धोतरा : (धोत्रा). हे नाव ⇨ सोलॅनेसी कुलातील (धोतरा कुलातील) पुढे दिलेल्या व दतुरा या लॅटिन नावाने ओळखल्या जाणाऱ्या वंशातील सर्व वनस्पतींना आणि ⇨ पॅपॅव्हरेसी कुलातील (अहिफेन कुलातील) एका वनस्पतीला (पिवळा धोतरा) उद्देशून वापरले जाते, तथापि या दोन वनस्पतींच्या वंशांचा परस्परांशी काही संबंध नाही.
काळा धोतरा : (काळा धोत्रा हिं. काला धत्तुरा गु. धत्तुरा क. कनका, मदगुणिके सं, धत्तूर उन्मत, शिवप्रिय इ. ब्लॅकपर्पल-दतुरा लॅ. दतुरा फॅस्टुओजा, द. मेटल, कुल-सोलॅनेसी). दतुरा वंशातील सर्व वनस्पती (ओषधी, झुडपे व लहान वृक्ष) विषारी असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील ऊबदार प्रदेशांत आहे. एकूण १५ जातींपैकी भारतात दहा जाती आढळतात परंतु त्यांपैकी फक्त तीन औषधी दृष्ट्या उपयुक्त असून बाकीच्या शोभेकरिता बागेत लावल्या जातात. वर दिलेली सर्वच सामान्य नावे जातिविशिष्ट नसून काळा व पांढरा ही विशेषणे काटेकोरपणे लागू पडत नाहीत, कारण एकाच जातीच्या वनस्पतीला पांढरी, जांभळी किंवा निळसर फुले येतात, असे संशोधनान्ती दिसून आले आहे. दतुरा हे अरबी नाव आहे. ‘धत्तूर’ या संस्कृत नावाची अपभ्रष्ट रूपे इतर भाषांतील नावांत आढळतात, त्यावरून धोतरा ही वनस्पती भारतीय असावी या समजुतीला बळकटी येते, तथापि काही जाती परकीय असल्याचे मानतात. ब्रुग्मॅन्सिया या वंशातील जाती हल्ली दतुरा वंशात अंतर्भूत करतात. दतुरा इनोक्सिया, द. स्ट्रॅमोनियम व द. मेटल (द. फॅस्टुओजा) ह्या धोतऱ्याच्या जाती भारतात फार प्राचीन काळापासून मादक (गुंगी आणणे) आणि उद्वेष्टनाशक (आचके थांबविणे) या गुणांबद्दल वापरात आहेत.
द. फॅस्टुओजा ही जाती लहानशा झुडपासारखी वाढते. भारतात ती सर्वत्र आढळते बागेतही लावलेली दिसते. तिची उंची सु. १ मी. असून तिचा आयुःकाल एक वर्षच असतो. पाने लवदार, साधी, त्रिकोणी व अंडाकृती, एकाआड एक, मोठी (सु. ७·५ – १५ X ३– ७·५ सेंमी.), काहीशी खंडित व तळाशी विषम असतात. या झाडाचे काही संकरज प्रकार बागेत लावतात त्यांची खोडे वाकडीतिकडी व कधीकधी जांभळट असतात. लॅटिन नावातील फॅस्टुओजा याचा अर्थ अभिमानी असा होतो, तो या झाडाच्या ताठ उभ्या फुलाला अनुलक्षून असावा फुले मोठी (सु. १८ X १० – २० सेंमी.) नियमित, द्विलिंगी, लांब नरसाळ्यासारखी (खालून वर पसरत आलेली), एकटी किंवा जोडीने सप्टेंबर ते डिसेंबरात येतात. पाच संदलांचा संवर्त नळीसारखा असून पुष्पमुकुटाच्या किनारीवर लहान शेपटासारखे पाच भाग दिसतात. फुले बाहेरून पांढरी निळसर, लालसर जांभळी किंवा जांभळी परंतु आतून पांढरी असतात. लागवडीतील काही प्रकारांत पुष्पमुकटाची (पाकळ्यांची) दोन, तीन किंवा चार मंडले (उदा., द. कार्नुकोपिया) असतात [ → फूल]. फळ (बोंड) शुष्क, लहान, जाड देठावर फार थोडे वाकलेले, गोलसर, बोथट, काटेरी आणि प्रथम हिरवे व नंतर पिवळट व तपकिरी दिसते. ते अनियमितपणे तडकते व आतील अनेक तपकिरी, चपट्या व लहान बिया बाहेर पडतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे धोतरा कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. बियांपासून नवीन झाडे येतात. सुकी पाने व फुले असलेले शेंडे अधिकृतपणे औषधात वापरात आहेत. औषधी द्रव्य मिळविण्याकरिता रानटी झाडे पसंत करतात. लागवडही केली जाते जूनमध्ये (टेकड्यांवर) किंवा जुलैत (मैदानी प्रदेशात) बी पेरतात. छाटणी केली असता झाडाचा विस्तार घटतो परंतु फुलोरा कमी केल्यास त्यातील अल्कलॉइडांचे प्रमाण वाढते तसेच खताचा (अमोनियम सल्फेटाचा) वापर केल्यास ते प्रमाण आणखी वाढते. फळे जसजशी पिकतील तसतसे बियांतील अल्कलॉइडांचे प्रमाण वाढते.
