निपाणी : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील शहर. लोकसंख्या ३५,११६ (१९७१). हे पुणे–बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर बेळगावच्या उत्तरेस ६४ किमी. व कोल्हापूरच्या दक्षिणेस सु. ४० किमी., महाराष्ट्र–कर्नाटक राज्यांच्या सरहद्दीवर वसले आहे. येथे किल्ला व त्याच्या शेजारीच सिद्दोजीराव निंबाळकरने १८०० साली बांधलेला एक वाडा आहे. पेशवाईत आप्पा देसाई नावाच्या दुर्वर्तनी सरदाराचा यावर अंमल होता. १८२७ साली किल्ल्यासह निपाणी गावाला तटबंदी करण्याचा अयशस्वी प्रयत्न आप्पाने केला होतो. येथील किल्ला १८४१ मध्ये इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. १८५४ पासून येथे नगरपालिका असून, हे तंबाखूच्या बाजारपेठेचे व विडी-उद्योगाचे तसेच तांबडी मिरची, गूळ, धान्य, गुरे यांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय आणि दवाखाने इत्यादींच्या सोयी येथे आहेत.
सांवत, प्र. रा.