नळकाम: इमारतींमधील निरनिराळ्या उपयोगांकरिता केलेल्या नळव्यवस्थेसंबंधीचे काम म्हणजे नळकाम होय. अशी नळव्यवस्था सर्वसाधारणपणे रहात्या इमारतीमधून पाणीपुरवठ्याकरिता आणि पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून नेण्याकरिता असते. उद्योगधंद्याच्या ठिकाणी रसायने किंवा वायू वाहून नेण्यासाठीसुद्धा विशेष प्रकारची नळव्यवस्था केली जाते. अशा कोणत्याही नळव्यवस्थेत प्रत्यक्ष नळ, त्याला लागणारी जोडसाधने व जोडउपकरणे यांचा समावेश होतो. ज्या कार्यासाठी नळव्यवस्था आयोजित केली असेल ते कार्य व्यवस्थितपणे होत आहे किंवा नाही हे पाहणे व होत नसल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करणे, हे नळकऱ्याचे वा नळव्यवस्था योजकाचे काम होय.
नळकामात वापरण्यात येणारे साहित्य व साधने वेगवेगळ्या धातू वा पदार्थांपासून बनविलेली असतात. नळ कोणत्या कामासाठी वापरले जात असतील, त्या कामाच्या स्वरूपावर ती धातू वा पदार्थ अवलंबून असतात. पाणीपुरवठ्याचे नळसाहित्य जस्तलेपित (गॅल्व्हनाइज्ड) लोखंडाचे, बिडाचे, पितळेचे, शिशाचे किंवा आता प्लॅस्टिकचे असते तर सांडपाणी व्यवस्थेचे नळसाहित्य लोखंड, चिनी माती, सिमेंट वा ॲस्बेस्टस सिमेंटचे असते. कारखान्यांमधून असणाऱ्या खास प्रकारच्या नळव्यवस्थेचे साहित्य बाष्पवहनासाठी तांब्याचे आणि इतर द्रवांच्या वहनासाठी पितळ, लोखंड वा काचेचेसुद्धा असू शकते.
हत्यारे : नळकऱ्याच्या कामामध्ये प्रामुख्याने नळ कापणे, जोडणे, इतर जोडसाधने बसविणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जस्तलेपित लोखंडी नळाच्या कामात लागणारी हत्यारे आ. १ मध्ये दाखविली आहेत. या हत्यारांशिवाय काथ्या, हबक, सिमेंट शिसे इ. वस्तूही या कामात लागतात.
नळ कापण्यासाठी पट्टी करवतीचा (आ. १ अ) किंवा चक्री कर्तकाचा (आ. १ आ) उपयोग करतात. नळ कापल्यावर टोकाशी राहिलेले कंगोरे तासण्यासाठी तासणी (आ. १ इ) वापरतात. असे नळ जोडण्यासाठी त्यास दोन्ही टोकांस आटे पाडावे लागतात. त्यासाठी नळ साखळी शेगड्यात (आ. १ ई) धरून त्याच्या टोकास पेचपाटीने (आ. १ उ) आटे पाडतात. पेचपाटीत आवश्यक ती मुद्रा (डाय) बसवून प्रथम कच्चे आटे पाडून मग मुद्रा घट्ट बसवून पक्के आटे पाडतात. आटे पाडताना वारंवार तेल किंवा साबणाचे पाणी सोडून पडणारा कीस दूर करावा लागतो. नळ वा त्याची जोडसाधने आवळून घट्ट बसविण्यासाठी किंवा सोडविण्यासाठी निरनिराळे नळपाने (आ. १ ऊ) वापरतात.
पाणीपुरवठ्याच्या नळांचे जोडकाम: पाणीपुरवठ्याच्या नळकामात जस्तलेपित लोखंडाचे नळ प्रामुख्याने वापरतात. अशा नळांच्या जोडकामास लागणारी काही जोडसाधने आ. २ मध्ये दाखविली आहेत. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी होतो. आटे असणारे दोन नळ जोडण्यासाठी साधी शेंबी वा आंतरजोड वापरतात.
