निराशावाद : (पेसिमिझम). निराशावाद (किंवा त्याला विरोधी असलेला आशावाद) हे काही एक सुव्यवस्थित तात्त्विक दर्शन किंवा तत्त्वप्रणाली नव्हे. तो विश्वाकडे आणि मानवी जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन, एक विशिष्ट जीवनविषयक वृत्ती आहे. सर्वसाधारणपणे विश्वात आणि मानवी जीवनात चांगल्यापेक्षा वाईटाचे, सुख, साफल्य, मांगल्य यांपेक्षा दुःख, वैफल्य, अमांगल्याचे प्राबल्य असते, असे निराशावाद मानतो आणि वाईटाचे हे प्राबल्य तात्कालिक नसते, काही विशिष्ट परिस्थितीत ते निर्माण होते आणि मानवी प्रयत्नाने ही परिस्थिती दूर केली, की हे प्राबल्यही दूर होते असे नसून विश्वाचे व जीवनाचे स्वरूपच मूलतः अमंगलाला पोषक आणि मंगलाच्या विरोधी आहे, असा निराशावादाचा दावा असतो. ⇨ आशावादाची भूमिका ह्याच्या नेमकी विरोधी आहे.

ज्या प्रकारच्या पुराव्यांवर आणि युक्तिवादांवर निराशावादी किंवा आशावादी जीवनदर्शन आतापर्यंत आधारण्यात आले आहे ते संमिश्र स्वरूपाचे आहेत. ⇨ अनुभववादी तत्त्ववेत्ते, म्हणजे वस्तूंचे ज्ञानेंद्रियांद्वारे जे अनुभव आपल्याला येतात, त्यांच्यापासूनच विश्वाच्या स्वरूपाचे ज्ञान आपल्याला होते असे मानणारे तत्त्ववेत्ते, साधारणपणे सुखवादी असतात म्हणजे सुख हीच एकमेव चांगली गोष्ट आहे आणि सुखप्राप्तीत माणसाचे कल्याण असते असे ते मानतात. सुखवादाची परिणती साधारणपणे निराशावादात होते. कारण मानवी आयुष्यात एकंदरीत सुख जवापाडे, दुःख पर्वताएवढे असेच आढळून येते व्यक्तीला किंवा मानवी समाजाला सातत्याने निर्भेळ सुख लाभत रहावे ह्याला विश्वाची रचना अनुकूल नाही, प्रतिकूल आहे असेच म्हणावे  लागते. ह्याच्या उलट, ⇨ विवेकवादी तत्त्वेत्त्यांचा, अस्तित्वाच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान विवेकाधिष्ठित तत्त्वांच्या द्वाराच होते, अनुभवांद्वारा वस्तूंचे यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही, असे मानणाऱ्या तत्त्ववेत्त्यांचा कल जे सत् आहे तेच आनंदमय आहे, अस्तित्वाची खरीखुरी रूपे ही स्वरूपतःच शिवाची, मांगल्याची रूपे असतात पण अनुभवात वस्तूंची जी रूपे आपल्याला प्रतीत होतात त्यांच्यात त्यांचे खरेखुरे स्वरूप झाकलेले असते, असे मानण्याकडे असतो. पाश्चात्त्य परंपरेत ⇨ प्लेटो (इ. स. पू. ४२८–३४८) आणि ⇨ ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) यांच्या तत्त्वज्ञानात हा दृष्टिकोन प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त झाला आहे. प्लेटोच्या मताप्रमाणे परिपूर्ण आणि स्वतःच कल्याणरूप असलेले असे तत्त्व−द आयडिया ऑफ द गुड–हेच विश्वाचे आधारभूत आणि पूर्णपणे वास्तव असे तत्त्व आहे. ह्या तत्त्वापासून अस्तित्वाची विशिष्ट रूपे किंवा सद्रूपे–उदा., घटत्व, अश्वत्व इ.–निष्पन्न होतात आणि ह्या तत्त्वात ती सहभागी होत असल्यामुळे तीही स्वतःच शिवस्वरूप किंवा कल्याणस्वरूप असतात. इंद्रियगोचर वस्तू ज्या प्रमाणात ह्या सद्रूपात सहभागी होतात किंवा ह्या सद्रूपांसारखी असतात, त्या प्रमाणात त्यांचे स्वरूप चांगले असते. प्लेटोच्या ह्या तत्त्वमीमांसेपासून निष्पन्न झालेला सर्वसामान्य सिद्धांत असा, की विश्व हे सत्तेच्या अधिकाधिक परिपूर्ण आणि म्हणून अधिकाधिक श्रेष्ठ अशा रूपांची एक मालिका किंवा श्रेणी आहे सत्तेची ही रूपे हीच शिवाचीही रूपे असतात आणि ह्या श्रेणीरूप व्यवस्थेचा आधार, उगमस्थान आणि परमोच्च बिंदू म्हणजे परिपूर्णपणे सत् आणि परिपूर्णपणे शिव असलेले असे तत्त्व असते. ह्या सिद्धांताची दुसरी बाजू अशी, की सत्तेच्या ह्या कमीअधिक परिपूर्ण पातळ्या मानवी व्यक्तिमतत्त्वात प्रतिबिंबित झालेल्या असतात. विवेकशक्ती माणसाला परिपूर्ण सद्रूपाशी जोडते, तर त्याच्या इच्छा, वासना त्याला कनिष्ठ इंद्रियगोचर वस्तूंशी जोडतात. विवेकाने आपल्या स्वाभाविक इच्छावासनांमध्ये सुसंवाद साधून माणसाला स्वतःचे परिपूर्ण स्वरूप साधता येते आणि ह्याच्यात माणसाचे साफल्य आणि कल्याण असते. हे अर्थातच आशावादी तत्त्वज्ञान आहे.

