नरोत्तम दास: (सु. १५२८–सु. १६११). बंगालमधील प्रख्यात वैष्णव कवी. गौडीय वैष्णव साहित्यात तो ‘नरोत्तमदास ठाकूर’ किंवा ‘दास-ठाकूर’ म्हणून ओळखला जातो. राजशाही जिल्ह्यातील गोपालपुरा परगण्याचा राजा कृष्णानंददत्त याचा तो पुत्र. आईचे नाव नारायणी देवी. जातीने तो कायस्थ होता. गोपालपुरा परगण्याची पद्मातीरावरील राजधानी खेतुर या ठिकाणी त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याची वृत्ती धार्मिक व विरागी होती. वडिलांच्या मृत्यूनंतर आपला चुलतभाऊ संतोषदत्त यास राजपद बहाल करून तो वृंदावनास निघून गेला. तेथे त्याने अद्वैत आचार्य यांचा शिष्य लोकनाथ गोस्वामी याच्याकडून दीक्षा घेतली आणि जीव गोस्वामी याच्याजवळ दीर्घकाळ भक्तिशास्त्राचा सखोल अभ्यास केला. १५८२ मध्ये तो श्रीनिवासाचार्य व श्यामानंदन यांच्यासमवेत बंगालमध्ये वैष्णव मतप्रचारार्थ परत आला व नंतर खेतुर येथे राहू लागला. नरोत्तम दासाच्या विचारसरणीत गौडीय वैष्णव मताचा व वृंदावन संप्रदायाच्या वैष्णव मताचा समन्वय साधलेला आढळतो.

खेतुर येथे तो भक्तिसाधना व भजन-कीर्तन करू लागला. खेतुर जवळच त्याने एक आश्रम उभारला व त्याला ‘भजनटूली’ असे नाव दिले. तेथे त्याने ⇨ चैतन्य महाप्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यानिमित्त १५८३ मध्ये एक महोत्सव आयोजित केला. या महोत्सवास बंगालच्या सर्व भागांतून अनेक वैष्णव भक्त, महंत आले व मोठा जनसमुदाय जमला. या उत्सवापासूनच श्रोतृगणासमोर जाहीर कीर्तन करण्याची प्रथा सुरू झाली. नरोत्तम दासाने त्यानिमित्ताने पारंपरिक कीर्तनाला कलात्मक रूप प्राप्त करून दिले आणि ‘गरानहाटी’ नावाच्या कीर्तनप्रकाराचे प्रवर्तन केले. त्याचा आवाज गोड होता व त्याला संगीताचेही चांगले ज्ञान होते. उत्तर बंगालमध्ये वैष्णव मताचा प्रसार होण्यास त्याने प्रवर्तित केलेल्या गरानहाटी या कीर्तनप्रकाराची खूपच मदत झाली. त्याने व त्याच्या शिष्यांनी पश्चिम बंगालमध्ये गौडीय वैष्णव माताचा विशेष प्रसार केला.

नरोत्तम दास हा निःसीम वैष्णव भक्त, प्रतिभासंपन्न कवी व संगीतज्ञ होता. त्याने हाटपतन, प्रेमभक्तिचंद्रिका, स्मरण मंगल, कुंजवर्णन, प्रार्थना  इ. काव्यग्रंथ तसेच काही भक्तिपर पदे (पदावली) रचली. तो स्वतः मोठा पंडित असूनही त्याच्या रचनेवर पांडित्याची छाप पडलेली नाही. सुबोध व रसाळ बंगालीत त्याची सर्व रचना असून ती अत्यंत मधुर आहे. गेयता हा त्याच्या रचनेचा लक्षणीय विशेष होय. प्रेमभक्तिचंद्रिका  हे त्याचे काव्य सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि आजही त्याची लोकप्रियता बंगालमध्ये टिकून आहे. या ग्रंथात त्याने वैष्णव रसतत्त्वाचे उत्कृष्ट विवरण केले आहे. ह्या काव्यावर ⇨ कृष्णदास कविराजकृत ⇨ चैतन्यचरितामृताचा लक्षणीय प्रभाव दिसून येतो. चैतन्यचरितामृताची त्याने आपल्या काव्यात यथोचित प्रशंसाही केली आहे. त्याचे प्रार्थना हे काव्य तसेच भक्तिपर पदे अत्यंत हृद्य व रसाळ असून त्यांना बंगाली साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. त्याला वैष्णव तांत्रिक साधकांनी गुरुस्थानी मानले होते. नरहरी चक्रवर्ती याने अठराव्या शतकात लिहिलेल्या नरोत्तमविलासमध्ये नरोत्तम दासाचे चरित्र व कार्य आले आहे. त्याची समाधी वृंदावन येथे त्याचा गुरू लोकनाथ गोस्वामी याच्या समाधीजवळ आहे.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)