एका नळातून दुसरा नळ काढण्यासाठी फाटे, वेगवेगळ्या व्यासाचे नळ जोडण्यासाठी लघुकारक शेंबी, वळणावर नळ फिरविण्यासाठी वाक वा कोपरे आणि नळाचे तोंड बंद करण्यासाठी बूच (प्लग) यांचा उपयोग केला जातो. नळाची जोडणी मध्येच कोठेही सहज सोडविता यावी म्हणून काही विवक्षित सांधे [उदा., सरक सांधा (आ. ३) व टोपीचा सांधा (आ. ४)] मार्गात ठेवण्यात येतात.
वाकविण्याच्या सुलभतेमुळे नळकामात शिशाच्या नळांचाही उपयोग करतात. अशा प्रकारचे नळ जोडताना त्यातील एकाचे तोंड लाकडी निमुळत्या दट्ट्याने फाकवून त्यात दुसऱ्या नळाचे टोक आत सारून सांध्याच्या दोन्ही बाजूंस सर्व बाजूंनी शिशाचा पातळ झाळ ओतून तो गोल चोळून सांधा पक्का करतात. दुसऱ्या कोणत्याही धातूच्या नळाशी शिशाच्या नळाचा सांधा करताना शिशाच्या नळाचे टोक फाकवून त्यात दुसऱ्या नळाचे तोंड बसवून वरीलप्रमाणे सांधा करतात.
तांबे वगैरेंसारख्या लवचिक धातूच्या नळांचे जोडकाम असेच झाळून करतात. ओतीव लोखंडाच्या नळांचे सांधे करताना एका नळाच्या मादीतोंडात दुसऱ्या नळाचे नरतोंड बसवून मधील जागेत डांबरात बुडविलेली वाखाची दोरी बसवितात आणि त्यावर शिसे ओतून ते व्यवस्थित ठोकून बसवून सांधा घट्ट करतात (आ. ५ अ). सांध्यांत शिसे ठोकण्यासाठी किनार मारण्याच्या छिन्नीचा (आ. ५ आ) उपयोग करतात. दोन नळांची नरतोंडे जोडण्यासाठी जोडनळ (आ. ५ इ) वापरतात. या जोडनळाचे दोन्ही सांधे वरीलप्रमाणेच करतात.
पाणीपुरवठ्याच्या नळकामात प्रवाहाचे नियमन करणारी विविध उपकरणे वापरावी लागतात. यांत प्रामुख्याने तोट्यांचा समावेश होतो. पाणी घेण्यासाठी एकतोंडी तोट्या (आ. ६ अ, आ), तर प्रवाह नियमनासाठी दुतोंडी तोट्या (आ. ६ इ, ई) मध्येच बसवितात. यात झडप असलेल्या तोट्या प्रवाह एकाच दिशेने राखण्यासाठी वापरतात. टाकी भरल्यानंतर आत येणारे पाणी आपोआप बंद व्हावे म्हणून तरता गोळा असलेली तोटी (आ. ६ उ) वापरली जाते. यातील तरता गोळा पाण्याच्या पातळीप्रमाणे वरखाली होतो व त्याच्या दांड्याच्या दुसऱ्या टोकास असलेल्या दट्ट्याने तोटीची उघडझाप होते. वापरण्यापुरताच पाण्याचा पुरवठा होण्यासाठी दाब तोटीचा उपयोग करतात. प्रवाह सुरू करण्यासाठी दट्ट्यावर दाब द्यावा लागतो, तो काढला असता त्यामागील स्प्रिंगमुळे दट्ट्या बाहेर येऊन प्रवाह बंद होतो.