निराशावाद व आशावाद यांचे दुसरे उगमस्थान धार्मिक अनुभव आणि तत्त्वज्ञान यांच्यात आढळते. आत्म्याची मुक्ती किंवा तारण हे धर्माचे साध्य असते. ह्या साध्यात असे अभिप्रेत असते, की संसार, लौकिक जीवन हे दुःखमय, पापमय, अमंगल असते आणि त्याच्यापासून आत्म्याची मोकळीक करण्यात, आत्म्याला वाचविण्यात माणसाचे परमोच्च कल्याण असते. ही धर्माची निराशावादी बाजू झाली. पण माणूस नैतिक व धार्मिक साधनेने मुक्ती, निर्वाण, ईश्वराशी सायुज्यता प्राप्त करून घेऊ शकतो ह्या मंगल, आनंदमय किंवा शांतीने ओतप्रोत भरलेल्या अवस्थेचा अनुभव ह्या जीवनातसुद्धा माणूस घेऊ शकतो, ही धर्माची शिकवण म्हणजे आशावादी बाजू. वेगवेगळ्या धर्मांत निराशावाद व आशावाद यांचे वेगवेगळ्या प्रमाणातील मिश्रण आढळते पण कोणत्याही धर्मात ह्या दोन्ही बाजू अनिवार्यपणे आढळतात.

सामाजिक परिस्थिती आणि घटना यांच्यामुळेही निराशावादी किंवा आशावादी वृत्ती स्थिर आणि दृढ व्हायला साहाय्य होते. उदा., सतराव्या शतकात यूरोप अनेक भीषण युद्धांनी गांजला होता आणि प्रस्थापित धर्म, राजकीय व सामाजिक व्यवस्था यांना आव्हाने देणारी अस्वस्थता सर्वत्र आढळून येत होती. ह्या परिस्थितीत माणसाच्या रानटी आणि उच्छृंखल प्रवृत्तींमुळे संस्कृती व सुव्यवस्था ही नेहमीच धोक्यात असते सुखी, सुव्यवस्थित, सुरक्षित जीवन मोठ्या प्रयत्नाने आणि जागरूकपणे टिकवून धरावे लागते ह्या प्रयत्नात यशापेक्षा अपयश येण्याचीच शक्यता जास्त असते, पण ते करीत राहणे आपले कर्तव्य आहे. ह्या आशयाचा संयत निराशावाद व्हॉल्तेअर, गिबन, जेफर्सन इ. विचारवंतांनी स्वीकारलेला आढळतो.

विज्ञानातील उपपत्तीमुळेही निराशावाद आणि आशावाद यांना चालना मिळू शकते. वैज्ञानिक दृष्टिकोनाप्रमाणे भौतिक विश्व हे मानवी हित किंवा प्रगती यांच्या संबंधात अपक्ष असते, म्हणजे निसर्गातील घटना कार्यकारणनियमांना अनुसरून अटळपणे घडत असतात. माणसाच्या कल्याणाशी त्यांचा काही संबंध नसतो. फार तर ह्या नियमांच्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या दृष्टीने इष्ट ठरतील अशा घटना आपण काही मर्यादांत घडवून आणू शकतो, एवढेच विज्ञानाचे ह्या बाबतीत म्हणणे असते. पण विशिष्ट वैज्ञानिक उपपत्तीमुळे निराशावाद किंवा आशावाद यांना अनुकूल किंवा प्रतिकूल वाटणारा पुरावा लाभू शकतो. उदा., डार्विनप्रणीत उत्क्रांतिवादी उपपत्तीचा दुहेरी परिणाम घडून आलेला दिसतो. जीवसृष्टीत जो विकास घडून आलेला आढळतो त्याच्यामागे कोणतेही उद्दिष्ट किंवा प्रयोजन नाही, ह्या विकासामागे प्राण्यांत घडून आलेले यादृच्छिक बदल आणि भीषण व यातनामय जीवनकलह आहे, ह्या विचारामुळे निराशावादाला पुष्टी मिळाली. पण उलट, निसर्गात विकासाचा एक क्रम आढळतो, मानव ह्या उत्क्रांतीचे एक फळ आहे. मानवी समाजही असाच उत्क्रांत होत जाऊन अखेरीस परिपूर्ण आणि सुखमय अशी अवस्था अपरिहार्यपणे गाठेल, ह्या आशावादी मतालाही ह्या उपपत्तीमुळे पाठिंबा मिळाला.

पाश्चात्त्य परंपरेच्या संदर्भात पाहता ग्रीक, ज्यू आणि ख्रिस्ती ह्या तिन्ही धर्मांत निराशावादाची गडद झाक आढळते. होमरच्या देवदेवता आनंदी, शुभंकर, मानवी जीवननाट्यात आत्मीयतेने सहभागी होणाऱ्या अशा दिसत असल्या, तरी होमरच्या दृष्टीने मानवी जीवनाची एक काळी बाजू आहे. श्वासोच्छ्‌वास करणाऱ्या साऱ्या  प्राणिमात्रांत माणसाइतका दुःखपीडित कोणीही नाही, असे होमरचे वचन आहे. जुन्या करारातील जॉबची कथा किंवा प्रवचनकाराची वचने घेतली, तर असाच खोल निराशावादी दृष्टिकोन त्यांच्यात प्रकट झालेला आढळतो. ख्रिस्ती धर्मश्रद्धेप्रमाणे ईश्वराच्या प्रसादामुळे माणसाच्या आत्म्याचे तारण होते, देवाच्या राज्यात तो चिरंतन प्रेममय आणि आनंदमय जीवन जगू शकतो, हे जितके सत्य आहे, तितकेच माणसाचे स्वाभाविक जीवन पापमय व अमंगल आहे आणि ज्या ईश्वरी प्रसादामुळे आत्म्याचे तारण होते त्याचा लाभ काही थोड्याच माणसांना होतो आणि इतर सर्व नरकाला जातात, हेही सत्य आहे.


