नॉर्थ कॅरोलायना : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील दक्षिण अटलांटिक विभागातील, मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये सर्वांत लांब व क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे आणि अमेरिकेच्या मूळ तेरा राज्यांपैकी एक राज्य. सर वॉल्टर रॅलीने १५८५ मध्ये येथे प्रथम वसाहत स्थापना स्थापन केली. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्स राजाने व्हर्जिनिया राज्याच्या दक्षिणेकडील प्रदेशास दिलेल्या अनुदानामुळे (१६२९) राज्याला ‘कॅरोलाना’ अथवा ‘कॅरोलायना’ (लँड ऑफ चार्ल्स) असे नाव पडले. १६६३ मध्ये दुसऱ्या चार्ल्स राजाने दिलेल्या अनुदानाच्या वेळी, त्याच्याही सन्मानार्थ तेच नाव कायम करण्यात आले. आग्नेयीकडील राज्यांत नॉर्थ कॅरोलायना हे शेती व औद्योगिक उत्पादन यांमध्ये अग्रेसर राज्य असून, लोकसंख्येच्या बाबतीत त्याचा फ्लॉरिडानंतर दुसरा क्रमांक लागतो. नॉर्थ कॅरोलायना हे ३३° २७ उ. ते ३६° ३४ उ. आणि ७५° २७ प. ते ८४° २० प. यांदरम्यान असून, ते दक्षिणेस साउथ कॅरोलायना व जॉर्जिया, पश्चिमेस आणि वायव्येस टेनेसी, उत्तरेस व्हर्जिनिया या राज्यांनी, तर पूर्वेस व आग्नेयीस अटलांटिक महासागराने सीमित आहे. विस्तार पूर्व-पश्चिम सु. ६६० किमी. व दक्षिणोत्तर सु. १८५ किमी. क्षेत्रफळ १,३६,१९८ चौ. किमी. पैकी ६,०९६ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ५४,७१,००० (१९७५). राजधानीचे शहर रॅली.

भूवर्णन :भूरचनेच्या दृष्टीने राज्याचे तीन ठळक स्वाभाविक विभाग पडतात. पश्चिम भागात नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे जाणाऱ्या ग्रेट स्मोकी व ब्ल्यूरिज या पर्वतराजी असून त्या दक्षिण ॲपालॅचिअन पर्वताचा भाग आहेत. या पर्वतराजींना ब्लॅक मौंटनसारखे अनेक फाटे आहेत. या पर्वतराजींची उंची सु. १,००० ते १,२०० मी. आहे. काही भागांत उंची २,००० मी. पर्यंत वाढते. ग्रँडफादर मौंटसारखी (१,८१८ मी.) काही सर्वोच्च शिखरे ब्ल्यूरिज पर्वत राजीत आढळतात तर ग्रेट स्मोकी पर्वतश्रेणीत ‘क्लिंगमन्झ डोम’ (२,०२४ मी.) यांसारखी पर्वतशिखरे असून ब्लॅक मौंटन श्रेणीत मौंट मिचेल हे सर्वोच्च (२,०३७ मी.) शिखर आढळते. या पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी पीडमाँट हा पठारी प्रदेश असून तो ५०० मी. पासून १०० मी. पर्यंत पूर्वेकडे उतरत जातो. या प्रदेशाने राज्याचे सु. ४०% क्षेत्र व्यापले असून येथील नद्या जलविद्युत् उत्पादनासाठी अतिशय उपयुक्त आहेत. राज्याचा पूर्वेकडील ४०% भाग मैदानी असून, १०० मी. पासून समुद्रसपाटीपर्यंत उतरत गेला आहे. या भागाची रूंदी २०० ते २५० किमी. आहे. मैदानाचा पश्चिम भाग उंच असून शेतीच्या दृष्टीने अत्युत्कृष्ट आहे. पूर्वेकडील सखल भागात दलदल, नैसर्गिक सरोवरे, उपसागर, सिंधुतडाग इ. गोष्टींच्या विपुलतेमुळे तो शेतीच्या दृष्टीने फारसा योग्य ठरत नाही. किनाऱ्यालगत वाळूचे दांडे, बेटे, भूशिरे इ. गोष्टी आढळतात. राज्याला ४८४ किमी. लांबीचा किनारा लाभाला आहे.

