धूप : (हिं.सफेद डामर, राल, बर्साल, चंद्रस, क. गुग्ले, मुंडधूप सं. अजकर्ण, धूप इं. इंडियन कोपल ट्री, पिनी व्हार्निश ट्री, व्हाइट डामर ड्री, मलबार टॅलो ट्री लॅ. वॅटेरीया इंडिका कुल-डिप्टेरोकार्पेसी). एक मोठा सदापर्णी सुंदर वृक्ष. हा सह्याद्रीतील सदापर्णी जंगले, उत्तर कारवार ते त्रावणकोर (१,०५०–१,२०० मी. उंचीपर्यंत), कर्नाटक व पश्चिम भारतात पानझडी जंगलातील नद्यांच्या काठाने आढळतो. खोडाचा व्यास १·५ मी.पर्यंत असून साल करडी आणि खरबरीत असून तिचे जाड गोलसर खवले निघतात. पाने एकाआड एक, साधी, सोपपर्ण (उपपर्णयुक्त), गुळगुळीत, चिवट, लांबट गोलसर (१३–२० X ५–१० सेंमी.) फुले लहान, टोकाकडे येणाऱ्या परिमंजरीत [ → पुष्पबंध] मार्च–एप्रिलमध्ये येतात केसरदले असंख्य फळ (बोंड) अंडाकृती असून फुटल्यावर तीन एकबीजी शकले होतात संवर्ताचा आकार वाढलेला नसतो. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ डिप्टेरोकार्पेसी कुलामध्ये (शाल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
याचे मध्यकाष्ठ (खोड किंवा फांद्या यांच्या आतील भागातील घन लाकूड) फिकट पिवळट, मध्यम मजबूत पण फारसे टिकाऊ नसते. चहाच्या पेट्या, साधी खोकी, प्लायवुड, आगपेट्या, घरातील किरकोळ लाकूडकाम, फळ्या वगैरेंकरिता उपयुक्त असते. खोडाला चिरा पाडून काढलेल्या ‘पिनी–रोझीन’ किंवा ‘पांढरे डामर’ हा राळेसारखा घट्ट पदार्थ धूप, रंग व रोगण यांकरीता वापरतात. तसेच मेणात अगर तेलात हा पदार्थ मिसळून संधिवातावर चोळतात. बियांतील तेल दिव्याकरिता, साबण व मेणबत्यांकरिता आणि फळाच्या साली कातडी कमाविण्याकरिता उपयोगात आहेत. तेल जुनाट संधिवातावर लावण्यास उपयुक्त असते. धूप म्हणून जाळण्याकरिता आणखी काही वनस्पतींचे उत्सर्गही (बाहेर टाकले जाणारे पदार्थही) वापरतात [ → ऊद गुग्गूळ साल–२].
धार्मिक विधींत व पूजार्चनात धूप वापरतात. बायबलमध्ये (जुन्या करारात) धुपाचा उल्लेख आहे. देवापुढे धूप जाळण्याचा म्हणजे धूपारती करण्याचा प्रघात भारताप्रमाणेच ईजिप्त, बॅबिलोनिया, ॲसिरिया, ग्रीस, रोम इ. प्राचीन देशांतही होता. रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये मोठमोठ्या प्रार्थनांच्या वेळी धूप जाळतात पण इतर ख्रिस्ती चर्चमधून याचा क्वचितच उपयोग करतात. मुसलमानांच्या मशिदीत व दर्ग्यात धूप जाळण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात संध्याकाळच्या आरतीला धूपारती म्हणतात. धुपाच्या सुवासाने भोवतालची दुर्गंधी नाहीशी होऊन वातावरण प्रसन्न होते म्हणून मोठ्या समारंभाप्रसंगी धूप जाळण्याचा प्रघात आहे. धूप जाळण्याच्या पात्राला धुपाटणे किंवा धूपग्रह म्हणतात. हे धातूचे किंवा मातीचे बनविलेले असून त्यातील निखाऱ्यांवर अधूनमधून धूप टाकतात.
जमदाडे, ज. वि.
“