नागरकोइल : तमिळनाडू राज्याच्या कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र. लोकसंख्या १,४१,२८८ (१९७१). नागरकोइल म्हणजे सर्पमंदिर, हे कन्याकुमारीच्या उत्तरेस १६ किमी. वर समुद्रकाठी असून त्रिवेंद्रम–कन्याकुमारी व मद्रास–त्रिवेंद्रम या राष्ट्रीय महामार्गांवरील महत्त्वाचे स्थानक आहे. शहरात ख्रिस्ती वस्ती बरीच आहे. कापडगिरण्या, भात सडण्याच्या गिरण्या, मोटारदुरुस्ती, रबरी वस्तू, काथ्याच्या दोऱ्या, चटया, ताडीपासून साखर व गूळ बनविणे, दारू गाळणे, विद्युत् साहित्य तयार करणे हे महत्त्वाचे व्यवसाय होत. येथील वाळूत मोनाझाइट व इल्मेनाइट ही मौल्यवान खनिजे सापडतात. येथे चार महाविद्यालये व इतर शिक्षणसंस्था असून शिवमंदिर व प्राचीन जैनमंदिराचे अवशेष उल्लेखनीय आहेत. नागरकोइलपासून सु. १४ किमी. वर पद्मनाभपुरम् हे पर्यटनकेंद्र असून तेथील ‘महाराजा प्रसाद’ प्रेक्षणीय आहे.
चौधरी, वसंत