निक्टॅजिनेसी : (इं. फोर-ओ-क्लॉक फॅमिली म. पुनर्नवा कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] ह्या वनस्पति-कुलात ए. बी. रेंडेल यांच्या मते ३० वंश व ३०० जाती, तर जे. सी. विलिस यांच्या मते ३० वंश व २९० जाती आणि जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते २८ वंश व २५० जाती समाविष्ट आहेत. या कुलाचा समावेश सी. ई. बेसी या शास्त्रज्ञांनी कॅरिओफायलेलीझ या गणात, तर ए. एंग्लर यांच्या पद्धतीत सेंट्रोस्पर्मी गणात आणि जे. बेंथॅम व जे. डी. हुकर यांनी कर्व्हेम्ब्रिई या श्रेणीत केलेला आढळतो. या कुलातील वनस्पती बव्हंशी ⇨ ओषधी पण काही झुडपे, वेली व वृक्ष असून त्यांचा प्रसार दोन्ही गोलार्धांतील उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. दोन वंश अमेरिकेखेरीज इतरत्रच निसर्गत: आढळतात. मिरॅबिलिस, बुगनविलिया, पिसोनिया, नीआ, रीशेनबॅकिया, हर्मिडियम, ॲब्रोनिया, ऑक्सिबॅफस, बुऱ्हाविया इ. यातील प्रमुख वंश आहेत. या वनस्पतींची पाने बहुधा समोरासमोर, साधी, अखंड व उपपर्णहीन असतात. कुंठित (मर्यादित) फुलोरा फुले नियमित, अरसमात्र, बहुधा द्विलिंगी (एकलिंगी असल्यास एकत्र किंवा विभक्त झाडांवर उदा., पिसोनिया), अवकिंज आणि एकावृत (परिदलांचे एक वर्तुळ असलेली) फुलाच्या तळाशी देठावर संवर्तासारखे दिसणारे छदमंडल व त्यानंतर पाकळ्यांसारख्या भागांचे जुळून बनलेले परिदलमंडल (याला संवर्तच समजतात प्रदले नसतात), कधीकधी छदे मोठी व रंगीत (उदा., बुगनविलिया) असतात. परिदलमंडलाचा आकार नळीसारखा वा तुतारीसारखा किंवा नरसाळ्यासारखा असतो. कलिकावस्थेत चूणित (चुन्या पडलेले) किंवा परिवलित [पिळवटलेले ⟶ पुष्पदलसंबंधी] केसरदले १–३०, स्वतंत्र (मुक्त) किंवा कधी तळाशी जुळलेली, कमीजास्त लांब व अवकिंज एका किंजदलापासून बनलेल्या ऊर्ध्वस्थ किंजपुटाभोवती परिदलाचा तळभाग पूर्णपणे चिकटून पुढे फळाभोवती वेढून राहतो (पुष्पकवच) आणि त्या वेष्टनाची सतत राहणारी विविध रूपांतरे होतात त्यांच्या साहाय्याने बीजप्रसारास मदत होते. किंजपुटात एकच कप्पा व त्यात एक तलोद्भव बीजक
[⟶ फूल] फळ शुष्क, एकबीजी, न तडकणारे बीज परिपुष्कयुक्त (गर्भाबाहेर प्रदेहापासून म्हणजे बीजपूर्व अवस्थेतील प्रमुख गाभ्यापासून बनलेला अन्नांश असलेले). रंगीत संवर्तासारखी छदे आणि पाकळ्यांसारखा संवर्त (परिदलमंडल) आणि एककिंजदलयुक्त किंजपुट ही या कुलाची वैशिष्ट्ये आहेत [⟶ फूल] तसेच सर्व भागांत कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे स्फटिक व खोडात असंगत [अनित्य ⟶ शारीर, वनस्पतींचे] संचरना आढळते, ⇨ बुगनविलियाच्या भिन्न रंगांच्या फुलांच्या काटेरी जाती व ⇨ गुलबुशाच्या विविध जाती बागेत सर्वत्र लावतात ⇨ पुनर्नवा ही ओषधी कोठेही जमिनीसरपट किंवा पडक्या भिंतीवरून लोंबत असलेली आढळते पिसोनियाच्या व बुगनविलियाच्या काटेरी खोडांमुळे आणि फांद्यांमुळे त्या कुंपणासाठी वापरतात. ऑक्सिबॅफस हिमालयीकस ही जाती हिमालयात आढळते.पहा : कॅरिओफायलेसी.
संदर्भ : Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.