आपण वर पाहिले आहे त्याचप्रमाणे प्लेटो व ॲरिस्टॉटल ह्यांचे तत्त्वज्ञान मूलतः आशावादी आहे. द्रव्य किंवा सामग्री आणि रूप किंवा आकार ही दोन मूलभूत, परस्परविरोधी पण परस्परपूरक तत्त्वे ग्रीक तत्त्वज्ञानाला पायाभूत आहेत. रूप हे व्यवस्थेचे, सुसंवादाचे तत्त्व आहे आणि विवेकशक्ती त्याचे ग्रहण करते. मूलतः निराकार असलेल्या द्रव्याला जेव्हा रूप प्राप्त होते तेव्हा प्रत्यक्ष अस्तित्व, विशिष्ट वस्तू सिद्ध होते. विश्व म्हणजे कमीअधिक परिपूर्ण रूपांनी आकारित असलेल्या अस्तित्वांची श्रेणी असते. हे आकार ज्याप्रमाणे अस्तित्वाची रूपे असतात. त्याप्रमाणे शिवाची, चांगुलपणाची, श्रेयाचीही रूपे असतात. प्रत्येक पातळीवरील अस्तित्वाला त्याचे उचित ते रूप पूर्णपणे लाभण्यात, त्या अस्तित्वात ते पूर्णपणे प्रकट होण्यात त्या अस्तित्वाचे श्रेय असते. तेव्हा विश्व हे ज्याप्रमाणे अधिकाधिक परिपूर्ण अशा अस्तित्वांची श्रेणी आहे, विवेकशक्ती हे माणसाचे रूप आहे आणि नैसर्गिक प्रेरणा, वासना हे त्याचे द्रव्य आहे. ह्या प्रेरणा-वासनांत सुसंवाद साधून, विवेकाला अनुसरून त्यांची एक सुव्यवस्था निर्माण करून माणूस स्वतःचे श्रेय साधतो. विश्व मूलतः श्रेयस्वरूप, शिवस्वरूप आहे आणि माणूस आपले श्रेय साधू शकतो ह्या सिद्धांतावर आधारलेले हे तत्त्वज्ञान आशावादी आहे. पण विशेषतः प्लेटोमध्ये निराशावादी सूरही आढळतो. प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे विवेकाचे रूप आपल्या जीवनाला देणे, ही गोष्ट कष्टसाध्य आहे फारच थोड्या व्यक्तींना आणि समाजांना ती साधते. सर्वसाधारणपणे व्यक्ती आणि समाज अविवेकी जीवन जगत असतात आणि आपल्या श्रेयापासून वंचित असतात. वासना आणि विवेक, स्वाभाविक प्रेरणा आणि व्यवस्था, निराकार द्रव्य आणि रूप ह्यांच्या सुसंवादी समन्वयात वैयक्तिक आणि सामाजिक श्रेय शोधले पाहिजे, ह्या प्लेटोच्या सिद्धांताचा खोल पगडा नंतरच्या विचारवंतांवर आढळून येतो.

सुसंस्कृत, सुव्यवस्थित, आटोपशीर ग्रीक नगरराज्याचे नागरिक असलेल्या प्लेटो, ॲरिस्टॉटल यांसारख्या तत्त्ववेत्त्यांना सामाजिक जीवनाला सुनियमित असे रूप देता येते आणि अशा सामाजिक जीवनात सहभागी होऊन व्यक्तीला आपले साफल्य साधता येते, असा अनुभव होता. पण ग्रीक नगरराज्ये अफाट साम्राज्यात विलीन झाल्यानंतर व्यक्तीला विश्वाच्या पसाऱ्यात एकाकीपणे आपले श्रेय शोधावे लागले. ⇨ स्टोइक मताप्रमाणे विश्वात जे असते किंवा घडते, ते विवेकशील तत्त्वाला अनुसरूनच असते किंवा घडते आणि म्हणून ते चांगले, शिवस्वरूप असते आणि ते चांगले म्हणून स्वीकारण्यात माणसाचे शहाणपण आणि कल्याण असते. ⇨ एपिक्यूरस मताप्रमाणे विश्वाची भीती आणि सुखांची हाव सोडून देऊन, चित्ताची सुखद समधातता साधण्यात व्यक्तीचे श्रेय असते. ह्या दोन्ही मतांत समान असलेले सूत्र असे, की व्यक्तीने स्वयंपूर्ण असण्यात, सुखासाठी स्वतःपलीकडच्या गोष्टींवर, घटनांवर अवलंबून न राहण्यात तिचे श्रेय असते. स्टोइक मत व्यक्तीला विश्वाशी एकरूप बनवून तिची स्वयंपूर्णता साधते कारण मग व्यक्तीला परके असे काही राहत नाही. एपिक्यूरसचा पंथ व्यक्तीच्या गरजा शक्य तितक्या संकुचित करून ही स्वयंपूर्णता साधतो. ह्या मतांत आशावाद (व्यक्तीला स्वतःचे सुख साधता येते हा सिद्धांत) आणि निराशावाद (विश्वाची रचना श्रेयसंपादनाला अनुकूल नाही हा सिद्धांत) ह्यांचे चमत्कारिक मिश्रण आहे. विश्वाच्या चिरंतन व्यवस्थेचा एक अंश मानले गेलेले रोमन सम्राज्य जेव्हा रानटी टोळ्यांच्या हल्ल्यांमुळे कोसळले, तेव्हा पाश्चात्त्य मनाला बसलेला धक्का ⇨ सेंट ऑगस्टीन (३५४–४३०) याच्या विचारांत प्रतिबिंबित झाला आहे. ह्या मताप्रमाणे आत्म्याचे तारण किंवा पतन, ईश्वरी प्रसाद किंवा पापमय जीवन यांनाच चिरंतन अर्थ असतो राज्यसंस्था जी व्यवस्था घालून देते ती इष्ट असली, तरी माणसाच्या चिरंतन कल्याणाशी तिचा संबंध नसतो. ऑगस्टीनच्या मताप्रमाणे माणसाचे कल्याण लौकिक जीवनाच्या पलीकडे असलेल्या जीवनात असते. ऐहिक, लौकिक जीवनाविषयीचा हा एक खोल निराशावाद होय.

