नालंदा : बिहार राज्यातील सुप्रसिद्ध प्राचीन बौद्ध अवशेषांचे एक स्थळ. ते गंगेच्या काठी पाटण्याच्या आग्नेयीस सु. ७० किमी. वर व राजगीरच्या उत्तेरस ११·२७ किमी.वर बडगाव नामक खेड्याच्या परिसरात वसले होते. नालंदा हे प्राचीन विद्यापीठ म्हणून भारतात ख्यातनाम होते. प्राचीन वाङ्मयात नालंदाची नल, नालक, नालकग्राम, नालंद वगैरे भिन्न नामांतरे आढळतात. नालंदा या नावाविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. नालंदा याचा अर्थ (न + अलम् + दा = पुरेसे देऊ न शकणारी) असा करण्यात येतो. भारतात प्रवासास आलेल्या फाहियान (४००–४११), ह्युएनत्संग (६३०–६४४) व इत्सिंग (६७३–६८५) या तीनही प्रसिद्ध चिनी प्रवाशांनी नालंदाच्या शैक्षणिक परंपरा व समृद्धी यांसंबंधी सविस्तर माहिती आपल्या प्रवासवृत्तांमध्ये लिहून ठेवली आहे.
प्राचीन वाङ्मयीन पुराव्यानुसार नालंदाची प्राचीनता मौर्यकाळातील अशोकाच्या साम्राज्यापर्यंत जाते तथापि या स्थळाची भरभराट इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांपासून पुढे झाली आणि हर्षवर्धन व पाल राजे (आठवे ते बारावे शतक) यांचा उदार आश्रय येथील विद्यापीठास मिळाला. कनिंगहॅम यांनी या स्थलाचा शोध १८७१ मध्ये लावला पण प्रत्यक्ष उत्खनन मात्र १९१६ पासून पुढे कित्येक वर्षे करण्यात आले. यात अनेक मंदिरे, विहार, स्तूप, मुद्रा व ब्राँझच्या मूर्ती सापडल्या. अनेक पायऱ्या असलेली उत्तुंग मंदिरे, मधे चौक व भोवताली व्हरांडा आणि अनेक खोल्या असलेले अनेक विहार आणि सभागृहे यांवरून प्राचीन विद्यापीठीय जीवनाची कल्पना येते. या इमारतीचे स्तंभ आणि भिंती कलात्मक चित्रांनी व कोरीवकामाने सजविलेल्या होत्या. विद्यार्थ्यांचे जीवन कसे होते, यावर प्रकाश टाकणारा पुरावाही येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. विहार अनेक वेळा आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा पुरावाही मिळतो. सुमात्राच्या राजाच्या विनंतीवरून देवपाल राजाने (नववे शतक) विहारांना गावे इनाम दिल्याचा ताम्रपट सापडला आहे. नांलदा विहाराच्या तसेच खाजरी व श्रेणींच्या मुद्राही बऱ्याच मिळाल्या आहेत. अनेक स्तूपांत बौद्ध मठ व धार्मिक ग्रंथांचा मजकूर असलेल्या मृण्मुद्राही हाती आल्या आहेत. याचा नाश कसा झाला याविषयी निश्चित पुरावा उपलब्ध नाही पण मुसलमानांच्या आक्रमण काळात बख्तीयार खल्जीने येथील विहार जाळले व मूर्ती फोडून स्तूप छिन्नविच्छिन्न केले असावेत, असे एक मत आहे.
संदर्भ : 1. Ghosh, A. Nalanda, New Delhi, 1959.
2. Patil, D. R. The Antiquarian Remains in Bihar, Patna, 1963.
देव, शां. भा.
“