धोतऱ्याच्या या जातीत ‘स्कोपोलामीन’ हे प्रमुख व उपयुक्त अल्कलॉइड अधिक असून हायसायमीन, ॲट्रोपीन व नॉरहायसायमीन यांचे प्रमाण फार कमी असते. सकाळी पानांतील या द्रव्याचे प्रमाण अधिक असल्याने ती त्या वेळी खुडून वापरतात भिन्न ठिकाणच्या भिन्न जातींत औषधी द्रव्यांचे प्रमाण भिन्न भागांत (अवयवांत) निरनिराळे आढळते. प्रस्तुत जातीत पाने व खोड, मुळे व फळे यांत काही ठिकाणी अधिक द्रव्ये आढळतात. सुकी पानेही वापरतात. पूर्व आफ्रिकेत हिरवी पाने कापड रंगविण्यास वापरतात. चव आणि वास या दृष्टीने नापसंत वाटणाऱ्या बियांतील स्थिर तेलात अनेक मेदाम्ले आणि क जीवनसत्व असतात. मादक गुणांवरून ‘उन्मत्त’ हे नाव सार्थ वाटते.
पांढरा धोतरा : (इं. जिम्सन वीड, जेम्सटाऊन वीड, थॉर्न ॲपल लॅ, दतुरा स्ट्रॅमोनियम). ९० सेमी. (उत्तम जमिनीवर १८० सेंमी.पर्यंत) उंच वाढणारे हे झुडूप भारतात सर्त्र टेकड्यांत सु. २,४०० मी. उंचीपर्यंत आढळते व वायव्य हिमालयात तर ते सामान्यतः दिसते रस्त्यांच्या दुतर्फा आणि खेडोपाडी शेतांच्या आसपास व उकिरड्याशेजारी आढळते. यूरोप व अमेरिका येथे लागवडीत आहे. याची पाने फिकट हिरवी, १२–१५ सेंमी, लांब व काहीशी दातेरी (खंडित) असतात फुले मोठी ७–२० सेंमी. लांब, पांढरी (कधी बाहेर निळसर) बोंडे सरळ लांबट व त्यांवर सरळ तीक्ष्ण काटे असून तडकून त्यांची चार शकले होतात. बिया मूत्रपिंडाकृत व अनेक फळे असलेली सर्वच झाडे कापून सुकवून घेतात. पाने निराळी सुकवितात व फळे फुटत असताना बडवून बिया सोडवून काढतात. याला नायट्रोजनयुक्त खत मानवते. चतुर्गुणित अथवा रंगसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या चौपट असलेल्या [ → बहुगुणन] झाडांपासून अधिक अल्कलॉइडे मिळतात. त्यांची पाने मोठी असतात अल्कलॉइडांचे संश्लेषण (घटक द्रव्ये एकत्र आणून पदार्थ तयार होण्याची क्रिया) मुळांत होते सावलीत सुकविलेल्या पानांत ते अधिक असते. या वनस्पतीत मुख्यतः हायसायमीन असून बाकीची द्रव्ये कमी असतात. या द्रव्यांचा परिणाम ⇨ बेलाडोनाप्रमाणे असतो दरम्यान, आकडीवर, वेदनांवर स्ट्रॅमोनियम (सुकी पाने व फुले असलेले शेंडे) फार उपयुक्त ठरले आहेत औषधात त्याचा वापर केला जातो. मूळव्याधीवर लावण्याच्या मलमात ते वापरतात कंपवातावरही देतात. गळवे व जखमा यांवर व मासा चावल्यास पाने लावतात कानदुखीवर फुलांचा रस कानात घालतात. दारुणा (कोंडा) व केस गळणे यांवर फळांचा रस डोक्यास लावतात. स्ट्रॅमोनियम हे कनकासवातील प्रमुख द्रव्य असून ते कफोत्सारक (कफ काढून टाकणारे), वेदनाहारक आणि शामक (शांत करणारे) आहे. दतुराच्या इतर जातींत (इनोक्सिया व मेटल) थोड्याफार प्रमाणात हे गुण असल्याने स्ट्रॅमोनियमऐवजी त्या