मध्ययुगात ख्रिस्ती धार्मिक तत्त्वज्ञानाचा बळकट पगडा जीवनाच्या सर्व अंगांवर होता. पण चर्चच्या प्रभुत्वाखालील मध्ययुगीन व्यवस्था जेव्हा मोडकळीला आली आणि प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला, तेव्हा यूरोपमध्ये वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या एका वेगळ्या मांडणीचा प्रारंभ झाला. व्यक्तिवादावरील भर, व्यक्तिस्वातंत्र्याची मागणी, राजसत्तेचे नियंत्रण करण्याची समस्या, वैज्ञानिक ज्ञानाचा नवीन आदर्श, विज्ञानावर आधारलेल्या तंत्रज्ञानाने मानवी सुख साधण्याची कल्पना, धर्मश्रद्धेला आणि नीतीला विवेकाधिष्ठित तत्त्वांचा पाया देण्याची मागणी, ही ह्या काळात घडून आलेल्या विचारमंथनाची वैशिष्ट्ये होती.

विवेकवाद ही ह्या विचारमंथनातून उद्‌भवलेली एक विचारधारा होती. ⇨ रने देकार्त (१५९६–१६५०) व ⇨ बारुक स्पिनोझा (१६३२–७७) ह्यांनी पुरस्कारलेल्या विवेकवादी तत्त्वज्ञानाची परिणती ⇨ जी. डब्ल्यू. लायप्निट्स (१६४६–१७१६) याच्या तात्त्विक दर्शनात झाली. आशावादी तत्त्वज्ञानाचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ह्या दर्शनाकडे पाहण्यात येते. प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले हे जग, शक्य असलेल्या सर्व जगांतील सर्वोत्कृष्ट जग आहे, हे त्याचे मत प्रसिद्ध आहे. ह्या तत्त्वज्ञानाचे सार असे, की परिपूर्ण असा ईश्वर अनिवार्यपणे अस्तित्वात असतो आणि पूर्णपणे सत्स्वरूप असलेला ईश्वर जे जग निर्माण करतो, ते शक्य असलेल्या वेगवेगळ्या जगांतील सर्वोत्कृष्ट जगाची निवड करून करतो. ह्या जगात जे अशिव, अमंगल आहे असे वाटते, तो एक आभास असतो कारण जगाच्या उत्कृष्टतेतील तो एक अनिर्वाय असा घटक असतो. आपल्या मर्यादित दृष्टीला जे अशिव आहे असे वाटते त्याला जर अस्तित्व नसते, तर त्यामुळे जग कमी उत्कृष्ट ठरले असते. लायप्निट्‌सचे हे आशावादी तात्त्विक दर्शन यूरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये प्रभावी ठरले. बॉलिंगब्रुक (१६७८–१७५१), पोप ह्यांनी आपल्या लिखाणातून त्याचा अनुवाद केला आहे. त्या काळच्या श्रेष्ठता-कनिष्ठतेवर आधारलेल्या समाजरचनेचे समर्थन करायला हे दर्शन उपयुक्त होते.

ह्या काळातील दुसरी प्रभावी विचारधारा अनुभवाधिष्ठित विज्ञानावर आधारलेली होती. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सृष्टीविषयीची सत्ये, निसर्गनियम शोधून काढता येतात व ह्या पद्धतीचा वापर करून मानवी जीवनाचे, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचे, नियमही शोधून काढता येतात. अंधश्रद्धेने स्वीकारलेल्या आणि परंपरेने चालत आलेल्या असत्य समजुतींचे खंडन वैज्ञानिक ज्ञानाच्या साहाय्याने करता येते आणि मग मानवी प्रगतीला त्यांचा अडथळा होत नाही. भौतिक विज्ञानावर आधारलेल्या भौतिक तंत्रज्ञानाने जीवनाला आवश्यक त्या सुखसोयी निर्माण करता येतात. मानसिक आणि सामाजिक विज्ञानावर आधारलेल्या सामाजिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजाची योग्य दिशेने पुनर्रचना करता येते. म्हणजे ज्या प्रकारच्या समाजरचनेमुळे आणि ज्या प्रकारची नीती अनुसरल्यामुळे समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींना जास्तीत जास्त सुख लाभेल, त्या प्रकारची समाजरचना आणि नीती प्रस्थापित करता येते. व्यक्तींना आवश्यक ते शिक्षण देऊन योग्य त्या नैतिक कल्पना त्यांच्या वृत्तीत रुजविता येतात. अशा रीतीने समाज अधिकाधिक सुखी होत जातो, मानवजातीची प्रगती होत जाते. हा आशावाद अठराव्या शतकातील प्रबोधनाचा गाभा होता.

