पूर्वप्राप्त : ‘पूर्वप्राप्त’ हे पद आणि त्याचे विरोधी ‘उत्तरप्राप्त’ हे पद ही प्रामुख्याने विधानांना उद्देशून लावण्यात येतात. ⇨ उत्तरप्राप्त विधान म्हणजे जे अनुभवावर आधारलेले असते, जे सत्य आहे की असत्य आहे ह्याचा निर्णय अनुभवाच्या कसोटीवर करावा लागतो, असे विधान. उलट पूर्वप्राप्त विधान म्हणजे ज्या विधानाच्या सत्यतेचा निर्णय असा अनुभवाच्या आधारे करता येत नाही, ज्याची सत्यता अनुभवनिरपेक्ष असते, असे विधान. उदा., ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान उत्तरप्राप्त आहे, तर ‘७+५=१२’ ह्यासारखे गणिती विधान पूर्वप्राप्त असते, हे सर्वसाधारणपणे मान्य होईल.
पूर्वप्राप्त आणि उत्तरप्राप्त ज्ञान किंवा विधाने ह्यांमधील भेद ॲयरिस्टॉटल (इ.स.३८४ -३२२) पर्यंत मागे नेता येतो. आधुनिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात जी.डब्ल्यू. लायप्निट्स (१६४६ – १७१६) व डेव्हिड ह्यूम (१७११ – ७६) ह्या तत्त्ववेत्त्यांनीही त्याची दखल घेतली आहे. पण इमॅन्युएल कांट (१७२४ – १८०४) याने हा भेद ठसठशीतपणे मांडला, त्याला ज्ञानमीमांसेत मध्यवर्ती महत्त्व दिले. कांटनंतरच्या तत्त्वज्ञानात मात्र कांटने दिलेल्या अर्थाला अनुसरून – म्हणजे वर स्पष्ट केलेल्या अर्थाला अनुसरून – हा भेद करण्यात येतो. कांटने पूर्वप्राप्त विधाने आणि उत्तरप्राप्त विधाने ह्या विधानांमधील भेदाचा संबंध विधानांमधील आणखी दोन भेदांशी जोडला. हे भेद म्हणजे : (१) विश्लेषक आणि संश्लेषक विधाने ह्यांमधील भेद आणि (२) अनिवार्य (नेसिसरी) विधाने आणि आयत्त (कन्टिन्जन्ट) विधाने हा भेद. अनिवार्य विधान म्हणजे जे विधान केवळ ‘असे, असे आहे’ एवढेच सांगत नाही तर ‘असे, असे असलेच पाहिजे’ असे सांगते, म्हणजे ‘असे,असे नसणे अशक्य आहे’ असा दावा करते असे विधान. गणिती विधाने ह्या अर्थाने अनिवार्य असतात हे उघड आहे. आता अनुभव आपल्याला जे आहे त्याचे दर्शन घडवितो अनुभवापासून आपल्याला काय आहे आणि ते कसे आहे ह्याचे ज्ञान होते. पण जे आहे ते तसे असलेच पाहिजे हे ज्ञान अनुभवापासून होऊ शकत नाही. तेव्हा अनुभवावर आधारलेले विधान, म्हणजे उत्तरप्राप्त विधान हे अनिवार्य विधान असू शकत नाही. असे विधान केवळ आयत्त, केवळ ‘काय आहे’ हे सांगणारे विधान असते. अनिवार्य विधानांचे आपले ज्ञान अनुभवनिरपेक्ष असेच असले पाहिजे अनिवार्य विधाने पूर्वप्राप्त असली पाहिजेत. विश्लेषक आणि संश्लेषक विधाने हा भेदही कांटनेच स्पष्टपणे प्रथम केला. विश्लेषक विधानाची कांटने दिलेली व्याख्या अधिक व्यापक करून अशी मांडता येईल : जे विधान ते मांडणाऱ्या वाक्यातील पदांच्या अर्थावरूनच सत्य म्हणून निश्चित होते असे विधान म्हणजे विश्लेषक विधान. उदा., ‘त्रिकोण ही एक आकृती