वापरतात. स्ट्रॅमोनियमपासून ॲट्रोपीनही काढतात त्याची काही लवणे औषधी आहेत. डोळ्यातील बाहुलीचा विस्तार करण्यास ॲट्रोपीन वापरतात. या जातीच्या बियांचा उपयोग आत्महत्येकरिता अथवा इतरांस विषप्रयोग करण्यास वापरतात घशाला कोरड, घेरी, निराधार भ्रम, अडखळणे, दृष्टीमांद्य इ. लक्षणे बियांचा वापर करण्याने दिसून येतात व शेवटी मृत्यूही येतो. बियांत १६–१७% स्थिर तेल असते त्या तेलात कित्येक मेदाम्ले (ओलेइक, लिनोलीइक, पामिटिक, स्टिअरिक इ.) आहेत. रेचक व वांतिकारक औषधे देवून विषबाधा कमी करता येते. शिवाय थंड किंवा उष्ण उपाय आवश्यकतेनुसार करतात. अर्जुन वृक्षाची साल घेऊन तिचे चूर्ण किंवा काढा करून देतात. दतुरा आर्बोरिया ही धोतऱ्याची मोठी (इं. एंजल्स ट्रंपेट) जाती बागेत लावतात व महाबळेश्वरात सामान्यपणे आढळते. हिला १८–२० सेंमी. लांबीची पांढरी फुले येतात व त्यांना कस्तुरीसारखा वास येतो तिची फळे काटेरी नसतात. कित्येक बाबतीत हिचे काळ्या धोतऱ्याशी साम्य आहे निसर्गतः समुद्रसपाटीपासून सु. १,२४० मी. उंचीपर्यंत ही सर्वत्र आढळते. या जातीत स्कोपोलामीन हे प्रमुख अल्कलॉइड असते हायसायमीन व ॲट्रोपीन कमी असून परिस्थितीप्रमाणे त्यांचे प्रमाण कमीजास्त होते. पानात क्लोरोजिनिक अम्ल असते. हिचे मूलस्थान द. अमेरिकेतील पेरू व चिली येथे आहे.
दतुरा इनोक्सिया ही धोतऱ्याची जाती सु. ९०–१२० सेंमी. उंचीचे झुडूप असून मूळचे ते मेक्सिकोतील आहे तथापि आता वायव्य हिमालयात, दक्षिणेच्या पठारावर व इतर काही ठिकाणी आढळते. द.मेटल या जातीशी याचे बरेच साम्य आढळते तथापि या झुडपावर आधिक दाट लव असते, पुष्पमुकुटावर दहा दाते आणि फळावर लांब व नरम काटे असतात. पाने गर्द हिरवी, अंडाकृती, तळाशी हृदयाकृती, १२ X ८ सेंमी., सुगंधी पांढरी फुले सु. ८ सेंमी. लांब असतात फळ लांबट, टोकदार (कोनीय), खाली वळलेले व ५ X ३·८ सेंमी असून टोकाशी चार शकलांनी तडकते. त्या मधल्या स्तंभाला अनेक भुऱ्या बिया चिकटून असतात. इतर जातींप्रमाणे याला (वनस्पतीला) तीव्र मादक वास येतो. याचा भारतातील उपयोग द. स्ट्रॅमोनियमसारखाच (पांढऱ्या धोतऱ्यासारखाच) करतात. शस्त्रक्रिया व प्रसूती यांमध्ये शुद्धिहारक म्हणून आणि नेत्र चिकित्सेत व विमान, जहाज इ. द्रुतगती वाहने लागण्यावर यातील स्कोपोलामीन या एकमेव द्रव्याचा उपयोग करतात. औषधांत ते शामक म्हणून वापरतात तत्पूर्वी त्याचे रूपांतर हायड्रोब्रोमाइडात करतात.
भरपूर सूर्यप्रकाश व दुमट सकस जमीन धोतऱ्याच्या लागवडीस चांगली प्रत्यक्ष बिया लावून किंवा प्रथम रोपे तयार करून लावणी करतात दोन झाडांतील अंतर सु. १ मी. ठेवून हेक्टरी सु. दोन किग्रॅ. बी वापरतात. गायीचे कुजलेले शेणखत वापरल्यास निरोगी वाढ होते.