नद्या मुख्यत: तीन प्रकारच्या आढळतात. पश्चिम भागातील नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन (टेनेसी व ओहायओ राज्यांमधून) सरतेशेवटी मेस्किकोच्या आखाताला मिळतात. त्यांमध्ये फ्रेंच ब्रॉड, लिटल टेनेसी, हायवॉसी, पिजन, न्यू, एल्क व वॉटॉगा या प्रमुख नद्या होत.

दक्षिण भागातील नद्या (याडकिन, कटॉब, ब्रॉड इ.) दक्षिण कॅरोलायनामध्ये जाऊन नंतर समुद्राला मिळतात. पर्वतराजीच्या पूर्व उतारावर उगम पावणाऱ्या रोअनोक, टार-पॅम्लीको, न्यूस-ट्रेंट, चोवॉन, केप फिअर यांसारख्या नद्या, किनारी प्रदेशाकडून पूर्वेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळतात. याडकिन, केप फिअर यांसारख्या नद्यांचाच राज्याला खरा उपयोग होतो.

पर्वतमय प्रदेशात जमीन लाल, चिकण व कंकरमिश्रित मातीची आहे. मैदानात मात्र नद्यांनी आणलेल्या गाळामुळे जमीन सुपीक आहे.

हवामान :राज्याचे हवामान काहीसे सौम्य आहे. समुद्रसान्निध्य, गल्फ प्रवाह यांचा तपमानावर परिणाम होतोच, शिवाय पश्चिमेकडील पर्वतराजींमुळे खंडांतर्गत थंड हवा या भागात येऊ शकत नाही. अर्थात पर्वतमय प्रदेशात उंचीमुळे हवामानात फरक पडलेला आढळतो. वार्षिक सरासरी तपमान १५° से., किमान तपमान ५·६° से. व कमाल तपमान २३·९° से. आहे. सौम्य हवामानामुळे पिकांच्या वाढीस योग्य असा काळ किनारी भागात २४० दिवसांचा, पर्वतमय भागात तो २०० दिवसांचा येतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५° सेंमी. आहे.

वनस्पती व प्राणी :नैसर्गिक पर्यावरणाच्या विविधतेमुळे वनस्पती जीवनात विविधता आढळते. राज्याच्या एकूण क्षेत्रांपैकी ५९·५% भाग वनाच्छादित आहे. वृक्षांच्या प्रकारांवर तपमानाचा प्रभाव आढळतो. लॉबलॉली पाइन, ओक, हिकरी, पॉप्लर, फर, बर्च, एल्म, स्प्रूस, गम, सायप्रस, वॉलनट, ॲश, बाल्सम या महत्त्वाच्या वनस्पती येथे आढळतात.

हवामान, भूमिस्वरूप, शेतीचे आधिक्य (वर्चस्व) आणि विस्तृत जंगलक्षेत्र या सर्वांच्या योगे राज्यातील प्राणिजीवनात वैपुल्य व विविधता खूप आढळते. क्वेल, कबूतर, जंगली, टर्की यांसारखे उंच प्रदेशातील पक्षी, खाड्या व उपसागर या ठिकाणी आढळणारे बदकांसारखे पक्षी आणि हरिण, कोल्हा, ओपोसम, रॅकून, ससा, अस्वल, रानमांजर, चिचुंद्री इ. प्राणी विपुल प्रमाणात आढळतात.नदीखाड्यांत व किनाऱ्यालगत स्पॉट, ब्लूफिश, फ्लाउंडर, सी ट्राउट, मॅकॅरल, डॉल्फिन, हेरिंग, म्युलेट असे विविध प्रकारचे मासे भरपूर प्रमाणात आढळतात. मेनहेडन, शेलफिश या दोन विशेष महत्त्वाच्या माशांच्या जाती आहेत.