सांडपाण्याच्या नळांचे जोडकाम: सांडपाणी वाहून नेण्यासाठी लोखंडी, चिनी मातीचे, सिमेंट व ॲस्बेस्टस सिमेंटचे नळ वापरतात. हे नळ आकारमानाने मोठे असतात. त्यांतून दाबयुक्त प्रवाह जात नसल्याने या नळांचे सांधे पाणीपुरवठ्याच्या नळासारखे पेचाचे नसतात. तरीही हे सांधे पूर्णतः झिरपमुक्त असणे जरूरीचे असते कारण सांध्यांमधून झिरपणारे सांडपाणी पाणीपुरवठ्याच्या नळव्यवस्थेत शिरून पाणी दूषित होण्याचा दाट संभव असतो. यासाठी असे नळ जोडताना त्याच्या सांध्यात सुतळी वा तागाने वेष्टण ओल्या सिमेंटमध्ये किंवा डांबरात बुडवून घट्ट बसवितात आणि शिवाय वरून ओले भिजविलेले सिमेंट फिरवून ते सर्व बाजूंनी बसवितात. हे सिमेंटचे सांधे एक आठवडा ओले ठेवल्याने भक्कम व झिरपमुक्त होतात.
सांडपाण्याच्या नळव्यवस्थेमध्ये सांडपाण्याच्या नळात निर्माण होणारे वायू उलट दिशेने घरात परत येऊ न देणे हेही महत्त्वाचे असते. यासाठी या नळव्यवस्थेत वापरण्यात येणारी सर्व साधने वा उपकरणे नळांशी जोडताना मधे वायुरोधक (ट्रॅप) वापरतात. नळाचा काही भाग उभ्या इंग्रजी U अक्षराच्या आकारात वळवून त्यात जलबंध निर्माण करून असा वायुरोधक तयार केला जातो. सांडपाण्याच्या काही उपकरणांमध्ये असे वायुरोधक त्याच्या मूळ बांधणीतच असतात (उदा., शौचकूपाची भांडी, आ. ७), तर काही उपकरणांना ते स्वतंत्रपणे लावले जातात.
न्हाणीघरात किंवा मोरीत बिडाचा साधा वायुरोधक (आ. ८), हात धुण्याच्या कुंडीस (बेसीनला) शिशाच्या नळाचा वायुरोधक (आ. ९) व सांडपाण्याचा नळ शेवटी गटाराशी जोडताना चिनी मातीचा वा लोखंडाचा घळी वायुरोधक (आ. १०) वापरतात.
सांडपाण्याच्या नळव्यवस्थेत मधेच निर्माण झालेले वायू कोंडून राहून व्यवस्थेत बिघाड उत्पन्न होऊ नये म्हणून सांडपाण्याच्या प्रत्येक उपकरणातून त्यास उच्छ्वास नळावाटे वाट दिली जाते. हा उच्छ्वास नळ घराच्या छपराच्याही वर नेला जाऊन त्याच्या माथ्यावर जाळीची टोपी बसवितात.
नळाचे आकारमान : सांडपाण्याचा नळ बसविताना त्यातून जास्तीत जास्त किती सांडपाणी वाहण्याची शक्यता आहे याचा अंदाज करून नळाचे आकारमान ठरविले जाते. इमारतीतील पाण्याचा वापर होईल अशी किती साधने नळास जोडली आहेत व त्यांपैकी एकाच क्षणी किती वापरली जातील त्यावरून एकाच वेळेस नळात किती सांडपाणी येऊ शकेल याचा अंदाज घेतला जातो. ३२ मिमी. व्यासाचा वायुरोधक बसविलेल्या हात धुण्याच्या कुंडीतून मिनिटाला सु. ४० लिटर पाणी वाहते. हे एकक धरून इतर साधनांमधील प्रवाहाचे आकडे पुढीलप्रमाणे दिले आहेत.
