नदोला : एन्दोला. झँबियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या २,२९,००० (१९७४). हे लूसाकाच्या उत्तरेस २७४ किमी., कॉपरबेल्ट प्रांतात १,२५० मी. उंचीवर वसले असून दळणवळण, व्यापार आणि उद्योग यांचे केंद्र आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हे गुलामांच्या व्यापाराचे ठिकाण होते. १९३२ पासून येथे नगरपालिका आहे. दारेसलामहून येणाऱ्या ‘टॅनझॅम’ तेलनळाचे हे अंतिम स्थानक आहे. हे लूसाका, लिव्हिंग्स्टन या शहरांशी व ऱ्होडेशिया आणि झाईरे या देशांशी लोहमार्गाने जोडले आहे. तांब्याच्या खाणींचे हे केंद्र असल्यामुळे येथून खाणींच्या ठिकाणापर्यंत रेल्वेफाटे गेले आहेत. येथे तांबे व साखर-शुद्धीकरण, रसायनउद्योग, लाकूड कापण्याच्या गिरण्या, साबण, सिमेंट, टायर, विटा व बर्फ इत्यादींचे कारखाने आहेत. शहरात दोन ग्रंथालये असून एक तंत्रविद्या महाविद्यालय आहे.
कांबळे, य. रा.