इतिहास व राज्यव्यवस्था : गोरे लोक या राज्यात आले तेव्हा आदिवासी रेड इंडियनांच्या ३० जमातींचे ३०,००० लोक या भागात होते. १५२४ मध्ये व्हेराझानो या इटालियनाच्या नेतृत्वाने एक फ्रेंच तुकडी केप फिअर भूशिराजवळचा किनारा पाहून गेली. सोळाव्या शतकाच्या अखेरीस सर वॉल्टर रॅलीने इंग्रजांची कित्येक पथके या भागात पाठवली. १५८४ मधील तुकडीने नुसती प्राथमिक पाहणी केली दुसऱ्या पथकाचा स्थानिक इंडियनांशी बेबनाव झाला आणि वसाहतीसाठी १५८७ मध्ये आलेला तिसरा १०० लोकांचा जथा १५९० पर्यंत नष्ट होऊन ‘रोअनोक बेटावरची बेपत्ता वसाहत’ म्हणून इतिहासात शिल्लक राहिला. त्यांच्यापैकीच एका जोडप्याला १५८७ साली झालेली व्हर्जिनिया डेअर नावाची मुलगी ही ‘नव्या जगात जन्मलेली पहिली इंग्रजकन्या’. इंग्रजांची पहिली वसाहत टिकली ती म्हणजे अगोदर झालेल्या व्हर्जिनिया वसाहतीतील लोकांनी, १६५० च्या सुमारास आल्बेमार्ले विभागात हळूहळू येऊन स्थापन केलेली. १६६३ मध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्‌सने आठ लोकांना या प्रदेशात जमीनमालकी दिली, तेव्हापासून याचे कॅरोलायना नाव रूढ झाले. १७२९ पर्यत मालकी पद्धत अयशस्वी ठरली व सात मालकांनी राजाला हक्क परत केल्यानंतर हा शाही मुलूख झाला. त्यानंतर १७५५ पर्यंत वस्ती बरीच वाढली, इंग्रजांप्रमाणे स्कॉटिश, आयरिश व जर्मन लोकांनी येऊन अंतर्भागात वसाहती केल्या. शेती हा प्रधान व्यवसाय झाला आणि मका, तंबाखू, वाटाणा, पावटे, गहू, भात अशी पिके निघू लागली. बाथ, करीटक, बोफर्ट, रोअनोक आणि ब्रन्झविक येथून माल इंग्लंड व वेस्ट इंडीजला निर्यात होऊ लागला. इंग्रजांनी लादलेल्या करांना नॉर्थ कॅरोलायनाने विरोध केला व राजाविरुद्ध बंड केले. १७७५ मध्ये मेक्लनबुर्कच्या परिषदेत इंग्रजांचे जोखड झुगारून देण्यात आले व १७७७ साली पहिली राज्यघटना मान्य झाली. १७८०–८१ मध्ये इंग्रज फौजा आल्या, पण गिलफर्ड कोर्ट हाउसच्या लढाईने स्वातंत्र्ययुद्धाची समाप्ती निश्चित केली. स्वातंत्र्य मिळाले, तरी राज्य दरिद्री झाले. १७९१ मध्ये रॅली ही राजधानी झाली. १८१५ ते १८३५ दरम्यान हजारो लोक राज्य सोडून गेले. १८३५ मध्ये जास्त व्यवहार्य अशी नवी घटना तयार झाली. शेती-व्यवसायाशिवाय खाणी व उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले, लोहमार्ग आले, शिक्षणसंस्था उघडण्यात आल्या. यादवी युद्धाच्या वेळी अगदी शेवटच्या घटकेला, राज्य बंडखोर दक्षिण पक्षाला मिळाले. त्या युद्धात राज्याला माणसे, मालमत्ता व उद्योगधंदे यांचे फार नुकसान भोगावे लागले, राज्याच्या भूमीवर लहानमोठ्या ८४ लढाया झाल्या. युद्धोत्तर १८६८ मध्ये संघराज्यात पुन्हा प्रवेश मिळाल्यावरही पुनर्रचनेची वर्षे राज्याला फार हलाखीची गेली. तथापि काही वर्षांतच कापड व फर्निचर कारखानदारी चालू झाली. तंबाखूचा धंदा व्यवस्थित सुरू झाला, बंदरांचा विकास झाला, शेती सुधारली, शिक्षणात प्रगती झाली आणि राज्य आजूबाजूच्या राज्यांपेक्षा पुढे आले. विसाव्या शतकारंभी किटीहॉक येथे राइटबंधूंच्या यशस्वी विमानोड्डाण प्रयोगाने जगाचे लक्ष या राज्याने वेधून घेतले. पहिल्या महायुद्धात राज्याने भरपुर मनुष्यबळ पुरवले. तेव्हाच देशातील सर्वांत मोठी तोफखान्याची छावणी फोर्ट ब्रॅग येथे आली. दुसऱ्या महायुद्धातही राज्यातून लष्करभरती मोठ्या प्रमाणावर झाली. नंतरच्या काळात कारखानदारीत विविधता येऊन आर्थिक विकास वेगाने झाला. राज्यविद्यापीठाने शिक्षणपद्धतीबाबत सर्वत्र मान्यता मिळविली.

