नाळ : गर्भावस्थेत गर्भ व गर्भाशयातील वार [→ वार–२] यांना जोडणाऱ्या दोरीसारख्या अवयवाला नाळ म्हणतात. गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवरच अवलंबूनअसते. गर्भाची वाढ होण्याकरिता आवश्यक त्या सर्व पदार्थांचा आणि ऑक्सिजनाचा पुरवठाकरणे, तसेच गर्भाच्या चयापचयामुळे (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींमुळे) उत्पन्न झालेले टाकाऊ पदार्थ वाहून नेणे ही नाळेची महत्त्वाची कार्ये असतात. वारेला जोडलेला असूनही गर्भ जेव्हा चलनक्षम बनतो, तेव्हा नाळ लांब असल्यामुळेच तो गर्भाशयात मोकळेपणाने फिरू शकतो.
भ्रूणविज्ञान : अगदी सुरुवातीच्या अवस्थेत भ्रूण गर्भाशयाच्या भित्तीला आखूड व जाड अशा देठाने जोडलेला असतो, या देठाला देहवृंत म्हणतात. या देठामध्येजो विस्तारित भाग बनतो त्याला ⇨ अपरापोषिका म्हणतात. देहवृंत भ्रूणावस्थेच्या सहाव्या आठवड्यात वाढलेला असतो. अपरापोषिकेच्या बरोबरच रक्तवाहिन्या या देठात शिरतात. भ्रूणाच्या वाढीबरोबरच देहवृंताची लांबी वाढत जाते आणि दोन नाळ- रोहिण्या वदोन नाळ-नीला तयार होतात. कालांतराने नाळ-नीलांचे एकीकरण होऊन एकचनाळ-नीला बनते. नाळ-नीला गर्भाला गर्भपोषक द्रव्ये व ऑक्सिजन पुरविते, तरनाळ-रोहिण्या गर्भातील टाकाऊ पदार्थ वाहून नेतात. अपरापोषिका हा भ्रूणाच्या प्राथमिक आंत्रमार्गापासून (आतड्याच्या मार्गापासून) निघणारा अंधवर्ध (एका टोकाला बंद असलेला पिशवीसारखा भाग) असतो. पूर्ण वाढलेल्या गर्भाच्या नाळेत या अंधवर्धाचा काही अल्पविकसित भाग शिल्लक असतो. अपरापोषिकेच्या भ्रूणाकडील भागापासून मूत्राशय बनते.
उल्बगुहेची (भ्रूणाच्या भोवती असलेल्या एका पातळ कोशिकामय कलेच्या म्हणजे पेशीमय थराच्या– उल्बाच्या –आतील पोकळीची) जसजशी वाढ होत जाते, तसतसे देहवृंतावर उल्बाचे आच्छादन तयार होते. त्यामध्ये पीतक-कोश (पोषक द्रव्ययुक्त कोश) व पीतक-नलिका यांचा समावेश होतो. देहवृंतातील भ्रूणमध्यस्तरापासून‘व्हॉर्टन जेली’(टॉमस व्हॉर्टन या इंग्रज शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यातयेणारा आणि म्यूकोपॉलिसॅकॅराइड व हायलुरॉनिक अम्ल यांचे जास्त प्रमाण ज्यात आहे असा भाग) म्हणजे नाळेतील संयोजी (जोडण्याचे कार्य करणारे) ऊतक (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांचा समूह) तयार होते. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात भ्रूणाच्या मध्यांत्राचा काही भाग देहवृंतात शिरलेला असतो. जन्मानंतर तो तसाच राहिल्यास अधरवर्ध्म (बेंबी संपूर्ण बंद न होता तिच्या भोकातून आतडे बाहेर येणे) किंवा नाभी फुगवटा यासारख्या जन्मजात विकृती उद्भवतात.
रचना : गर्भकाल पूर्ण होण्याच्या सुमारास नाळेची सर्वसाधारण लांबी ५० सेंमी. आणि व्यास १·५ सेंमी. असतो. तिला डावीकडून उजवीकडे जाणारे पीळ पडलेले असतात. तिची रचना पुढीलप्रमाणे असते : (१) बाहेरून उल्बाचे आच्छादन असते. गर्भाच्या बाह्यत्वचेतील थराप्रमाणे यातही स्तरित घनाकार कोशिका असतात (२) व्हॉर्टन जेली. जेलीसारखा संयोजी ऊतकाचा आधार देणारा भाग. यामुळे नाळेतील सर्व भाग एकत्रित राहतात व रक्तवाहिन्यांना संरक्षण मिळते (३) दोन नाळ-रोहिण्या व एक नाळ-नीला (४) अपरापोषिकेचा अल्पविकसित भाग (५) पीतक-नलिकेचा उरलेला भाग.
