नायकराजे : सोळाव्या शतकात राक्षस-तागडीच्या लढाईनंतर हळूहळू द. हिंदूस्थानातील विजयानगरच्या सामंतांनी (नायक व पाळेगार)आपापल्या प्रदेशांत स्वतंत्र राज्ये स्थापन केली. प्रथम त्यांना नायक अथवा पाळेगार व नंतर राजे म्हणू लागले. विजयानगरच्या साम्राज्याचे प्रशासनाच्या सोयीसाठी उदयगिरी, पेनुकोंडा, चंद्रगुत्ती, मदुराई, तंजावर, जिंजी, इक्केरी, म्हैसूर इ. भागांत विभाजन केले होते. या विभागांचे प्रशासन पाहण्यासाठी नायक, पाळेगार वगैरे अधिकारी असत. सम्राट त्यासाठी राजघराण्यातील व्यक्ती, मंत्री वा सेनाधिकारी यांची नेमणूक करी. एखादा नवीन प्रदेश जिंकल्यावर तो प्रदेश अशा अधिकाऱ्यास त्याच्या कर्तबगारीसाठी बक्षीसादाखलसुद्धा देत.त्यामुळे असे नायक किंवा पाळेगार त्या प्रदेशाचे जवळजवळ राजेच बनत. मदुराई, जिंजी, इक्केरी, तंजावर इ. स्वतंत्र राज्ये (राजकुले) अशीच निर्माण झाली.

मदुराईचे नायक:राक्षस-तागडीच्या लढाईत १५६५ मध्ये विजयानगरचा पराभव झाला.त्याचे साम्राज्य प्रायः नष्ट झाले. त्याचे वंशज प्रथम पेनुकोंडा आणि नंतर चंद्रगिरी येथे नाममात्र राज्य करीत राहिले.तत्पूर्वी बरीच वर्षे मदुराईचा अधिकारी नागम याने बंड केले. त्या वेळी नागमचा मुलगा विश्वनाथ नायक (१५५९–६३)याने विजयानगरच्या कृष्णदेवराय किंवा अच्युतराय यांच्या आज्ञेवरून त्याचा मोड करण्याचा विडा उचलला आणि मदुराईवर स्वारी करून नागम यास विजयानगरला धरून आणले.याकामगिरीबद्दल विजयानगरच्या राजांनी मदुराईचे नायकत्व व तिरुचिरापल्लीपासून कन्याकुमारी, तसेच सेलम आणि कोईमतूर धरून सर्व प्रदेश त्याच्या ताब्यात दिला आणि तंजावर हे शिवप्पा नायक याच्या देखरेखीखाली ठेवले.विश्वनाथाने सैन्याची जमवाजमव करून आपल्या अखत्यारीखालील प्रदेशात ठिकठिकाणी वंशपरंपरागत काही अधिकारी नेमले.यांनी मदुराईच्या नायकास दरवर्षी काही नियमित खंडणी द्यावी, असेही ठरले. राक्षस-तागडीच्या लढाईनंतर मदुराईचे नायक नाममात्र विजयानगरचे मांडलिक राहिले.यावेळी विश्वनाथाचा मुलगा पहिला कृष्णप्पा(१५६४–७२)मदुराई येथे नायक होता.

पारंपरिक इतिहासानुसार मदुराईच्या नायक राज्याची स्थापना कृष्णदेवराय याने केली असावी.कारण १५२०–२५च्या दरम्यान तो दक्षिणेकडे गेला होता आणि वीर नरसिंह याला त्याने दक्षिणेचा राज्यपाल नेमले आणि नागम याला मदुराईचा राज्यपाल केले परंतु पुढे नागमाने बंड करून मदुराईची स्वतंत्र गादी स्थापण्याचा यत्‍न केला. तेव्हा त्याचा मुलगा व विजयानगरचा एक सेनापती विश्वनाथ यास अच्युतरायाने त्यावर धाडले.त्याने नागमाला पकडून त्याचे बंड मोडले.याचे बक्षिस म्हणून त्यास मदुराईचे नायकपद देण्यात आले (१५५९).काही इतिहासकारांच्या मते विश्वनाथाचा मुलगा कृष्णप्पा यास विजयानगरच्या राजाने नायकपद दिले आणि त्यावेळेपासून मदुराईचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