सध्याची राज्यघटना १८७६ पासून कार्यवाहीत असून (तीदेखील १८६८ च्या घटनेवरच मोठ्या प्रमाणात आधारित आहे) तिच्यात १३४ दुरुस्त्या करण्यात आल्या. १८६८ च्या घटनेप्रमाणे ४ वर्षांसाठी निवडलेला राज्यपाल व ९ खातेप्रमुख कारभार चालवतात. देशातील या एकाच राज्यात राज्यपालाला रोधाधिकार (व्हेटो) नाही. राज्याच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहांत अनुक्रमे ५० व १२० सदस्य, दोन वर्षांसाठी निवडलेले असतात. विषमांकी वर्षी रॅली येथे १२० दिवसांची अधिवेशने भरतात. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य व ६ सहकारी न्यायमूर्ती, अपील न्यायालयांचे राज्यपालनियुक्त नऊ न्यायाधीश, ३० जिल्हावार वरिष्ठ न्यायाधीश हे सर्व ८ वर्षांसाठी निवडलेले तसेच शांतिन्यायालयांचे व पालिका न्यायालयाचे न्यायाधीश सर्व न्यायव्यवस्था पाहतात. संसदेवर राज्यातर्फे २ सीनेटर व ११ प्रतिनिधी निवडून जातात. स्थानिक प्रशासनासाठी राज्याचे शंभर परगण्यांत विभाजन केले आहे.