पण अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी उदयाला आलेल्या स्वच्छंदतावादातून (रोमँटिसिझम) एक पूर्णपणे वेगळी वृत्ती प्रकट झालेली आढळते. गटे, हाइन, बायरन ह्यांच्या लिखाणातून मानवी परिस्थितीविषयीची एक तीव्र व्यथा, खोल निराशा आविष्कृत झाली आहे. व्यक्तीच्या एकाकीपणातून, इतर व्यक्तींशी आणि विश्वाशी अर्थपूर्ण संबंध जोडण्याच्या तिच्या असमर्थतेतून ही व्यथा निर्माण होते. जर्मन ⇨ चिद्‌वादी तत्त्ववेत्त्यांनी–फिक्टे, शेलिंग व हेगेल ह्यांनी−ह्या निराशावादाला उत्तर देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या दिशांनी केला. ह्यांमधील ⇨ जी. डब्ल्यू. एफ्. हेगेल (१७७०–१८३१) याचे उत्तर सर्वांत अधिक प्रभावशाली ठरले. आहे. हेगेलने प्लेटो–ॲरिस्टॉटलचे सूत्र परत उचलले. अस्तित्वाचे दोन परस्परविरोधी पण परस्परपूरक असे घटक असतात. पहिला, अविवेकी सामग्री आणि दुसरा, विवेकशील रूप. अविवेकी सामग्रीला विवेकशील रूप लाभल्यानेच वस्तूचे मूर्त अस्तित्व सिद्ध होते, तिला आपली परिपूर्ण अवस्था, श्रेय प्राप्त होते. पण ह्या प्रक्रियेला एक नकारी, शोकमय बाजू अपरिहार्यपणे असते. प्रारंभी आणि प्रथमदर्शनी सामग्री आणि रूप यांच्यात विरोध असतो ह्या विरोधाचे निराकरण करून, त्या सामग्रीचे स्वतःचे केवळ सामग्री म्हणून जे स्वरूप असते ते नष्ट करून, त्याच्या जागी विवेकशील रूप प्रस्थापित करून, म्हणजे ह्या विवेकशील रूपात त्या सामग्रीला सामावून घेऊन वस्तू आपली परिपूर्ण अवस्थेत विलीन झाल्याने सामग्रीला आपले साफल्य, श्रेय लाभते हे जसे खरे, त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या स्वरूपाचे बलिदान करूनच हे श्रेय तिला साधता येते हेही खरे आहे. हेगेलच्या म्हणण्याप्रमाणे विवेकशील तत्त्व विश्वात अंतर्हित असते आणि विश्वव्यापारातून आणि मानवी समाजाच्या इतिहासातून ते अधिकाधिक पर्याप्तपणे आविष्कृत होत जाते. ही हेगेलच्या तत्त्वज्ञानाची आशावादी बाजू.  मानवी समाजाच्या इतिहासात श्रेयाचा, परिपूर्णतेचा अधिकाधिक पर्याप्त असा आविष्कार अपरिहार्यपणे होत राहतो. पण ह्या प्रगतीला एक अनिवार्य अशी शोकमयतेची, व्यथेची बाजू असते. श्रेयाची, साफल्याची अनेक रूपे नष्ट करूनच ही परिपूर्णता साधली जाते. अर्थात ही नष्ट होणारी रूपे अपूर्ण असली, तरी श्रेयाची रूपे असतात. ही हेगेलच्या तत्त्वज्ञानाची निराशावादी बाजू. बालपणीचा निरागस पण भंगुर आनंद मागे सारून, मृत्यूच्या अनुभवावर मात करूनच ज्याप्रमाणे प्रौढपणीचे जीवन जगता येते, त्याप्रमाणे मानवी अस्तित्त्वाची, मानवी इतिहासाची ही शोकमय बाजू पचवूनच मानवाला साफल्य साधता येते. पण हे साफल्य साधता येते आणि साधले जाते ही मूलभूत महत्त्वाची गोष्ट आहे.


मार्क्सवादी दर्शन हे हेगेलच्या दर्शनाचे एक अपत्य आहे. ह्या दर्शनाप्रमाणे मानवाची प्रकृती मानवी इतिहासात क्रमशः प्रकट होत जाते, तिची क्रमशः परिपूर्तीही होत जाते आणि अखेरीस साम्यवादी समाज, ज्याच्यात प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र असेल आणि तिचे परिपूर्ण स्वातंत्र्य इतर प्रत्येक व्यक्तीच्या परिपूर्ण स्वातंत्र्याशी पूर्णपणे सुसंगत असेल असा समाज प्रस्थापित होणे, हे इतिहासाचे अटळ भवितव्य आहे. पण ह्या आशावादी तत्त्वज्ञानाला, हेगेलच्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच, निराशावादाची एक काळोखी बाजू आहे. इतिहासाची वाटचाल वर्गकलहातून होत असते, अगदी प्राथमिक अवस्थेतील समाज सोडला, तर इतिहासातील प्रत्येक समाजाचे परस्परविरोधी वर्गात विभाजन झालेले असते, उत्पादनाच्या साधनांची मालकी असलेला वर्ग श्रमिकांच्या वर्गाची पिळवणूक करीत असतो आणि ह्या वर्गांच्या संघर्षातून इतिहासाचा विकास होत जातो. मानवजातीच्या अंतिम परिपूर्तीसाठी व इतिहासातून क्रमशः होत जाणाऱ्या तिच्या आंशिक परिपूर्तीसाठी दारिद्र्य, दुःख, अन्याय, संघर्ष, क्रांती ह्यांची फार मोठी किंमत द्यावी लागते. हेगेलच्या दर्शनामागची प्रेरणा धार्मिक आहे आणि ⇨ कार्ल मार्क्स (१८१८–८३) याने ह्या धार्मिक प्रेरणेला इहवादी आशय दिला. ऐहिक जीवनाविषयीचा निराशावाद, पारलौकिक पूर्तीसाठी करावयाच्या साधनेत रूपांतर करता येते ही आशावादी श्रद्धा, ही धार्मिक दर्शनाची जी वैशिष्ट्ये असतात ती हेगेल व मार्क्स ह्यांच्या तत्त्वज्ञानात आढळतात [→ मार्क्सवादी].

