नार्थब्रुक, लॉर्ड टॉमस जॉर्ज बेअरिंग : (२२ जानेवारी १८२६–१५ नोव्हेंबर १९०४). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील १८७२–७६ या काळातील गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या जर्मन सधन कुटुंबात त्याचा जन्म लंडन येथे झाला. बेअरिंग घराणे बँकिंगच्या क्षेत्रात प्रसिद्धीस आले होते. क्राइस्टचर्च (ऑक्सफर्ड) महाविद्यालयात शिक्षण घेऊन नॉर्थब्रुकने नेमस्त पुढाऱ्यांकडे खाजगी चिटणीसाचे काम केले. तो ग्लॅडस्टनच्या उदारमतवादी पक्षाचा पुरस्कर्ता होता. १८५७ साली संसदेमध्ये निवडून आल्यानंतर नार्थब्रुक यास पामर्स्टनने आरमाराचा सिव्हिल लॉर्ड म्हणून नेमले. १८५७ पासून १८७२ पर्यत नॉर्थब्रुकने चार्ल्स वुड आणि जॉर्ज ग्रे यांचा दुय्यम चिटणीस, हिंदुस्थानचा दुय्यम भारतमंत्री, संसदेचा सभासद, तसेच युद्धखात्यात काही दिवस दुय्यम चिटणीस वगैरे उच्च पदांवर काम केले.
नॉर्थब्रुक १८७२ मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून हिंदुस्थानात आला. त्याचे सर्वसाधारण धोरण शांततावादी होते. १८७३–७४ या काळात बिहार व बंगाल येथे पडलेल्या दुष्काळात त्याने दुष्काळपीडितांना मदत केली. १८७५ मध्ये बडोद्याच्या गायकवाडांनी ब्रिटिश रेसिडेंटला विष घालण्याचा कट केला. नॉर्थब्रुकने या आणि इतर आरोपांच्या चौकशीसाठी आयोग नेमला. चौकशीत गायकवाड निर्दोषी ठरले, तरी नॉर्थब्रुकने त्यास पदच्युत केले. त्यामुळे नॉर्थब्रुकवर दोषारोप ठेवण्यात आला.
नॉर्थब्रुकने तेल, तांदुळ, तीळ, लाख या गोष्टी वगळता इतर बाबींवरील निर्यात कर रद्द केला. खुल्या व्यापाराच्या पुरस्कारासाठी त्याने आयात कर कमी केला. हा कमी केलेला करही लँकाशरच्या कापड उत्पादकांना पसंत पडला नाही. त्यांच्या खुल्या व्यापाराच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी डिझरेली आणि भारतमंत्री सॉल्झबरी यांनी वरील कर रद्द करावा, म्हणून आग्रह धरला. यामुळे नॉर्थब्रुक आणि सॉल्झबरी यांत मतभेद आले. यापूर्वीही काही मतभेदांचे प्रसंग उद्भवले. उदा., १८७३ मध्ये रशियाने खिवा घेतल्यामुळे अफगाणिस्तानच्या शेरअलीने नॉर्थब्रुकला तह करण्याची विनंती केली होती. नॉथर्ब्रुकची या तहास मान्यता होती परंतु या वेळी ग्रेट ब्रिटनने त्यास विरोध केला. असे अनेक मतभेद झाल्यामुळे नॉर्थब्रुकने अखेर राजीनामा दिला. उर्वरित आयुष्यात आयरिश प्रश्नावर त्याचे ग्लॅडस्टनशी मतभेद झाले आणि त्याने ग्लॅस्टनचा पक्ष सोडला.
देवधर, य. ना.
“