विश्वनाथ (१५२९–६४)हा मदुराईचा पहिला नायक.तो विजयानगरने नेमलेला राज्यपाल म्हणून मदुराईचा राज्यकारभार पाहत होता किंवा काय, याविषयी अद्यापि इतिहासतज्ञांत एकमत नाही.तथापि पराक्रमी सेनापती व प्रशासक म्हणून त्याने चांगली कामगिरी केली. ७२ बुरूजांचा मदुराई किल्ला बांधला आणि तिरुचिरापल्ली आपल्या राज्यात समाविष्ट करून तेथेही एक किल्ला बांधला.याशिवाय रामेश्वरम्‌चा मार्ग चोर व वाटमाऱ्यांपासून निर्धास्त केला आणि तिरुनेलवेली येथील पांड्यांवर वर्चस्व स्थापिले. त्याच्या अंमलाखाली मदुराई, रामानाथपुरम्, तिरुनेलवेली, तिरुचिरापल्ली, कोईमतूर, सेलम व केरळ राज्यांचा काही भाग होता.त्याने प्रशासनव्यवस्थेसाठी अरियनाथ या आपल्या मंत्र्याच्या मदतीने पाळ्यम्‌पद्धती नावाची खास व्यवस्था कार्यवाहित आणली.यानुसार त्याने राज्याचे ७२ भाग पाळ्यम्‌ पाडले व प्रत्येकावर एक प्रमुख अधिकारी–पाळेगार(पाळय–गार)नेमला. या पाळेगारांनी राज्याच्या संरक्षणासाठी फौज ठेवावी आणि प्रसंगोपात्त नायकास मदत करावी, याशिवाय त्यांनी नागरी शासन आणि जमिनीच्या उत्पन्नाचा १/३ भाग महसूल म्हणून नायकास द्यावा असे ठरले. या पाळेगारांनी जंगले तोडून शेती केली, छोटीछोटी धरणे बांधली, तलाव खोदले आणि काही खेडी नव्याने वसविली. त्यामुळे साहजिकच शेतीस उत्तेजन मिळून उत्पन्न वाढले. विश्वनाथाने अनेक मंदिरे व इमारती बांधल्या. त्यांपैकी मीनाक्षी-सुंदरेश्वर मंदिर प्रसिद्ध असून तिरुचिरापल्ली आणि श्रीरंगम् येथील मंदिरांचा त्याने जीर्णोद्धार केला.

विश्वनाथानंतर त्याचा मुलगा कृष्णप्पा नायक (१५६४–७२)मदुराईच्या गादीवर आला. त्या वेळी तुंबिच्ची नायक नावाच्या पाळेगाराने बंड केले. ते त्याने मोडून काढले. त्यानंतर त्याने श्रीलंकेवर स्वारी केली कारण श्रीलंकेने विजयानगरची खंडणी कित्येक दिवस दिली नव्हती. त्याच्या चिन्न केशव या सेनापतीने श्रीलंकेच्या राजास ठार मारले आणि कृष्णप्पा नायक या आपल्या मेहुण्यास श्रीलंकेच्या राज्यव्यवस्थेसाठी मागे ठेवले. या सुमारास विजयानगरवर मुसलमानांनी आक्रमण केले, तेव्हा कृष्णप्पा नायकाने आपले प्रधानी आणिदळवी अरियनाथ यांच्याबरोबर सैन्य देऊन विजयानगरच्या मदतीस धाडले परंतु राक्षस-तागडी येथे विजयानगरचा सपशेल पराभव झाला (१५६५).तेव्हा अरियनाथ मदुराईस परत आला. कृष्णप्पाने अनेक देवळे बांधली आणि कृष्णपुरमकडैयम ही दोन गावे वसविली.याशिवाय मंदिरांना त्याने अनेक देणग्या दिल्या.