निराशावादाचा आधुनिक काळातील सर्वांत प्रख्यात पुरस्कर्ता ⇨ ऑर्थर शोपेनहौअर (१७८८–१८६०) हा होय. त्याच्या विचारांवर भारतीय तत्त्वज्ञानाचा, विशेषतः उपनिषदांचा व बौद्ध तत्त्वज्ञानाचा, खोल पगडा आहे. हेगेलच्या म्हणण्याप्रमाणे विश्व हा विवेकशक्तीचा आविष्कार आहे आणि विश्वाच्या प्रक्रियेतून विवेक अधिकाधिक पर्याप्तपणे मूर्त होत जातो. प्रबोधनाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे निसर्गाचे आणि मानवाचे सम्यक् वैज्ञानिक ज्ञान जसेजसे उपलब्ध होत जाईल, तसतशा सामाजिक संस्था आणि व्यक्तींचे आचरण अधिकाधिक विवेकशील बनत जाईल आणि समाज व व्यक्ती अधिकाधिक सुखी बनतील. शोपेनहौअर आशावादाचे हे दोन्ही प्रकार नाकारतो. विश्वाच्याघडणीत आणि मानवी जीवनात विवेकाला असे मध्यवर्ती स्थान नसतेच. मूल, प्राथमिक अस्तित्त्व म्हणजे एक आंधळी, दुर्दम्य, अस्तित्वासाठी आसुसलेली, अस्तित्वाला चिकटून राहणारी इच्छाशक्ती आहे. विश्व हा तिचा आविष्कार आहे आणि माणूस हा तिचा अंश आणि आविष्कार आहे. माणसाचे वरवर पाहता विवेकशील वाटणारे वर्तनही ह्या आंधळ्या, स्वार्थी, चिवट इच्छाशक्तीतून निर्माण झालेले असते. ह्या इच्छाशक्तीच्या तावडीत आपण सारे असतो आणि तिने प्रेरित होऊन कृत्ये करीत असतो, दुःख भोगीत असतो. सामाजिक संस्थांमध्ये सुधारणा करणे, अधिक भौतिक सुखसोयी उत्पन्न करणे, हा ह्या दुःखावरील उपाय नव्हे कारण ह्या दुःखाचे मूळ बाह्य परिस्थितीत नाही, तर मानवी अस्तित्वाच्या बुडाशी आहे. जीवन दुःखमय आहे हे जाणूनही माणसाची जगण्याची हाव शमत नाही कारण तो इच्छाशक्तीच्या पाशात अडकलेला असतो. पण विश्वाचा दृश्य पसारा हा केवळ भास आहे, आंधळी इच्छाशक्ती हेच मूळ अस्तित्त्व आहे, ही गूढ दृष्टी प्राप्त होऊन माणूस जेव्हा पूर्णपणे विरक्त होतो, तेव्हाच त्याची इच्छाशक्ती शमते, तो मुक्त होतो. शोपेनहौअरनंतर फोन हार्टमान ह्या तत्त्ववेत्त्यानेही अशाच भूमिकेतून निराशावादाचा पुरस्कार केला आहे. ⇨ फ्रीड्रिख नीत्शे (१८४४–१९००) याने शोपेनहौअरच्या निराशावादाचा प्रतिवाद केला. इच्छाशक्तीचे मूलभूत स्थान नीत्शे मान्य करतो, दुःखाचे व्यापक अस्तित्वही तो स्वीकारतो पण विरक्ती आणि इच्छाशक्तीचे शमन ह्या मूल्यांचा तो अव्हेर करतो. आपल्या संकल्पांना दृढता आणण्यासाठी जी साधना करावी लागते, ती दुःखमयच असते पण ह्या दुःखाची किंमत देऊन निर्मितीशील जीवनाचा आनंद साजरा करण्यात जीवनाचे सार्थक आहे, असे तो मानतो. उथळ आशावाद आणि उथळ निराशावाद ह्यांच्या पलीकडे जाऊ पाहणाऱ्या जीवनदृष्टीचा नीत्शेने पुरस्कार केला आहे. ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९४०) याच्या मनोविश्लेषणापासून काढण्यात आलेले निष्कर्षही निराशावादाला अनुकूल आहेत. शोपेनहौअरप्रमाणेच फ्रॉइडही मानवी वर्तन एका अजाण आंधळ्या प्रेरणेचा–कामप्रेरणेचा–आविष्कार असते असे मानतो. फ्रॉइडच्या म्हणण्याप्रमाणे मानवी दुःखाचे मूळ त्रिविध आहे. एकतर, माणूस निसर्गापुढे हतबल असतो त्याचे शरीर जीर्ण होत जाते व मरते आणि माणसाची अजाण प्रेरणा आणि तिच्यातून निर्माण होणाऱ्या  इच्छा–वासना ह्यांची सामाजिक प्रथा, चालीरीती, नीतिनियम ह्यांच्याशी संघर्ष येतो. पहिल्या दोन कारणांवर काही इलाज नाही पण मनोविश्लेषणाने शोधून काढलेल्या तंत्राचा वापर करून आपण आपल्या प्रेरणांचे खरे स्वरूप समजून घेतले, तर त्याच्याशी अनुरूप अशी नीतिमत्ता तसेच सांस्कृतिक आदर्श निर्माण करून दुःखाचे एक कारण सौम्य करता येईल. पण ही गोष्ट साधणे अतिशय कठीण आहे.

