नवलराम: (९ मार्च १८३६–७ ऑगस्ट १८८८). गुजरातीतील आद्य साहित्यसमीक्षक व अष्टपैलू लेखक. त्यांचे संपूर्ण नाव नवलराम लक्ष्मीराम पंड्या असले, तरी ते ‘नवलराम’ ह्या नावानेच ओळखले जात. सुरत येथे एका वीसनगरा नागर जातीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कवी ⇨ नर्मद यांचे (१८३३–८६) ते जवळचे मित्र होते. त्यांचे शिक्षण सुरत येथे मॅट्रिकपर्यंत झाले पण मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांची वृत्ती अत्यंत अभ्यासू होती आणि वाचनही विपुल व विविध होते. शिक्षण सोडून देऊन ते सुरत येथील माध्यमिक विद्यालयात अध्यापक झाले (१८५४–७०). नंतर अहमदाबाद व राजकोट येथील अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयांचे अनुक्रमे उपप्राचार्य (१८७०–७६) व प्राचार्य (१८७७–८८) म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यामुळेच ‘गुजरातचे विद्यागुरू’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.
गुजराती साहित्यात आद्य साहित्यसमीक्षक व पत्रकार म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांचे सर्व लिखाण नवलग्रंथावली (१८९१) या नावाने चार भागांत संकलित आहे. गुजरात शाळापत्र मासिकाचे ते संपादक होते. साहित्यसमीक्षा, साहित्यचर्चा, शैक्षणिक सिद्धांत, ज्ञानविज्ञानवर्धक सामान्य माहिती इ. त्यांच्या व्यासंगाचे व लिखाणाचे प्रमुख विषय होते. त्यांच्या समीक्षेत संस्कृत साहित्यशास्त्र व पाश्चात्त्य समीक्षासिद्धांत यांचा समन्वय झालेला आहे. शास्त्रीय विवेचन, विद्वत्ता, विचाराची स्पष्टता, सहृदयता, मार्मिकता इ. त्याच्या समीक्षेचे गुणविशेष होत. त्यांची विवेचनपद्धती विश्लेषणात्मक आहे. निर्भयता, अलिप्तता व सत्यान्वेषण यांचा आग्रह धरीत असले, तरी विवेच्य कृतीच्या लेखकाबद्दल त्यांच्या मनात असलेल्या अपार सहानुभूतीचाही प्रत्यय त्यांच्या समीक्षेत येतो.
नवलराम हे रसिक कवीही होते. बाळलग्नबत्रीशी (१८७६), बाळगरबावळी (१८७७), अकबरबीरबल काव्यतरंग (१८७९) हे त्यांचे काव्यसंग्रह होत. त्यांचे जनावरनी जान हे काव्यही विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय भटनुं भोपाळु (मोल्येरच्या मूळ फ्रेंच नाटकाच्या इंग्रजी अनुवादाचे गुजराती नाट्यरूपांतर – १८६७) व वीरमती (ऐतिहासिक नाटक – १८६९) ही दोन नाटके मेघदूताचे भाषांतर (मेघदूतनुं भाषांतर – १८७०) प्रेमानंदकृत कुंवरबाईनुं भामेरुंचे संपादन (१८७१), व्युत्पत्तिपाठ (१८७२) हा भाषाशास्त्रीय ग्रंथ निबंधरीति (१८८०), इंग्रेज लोकनो संक्षिप्त इतिहास (१८८०–८७), कविजीवन : नर्मदनुं (कवी नर्मदचे चरित्र – १८८८) इ. महत्त्वपूर्ण ग्रंथनिर्मिती त्यांनी केली आहे. कविजीवन : नर्मदनुं हा चरित्रग्रंथ गुजराती साहित्यात विशेष महत्त्वाचा मानला जातो.
पेंडसे, सु. न.
“