त्याच्यानंतर त्याचा मुलगा वीरप्पा नायक (१५७२–९२)गादीवर आला. त्याने शांततेने राज्य केले.त्याच्या वेळीही मावळी वनद रायर नावाच्या अनौरस पांड्य राजपुत्राने बंड केले पण त्याचा त्याने निःपात केला. त्याने चिदंबरम् येथील देवळाभोवती प्राकार बांधला आणि किल्ल्याची डागडुजी केली. यानेच सहस्त्रस्तंभी मंडप बांधला असावा, असे एक मत आहे. त्याच्या काळी मिशनरी लोकांनी मदुराई येथे एक चर्च बांधले आणि फादर जी. फर्नांडिस हा तेथे ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ राहू लागला.

वीरप्पा नायकानंतर त्याचा मुलगा दुसरा कृष्णप्पा नायक (१५९५–१६०१)गादीवर आला. याचा काळही अत्यंत शांततेचा गेला. आपल्या पूर्वसूरींप्रमाणेच तो विजयानगरच्या राजांशी निष्ठावंत होता.त्याच्या काळी अरियनाथ हा प्रसिद्ध दळवी मरण पावला.

कृष्णप्पाच्या मृत्यूनंतर त्याच्या कस्तुरी रंग या धाकट्या भावाने काही काळ गादी बळकाविली परंतु थोड्याच दिवसांत त्याचा खून झाला. कृष्णप्पाचा थोरला भाऊ विश्वप्पा १६०१ पूर्वीच मरण पावला होता.विश्वप्पाचा मुलगा मुत्तू कृष्णप्पा नायक (१६०१–०९)हा गादीवर आला. मुत्तू कृष्णप्पाने मारव देश समृद्ध करून त्यावर सदैकदेव (उडैयन सेतुपति)याची राज्यकर्ता व प्रशासक म्हणून नेमणूक केली.यामुळे पोर्तुगीजांचा मदुराईच्या राज्यातील शिरकाव थांबला आणिरामेश्वरम्‌च्या यात्रेकरूंचा मार्ग सुगम झाला. तथापि त्याने पोर्तुगीजांना धर्मप्रसारास परवानगी दिली.त्यामुळे रॉबर्ट डी. नोबिली हा धर्मप्रसारासाठी मदुराईस येऊन राहिला आणि त्याने भारतीय रीतिरिवाज आत्मसात करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. मुत्तू कृष्णप्पाने कन्याकुमारीला भगवती मंदिर आणि कयत्तरला शिव मंदिर बांधले. यांशिवाय त्याने इतर मंदिरे बांधून त्यांना जमिनी दिल्या.


मुत्तू कृष्णप्पानंतर त्याचा मुलगा पहिला मुत्तू वीरप्पा नायक (१६०९–२३)गादीवर आला. या वेळी विजयानगरचा राजा दुसरा वेंकट मृत्यू पावल्यामुळे वेळ्ळूरच्या गादीचा तंटा निर्माण झाला. त्यामुळे यादवी माजली. त्याने विजयानगरच्या राजाशी असणारे संबंध तोडून टाकले. याच वेळी त्याने आपली राजधानी तंजावरच्या नायकांना शह देण्यासाठी मदुराईहून तिरुचिरापल्ली येथे हलविली व तंजावरच्या नायक राजांची आपल्यावर स्वारी झाल्यास संरक्षण करता येईल, अशीतयारी ठेवली. मदुराईत यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार अधिक वाढला.