विसाव्या शतकाच्या दोन महायुद्धांच्या उत्पातामुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड प्रगतीतून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पारंपारिक आदर्श ढासळून पडले आहेत. मानवी जीवनात सुख आणि दुःख किंवा चांगले आणि वाईट ह्यांच्यातील कशाचे प्राबल्य अधिक आहे, ह्या स्वरूपात जरी निराशावादाची समस्या उपस्थित करण्यात आली नाही, तरी मानवी अस्तित्वाचे खरेखुरे स्वरूप काय आहे, विश्वाचा आणि माणसाचा संबंध काय आहे आणि ह्यांना अनुरूप असलेल्या सम्यक् जीवनाचे स्वरूप कसे असेल, हे प्रश्न तीव्र आशंकेने विचारण्यात येत आहेत. माणूस एकाकी असतो, स्वतः होऊन मुक्तपणे केलेल्या निर्णयाच्या आधारे जगण्याचा असह्य भार त्याच्यावर असतो, ह्या गोष्टींवर भर देणारा ⇨ अस्तित्ववाद हे स्वच्छंदवादाने चालना दिलेल्या निराशावादाच्या परंपरेतील जीवनदर्शन आहे, असे म्हणता येईल.

रेगे, मे. पुं.

निराशावाद, भारतीय : भारतीय तत्त्वज्ञाने ही मुख्यतः धार्मिक तत्त्वज्ञाने आहेत. या तत्त्वज्ञानांमध्ये कर्मसिद्धांत हा सर्वांचा मूलभूत सिद्धांत आहे. कर्म म्हणजे पाप व पुण्य. पापांमुळे दुःख व पुण्यामुळे सुख प्राप्त होते. मनुष्यजन्म  हा पाप व पुण्य यांची समान संख्या झाल्यावर प्राप्त होतो. मुनुष्याखालच्या जीवयोनींमध्ये दुःखाचे आधिक्य असते, मनुष्ययोनीमध्ये सुखे व दुःखे साधारणपणे समानच असतात आणि मनुष्यापेक्षा वरच्या देव, गंधर्व, अप्सरा इ. योनींमध्ये सुख अधिक व दुःख कमी असते.

परंतु सुखे वा दुःखे ही कर्मजन्य असल्यामुळे ती नाशिवंत असतात, म्हणून सुखेसुद्घा एक प्रकारे नाशिवंत असल्यामुळे अत्यंत सुखी व्यक्तींना देखील ती अस्वस्थ व चिंतातुर  करतात. म्हणून विवेकी मनुष्याच्या दृष्टीने सर्व जीवन दुःखमयच असते कारण शांत, निर्वेध व नित्य असे सुख कोणासच प्राप्त होत नाही. जो जो जन्माला येतो, तो तो केव्हा तरी मरतोच म्हणून मरणाचे भय देवालाही चुकविता येत नाही. म्हणून जन्ममरणपरंपरा म्हणजेच संसार हा दुःखमय आहे, असा विचार प्रथम प्राचीन उपनिषदांमध्ये डोकावला. महावीरासारखे जैन तीर्थंकर व विशेषतः भगवान बुद्ध यांनी संसार म्हणजे जन्ममरणपरंपरा ही दुःखमयच आहे, असा सिद्धांत सांगून जन्ममरणपरंपरेतून म्हणजे भवदुःखातून सुटका अर्थात निर्वाण वा मुक्ती हेच शाश्वत सुख किंवा शाश्वत शांती होय व हेच जीवात्म्याचे अंतिम साध्य होय, असा मूलभत विचार प्रतिपादिला. या संसारालाच भवसागर म्हणतात.

हा संसारसिद्धांत वेदान्त, न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, जैन व बौद्ध या दर्शनांनी संपूर्णपणे मान्य केला परंतु या सर्व दर्शनांनी वा भारतीय शैव, वैष्णव इ. उच्च धर्मसंप्रदायांनी योगमार्गाने समाधी प्राप्त झाल्यावर किंवा ईश्वरभक्तीने ईश्वराची संपूर्ण कृपा संपादन केल्यावर धर्म, ज्ञान, वैराग्य हे गुण निरपवाद रीतीने साधकाला प्राप्त होतात व तो सिद्ध पुरुष होतो या सिद्ध किंवा योगी स्त्रीपुरुषांना अष्टसिद्धी प्राप्त होतात, त्यामुळे त्यांचे जीवन कल्पवृक्ष किंवा कामधेनू वा चिंतामणीप्रमाणे बनते कसलेही दुःख प्राप्त होत नाही, कसलेही भय राहत नाही, मृत्यूवर विजय प्राप्त होतो, जे जे पाहिजे ते प्राप्त करून घेता येते असे मानले. याचा अर्थ असा, की ईश्वराच्या सर्व शक्ती त्याला प्राप्त होतात. म्हणजे समाधी, भक्ती किंवा अंतिम साक्षात्कार यांच्या ठिकाणी एक प्रकारची अमर्याद जादूची शक्ती असते, असे मानले जाते होते.

