धौलागिरी : मध्य नेपाळच्या उत्तरेला, काठमांडूच्या वायव्येस सु. २०० किमी. वर असलेली शिखरांनी युक्त हिमालयाची एक शाखा. ही पर्वतश्रेणी काली गंडकी व थाली भेरी नद्यांच्या दरम्यान आहे. यामध्ये धौलागिरी –१ (८,१६७मी.), धौलागिरी –२ (७,७५१ मी.), धौलागिरी –३ (७,७०३ मी.), धौलागिरी –४ (७,६४० मी.) अशी चार प्रमुख शिखरे आहेत. जगातील अत्युच्च शिखरांमध्ये धौलागिरी–१ याची गणना होते. धौलागिरी आणि अन्नपूर्णा शिखरांदरम्यान काली गंडकीची खोल दरी आहे. १९५३ सालापर्यंत राजकीय कारणास्तव या भागाचे विशेष शास्त्रीय संशोधन होऊ शकले नव्हते परंतु पुढे मात्र हे दुर्गम शिखर माक्स आयसलीनच्या नेतृत्वाखाली स्वीस गिर्यारोहक पथकाने १३ मे १९६० रोजी सर केले.

खातु, कृ. का.