मुत्तू वीरप्पानंतर त्याचा धाकटा भाऊ तिरुमल नायक (१६२३–५९)गादीवर आला. हा मदुराईच्या नायक घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. याच्या वेळी वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र इ. कलांत विशेष प्रगती झाली. त्याने गादीवर येताच प्रथम ३०,००० सैन्य उभारून आपले लष्करी सामर्थ्य वाढविले, सरहद्दीवर नवीन किल्ले बांधले आणि राजधानी पुन्हा मदुराईस नेली. विजयानगरच्या राजांबरोबरचे सर्व संबंध त्याने पूर्णतः तोडले. त्याला म्हैसूरच्या चामराज ओडेयर याच्याशी युद्ध करावे लागले. त्यात चामराजाचा पराभव झाला. पुढे त्याने त्रावणकोर हे मांडलिक राज्य खंडणी देत नाही, म्हणून त्यावर स्वारी केली व रामनाथपुरम् येथील अंतर्गत बंडाळीही मोडून काढली. नंतर त्याचे विजयानगरचा तिसरा श्रीरंग याजबरोबर गोवळकोंड्याच्या मदतीने युद्ध झाले. तीत गोवळकोंड्याच्या राजाने विजयानगरचा पूर्ण पराभव केला व विजयानगरचे हे अखेरचे राज्यही संपुष्टात आले.

तिरुमलाच्या कारकीर्दीच्या अखेरीस म्हैसूरच्या कंठीरव नरस राजाने मदुराईवर स्वारी केली. तीत तिरुमलाचा पूर्ण जय झाला. त्याच्या कारकीर्दीत मिशनऱ्यांची कारवाई वाढली होती तथापि हिंदू धर्माबद्दलची त्याची सहिष्णू वृत्ती यत्किंचितही कमी झाली नाही. त्याने राजवाडे व अनेक देवळे बांधली गोपुरे उभारली आणि मंडप बांधले. एवढेच नव्हे, तर दानधर्मात तो फार उदार होता. गरिबांसाठी त्याने धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्रे उघडली. तसेच आपल्या पुतळ्यासह एक मंदिर मदुराईमध्ये बांधले.

तिरुमलनंतर मुत्तू वीरप्पा नायक (१६५९) हा त्याचा मुलगा गादीवर आला पण काही महिनेच त्याने राज्य केले. या काळात तंजावरच्या विजयराघव नायकावर ह्याने स्वारी केली पण विजयराघवच्या मदतीस शहाजी आला व त्यानेच तंजावर आत्मसात केले आणि त्यामुळे पुढील लढाई आपोआपच थंडावली.

त्याच्यानंतर त्याचा मुलगा चोक्कनाथ (१६५९–८२)वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी गादीवर आला.त्याने आपली राजधानी परत तिरुचिरापल्ली येथे हलविली. पुन्हा विजयराघवबरोबर युद्ध पुकारले. त्याच्या कारकीर्दीत त्याच्या दळवींनी सत्ता हातात घेतली, तरीही त्याने राज्यातील अंतर्गत बंडाळी शमविण्याचाप्रयत्‍न केला. तंजावरवर आपली अधिसत्ता स्थापन केली पण अखेरच्या दिवसांत तो कामांध व दुर्बल झाला. यामुळे त्याने पुढे केलेल्या लढायांत त्यास बराच प्रदेश गमवावा लागला. एवढेच नव्हे, तर त्याचा धाकटा भाऊ मुत्तुलिंग नायक राज्यकारभारात ढवळाढवळ करू लागला. याच वेळी म्हैसूरच्या राजाने मदुराईवर स्वारी केली. तेव्हा त्याने एकोजी व अरसुमलै या तंजावरच्या मित्रांची मदत घेतली पण पुढे अरसुमलैने तिरुचिरापल्लीवरच स्वारी केली. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन चोक्कनाथ मरण पावला.

त्याच्यानंतर रंग कृष्ण मुत्तू वीरप्पा नायक (१६८२–८९)हा मुलगा गादीवर आला.त्याच्या वेळी मदुराईच्या आसपासचा बराचसा भाग म्हैसूरचे राजे, मराठे व तंजावरकर यांच्या ताब्यात होता. प्रत्यक्ष मदुराईची व्यवस्थाही म्हैसूरच्या हातात होती. जिकडे तिकडे अनागोंदी व अराजकता माजली होती परंतु त्याच्या शत्रूंत आपापसांत भांडणे सुरू झाली आणि हळूहळू त्याचे राज्य त्याला मिळाले. रंग कृष्ण मुत्तू वीरप्पानेही अनेक धर्मशाळा व देवळे बांधली आणि दानधर्म केला. त्याच्या काळी मिशनरी धर्मप्रसाराचे कार्य जॉन डी ब्रिट्ट या पाद्र्यामार्फत चालू होते.

