नागदवणा: (हिं. चिंदार, सुखदर्शन गु. नागदमनी, नागदमन क. विषमुंगली सं. नागदमनी, नागपुष्पी लॅ. क्रायनम एशियाटिकम कुल-ॲमारिलिडेसी). ही गुच्छाकृती, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), कंदयुक्त ⇨ ओषधी यूरोप, भारत, पाकिस्तान, श्रीलंका व इतर उष्ण प्रदेश येथे रानटी अवस्थेत किंवा बागेत शोभेकरिता लावलेली आढळते. उष्ण हवा, बेताचा पाऊस व मध्यम प्रतीची जमीन तिला आवश्यक असते. कंद मोठे व आवृत (आवरणयुक्त) असून त्यांना चिंचोळी ग्रीवा (मानेसारखा भाग) १५–३० सेंमी. व तीवर जुन्या पानांचे आवरक (वेढणारे) तळभाग शेषरूपात असतात. पाने मूलज (मुळातून आल्यासारखी), २०–३०, हिरवी, लांबट व पातळ, १·५ मी. X १२–१८ सेंमी. फुलोरा चवरीसारखा असून सु. १ मी. लांब व १–५ सेंमी. जाड दांड्यावर टोकास ऑगस्ट-नोव्हेंबरात येतो त्यावर १५–२० सच्छद (तळाशी पानासारखी उपांगे असलेली), सुगंधी, पांढरी फुले येतात. परिदलांची नलिका लांब, दंडाकृती आणि दले सहा व रेषाकृती केसरदले सहा व लालसर, परिदलास खाली चिकटलेली परंतु वर सुटी अधःस्थ किंजपुटात तीन कप्पे [→ फूल] बोंड गोलसर, २·५–५ सेंमी. व्यासाचे, चंचुयुक्त व अनियमितपणे तडकणारे असते बीजे १–२. ⇨ कुमूर (पँक्रॅशियम ट्रायफ्लोरम) ही ⇨ ॲमारिलिडेसी कुलातील (मुसली कुलातील) वनस्पती असून तिच्या फुलात सर्व केसरदलांना जोडणारा पेल्यासारखा भाग (तोरण) असतो नागदवण्याच्या वंशात (क्रायनम) तो नसतो हा फरक महत्त्वाचा असल्याने दोन्हींची फुले आणि कुमूरची अरुंद पाने यामुळे ह्या वनस्पती सहज ओळखता येतात.
नागदवण्याचा कंद कडू, शक्तिवर्धक, सारक, कफोत्सारक (कफ काढून टाकणारा), पित्तविकार व मूत्रविकार यांवर गुणकारी ताजे मूळ वांतिकारक (ओकाऱ्या सुरू करणारे) व स्वेदकारक (घाम आणणारे) बी रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारे), आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे), शक्तिवर्धक पाने कफोत्सारक, कातडीच्या रोगांवर व दाह कमी करण्यास उपयुक्त भाजलेल्या पानांचा रस थोडे मीठ घालून कानदुखीवर उपयुक्त. मोहरीचे तेल लावलेले हिचे पान गरम करून सुजलेल्या सांध्यावर व नारूवर बांधतात मुळात नार्सीसाइन (लायकोराइन) व क्रीनामाइन ही अल्कलॉइडे असतात. मूळ थंड पाण्यात उगाळून सर्व प्रकारच्या विषांवर देतात.
गडांबी कांदा: (हिं. सुखदर्शन सं. सोमवल्ली, वृषकर्णी लॅ. क्रायनम लॅटिफोलियम). नागदवण्याच्या वंशातील ही एक जाती असून या दोन्हींच्या अनेक लक्षणांत साम्य आहे. ही भारतात सर्वत्र आढळते. हिचे कंद नागदवण्याच्या कंदापेक्षा दुप्पट मोठे, पाने संख्येने अधिक पण लहान व पट्टीप्रमाणे असतात. फुलोऱ्याचा दांडा जांभळट व फुलावर मध्याखाली जांभळट रेषा किंवा छटा असते. पुष्पमुकुट नसराळ्यासारखा, नळीचा भाग अधिक लांबट व वाकडा, केसरदले लांब व वाकलेली, बीजके अधिक (कप्प्यात ५–६) व बोंड नागदवण्यापेक्षा मोठे असते. कंदाचा रस तिखट व जहाल असतो कंद भाजून व चेचून संधिवात, मूळव्याध व फोड यांवर बांधतात. पानांचा रस कानदुखीवर गुणकारी असतो.
पहा : ॲमारिलिडेसी कुमूर लिलिएलीझ.
जगताप, अहिल्या पां.
“