नॅशव्हिल: उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थानांपैकी टेनेसी राज्याच्या राजधानीचे ठिकाण व दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ४,४७,८७७ (१९७०). हे कंबर्लंड नदीकाठी असून मेंफिसच्या ईशान्येस ३१८ किमी. अंतरावर आहे. जेम्स रॉबर्ट्सन याने १७८० मध्ये या शहराची स्थापना केली. १८०६ मध्ये यास शहर म्हणून मान्यता मिळाली. नॅशव्हिल १८४३ पासून राज्याची राजधानी असून दळणवळण, व्यापार, उद्योगधंदे व शिक्षणाच्या सोयी यांचे केंद्र आहे. ह्याचा आसमंत सुपीक व शेतीकरिता प्रसिद्ध आहे. रेयॉन, पादत्राणे, विमाने, होजिअरी, तंबाखूपासूनचे पदार्थ, स्टोव्ह, खते, कृषिअवजारे, सिमेंट, मांस डबाबंद करणे, लाकडी वस्तू, तेलशुद्धीकरण वगैरे अनेक उद्योग येथे आहेत. येथे व्हँडरबिल्ट व फिस्क विश्वविद्यालये, मेहॅरी भिषग् महाविद्यालय, जॉर्ज पीबॉडी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय स्कारित महाविद्यालय, ट्रेव्हेक्का नॅझारेन महाविद्यालय, कृषी व तंत्रविषयक सरकारी महाविद्यालय, अँड्रू जॅक्सन विश्वविद्यालय, डेव्हिड लिप्सकाँब महाविद्यालय, वॉर्ड बेलमाँट विद्यालय, समाजशिक्षणाकरिता नॅशव्हिल विद्यालय, अंध आणि बहिरे–मुके यांकरिता राज्य सरकारचे विद्यालय वगैरे शिक्षणसंस्था आहेत. अमेरिकेचे सातवे अध्यक्ष अँड्रू जॅक्सन यांचा मृत्यू येथील ‘हर्मिटेज’ या त्यांच्या वास्तूत झाला.
लिमये, दि. ह.