नॉटिंगॅम : इंग्लंडमधील नॉटिंगॅमशर परगण्याचे मुख्य ठिकाण व औद्योगिक शहर. लोकसंख्या २,८७,६०० (१९७४). हे ट्रेंट नदीच्या डाव्या काठावर वसले असून, लंडनच्या वायव्येस १३२ किमी. व बर्मिंगहॅमच्या ईशान्येस सु. ७५ किमी. आहे. सहाव्या शतकात प्रथम अँग्लो-सॅक्सनांनी येथे वसाहत केली. या वसाहतीस ‘स्नॉटिंगम’ म्हणत असत. वास्तविक पाहता या शहराचा इतिहास नवव्या शतकापासून ज्ञात आहे. नवव्या शतकात हे डेन लोकांच्या वसाहतीचे प्रसिद्ध नगर होते. १६४२ मध्ये पहिल्या चार्ल्सने येथे बंडाचे निशाण उभारून यादवी युद्धास सुरुवात केली. नॉर्मन काळात ट्रेंट नदीच्या काठावर विल्यम पेव्हेरेलने बांधलेला किल्ला, बॉझ्वर्थ फील्डच्या लढाईपूर्वी स्कॉटलंडच्या दुसऱ्या डेव्हिडच्या कारावासाचे व तिसऱ्या रिचर्डचे राहण्याचे ठिकाण होते. नंतर हा किल्ला क्रॉमवेलने पाडून पुन्हा १६७४ मध्ये बांधला. १८३१ साली ‘रिफॉर्म बिल’ आंदोलनात हा किल्ला जाळला गेला. १८७५–७८ मध्ये महानगरपालिकेने हा दुरुस्त करून त्यात वस्तुसंग्रहालय व कलावीथी यांची स्थापना केली. सध्या नॉटिंगॅम हे आधुनिक व महत्त्वाचे औद्योगिक शहर असून येथे लहानमोठे पुष्कळ उद्योग विकसित झाले आहेत. सुती वस्त्रे व सिगारेट उद्योगांचे हे प्रमुख केंद्र आहे. येथे लेस, मोजे, औषधे, सायकली, रेशमी कापड, विद्युत उपकरणे, मद्ये, चामडी इ. उद्योग आहेत. येथील लेस तयार करण्याचा उद्योग पूर्वी फार प्रसिद्ध होता. सायकली तयार करण्याचा जगामधील सर्वांत मोठा कारखाना येथे आहे. रॅडफर्ड, बेसफर्ड, बुलवेल, डेब्रुक ही नॉटिंगॅमची औद्योगिक उपनगरे आहेत. नॉटिंगॅम हे ब्रिटनमधील दगडी कोळशाच्या उत्पादनाचे पहिल्या क्रमांकाचे ठिकाण आणि रेल्वे, रस्ते व नदीमार्गाचे केंद्र आहे. न्यू स्टेड ॲबी हे लॉर्ड बायरनचे निवासस्थान, वॉल्टन हॉलमधील नॅचरल हिस्टरी म्यूझीयम (१९२६), नॉटिंगॅम विद्यापीठ, थिएटर रॉयल (१८६५), प्ले हाउस (१२६३), सार्वजनिक ग्रंथालय, तांत्रिक महाविद्यालय, आधुनिक संसदभवन, रोमन कॅथलिक कॅथीड्रल इ. गोष्टी प्रेक्षणीय असून, हे रॉबिन हुडचे जन्मस्थान आहे, असे म्हणतात.

कांबळे, य. रा.