आहे ’. विश्लेषक विधान नाकारले तर आत्मव्याघात निष्पन्न होतो आणि म्हणून विश्लेषक विधान असत्य असणे अशक्य असते ते अनिवार्यपणे सत्य असते. शिवाय विश्लेषक विधान पूर्वप्राप्त असते त्याची सत्यता अनुभवावर आधारलेली नसते. केवळ तार्किक नियमांनी ते सत्य म्हणून निश्चित होते. संश्लेषक विधान म्हणजे विश्लेषक नसलेले विधान. असे विधान केवळ पदांच्या अर्थांवरून सत्य ठरत नाही. ते सत्य असेल, तर दुसऱ्या कशाच्या तरी आधारावर सत्य ठरते आणि हा आधार अर्थांत अनुभवाचा असतो. तेव्हा संश्लेषक विधान हे उत्तरप्राप्त आणि म्हणून आयत्त असते. तेव्हा प्रथमदर्शनी असे दिसते, की संश्लेषक विधाने, काय आहे हे सांगणारी, किंवा वस्तूंविषयीची विधाने ही अनुभवाधिष्ठित आणि आयत्त असतात, तर विश्लेषक विधाने, पदांच्या अर्थांवर आधारलेली विधाने, ही पूर्वप्राप्त आणि अनिवार्य असतात. आता हे विधान म्हणजे अनुभववादाचा मूलभूत सिद्धांत होय. अनुभववादाप्रमाणे वस्तूविषयीचे ज्ञान अनुभवापासूनच लाभू शकते व म्हणून हे ज्ञान मांडणारी संश्लेषक विधाने अनुभवाधिष्ठित व आयत्त असतात. पूर्वप्राप्त विधाने वस्तूविषयीची नसतात, ती केवळ पदांच्या अर्थांवर आधारलेली, विश्लेषक असतात व अनिवार्य असतात. आता तार्किक आणि गणिती विधाने अनिवार्य असतात हे वादातीत आहे. तेव्हा ही विधाने विश्लेषक असतात हे दाखवून देणे हा अनुभववादी कार्यक्रमाचा एक भाग असतो. पण हा कार्यक्रम पार पाडण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कांट ही अनुभववादी भूमिका नाकारतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या अनुभवाचे विषय असलेल्या वस्तूंचे पूर्वप्राप्त ज्ञान आपल्याला असते. म्हणजे आपल्याला काही संश्लेषक विधानांचे पूर्वप्राप्त ज्ञान असते. आपल्या ज्ञानशक्तीपासून अवकाश आणि काल ही पूर्वप्राप्त प्रतिमाने आणि कित्येक पूर्वप्राप्त संकल्पना आपल्याला प्राप्त होत असतात, ही पूर्वप्राप्त प्रतिमाने आणि संकल्पना ह्यांची मिळून आपल्या अनुभवाची एक अनिवार्य अशी आकारिक चौकट सिद्ध होत असते. गणिती विधाने अवकाश आणि काल ह्या पूर्वप्राप्त प्रतिमानांवर आधारलेली असतात आणि ती संश्लेषक, पूर्वप्राप्त व अनिवार्य असतात. तसेच ‘प्रत्येक घटना कार्यकारणनियमाला अनुसरून घडते’ ह्यासारखी आपल्या अनुभवाच्या आकारिक चौकटीचे वर्णन करणारी विधानेही पूर्वप्राप्त, संश्लेषक व अनिवार्य असतात.
गणिती विधानांचे तार्किक स्वरूप आणि पूर्वप्राप्त संकल्पनांचे व विधानांचे आपल्या अनुभवातील स्थान व कार्य हे अजून तत्त्वज्ञानात वादाचे विषय राहिलेले आहेत व त्यांची निर्णायक उत्तरे अजून लाभलेली नाहीत.
पहा : अनुभववाद कांट, इमॅन्युएल.
रेगे, मे. पु.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..