त्याच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या त्याच्या मुलाचे विजयरंग चोक्कनाथ हे नाव ठेवण्यात येऊन त्याला गादीवर बसविण्यात आले परंतु त्याची आजी मंगम्मळ (चोक्कनाथाची पत्‍नी) हिच्याकडेच राज्याची सूत्रे व सर्व सत्ता आली (१६८९ – १७०६). तिने काळाची पावले ओळखून मुसलमानांना खंडणी देण्याचे ठरविले आणि आपले राज्य परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठेवले. तथापि त्रावणकोरच्या मांडलिक राजाने स्वातंत्र्य जाहीर केले आणि म्हैसूरने काही प्रदेश बळकाविला. तिने खिस्ती धर्मप्रचारास आळा घातला नाही. एवढेच नव्हे, तर मुसलमानांना मशीद व दर्गा बांधून दिला आणि नायक घराण्याचे सहिष्णू धोरण पुढे चालविले. तिने दानधर्म करून धर्मशाळा बांधल्या रस्त्यांवर पाणपोई घातल्या व झाडे लावली आणि पाटबंधारे बांधले. ती १७०६ मध्ये मरण पावली.


विजयरंग चोक्कनाथ (१७०६ – ३२) हा तिच्या मृत्यूनंतर सज्ञान झाल्यावर गादीवर आला. राजकर्त्याचे कोणतेच गुण त्याच्या अंगी नव्हते. त्याने दानधर्मात पैशाची उधळपट्टी केली आणि राज्यव्यवस्था दळवी कस्तुरी रंगय्या व प्रधानी वेंकटकृष्णय्या यांच्या हाती सुपूर्त केली. त्यांनी जनतेवर अत्याचार व जुलूम केला.

त्याच्या मृत्यूनंतर त्याला मुलगा नसल्यामुळे मीनाक्षी (१७३२ – ३६) या त्याच्या राणीकडे राज्याची सूत्रे आली. तिने विजयकुमार या मुलास दत्तक घेऊन त्याच्या नावे राज्यकारभार सुरू केला. तेव्हा नातेवाईकांनी यादवीस प्रारंभ केला आणि मुसलमानांचा चंचूप्रवेश मदुराईत आला. कर्नाटकाचा नबाब चंदासाहेब याने तिला फसवून तिचे राज्य गिळंकृत केले व तिला अटक केली. अखेर मीनाक्षीने तुरूंगातच आत्महत्या केली.

राज्यव्यवस्था : नायक राजांचे राज्य जवळजवळ तमिळनाडूतील डिंडिगल, घारापुरम्, कोईमतूर, सत्यमंगलम्, एरोड, करूर, नामकल, सेंडमंगलम्, सेलम, मेलूर, अत्तूर इ. प्रदेशांवर होते. तेथील अधिकारी जरी विजयानगरच्या सम्राटांचे नाममात्र मांडलिक होते, तरी त्यांची राज्यव्यवस्था स्वतंत्र होती आणि ठराविक खंडणी ते विजयानगरच्या सम्राटास अनेक वर्षे देत होते. नायक राजा हा जरी सर्व सत्ताधीश असला, तरी राज्यकारभारासाठी त्याने एक मंत्रिमंडळ नेमले होते आणि प्रशासनव्यवस्थेसाठी ७२ पाळ्यम्‌मध्ये राज्याचे विभाग केले होते. हे पाळ्यम् आपल्या महसुलातील १/३ हिस्सा नायकांना देत व आपल्या विभागाचे संरक्षण करीत. राजेशाही पद्धती जरी अस्तित्वात होती, तरी राजा मंत्रिमंडळाचा प्रसंगोपात्त सल्ला घेई. या मंडळात दळवी, प्रधानी, रायसम, कनक्कन, व स्तानपती हे प्रमुख अधिकारी असत. दळवी हा मुख्यमंत्री व प्रमुख सेनापती असे. तर प्रधानी हा अर्थमंत्री होता. रायसम हा मुख्य सचिव, कनक्कन हा मुख्य लेखापाल व स्तानपती हा परराष्ट्र सचिव असे. त्यांच्या खात्यांची संविधानात्मक माहिती ज्ञात नाही तथापि मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली निरनिराळ्या प्रदेशांचे राज्यपाल आणि राज्यपालांच्या हाताखाली पाळेगार असत, हे पाळेगार नागरी व लष्करी व्यवस्था पाहत. यांशिवाय विविध किल्ल्यांवर उदा., तिरूचिरापल्ली, मदुराई इ. किल्लेदार असत. लष्करात सेनादलाशिवाय घोडदळ, हत्तीदळ इ. होती. मारव प्रदेशातून उत्तम लढवय्ये व शिपाई सैन्यात भरती होत.

