे वा पुरुष सृष्टिकर्ता ईश्वर नव्हेत. सृष्टीचा कोणी निर्माता वा संहारकर्ता आहे, असे

 पूर्वमीमांसा दर्शन मानत नाही. आधुनिक काळात मानवेंद्रनाथ रॉयप्रणीत ⇨ नवमानवतावादी विचारसणीत निरीश्वरवादी विचार प्रतिपादन केले आहेत.

मूल्यमापन : तत्त्वज्ञानातील अनेक महत्त्वाचे प्रश्न ईश्वराच्या अस्तित्वविषयक प्रश्नाशी निगडित आहेत. तत्त्वमीमांसेच्या (मेटॅफिजिक्स) शक्यताशक्यतेच्या मूलभूत प्रश्नाशीही ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्न निगडित आहे. तत्त्वमीमांसेतील कार्यकारणभावाचे तत्त्व व त्याच्या यथार्थतेची सिद्धता या प्रश्नांशीही हा ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्न संबद्ध आहे. तत्त्वमीमांसेची शक्यता जर प्रस्थापित करता आली नाही आणि तिच्यातील कार्यकारणभावाचे समर्थन करता आले नाही, तर ईश्वराचे अस्तित्व वैज्ञानिक गृहीतकाच्या आधारे सिद्ध करणे, एवढा एकच पर्याय उरतो आणि अशा वैज्ञानिक गृहीतकाचा पडताळा तर पाहता येत नाही.

नीतिकल्पना व धर्म यांच्याशी असलेला निरीश्वरवादाचा संबंधही महत्त्वपूर्ण आहे. निरीश्वरवाद्यांना मूल्ये वा नैतिक व्यवस्था वा सदाचार यांबद्दल आस्था असू शकत नाही,  असा जो पूर्वापार समज आहे तो टिकण्यासारखा नाही. ईश्वर हा मूल्यांचा मूलाधार आहे, असे ज्यांना वाटत नाही त्यांनाही मूल्यांची कदर व सदाचरणाची चाड असू शकते. ईश्वरविरहित सद्धर्मही असू शकेल. उदा., जैन, बौद्ध अशा धर्मांमध्ये ईश्वराचे स्थान मानवाने घेतल्याचे दिसते. त्यांत मानवाच्या कल्याणाची कळकळ व मानवकेंद्रित नीतिमूल्येही प्रकर्षाने आढळतात. तेव्हा धर्म व नीती यांना निरीश्वरवादाचा विरोध असतोच, असे म्हणणे नेहमीच बरोबर असत नाही, ही वस्तुस्थिती आहे. धर्म, नीती, ईश्वरी अस्तित्व यांची आवश्यकता माणसास भासते ती मानवतेच्या व माणसाच्या कल्याणासाठीच, हेही विसरून चालणार नाही. जगात आढळणारी अपूर्णता तसेच दुष्टता वा अशिव यांचा उलगडा ईश्वरी अस्तित्व मान्य करून करणे खरोखरीच कठीण आहे. परिपूर्ण, सर्वशक्तिमान, परमदयाघन ईश्वराने निर्माण केलेल्या जगात वास्तविक अपूर्णता तसेच दुष्टता वा अशिवाचा अंशही असावयास नको पण तो तर प्रकर्षाने आहे म्हणूनच ईश्वराचे अस्तित्व विसंगत ठरते.

मानवाला आपल्या जीवनात नेहमीच गूढानुभव आणि त्यांचा उगम तसेच आपले निर्णय, आपली ध्येये यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच निरीश्वरवाद, अज्ञेयवाद व ईश्वरावरील श्रद्धा ह्या तिन्हीही संकल्पनांबद्दल त्याला निवड करून त्यांपैकी एकीचा स्वीकार करण्याची आवश्यकताही नेहमीच भासत राहणार आहे.

ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक युक्तिवाद धार्मिक तत्त्ववेत्त्यांनी मांडले आहेत परंतु ते युक्तिवाद निर्विवादपणे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू शकत नाहीत [⟶ईश्वरवाद]. हे युक्तिवाद ईश्वरावर श्रद्धा असलेल्यांनाच त्यांची श्रद्धा दृढ करण्यास उपयुक्त ठरतात.

संदर्भ : 1. Altizer, Thomas Hamilton, William, Radical Theology and The Death Of God, Toranto, 1966.

             2. Ayer, A. J. Ed. Logical Positivism, Glencoe, Illionois, 1960.

             3. Borne, Eticnne Trans. Tester, S. J. Atheism, New York, 1961.

             4. Feuerbach, Ludwig, The Essence of Christianity, New York, 1957.

             5. Flint Robert, Anti-Theistic Theories, London, 1878.

             6. Hick John, Ed. The Existence of God, New York, 1964.

             7. Lubac, Henri de Trans. Riley, E.M. The Drama of Atheist Humanism, Cleveland, 1963.

             8. Maritain, Jacques, The Range Of Reason, New York, 1952.

             9. Robinson, R. An Atheist’s Values, Oxford, 1964.

            10. Russell, Bertrand, Religion and Science, London, 1935.

            11. Russell, Bertrand, Why I Am Not a Christian and Other Essays on Related Subjects, London, 1957.

            12. Sartre, Jean Paul, Existentialism, New York, 1947.

सुर्वे, भा. ग.