आर्थिक व सामाजिक जीवन : कृषिक लोकसंख्या व शेतांची संख्या या दोन्ही दृष्टींनी राज्याचा सबंध देशात अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक लागतो. राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती व शेतीप्रधान उद्योगांना फार महत्त्व आहे. विशेषत: मैदानी प्रदेशाचा पश्चिम भाग कृषि-उद्योगानुकूल आहे. १९७४ मध्ये १·३५ लक्ष शेते होती आणि १४० लक्ष एकर कृषिक्षेत्र होते. एका शेताचा सरासरी आकार ४२ हे. (देशाच्या सर्व राज्यांमध्ये सर्वांत कमी) होता. तंबाखू, मका, कापूस, वाटाणा, सोयाबीन, गहू, ओट, बार्ली, बटाटे ही महत्त्वाची पिके होत. रताळी, पीच, सफरचंद आणि विविध फळे यांचेही मोठे उत्पादन होते. १९७३ मध्ये पिकांपासून १४०·९ कोटी डॉ. तर कोंबड्या व गुरे, डुकरे यांपासून ९७·१ कोटी डॉ. उत्पन्न मिळाले. नॉर्थ कॅरोलायना हे सबंध देशात तंबाखू उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. १९७३ मध्ये खालीलप्रमाणे विविध पिकांचे उत्पादन झाले : (आकडे लक्ष एकक). तंबाखू ३,६७८·३६ किग्रॅ. मका १,१५० बुशेल कापूस १·६४ गासड्या वाटाणा २,११०·९८ किग्रॅ. सोयीबीन ३६० बुशेल. १९७४ साली शेतांवर १·५५ लक्ष गाई, १०·७ लक्ष गुरेढोरे, १९·५ लक्ष डुकरे, १२,००० मेंढ्या व २,९०४ लक्ष कोंबड्या होत्या. अटलांटिक महासागर किनारा व राज्यांतर्गत जलाशय यांमधून मासेमारी चालते. १९७४ मधील एकूण मासे उत्पादन व त्याचे मूल्य अनुक्रमे ८८७ लक्ष किग्रॅ. व १७५ लक्ष डॉ. झाले. लाकूड-उत्पादनक्षेत्र वाढविणारे नॉर्थ कॅरोलायना हे देशातीव एकमेव राज्य असून, लाकूड-उत्पादनात त्याचा दक्षिणेकडील राज्यांत पहिला व सबंध देशात पाचवा क्रमांक लागतो. १९७३ मध्ये ८४·८४ लक्ष हे. जमीन (६६% भूमिक्षेत्र) लाकूड उत्पादनाखाली असून या उद्योगापासून सु. २०० कोटी डॉ. उत्पन्न मिळाले. राज्यात सापडणारी महत्त्वाची खनिजे म्हणजे कंकर, वाळू, संगजिरे, चुनखडी, फेल्‌स्पार, फॉस्फेट, टिटॅनियम, अभ्रक, चिकणमाती, लिथियम खनिजे, पांढरा शाडू ही होत. अभ्रक, फेल्‌स्पार व लिथियम खनिजांच्या उत्पादनात नार्थ कॅरोलायनाचा प्रथम क्रमांक लागतो. विटांच्या उत्पादनातही हे राज्य अग्रेसर आहे. १९७२ मध्ये राज्याने १२० कोटी विटांचे (६२० लक्ष डॉ. हून अधिक किंमतीच्या) उत्पादन केले (देशातील एकूण उत्पादनाच्या १४ टक्के). हेंडरसन येथे देशातील सर्वांत मोठी टंगस्टनची खाण आहे.

राज्यात शेती व जंगले यांतून निघणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असे अनेक उद्योगधंदे आहेत. औद्योगिक उत्पादनात राज्याचा सबंध देशात बारावा क्रमांक लागतो. जलविद्युत्, कामगार व दळणवळणाच्या सुविधा या सर्वांच्या उपलब्धतेमुळे राज्यात कारखानदारी विशेष वाढली आहे. १९७३ मध्ये राज्यातील ९,००० उद्योगधंद्यांमधून ७·७ लक्ष कामगार गुंतलेले होते. प्रमुख उद्योग म्हणजे कापड व विणमाल (सर्व राज्यांत अग्रेसर, ४०% च्या वर), सिगारेट (देशातील एकूण उत्पादनापैकी ५५% या राज्यात होते सर्व राज्यांत अग्रेसर), रसायने,विद्युत् यंत्रसामग्री, अन्नप्रक्रिया, कागद व लगदा, फर्निचर व विटा (या दोन्ही उद्योगांत अग्रेसर राज्य) हे होत. रबर उद्योगही वाढत आहे. पर्यटन उद्योग वाढता असून १९७०–७५ या काळात प्रतिवर्षी या उद्योगापासून ८० कोटी डॉ. च्या वर उत्पन्न राज्याला मिळत गेले.


राज्यातील सर्व हमरस्ते सुस्थितीत ठेवणारे नॉर्थ कॅरोलायना हे देशातील पहिले राज्य असून, १९७४ मध्ये राज्यात १,२०,७०० किमी. लांबीचे पक्के हमरस्ते होते. त्याच वर्षी २७,५२,३१३ मोटारगाड्या व ७,१८,९५७ ट्रक यांची नोंद झाली होती. राज्यात ६,९७८ किमी. लांबीचे लोहमार्ग असून ते १०० परगण्यांपैकी ९२ परगण्यांना आपली सेवा उपलब्ध करतात. सबंध देशात या राज्यातील रेल्वेवाहतूक दर पुष्कळच कमी आहेत. आठ विमानकंपन्या हवाईवाहतूक करीत असून राज्यातील १८६ विमानतळांपैकी ५८ सरकारी आहेत. विल्मिंग्टन व मोरहेड सिटी ही राज्यातील दोन सागरी बंदरे असून अन्य २० उपबंदरे आहेत. २,०११ किमी. अंतर्गत जलमार्ग राज्यास लाभला आहे. राज्यात संदेशवहन व्यवस्था चांगली असून २७० नभोवाणी केंद्रे, २७ दूरचित्रवाणी केंद्रे, ४७ दैनिके व १४९ साप्ताहिके आहेत.

