ध्रांगध्रा : गुजरात राज्याच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण आणि पूर्वीच्या ध्रांगध्रा संस्थानाची राजधानी. लोकसंख्या ४०,७९१ (१९७१). हे फुलका नदीकाठी वसले असून अहमदाबादच्या पश्चिमेस सु. १२० किमी. अहमदाबाद–भूज लोहमार्गावरील स्थानक आहे. येथे दगडांच्या अनेक खाणी आहेत. येथे एक राजवाडा व रणछोडजी, राम, स्वामीनारायण यांची मंदिरे असून प्रत्येक मंदिराला जोडूनच एक धर्मशाळा आहे. ह्या भागातील हे एक औद्योगिक केंद्र असून कॉस्टिक सोडा, सोडा ॲश, सोडियम बायकार्बोनेट या रासायनिक पदार्थांचे तसेच यंत्रसामग्री, सरकी काढणे, कापूस पिंजणे, सुती वस्त्रोद्योग इत्यादींचे कारखाने आहेत. कापूस, मीठ, ज्वारी, बाजरी, इमारतीस लागणारा दगड यांचा व्यापार आणि हातमाग, मातीची भांडी, भरतकाम इ. उद्योग आहेत. येथे नगरपालिका आहे.

चौधरी, वसंत