तंजावरचे नायक : तंजावरच्या वीरशेखर राजाची स्थिती मदुराईच्या राजाप्रमाणे झाली आणि तंजावर विजयानगरच्या राजाने हस्तगत करून शिवप्पा नायक (१५४९ – ७२) यास दिले. शिवप्पा नायक हा अच्युतरायाचा साडू होता शिवप्पा कार्यक्षम प्रशासक होता. त्याने तंजावर येथे शिवगंगा नावाचा किल्ला बांधला व एक तलाव खोदला, तसेच तिरुवन्नामलई येथे एक मंदिर बांधले. तो शैवपंथी होता, तरी इतर पंथ व धर्म यांना त्याने आर्थिक साहाय्य दिले. शिवप्पानंतर त्याचा मुलगा अच्युताप्पा नायक (१५७२ – १६१४) तंजावरच्या गादीवर आला. शिवप्पा व अच्युतप्पा हे राक्षस-तागडीच्या युद्धानंतरही विजयानगरच्या राजांशी एकनिष्ठ होते. अच्युताप्पानंतर रघुनाथ (१६१४ – ६०) नायक झाला. हा पराक्रमी, कलाभिज्ञ व विद्वानांचा चाहता होता आणि त्याने विजयानगरचे वर्चस्व झुगारून दिले. गोविंद दीक्षित या आपल्या प्रधानाच्या मदतीने त्याने आपले राज्य विस्तृत व ऐश्वर्यसंपन्न केले. रघुनाथ हा स्वतः लेखक होता व त्याचा उपर्युक्त मंत्री गोविंद हा अप्पय्य दीक्षिताचा मित्र असून विद्वान म्हणून प्रसिद्ध होता. त्याने साहित्यसभा हा ग्रंथ लिहिला. त्याच्या वाड्‌मय मंडळात मदुरावनी व रामभद्रांबा या दोन कवयित्री होत्या. तथापि त्याच्या वेळी आदिलशाहाने स्वारी करून त्याचा पराभव केला व मोठी खंडणी वसूल केली. रघुनाथ नायकानंतर त्याचा मुलगा विजयराघव (१६६० – ७३) गादीवर आला. तो धर्मनिष्ठ व परोपकारी होता. त्याने गरिबांसाठी धर्मशाळा बांधल्या आणि विद्वानांना देणग्या दिल्या. मदुराईच्या चोक्कलिंग नायकाने त्याच्या मुलीस मागणी घातली. ती विजयराघवने अमान्य केल्यामुळे मदुराई व तंजावर यांत लढाई झाली. तीत विजयराघव व त्याचा पुत्र दोघेही मारले गेले. त्यापूर्वीच त्याच्या सर्व राण्यांनी आत्महत्या केली होती. चोक्कलिंग नायकाने अळगिरी यास तेथे प्रशासक म्हणून नेमले पण त्याने मदुराईचे वर्चस्व झुगारून दिले. वरील युद्धाच्या धुमश्वक्रीत विजयराघवचा सेंगमलदास (चेंगमलदास) नावाचा एक मुलगा वाचला. तो वेंकण्णनामक ब्राह्मणाने आपल्या हाताशी धरून कारस्थान केले आणि विजापूरच्या मदतीने अळगिरीचा पराभव करून सेंगमलदास यास तंजावरच्या गादीवर बसविले पण पुढे सेंगमलदास व वेंकण्ण यांत वैर आले. यावेळी विजापूरच्या वतीने एकोजीला वेंकण्णाच्या मदतीसाठी पाचारण करण्यात आले. एकोजीने तंजावर जिंकून सेंगमलदास व वेंकण्ण यांना बाजूस सारून तंझावरची गादी बळकाविली (१६७६).