राज्यातील सु. ५५% लोक खेड्यांत, तर सु. ४५% लोक शहरांत राहतात. ७६·८% श्वेतवर्णीय तर २३·२% कृष्णवर्णीय आहेत. १९७४ मधील जन्म, मृत्यु, बालमृत्यू, विवाह यांचे प्रमाण दरहजारी अनुक्रमे १५·७ ८·६, १९·४ व ८·४ असे होते. प्रमुख धर्मपंथांच्या दृष्टीने १९७४ मध्ये राज्यात बॅप्टिस्ट ४८·९%, मेथडिस्ट २०·७%, प्रेसबिटेरियन ७·७%, ल्यूथरन ३% व रोमन कॅथलिक २·७% असे होते. सर्व धर्मपंथीय मिळून १९७४ मधील एकूण संख्या सु. २५·८ लक्ष होती. ७ ते १६ वर्षे वयोगटात शिक्षण सक्तीचे आहे. सार्वजनिक शाळांमध्ये १९७४–७५ या वर्षी एकूण विद्यार्थिसंख्या ११,७७,८६० होती, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या २,०३१ व शिक्षक ७३,८४३ होते. १९७३–७४ चा सार्वजनिक शाळांचा एकूण खर्च ९,८५३ लक्ष डॉ. होता. १९७३ मध्ये राज्यशासनाच्या मदतीने चालविली जाणारी महाविद्यालये व विद्यापीठे यांमध्ये दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांची १५ महाविद्यालये (विद्यार्थी २७,३३०) चार वर्षांच्या अभ्यासक्रमांची १६ महाविद्यालये (विद्यार्थी ८४,८९३) व तांत्रिक संस्था (विद्यार्थी ३,५५०) होत्या. १९७४ मध्ये राज्यात विद्यापीठे व महाविद्यालये मिळून १०० उच्च शिक्षणसंस्था (त्यांपैकी सार्वजनिक ५७) व विद्यार्थिसंख्या १,७६,५२९ होती. राज्यात बारा विद्यापीठे आहेत. सबंध देशाच्या दृष्टीने या राज्यातील शिक्षकांना मिळणारे निम्नवेतन व वर्णभेद या दोन शैक्षणिक समस्या प्रकर्षाने जाणवतात. राज्यात वार्धक्य, अपंगत्व यांबाबत शासनाकडून साहाय्य मिळते. ३४,३७५ खाटांची १६० रुग्णालये व ६,३७० वैद्य (१९७४), १,७९१ दंतवैद्य व २१,३६८ परिचारिका (१९७२) होत्या. शासनसाहाय्यित रुग्णालयांतून बालपंगुत्व, मद्यासक्ती (मद्यरोग), मंदपणा व मनोरोग, मस्तिष्क पक्षाघात व क्षय यांसारख्या विशेष प्रकारच्या रोगांबाबत अधिककरून लक्ष पुरविले जाते. १८७७ पासून सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम परिणामकारकपणे कार्यवाहित आहे. शिक्षण, वैद्यकीय सेवा व आरोग्य, पोलीस आणि कल्याण यांवरील राज्य व स्थानिक शासन करीत असलेला दरडोई खर्च ३९० डॉ. आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न १९७४ मध्ये ४,६६५ डॉ. तर देशाचे ५,४४८ डॉ. होते.