भांगेची [ → गांजा] व मद्याची तीव्रता (मादकता) वाढविण्यास त्यात धोतऱ्याचे बी घालीत असत. सूज, गालगुंड, वेदना, संधिवात,स्तनदाह इत्यादींवर पानांचा रस चोळतात. बी स्तंभक (आकुंचन करणारे), मादक (गुंगी आणणारे), वेदनाहारक, कडू, वायुनाशी व दीपक (भूक वाढविणारे) असते. दम्यावर बियांची किंवा पानांची धुरी देतात. विंचूदंशावर दंशाच्या जागी पानांचा रस चोळतात. धोतऱ्याच्या फुलांचा श्रीशंकर या देवाशी धार्मिक संबंध असल्याने त्याला ‘शिवशेखर’ म्हणतात. द.क्लोरँथा या जातीस हिरवट पिवळी व सुगंधी फुले असतात. द. सॅग्वीनियाला नारिंगी लालसर आणि द.स्वॅव्हिओलेन्सला मोठी, लोंबती, पांढरी व सुंगधी फुले येतात.
जोशी, रा. ना. परांडेकर, शं. आ.
पिवळा धोतरा : (फिरंगी धोत्रा, काटेधोत्रा हिं. शियाला काटा गु. दारुडी क. पिरंगी दत्तुरी, मुळ्ळ हळदी सं. स्वर्णक्षीरी, पीतपुतण, शृगाल काटा इं. मेक्सिकन पॉपी, प्रिक्ली पॉपी लॅ. आर्जिमोन मेक्सिकाना कुल-पॅपॅव्हरेसी). ही लहान, काटेरी, निळसर छटा असलेली, वर्षायू (वर्षभर जगणारी), पसरट फांद्यांची, ओषधी [ → ओषधि] मूळची अमेरिकेच्या उष्ण भागातील असून भारतात सर्वत्र (१,५५० मी. उंचीपर्यंत) तणाप्रमाणे आढळते. हिची पाने एकाआड एक, साधी, आयत, अर्धसंवेष्टी (तळाशी खोडास अर्धवट वेढणारी), काटेरी कडांची, बिनदेठाची, थोडीफार विभागलेली असून शिरा पांढऱ्या असतात. त्यांच्या बगलेत व खोडाच्या आणि शाखांच्या शेंड्यावर एकाकी मोठी पिवळी फुले डिसेंबर ते मार्च-एप्रिलमध्ये येतात. त्याची संरचना व इतर सामान्य लक्षणे अहिफेन कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात [ → पॅपॅव्हरेसी अफू]. बोंड लांबट, काटेरी व ४-६ शकलांनी फक्त टोकास तडकून वाऱ्याच्या झोताने बिया बाहेर फेकल्या जातात. बिया पिंगट, काळ्या, लहान, विपुल, गोलसर व सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) असून मोहरीच्या बियांत त्यांची भेसळ करतात. या वनस्पतीचा पिवळसर चीक औषधी असून कावीळ, खरूज, फोड ,जखमा इत्यादींवर उपयुक्त असतो. दुधाबरोबर कुष्ठावर व तुपाबरोबर परम्यावर देतात. मुळांचा काढा आरोग्य पुनःस्थापक व जुनाट चर्मरोगनाशक आहे. बिया अधिक प्रमाणात विषारी असून त्या रेचक, वांतीकारक, कफोत्सारक व शामक आहेत. बियांतील कडू अखाद्य तेल (२२–३६%) कमी प्रमाणात सौम्य रेचक आहे मोठ्या प्रमाणात तीव्र रेचक व वांतीकारक असते. कातडीच्या रोगांवर हे तेल उपयुक्त आहे. शिवाय ते वंगणाकरिता व दिव्याकरिता उपयुक्त असते. बेरबेरीन व प्रोटोपाइन ही दोन अल्कलॉइडे या वनस्पतीत आढळतात. खाद्य तेलात या तेलाची भेसळ करणे हानिकारक असते त्यामुळे जलसंचय (शोफ) होतो. हे जवस तेलात मिसळून रंगकामास वापरता येते.
हर्डीकर, कमला श्री.
संदर्भ : 1. Chopra, R. N. Badhwar, R. L. Ghosh, S. Poisonous Plant of India, New Delhi, 1972.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.
“