नाळेमध्ये कोणत्याही तंत्रिका (मज्जा) नसतात व तिचे ताणबल (न तुटता जास्तीत जास्त ताण सहन करू शकेल ते बल) ३·६ किग्रॅ. इतके असते. नाळेतील रोहिण्या नीलेपेक्षा अधिक लांब असतात. प्रसूतीनंतर नाळेच्या रोहिण्यांमधील स्पंदन जवळजवळ दोन मिनिटे चालू असते व त्यानंतर ते हळूहळू अस्पष्ट होऊन थांबते. वारेच्या बाजूकडील शक्य तेवढे रक्त नवजात अर्भकास मिळावे म्हणून दोन मिनिटे थांबून नाळ कापतात. उपस्थित परिचारक किंवा दाई प्रसूतीनंतर अर्भकाच्या उदरभित्तीकडील नाळ ५ सेंमी. अंतरावर बांधते आणि दुसरे बंधन वारेच्या बाजूला पहिल्या बंधनापासून सु. १·२५ सेंमी. अंतरावर बांधून दोन्ही बंधनांच्या दरम्यान नाळ कापते.
विकृती : (१) अपसामान्य लांबी : नाळेच्या लांबीत १३ सेंमी. ते १२५ सेंमी. पर्यंत फरक असू शकतो. ७६ सेंमी. पेक्षा अधिक किंवा ३० सेंमी. पेक्षा कमी लांबी असलेली नाळ अपसामान्य समजली जाते. क्वचित संपूर्ण नाळेचा अभावही आढळला आहे. अतिशय लांब नाळ ही ‘नाळदर्शन’ (प्रसूतीच्या वेळी नेहमीप्रमाणे डोके बाहेर न येता अगोदर नाळ दिसणे किंवा बाहेर पडणे) या अपसामान्य प्रसूतीस कारणीभूत असते. (२) वारेशी जोडलेल्या ठिकाणच्या विकृती याकरिता ‘वार-२’ ही नोंद पहावी. (३) गाठी पडणे. गाठी दोन प्रकारच्या असतात : (अ) खरी व (आ) आभासी. खरी गाठ नाळ लांब असल्यामुळे वेटोळ्यातून फिरल्यामुळे तयार होते. अशी गाठ फार आवळली गेल्यास गर्भाला मिळणाऱ्या ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होते (ऑक्सिजनन्यूनता) व मृत्यूही संभवतो. आभासी गाठ केवळ व्हॉर्टन जेलीचा फुगवटा असतो. (४) नाळ परिपीडन (पीळ बसणे) : गर्भाच्या बेंबीजवळील भागात बहुधा आढळणाऱ्या या विकृतीत गर्भमृत्यू लवकर संभवतो. (५) रक्तार्बुद : गर्भाच्या जवळील नाळेच्या भागात नाळ-नीला फाटून रक्तस्राव गोळा होतो बहुधा गर्भमृत्यू होतो. (६) नाळशोथ : संक्रामित (रोगकारक सूक्ष्मजंतूंचा संसर्ग झालेले) उल्बद्रव्य किंवा मातेला उपदंशासारखी विकृती असल्यास नाळेला शोथ (दाहयुक्त सूज) येतो. (७) नाळ अर्बुदे : अत्यंत अल्पप्रमाणात ही विकृती आढळते (अर्बुद म्हणजे कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी व शरीरक्रियेला निरुपयोगी असणारी गाठ). (८) गळ्याभोवती नाळेचे वेढे असणे : पुष्कळ प्राकृत (सर्वसाधारण) प्रसूतींमध्ये नाळ नवजात अर्भकाच्या गळ्याभोवती वेढलेली आढळते. सहसा अर्भकास त्रास होत नाही परंतु दोनतीन वेढे पडलेले असल्यास अपसामान्य प्रसूती संभवते. कधी फास आवळ बसून ऑक्सिजनन्यूनता होते. अनेक वेळा ते नवजात अर्भकातील मृतजाततेचे कारण असू शकते.
संदर्भ : 1. Arey, L. B. Developmental Anatomy, Bombay, 1961.
2. Baird, D., Ed. Combined Texbook of Obstetrics and Gynaecology, Edinburgh, 1962.
3. Dawn, C. S. Textbook of Obstetrics, Calcutta, 1974.
भालेराव, कमल य. भालेराव, य. त्र्यं.
“