नॉर्थ कॅरोलायना हे राज्य आर्थिक दृष्ट्या अधिककरून कृषिक, धार्मिक दृष्ट्या प्रॉटेस्टंटपंथीय, राजकीय दृष्ट्या एकोणिसाव्या शतकारंभकाळात जेफर्सनच्या मताचे, १८३५–५० या काळात व्हिग विचारांचे आणि तेव्हापासून आजपर्यंत काही अपवादकाळ वगळता, डेमॉक्रॅटिक पक्षाचे राहिले आहे. जोसेफन डॅनिएल्स (१८६२–१९४०), आर्चिवाल्ड हेंडरसन (१८७७–१९६३), जोनाथन डॅनिएल्स (१९०२– ) हे प्रसिद्ध चरित्रकार व इतिहासकार, जॉन हेन्री बोनर हा कवी व संपादक, विल्यम सिडनी पोर्टर किंवा ओ. हेन्री (१८६९–१९१०) हा प्रसिद्ध अमेरिकन लघुकथाकार, टॉमस डिक्सन (१८६४–१९४६) याच्या पुनर्रचनाकालीन कादंबऱ्या द बर्थ ऑफ अ नेशन ह्या सुविख्यात चित्रपटाला पार्श्वभूमी ठरल्या. इन अब्राहम्स बुझम या नाटकाबद्दल पुलिट्झर पारितोषक मिळालेला नाटककार पॉल ग्रीन (१८९४–  ), विल्यम चर्चिल द मिल (१८७८–१९५५) हा नाटककार आणि लुक होमवर्ड, एंजलऑफ टाइम अँड द रिव्हर या आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या कांदबऱ्यांचा कर्ता टॉमस वुल्फ (१९००–३८) या साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होत.

‘नॉर्थ कॅरोलायना म्यूझीयम ऑफ आर्ट’ हे राज्याने स्थापन केलेले देशातील पहिले वस्तुसंग्रहालय, तर ‘नॉर्थ कॅरोलायना सिंफनी’ हाही देशातील पहिला वाद्यवृंद आहे. लोककला व ऐतिहासिक पुनरावलोकन (दृश्य समारंभ) यांबाबत राज्य अग्रेसर आहे. रोअनोक बेटावरील मँटीओ येथे उन्हाळ्यामध्ये द लास्ट कॉलनी या नाटकाद्वारे सर वॉल्टर रॅलीचे वसाहत स्थापनेचे साहसी कृत्य, राणी एलिझाबेथच्या दरबारातील देखावे आणि रोअनोक बेटावरील देखावे दाखविले जातात. बून शहरात द हॉर्न ऑफ द वेस्ट या नाटकाचे देखावे डॅन्येल बूनच्या व्यक्तिरेखेसह सादर केले जातात चेरोकी येथे अन्टू दीज हिल्स हे नाटकही चेरोकी इंडीयनांचे वंशज सादर करून दाखवितात. राज्यात अनेक वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये, सार्वजनिक इमारती असून महत्त्वाच्या खालीलप्रमाणे आहेत : पॅक मेमोरियल पब्लिक लायब्ररी (ॲशव्हिल), मोरहेड खगोलालय, ऑकलंड मेमोरियल आर्ट म्यूझीयम (चॅपल हिल), मिंट म्यूझीयम (शार्लट), ड्यूक विद्यापीठ ग्रंथालय (डरॅम), ग्रीन्झबरो ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, म्यूझीयम ऑफ नॉर्थ कॅरोलायना मिनरल्स (गिलेस्पी गॅप) स्टेट आर्ट म्यूझीयम (रॅली).


