ध्रांगध्रा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या काठेवाडमधील (सौराष्ट्र) एक जुने संस्थान. धारंगधर (अश्मधारक) या नावावरून संस्थानला ध्रांगध्रा हे नाव पडले असावे. कारण तेथे दगडांच्या अनेक खाणी आहेत. क्षेत्रफळ  २,९७० चौ. किमी. लोकसंख्या सु. १,२५,००० (१९४१). उत्पन्न २३ लाख रुपये. उत्तरेस कच्छचे छोटे रण, नैर्ऋत्येस वांकानेर-मोरवी-मालिया, दक्षिणेस वढवाण-सायला-ठाण-लख्तर, पूर्वेस बजाना-वन-लख्तर-वढवाण संस्थाने यांनी ते सीमित झाले होते. झाला राजपुतांपैकी तेराव्या शतकातील हरिपाळदेव हा या संस्थानचा मूळ पुरुष. गुजरातच्या मुसलमानी आक्रमणाला तोंड देण्यासाठी तेविसावा राजपुरुष राजेश्वरजीने १४८८ मध्ये राजधानी हालवाडला हलवली. या वेळेपासून संस्थानाच्या स्वतंत्र अस्तित्वाला आरंभ झाला. १६८२ मध्ये औरंगजेबाकडून हालवाड व तिथल्या मिठागरांची कायमची सनद संस्थानला मिळाली. सतराव्या शतकात भय्यादानी (राजाचे नातेवाईक) वांकानेर, वढवाण, लिमडी, ठाण-लख्तर आणि गजासिंहजीच्या कारकीर्दीत (१७४५–८२) सायला ही स्वतंत्र संस्थाने स्थापिली गेली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात हालवाड ही काही काळ मोगल जहागीर बनली पण अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रतापसिंहजीने गुजरातच्या मोगल सुभेदार सरबुलंदखानला आपली मुलगी देऊन खंडणी टाळली. १७३० मध्ये राजधानी ध्रांगध्रा येथे कायम झाली. अठराव्या शतकात राणी जिजीबाईने पेशवे व राधनपूरच्या मदतीने सायलाचे वर्चस्व मोडून काढले. पुढे पेशवे आणि जुनागढ संस्थानने खंडणी घ्यायला सुरुवात केली. अठराव्या शतकाच्या अखेरीस मराठ्यांची मूलूखगिरी, शेजारच्या संस्थानाशी युद्ध, काठी-मियाणा जमातींची लुटालूट यांमुळे संस्थान जेरीस आले. १८०७ मध्ये संस्थानने इंग्रजांची मांडलिकी पतकरली. त्यानंतर इंग्रज व गायकवाड यांना संस्थान खंडणी देई. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेल्वे, शिक्षण इ. विविध क्षेत्रांत विकास होऊन संस्थानचे उत्पन्नही सु. २३ लाख रुपयांवर गेले. संस्थानिकास ११ तोफांच्या सलामीचा मान, राजेसाहेब हा किताब आणि जन्मठेप व मृत्युदंड यांची शिक्षा देण्याचा अधिकार होता. संस्थानात १५० खेडी असून ध्रांगध्रा, हालवाड, उमरडा, मेठन, टिकार या महालांवर वहीवाटदार असत. संस्थान प्रथम १९४८ मध्ये सौराष्ट्र संघात विलीन झाले व पुढे १९५६ मध्ये मुंबई द्विभाषिक राज्यात आणि १ मे १९६० पासून गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले.

कुलकर्णी, ना. ह.