तोंडले :(हिं. कांदुरी गु. घौब, गलेडू क. तोंडलेकाई, तोंडलेबळ्ळी सं. बिंबा, पीलुपर्णी, तुंडी इं. आयव्ही गोर्ड लॅ. कॉक्सिनिया इंडिका, सिफॅलँड्रा इंडिका कुल–कुकर्बिटेसी). या अनेक वर्षे जगणाऱ्या व ओषधीय [⟶ ओषधी] वेलीचा प्रसार भारत, श्रीलंका, मलेशिया व आफ्रिकेतील उष्ण भाग येथे असून बागा, शेते, परसू वगैरे ठिकाणी लावून वर्षानुवर्षं फळे मिळवितात. जंगलातील वेलींची फळे कडू पण लागवडीतील वेलीस गोड फळे येतात वेल बहुधा मांडवावर चढवितात. फुले एकलिंगी, एकेकटी, पांढरी अगर पिवळी, घंटेसारखी असून ऑगस्ट ते सप्टेंबरात येतात. फळे २·५ ते ५ सेंमी. लांब व १·५ ते २·५ सेंमी. जाडीची, लंबगोल, दोन्ही टोकांस निमुळती, कोवळेपणी हिरवी व त्यांवर पांढरट उभ्या रेषा, पिकल्यावर गडद शेंदरी बिया अनेक, पिवळट, चपट्या व लांबट असतात. फळे कच्ची, शिजवून वा तळून आवडीने खातात. त्यांत जीवनसत्त्वे असतात. मुळे ग्रंथिल असतात. मुळाची साल सारक व पाने बाहेरून लावल्यास चर्मरोगनाशक असतात. इतर सामान्य लक्षणे आणि आकृती कर्कटी कुलात [⟶ कुकर्बिटेसी] दिल्याप्रमाणे असतात.

क्षीरसागर, ब. ग.

निचऱ्याच्या कसदार जमिनीत केलेल्या आळ्यात खत घालून प्रत्येकी ३०–४५ सेंमी. लांबीचे वेलाचे ३-४ फाटे अथवा ग्रंथिल मुळे मेमध्ये लावतात व पाणी देतात. लावलेल्या फाट्यांतून निघालेले वेल मांडवावर चढविल्यानंतर तीन महिन्यांत ते मांडव व्यापतात पुढे दर आठवड्याने पाणी द्यावे लागते. आंतर मशागत करून तण काढतात. वर्षाला ३-४ किग्रॅ. नायट्रोजन वरखत तीन हप्त्यांनी देतात. लागणीपासून तीन महिन्यांनी फळे मिळू लागतात. लागवड ६-७ वर्षे टिकते. नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये वेलांना विसावा देऊन जानेवारीत छाटणी करतात. हेक्टरी १५,०००–२०,००० किग्रॅ. हिरवी फळे मिळतात. या पिकावर भुरी रोग जास्त प्रमाणावर आढळून येतो. रोग निवारणासाठी २५० मेशचे गंधक पिस्कारतात.

पाटील, ह. चिं.