जिंजीचे नायक : विजयानगरच्या राजाने १४६४ मध्ये या प्रदेशावर वेंकटपती नायक याची आपला प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. पुढे येथील नायक स्वतंत्रपणे वागतात असे दिसताच कृष्णदेवरायाने (१५०९ – २९) हा प्रदेश पुन्हा जिंकून त्यावर तुबाकी कृष्णप्पा नायक याची नेमणूक केली. हाच जिंजीचा पहिला नायक राजा होय. त्याच्यानंतर अनुक्रमे अच्युत रामभद्र नायक, मुथैल व वेंकटप्पा हे जिंजीचे नायक राजे झाले. त्यांच्या कारकीर्दीत (१५२१ – ५०) जिंजीचा किल्ला दुरुस्त करण्यात आला. पुढे कृष्णप्पा नायक (१५७० – १६२०) हा विजयानगरच्या अध:पतनानंतर राज्य करीत होता. त्याने आपले स्वातंत्र्य जाहीर केले म्हणून विजयानगरच्या वेंकटरायाने त्यास पकडले पण नंतर काही अटींवर त्यास सोडले. तथापि पुढे त्याने खंडणी देण्याचे बंद केले तेव्हा पुन्हा त्यास पकडले आणि मग घातलेल्या अटी मान्य करून जिंजीचे राज्य त्यास दिले. वेंकटराय मेल्यानंतर विजयानगरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा कृष्णप्पाने जग्गराय या अनौरस पुत्राचा पक्ष घेतला पण या दोघांचा पराभव झाला. तरी कृष्णप्पाला १६४८ मध्ये जिंजीचे राज्य मिळाले. त्याच्यानंतर एकदोन नायक झाले पण ते दुर्बळ होते. तेव्हा विजापूरच्या आदिलशाहाने जिंजीचे राज्य जिंकून त्यावर आपली सत्ता स्थापन केली. कृष्णप्पा वैष्णव होता. त्याने धर्मप्रसारासाठी पैसा खर्च केला. त्यानेच नटराजमंदिराचा (चिदंबरम्) जीर्णोद्धार केला.