भगवद्‌गीतेमध्ये सुख-दुःख, जय-पराजय, लाभ-हानी यांच्या बाबतीत अनासक्ती प्राप्त झालेला स्थितप्रज्ञ हा जिवंत असतानाच परम शाश्वत शांती प्राप्त करून घेऊ शकतो, असा सिद्धांत मांडला आहे. अलिप्तता किंवा अनासक्ती अंगी बाणलेला मनुष्य शाश्वत आनंदाचा भोग घेऊ शकतो. तो संसारात असला, अनेक व्यावहारिक उलाढाली करीत असला, तरी त्याची सर्वे कर्मे शुद्ध सात्त्विक बनतात, असा सिद्धांत भगवद्‌गीतेत मांडलेला आहे.

उपनिषदांच्या पूर्वी वेदकाली वैदिक समाजात आणि मंत्रकर्त्या ऋषींमध्ये निराशावाद नव्हता. पशुपालन, कृषिकर्म, युद्ध, राज्यशासन आणि यज्ञादी कर्मकांड आचरत असताना या भौतिक विश्वाबद्दल, त्यांच्यामध्ये खूप आदर आणि आशा वसत होती, असे ऋग्वेदातील ऋचांवरून दिसते. पिता-माता, पति-पत्नी, पुत्रपौत्र, बांधव व मित्र यांच्या संगतीत ऐहिक कर्मे आणि पारलौकिक कर्मे करण्यात त्यांना फार आनंद होत होता. वेदकालीन जीवन उत्साह, ईर्षा आणि शौर्य यांनी भरलेले दिसते. आकाश आणि पृथ्वी याला पिता आणि माता समजून त्यांची ते पूजा करीत होते. सूर्य, चंद्र, वायू, पर्जन्य, उषःकाल यांच्यामध्ये त्यांना दिव्यत्वाचे दर्शन होत होते. संतती, धनधान्य, गाय, बैल, अश्व, शेळ्या-मेंढ्या इ. ऐहिक जीवनातील समृद्धीने त्यांना खूप आनंद होत होता. ऐहिक जीवन व स्वर्ग ही दोन्हीही स्थाने त्यांना अत्यंत अभिलषणीय वाटत होती. सृष्टिसौंदर्यावर ते अत्यंत मोहून जात होते. पापाबद्दल त्यांना खंत होती. पापाने नरकप्राप्ती होते अशीही त्यांची श्रद्धा होती. रोगराईबद्दल भीती होती. देवांच्या प्रार्थना आणि आराधना पापानिष्कृतीकरता आणि ऐहिक जीवनातील समृद्धीकरता ते करीत होते पण ऐहिक विश्वाबद्दल कधीही निराशेचा लेशंही वैदिक वाङ्‌मयात अप्रत्यक्ष रीतीने सूचित केलेला दिसत नाही. समृद्ध व निरोगी दीर्घायुष्य मिळावे, मृत्यूनंतर स्वर्गात जावे आणि हे सर्व योग्य क्रमाने प्राप्त होईलच असा श्रद्धाशील आशावाद वेदांमध्ये जागोजागी प्रकट झालेला दिसतो.

वरील धार्मिक दर्शनांच्या निराशावादी प्रवाहाबरोबरच आगम किंवा तंत्रमार्गाचा आशावादी प्रभाव प्राचीन भारतीयांच्या विचारसरणीत दिसतो. तंत्रमार्गाचे दक्षिण पंथ व वाम पंथ असे दोन पंथ आहेत. हे दोन्ही पंथ आशावादी पंथ होत. भोग आणि योग किंवा भुक्ती व मुक्ती या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नसून पूरक आहेत, असे हे आगमवादी तत्त्वज्ञान सांगते. या दोन्ही मार्गांतील पूजेच्या साहित्यात सुंदर मंदिरे, विशाल उद्याने, सुरेख वस्त्रे-पात्रे यांचा अंतर्भाव केलेला आहे. संगीत व अन्य कला यांचा देव किंवा देवी यांच्या पूजेमध्ये महत्त्वाचे अंग किंवा साधन म्हणून अंतर्भाव केलेला आहे. भोगासह योग किंवा मोक्ष साधायचा असेल, तर अनासक्तीची अट पाळावी लागते परंतु प्रत्यक्ष भोगाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, असा तंत्रमार्गाचा निष्कर्ष आहे. [→ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म].

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत हिंदू धर्माची नवी भाष्ये तयार झाली आहेत. राजा राममोहन रॉय यांनी प्रवृत्त केलेला ⇨ ब्राम्होसमाज, स्वामी दयानंदांनी स्थापलेला ⇨ आर्यसमाज, लो. टिळक, विवेकानंद, रामतीर्थ व योगी अरविंद घोष यांनी केलेली गीतेवरची वा वैदिक धर्मावरची अथवा भारतीय अध्यात्मावरची प्रवचने यांमध्ये ऐहिक जीवनातील आशावाद संपूर्णपणे समर्थित केलेला आहे.

संदर्भ : 1. Bailey, R. B. Sociology Faces Pessimism: A Study of European Sociological Thought amidst a Fading Optimism, The Hague, 1958.

           2. Marcel, Gabriel Trans. Homo Viator, Chicago,1951.

           3. Sully James, Pessimism: A History and a Criticism, London, 1877.

जोशी, लक्षमणशास्त्री