नानकसिंग : (४ जुलै १८९७ – २८ डिसेंबर १९७१). ख्यातनाम पंजाबी कादंबरीकार. त्यांचे मूळ नाव हंसराज परंतु शीख धर्माचा स्वीकार केल्यानंतर ‘नानकसिंग’ असे नाव ते लावू लागले. ते लहान असतानाच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे पूर्ववयात त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले. लेखनाची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती. आरंभी ते कविता करीत पुढे कादंबरीलेखनाकडे वळले. हिंदीतील श्रेष्ठ कादंबरीकार प्रेमचंद ह्यांचा नानकसिंगांवर फार मोठा प्रभाव होता.
नानकसिंगांनी सु. ३६ कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांच्यातील विकासक्षम वाङ्मयीन कलावंत त्यांतून प्रकट होत गेलेला आहे. छिटा लहू (१९३२) ही त्यांची पहिली गाजलेली कादंबरी कादंबरीकार म्हणून त्यांच्या अंगी असलेल्या अनेक चांगल्या गुणांचा प्रत्यय तिच्यातून येतो. दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा ह्या सामाजिक कादंबरीत त्यांनी ताकदीने उभ्या केल्या आहेत. त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोनही तीत दिसून येतो. अध खिडिआ फुल्लं (१९४०) ही त्यांची दर्जेदार कादंबरी. त्यांच्या इक म्यान बिच दो तलवारां या कादंबरीस १९६१ मध्ये साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त झाला.
सामाजिक अन्यायाच्या जाणिवेने प्रेरित होऊन विधवांचा प्रश्न, अस्पृश्यता, जरठ कुमारी विवाह अशा अनेक महत्त्वाच्या विषयांना त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून वाचा फोडली आहे; शेतकरी व श्रमिक ह्यांच्याबद्दल त्यांनी सहानुभूती बाळगली. स्त्रियांच्या समान हक्कांचा पुरस्कार केला. १९४७ साली, देशाच्या फाळणीनंतर घडून आलेल्या रक्तपाताने व्यथित होऊन त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या शोकात्म आहेत. स्वतःच्या जीवनातील अनेक कडवट अनुभवही त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून कलात्मकपणे व्यक्त केले आहेत.
नानकसिंग हे पंजाबी साहित्यातील पहिले वास्तववादी कादंबरीकार होत. पंजाबी कादंबरीला त्यांनी नवेचैतन्य प्राप्त करून दिले. वाचकाला खिळून ठेवणारी ओघवती निवेदनशैली, प्रसंगांची कौशल्यपूर्ण गुंफण आणि परिणामकारक शेवट ही त्यांच्या कादंबरीलेखनाची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत.
नानकसिंग ह्यांनी कथालेखनही केले तथापि त्यांचा पिंड कादंबरीकाराचा असल्यामुळे त्यांच्या कथाही कादंबरीच्या अंगाने लिहिल्या गेल्या आहेत.
के. जगजीत सिंह (इं.) कर्णे, निशा (म.)