कॅनाबिनेसी : (गांजा कुल). फुलझाडांच्या (आवृत्तबीज, द्विदलिकित) अर्टिकेलीझ (अर्टिसिफ्लोरी) या गणातील चार कुलांपैकी [_अर्टिकेसी, उल्मेसी, _मोरेसी, कॅनाबिनेसी] एक कुल. यामध्ये फक्त दोन वंश आणि पाच जाती आहेत. ह्युम्युलस  वंश उत्तर समशीतोष्ण कटिबंधापर्यंत पसरलेला असून शिवाय लागवडीतही आहे [→ हॉप]. कॅनाबिस  वंश उष्णकटिबंधात आढळतो [→ गांजा]. ह्या कुलातील वनस्पती ओषधी [→ ओषधि], उपक्षुपे (झुडपे) किंवा वेली असून त्या सुवासिक व बिनचिकाच्या असतात मात्र काहीत राळ व चीक ही असतात. पाने साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, सोपपर्ण (उपपर्णयुक्त), हस्ताकृती, खंडित किंवा अखंडित कडा असलेली फुले एकलिंगी, विभक्त झाडांवर, पानांच्या बगलेत, कुंठित किंवा संमिश्र फुलोऱ्यावर येतात [→ पुष्पबंध]. पुं-पुष्पात काहीशी तळात जुळलेली पाच परिदले परिदलांसमोर पाच केसरदले स्त्री-पुष्पात एक किंजदल परिदलांचा पेला किंजपुटाभोवती व त्यातील एकच कप्प्यात एक बीजक असते [ → फूल]. फळे शुष्क, कृत्स्न (आपोआप न फुटणारी, फळाच्या भित्तीपासून स्पष्टपणे अलग असलेले एकच बीजक असणारी) बी सपुष्क (गर्भाचे पोषण करणारा अन्न द्रव्ययुक्त भाग असलेली). हॉपपासून लुप्युलीन व कॅनाबिसपासून भांग, चरस व गांजा मिळवितात.

घन, सुशीला प.