इक्केरीचे नायक (केळदि-बिदनूर) : बसप्पा हा या घराण्याचा मूळ नायक. त्याने प्रथम काही सैन्य जमवून आसपासची गावे आपल्या ताब्यात घेतली व तो पाळेगार झाला. केळदिनृपविजय या ग्रंथात यासंबंधी माहिती मिळते. त्याचा मुलगा सदाशिव याने विजयानगरच्या राजास मदत केली (१५४५ – ६५). त्याला रायनायक ही पदवी याबद्दल मिळाली. पुढे त्याने पुंड पाळेगारांची बंडे मोडली. या कामाबद्दल त्यास तुळुव राज्यात नायकी मिळाली. अरग, गुत्ती, बारकूर, मंगलोर हे प्रदेश त्याच्या अंमलाखाली होते. त्यास दोड्ड संकण्ण व चिक्क संकण्ण असे दोन मुलगे होते. दोड्ड संकण्णाने एक वर्षे राज्य केले (१५६६). त्यानंतर चिक्क संकण्णाने (१५६७ – ८०) सु. तेरा वर्षे राज्य केले. त्याने इक्केरी ही राजधानी केली व तिथे राजवाडा बांधला. पुढे दोड्ड संकण्णाचा मुलगा रामराजय्या (१५७० – ८६) आणि चिक्क संकण्ण हे संयुक्तपणे राज्य करीत होते. त्याच्यानंतर वेंकटप्पा (१५८६ – १६२९) हा दोड्ड संकण्णाचा दुसरा मुलगा गादीवर आला. त्याने विजयानगरचा सामंत म्हणून राज्य केले परंतु १६१३ नंतर त्याने स्वतंत्रपणे कारभार केला. वेंकटप्पानंतर त्याचा नातू वीरभद्र (१६२९ – ४५) व नंतर त्याचा चुलत चुलता शिवप्पा (१६४५ – ६०) यांनी राज्य केले. मुसलमानांनी वेल्लोर घेतले होते, ते त्याने परत मिळविले. तसेच पोर्तुगीजांकडून इक्केरी, उदगणी, सोरब हे किल्ले परत मिळविले आणि काही नवीन किल्ले बांधले, शिवप्पानंतर त्याचा भाऊ वेंकटप्पा (१६६१) आणि मुलगे भद्रप्पा (१६६१ – ६३) व सोमशेखर (१६६३ – ७१) यांनी राज्य केले. सोमशेखरची ⇨ चन्नमा राणी (१६६१ – ९७) प्रसिद्ध असून ती पराक्रमी आणि कुशल राज्यकर्ती होती. तिने राज्यावर संकट येईल याची जाणीव असूनही छत्रपती राजाराम जिंजीस सुखरूप पोहोचविण्यास साह्य केले. तिला मुलगा नव्हता म्हणून तिने बसवप्पा (१६९७ – १७१४) नावाच्या मुलास दत्तक घेतले व त्याला शिक्षण दिले. तो विद्वान होता. त्याने शिवतत्त्व-रत्‍नाकर नावाचा ग्रंथ लिहिला. सुरुवातीसच त्यास मराठे आणि म्हैसूरकर यांच्याशी लढावे लागले. त्याच्यानंतर १७५७ पर्यत चार – पाच नायक गादीवर आले पण इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज यांच्या संघर्षात त्यांची सत्ता कमकुवत झाली. अखेरीस हैदर अलीने १७६३ मध्ये इक्केरीचे राज्य जिंकले. इक्केरीचे राजे वीरशैव पंथी होते आणि त्यांनी अनेक मठांना देणग्या दिल्या. चन्नम्मा व अखेरची वीरम्मा या राण्या कार्यक्षम प्रशासक म्हणून प्रसिद्ध आहेत. या नायकांनी स्वत:ची सोन्याची नाणी पाडली होती. इक्केरी होन म्हणून ती प्रसिद्ध आहेत.

नायक राजांच्या वेळी दक्षिण भारतात अनेक मंदिरे बांधली गेली पाणपोया, धर्मशाळा स्थापन करण्यात आल्या. हिंदू धर्माचा प्रसार व प्रचार झाला. त्याबरोबरच ख्रिस्ती धर्म, वीरशैव पंथ यांचाही प्रसार व प्रचार झाला. तथापि स्वार्थी कारवाया व आपापसांतील भांडणे यांमुळे कोणतेही नायक घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही. शिवाय नाविक दल, आधुनिक शस्त्रास्त्रे आणि मुसलमानांचे व पाश्चात्त्य इंग्रज, फ्रेंच, डच वगैरेंचे दक्षिणेकडील वाढते वर्चस्व यांमुळे अखेर एकामागून एक नायक घराणी नष्ट पावली.

संदर्भ : 1. Aiyer, R. S. Nayaks of Madura, Madras, 1924.

           2. Heras, H. The Aravidu Dynasty of Vijayanagara, Madras, 1927.

           3. Rajayyan, K. History of Madurai, Madurai, 1974.

           4. Sastri, K. A. N. A History of South India, Oxford, 1958.

           5. Shenoy, J. P. L. Madura, Bangalore, 1955.

देशपांडे, सु. र.