महत्त्वाची स्थळे : शार्लट (लोकसंख्या २,७१,१७८–१९७०). प्रिन्सेस शार्लट सोफियानामक तिसऱ्या जार्ज राजाच्या पत्नीवरून हे नाव शहरास मिळाले. कॅलिफोर्निया गोल्डरश, (१८४९) च्या आगोदर हे देशाचे प्रमुख सुवर्ण उत्पादन केंद्र होते. सध्या वस्त्रे, यंत्रसामग्री, धातू व अन्नपदार्थ यांचे कारखाने येथे आहेत. ग्रीन्झबरो (१,४४,०७६) हे नाव जनरल नाथॅनेएल ग्रीनवरून पडले. वस्त्रोद्योग हा प्रमुख असून हे प्रमुख वितरण केंद्र, शेतमालविपणन व विमानव्यवसाय यांचे केंद्र आहे. विन्स्टन–सेलम (१,३२,९१३). क्रांतिवीर मेजर जोसेफ विन्स्टन याचे नाव शहरास दिले असून तंबाखू, वस्त्रे, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनीय उपकरणे यांचे कारखाने येथे आहेत. सतरावा अध्यक्ष अँड्रू जॉन्सन याचे हे जन्मगाव आहे. रॅली (१,२१,५७७) : राज्याचे राजधानीचे शहर. सर वॉल्टर रॅलीच्या स्मरणार्थ त्याचे नाव शहरास दिले गेले. शिक्षण–विज्ञान–संस्कृती या त्रयीचे केंद्र. डरॅम (९५,४३८) हे सिगारेट उद्योगाचे मोठे केंद्रे असून, येथे ड्यूक विद्यापीठ आहे. हाय पॉइंट (६३,२०४) अमेरिकेच्या फर्निचर उद्योगाचे एक अग्रेसर केंद्र असून येथे विणमाल उद्योगही आहे. रंग, रसायने आणि यंत्रसामग्री यांचे उद्योग आहेत. ॲशव्हिल (५७,६८१) : सॅम्युएल ॲश या गव्हर्नराच्या स्मरणार्थ वसलेले हे शहर पशुधन आणि तंबाखू यांची मोठी व्यापारपेठ आहे. टॉमस वुल्फ या कादंबरीकाराचे हे जन्म ग्राम आहे. फेइटव्हिल (५३,५१०) : मार्की द लाफायेतवरून हे नाव पडलेल्या या शहराचे वस्त्रोद्योग व लाकूडवस्तुनिर्मिती उद्योग हे प्रमुख आधारोद्योग आहेत. गॅस्टोनिया (४७,१४२)– सेनेटर आणि न्यायाधीश विल्यम गॅस्टन याच्या नावावरून वसलेले हे शहर अमेरिकेतील वस्त्रोद्योगाच्या मोठ्या शहरांपैकी एक असून येथे अन्यविविधांगी उद्योग आहेत. विल्मिंग्टन (४६,१६९)– स्पेन्सर क्रॉम्प्टन, (विल्मिंग्टनचा सरदार), याच्या सन्मानार्थ शहरास हे नाव देण्यात आले असून ते केप फिअर नदीवरील प्रमुख बंदर आहे. जहाजबांधणी, ट्रक, शेती, पर्यटन व निर्मितिउद्योग (प्रामुख्याने वस्त्रे) यांचे ते प्रमुख केंद्र आहे.

विल्मिंग्टन व मोरहेड सिटी या शहरांजवळील पुळण्या व आरोग्यस्थाने पर्यटकांना खाऱ्या पाण्यातील मासेमारी व जलक्रीडा यांकरिता आकृष्ट करतात. कित्येक खाड्यांमधून उन्हाळ्यात मासेमारी व हिवाळ्यात बदकांची शिकार चालते. सॅंडहिल्समधील पाइन्स व पाइनहर्स्ट ही प्रसिद्ध शारदीय आरोग्यस्थाने आहेत. पीडमाँटमधील अनेक कृत्रिम सरोवरे आणि राज्य उद्याने हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. ‘ग्रेट स्मोकी मौंटन नॅशनल पार्क’ या उद्यानास सर्वाधिक पर्यटक भेट देतात, तसेच ‘केप हॅटरस नॅशनल सीशोअर रिक्रिएशनल एरिया’ या क्षेत्रामध्ये प्रवासी गर्दी करतात. राज्यात मौंट मिचेल, फोर्ट मेकॉन, हॅंगिंग रॉक, मॉरो मौंटन यांसारखी अनेक उद्याने व मनोविनोदनात्मक स्थळे आहेत. किटीहॉक येथे ‘राइट ब्रदर्स नॅशनल मेमोरियल’ आहे.

ओक, शा. नि. गद्रे, वि. रा., फडके, वि. शं.