नामुर : फ्लेमिश-नामन. बेल्जियममधील याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या ३१,५१९ (१९७४ अंदाज). हे ब्रूसेल्सच्या आग्नेयीस ६३ किमी. सांब्र व म्यूझ नद्यांच्या संगमावर वसलेआहे.हेमोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे येथे अनेक लढाया झाल्या.१६९२ ते १७९४ या काळात हे सात वेळा फ्रेंच व दोस्तराष्ट्रांच्या अंमलाखाली होते.बेल्जियम स्वतंत्र होईपर्यंत हे डच सत्तेखाली होते (१८१५–३०).पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये याचे फार नुकसान झाले. हे देशातील व देशाबाहेरील मुख्य शहरांशी लोहमार्गांनी व सडकांनी जोडले आहे. येथे काच, कागद, कातडी कमावणे, लोह व पोलादाच्या वस्तू तयार करणे, कटलरी, साबण, सिमेंट इ.उद्योगधंदे चालतात.मीट हॉलमधील पुराणवस्तुसंग्रहालय, सेंट औबाइनचे बरोक शैलीतील कॅथीड्रल, सेंट लूप चर्च, कलावीथी, नोत्रदाम मठ, अकराव्या शतकातील म्यूझ नदीवरील पूल इ. येथील गोष्टी प्रेक्षणीय असून नामुर हे म्यूझ व सांब्र नद्यांच्या निसर्गसुंदर खोऱ्यांचे प्रवेशद्वार आहे.
गाडे, ना. स.
“