धार : मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व पूर्वीच्या धार संस्थानची राजधानी. लोकसंख्या ३६,१७२ (१९७१). सरोवरे, वनस्पती व ओसाड टेकड्यांनी वेढलेले हे शहर विंध्य पर्वत रांगेच्या उत्तर उतारावर स. स. पासून सु. ५८२ मी. उंचीवर वसलेले आहे. धार हे नाव ‘धारानगरी’ या नावावरून पडले असावे. अकराव्या शतकात भोज परमारकडे व चौदाव्या शतकात हे मुसलमानांकडे होते. १७३० मध्ये ते मराठ्यांकडे आले. १४०५ मध्ये दिलावरखान घोरीनी हिंदू देवालयांच्या अवशेषांचा उपयोग करून बांधलेल्या लाट मशिदीच्या पूर्वेच्या आणि उत्तरेच्या दरवाज्यांवर दोन फार्सी शिलालेख आहेत. शहराच्या उत्तरेकडील उंचवट्यावर तांबड्या वालुकाश्मांनी बांधलेला किल्ला चौदाव्या शतकात महंमद तुघलकच्या वेळी बांधलेला असावा. किल्ल्यात राजवाडा असून दुसऱ्या बाजीरावाचा जन्म येथेच झाला. वाक्पति–मुंज, सिंधुराजा आणि भोज यांच्या कारकीर्दीमध्ये धार हे सर्व हिंदुस्थानातील महत्त्वाचे शिक्षणकेंद्र समजले जात असे. येथे हल्ली मशिदीच्या स्वरूपात असलेली भोजशाळा, चार थडगी असलेले कमालमौला आवार, लाट मशीद, धारेश्वराचे मंदिर, किल्ला, कालिका देवीचे मंदिर या महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. ईशान्येस ५८ किमी. वर असलेल्या इंदूरशी हे सडकेने जोडलेले आहे. ग्रंथालय, दवाखाना, संगीत अकादमी व विक्रम विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय येथे आहे. मका, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, तंबाखू, अफू यांच्या व्यापाराचे हे महत्त्वाचे केंद्र असून येथे कापूस पिंजणे व हातमागावर कापड विणण्याचे उद्योग चालतात.
चौधरी, वसंत