पवित्र वृक्ष व त्याचे पूजक, इ. स. पू. ९ वे शतक, निमरूद.

निमरूद : इराकमधील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. बायबलमध्ये कालाख या निवाने उल्लेखिलेली प्राचीन नगरी. प्राचीन ॲसिरियन साम्राज्याचे निनेव्ह आणि असुर यांखालोखाल निमरूद हे तिसरे राजधानीचे शहर होते. प्राचीन ॲसिरियाची ही लष्करी राजधानी असल्यामुळे तेथे संरक्षणाच्या दृष्टीने अनेक प्रासाद व इमारती बांधण्यात आल्या होत्या. इराकमध्ये मोसूलच्या आग्नेयीस सु. ३५ किमी.वर टायग्रिस नदीच्या पूर्व किनाऱ्यावर निमरूदचे अवशेष मिळतात. ऑस्टिन लेअर्ड या संशोधकाने १८४५–५१ व पुढे एम्. इ.एल्. मालोवन याने १९४९–५८ या काळात येथे अनेक वेळा उत्खनने केली. यांपैकी ए. एच्. लेअर्ड या प्रख्यात संशोधकाने स्वत:च्या पैशाने संशोधन केले. त्याला तेथील बालेकिल्ल्यात ॲसिरियाचा दुसरा आशुर-नाझीर-

पाल, तिसरा शॅल्मानीझर व एसार-हडन या तीन राजांचे राजप्रासाद सापडले. प्रासादवास्तूशिवाय बैलांचे दगडी भव्य पुतळे, हस्तिदंती प्रतिमा, ब्राँझची भांडी व मृत्पात्रे तसेच फर्निचर, भित्तिशिल्पे आणि क्यूनिफॉर्म अक्षरवाटिकेतील असंख्यलेख मिळाले. १९५८ मध्ये प्रासादाचे आणखी काही भाग उत्खननांत उघडकीस आले. त्यांत कार्यालये, घरे, प्राकार, इश्तार व निनुर्त यांची मंदिरे व संग्रहालये तसेच झिगुरात आढळले. एका लेखात राजप्रासादाच्या उद्‌घाटनप्रसंगी राजाने अनेक दिवस लोकांना भोजन दिल्याचा उल्लेख आहे. याशिवाय इ. स. पू. तेरावे शतक ते इ. स. पू. सातवे शतक या काळातील सांस्कृतिक जीवनाबद्दलची बरीच माहिती या उत्खननांत मिळाली. इ. स. पू. ६१२ मध्ये मीड लोकांनी या नगराचा नाश केला आणि त्यानंतर ग्रीकांश संस्कृतीच्या काळात येथे प्रत्यक्षात फारच थोडी वस्ती असावी, असे उत्खननांत दिसून आले.

संदर्भ : Mallowan, M. E. L. Nimrud and Its Remains, London. 1956.

देव, शां. भा.