निंफिएसी : (कमल कुल). ह्या जलवनस्पती कुलाचा समावेश ⇨ रॅनेलीझ (मोरवेल गण) या फुलझाडांच्या गणात केला असून याला ‘कमलादि कुल’ असेही म्हणतात. ए. बी. रेंडेल यांच्या मते यामध्ये आठ वंश आणि सु. शंभर जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स : नव्वद जाती जे. सी. विलिस : पन्नास जाती) आहेत. थंड प्रदेश सोडल्यास त्यांचा प्रसार जगभर आहे. या वनस्पती एक वर्ष किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या असून त्यांना सदैव पाण्यात वाढणारे मूलक्षोड [⟶ खोड] असते कित्येकांत दुधी चीक असतो. यांची पाने पाण्यावर तरंगणारी किंवा पाण्यात बुडालेली अथवा दोन्ही प्रकारची साधी, एकाआड एक, छत्राकृती, तळाशी हृदयाकृती व टोकास गोल आणि लांब देठाची असतात. फुले मोठी, आकर्षक, बहुधा सुगंधी, पाण्याच्या पृष्ठभागावर राहणारी, नियमित, द्विलिंगी, अवकिंज किंवा अपिकिंज, मंडलित, अर्धमंडलित किंवा अमंडलित असून लांब देठावर एकाकी येतात परिदले सुटी, सहा किंवा अधिक सामान्यपणे संदले व प्रदले असा भेद असतो कधीकधी संदलांचे प्रदलांत आणि प्रदलांचे केसरदलांत संक्रमण होते. केसरदले तीन ते सहा किंवा अधिक व सुटी केसरतंतू अनेकदा प्रदलांसारखेच असतात, किंजदले तीन किंवा अधिक, सुटी व पुष्पस्थलीत रुतलेली किंवा जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ [⟶ फूल]. बीजक एक किंवा अनेक आणि किंजपुटाच्या आतील बाजूस चिकटलेली असून पेटिकाफळे, मृदुफळे किंवा कृत्स्नफळे [⟶ फळ] यांचा घोस आढळतो बी अध्यावरणयुक्त (बीजावरणावरची अधिक वाढ असलेले) शिवाय त्यात पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) व परिपुष्क (पुष्काबाहेरचा अन्नांश) असतात.

कॅबोम्बॉइडी (कॅबोम्बेसी), निलंबॉइडी (निलंबेसी) आणि निंफिऑइडी (निंफिएसी) अशी तीन उपकुले या कुलात अंतर्भूत केलेली आढळतात. जे. हचिन्सन यांनी कॅबोम्बेसी हे स्वतंत्र कुल मानले असून फक्त इतर दोन्हींचा समावेश त्यांनी निंफीएसीत केला आहे. कमल कुलातील आठ वंशांपैकी यूरिएलबार्क्लेऑ आशियात आणि व्हिक्टोरिया द. अमेरिकेत आढळतो. ब्रॅसेनिया यूरोपखेरीज इतरत्र आढळतो. निंफिया (कॅस्टालिया), नूफर उ. गोलार्धात सर्वत्र असून कॅबोम्बा अमेरिकेत, निलंबोची एक जाती ईशान्य अमेरिकेत तर दुसरी जाती भारत ते ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत आढळतात. भारतात सामान्यपणे कमळ या नावाचे पुढील जाती व प्रकार आढळतात : निंफिया आल्बानिं. लोटस (पांढरे कमळ), नि. स्टेलॅटा (निळे कमळ), निलंबो न्यूसीफेरा किंवा निलंबियम स्पेसिओजम (पांढरे किंवा गुलाबी कमळ), नूफर ल्युटिनमकॉबोम्बा ॲक्वॅटिका (पिवळे कमळ), निंफिया रुब्रा म्हणजेच नि. प्युबिसेन्स (लाल कमळ). अनेक रंगांची फुले एकाच जातीत आढळतात असेही दिसून आले आहे. ह्या कुलातील वनस्पतींत कॅल्शियम ऑक्झॅलेट असते. वाहक वृंदात (पाणी व अन्नरस नेणाऱ्या कोशिकांच्या–पेशांच्या–आणि वाहिन्यांच्या समूहात) नवीन घटक बनविणाऱ्या कोशिकांचा थर (ऊतककर) नसतो. प्रकाष्ठ (जलीय विद्राव वाहून नेण्याचे व वनस्पतीला आधार देण्याचे कार्य करणाऱ्या कोशिकांच्या समूहाच्या ऊतकाच्या) भागात वाहिन्या नसतात. हिंदू लोक कमळ पवित्र मानतात व पूजेकरिता वापरतात. कमळ हे भारताचे राष्ट्रीय पुष्प आहे. काही जाती औषधी आहेत. आयुर्वेदातही कमळाचे औषधी उपयोग विस्ताराने वर्णिले आहेत. सुश्रुतांनी उत्पलादी गणात उत्पल, रक्तोत्पल, कुमुद, सौगंधिक, कुवलय, पुंडरीक हे प्रकार व त्यांचे गुणधर्म सांगितले आहेत. निघंटूमध्येही अनेक प्रकार वर्णिले आहेत, तसेच त्यांचे भिन्न रोगांवरील उपयोगही सांगितले आहेत.

पहा : कमळ कुमुद जलवनस्पति रॅनेलीझ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.

            2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

            3. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

            ४. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७५.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.

निंफिएसी : निंफियाच्या तीन भिन्न जातीची कमळे