३२ मिमी. व्यासाचा वायुरोधक असलेली हात धुण्याची कुंडी … १
३८ मिमी. व्यासाचा वायुरोधक असलेली भांडी धुण्याची कुंडी … २
न्हाणीघर व कपडे धुण्याची जागा … … … … … … … . २
१४ लिटर धारणेची टाकी असलेल्या पाणठोसाने सफाई होणारे शौचपात्र ४
४ सेंमी. व्यासाच्या नळावरील दाबतोटीने सफाई होणारे शौचपात्र (पाण्याच्या त्या जागी असणाऱ्या दाबाप्रमाणे). २ ते ४
५० मिमी. व्यासाचा वायुरोधक असलेले इंग्रजी पद्धतीचे स्नानकुंड .. ३
फरसबंदी धुण्यामुळे येणारे पाणी .. १
चाचणी: प्रत्येक नळव्यवस्थेतील नळकाम झाल्यावर त्याची चाचणी घेणे आवश्यक असते. प्रत्यक्ष नळांची चाचणी व नळकामाची (सांध्यांसहित व जोडसाधनांसहित असलेल्या नळव्यवस्थेची) चाचणी अशा दोन्ही चाचण्या घ्याव्या लागतात.
नळांची चाचणी दोन प्रकारे केली जाते. (१) शोषण चाचणी : ही चाचणी सर्वसाधारणपणे चिनी मातीच्या, सिमेंटच्या किंवा ॲस्बेस्टस सिमेंटच्या नळांकरिता घ्यावी लागते. असे नळ किती पाणी शोषून घेतात हे या चाचणीत पाहिले जाते. कोरड्या नळाचे वजन व काही वेळ पाण्यात भिजल्यानंतरचे वजन यांतील कमाल फरक २·५ सेंमी. जाडीच्या नळात ७%, ३·२ सेंमी. जाडीच्या नळात ८% व ३·८ सेंमी. जाडीच्या नळात ९% यापेक्षा जास्त असू नये. (२) जलदाब चाचणी : याद्वारे पाण्याचा किती दाब नळ सहन करू शकेल हे पाहिले जाते. या चाचणीनुसार दर चौ. सेंमी.ला १·५ किग्रॅ. इतका दाब निदान ५ सेकंद तरी, त्यात कोणतीही विकृती उत्पन्न न होता, नळ सहन करू शकला पाहिजे.
नळकाम पूर्ण झाल्यावर सर्व सांधे पक्के झाले आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी झिरप चाचणी घेतात. यात ज्या भागाची चाचणी घ्यावयाची असेल त्याच्या दोन्ही बाजू गट्ट्याने (बुचाने) पूर्णपणे बंद करून आतील बाजूत रबरी नळीचे एक टोक सोडून नळीचे दुसरे टोक एका उभ्या नरसाळ्यात बसवून त्यातून पाणी सोडून तो भाग पूर्ण भरला जातो. नरसाळ्यात पाणी पूर्ण भरल्यावर ते साधारणपणे २ तास तसेच ठेवून नरसाळ्यातील पाण्याच्या पातळीतील फरक पाहिला जातो. हा फरक ठराविक प्रमाणाहून जास्त नसल्यास जोडकाम चांगले झाले आहे असे समजले जाते. मात्र तो फरक प्रमाणाबाहेर असल्यास जोडकामात दोष असल्याचे सिद्ध होऊन सर्व सांधे तपासावे लागतात व खराब सांधा दुरुस्त केला जाऊन चाचणी पुन्हा घेतली जाते.
पाहा : वाहितमल संस्करण व विल्हेवाट; सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य.
संदर्भ : 1. Deshpande, R. S. A Textbook of Sanitary Engineering, Poona, 1963.
2. Hall, F. Plumbing, London, 1961.
3. Martin, A. C., Ed. Plumbing and Domestic Engineering, 5 Vols., London.
4. Stubbs, S. G., Ed. The Encyclopedia of Sanitary Engineering, Heating and Plumbing, 3 Vols., London.
कुलकर्णी, गो. पु.; कर्वे, श्री. रा.