पृथुवैन्य : पृथु (क्कचित् पृथि किंवा पृथी) याचे नाव वैदिक वाङ्मयात -ऋग्वेद ८.९.१० १०.९३.१४ १०.१४८.५ अथर्ववेद ८.९.१० ८.९.२४ पंचविंशब्राह्मण १३.५.१९ जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण १.१०.९ इ. अनेक ठिकाणी येते. तो कृषिविद्येचा संशोधक होता, असे अथर्ववेदात म्हटले आहे. पंचविंशब्राह्मणात त्याला दोन्ही लोकांचा तसेच मनुष्य आणि पशू यांचा अधिपती म्हटले आहे. अनेक ठिकाणी त्याच्या नावाला वैन्य (वेनाचा पुत्र) हे उपपद लावले आहे. तो पृथ्वीचा पहिला राजा होता.

पृथूविषयी जास्त माहिती महाभारत, रामायण व पुराणे यांत मिळते (महाभारत, शांतिपर्व ५९ श्रीमद्भागवत ४.१५ वायुपुराण ६२.१४७ अग्निपुराण १८.८५ वाल्मीकिरामायण, बालकाण्ड ३५ ब्रह्माण्डपुराण २.३६). सहावा मनु चाक्षुष याचा नातू वेन हा राजा मोठा दुष्ट आणि प्रजेचा छळ करणारा निघाला. त्याच्याविरुद्ध ऋषींनी बंड करुन त्याला पदच्युत केले आणि ठार मारले. त्यानंतर देशात अराजक माजले, तेव्हा ऋषींनी त्याचा पुत्र पृथु याला गादीवर बसवले. त्याने राज्याभिषेकाच्या वेळी ‘मी निःपक्षपाताने राज्य करीन, जो कोणी अधर्म वर्तन करील त्याला शासन करीन आणि प्रजाजनांना पृथ्वीवरील ब्रह्म समजून त्यांचे पालन करीन’, अशी शपथ घेतली. नंतर त्याने पृथ्वीवरील उंचसखल प्रदेश सपाट करुन कृषियोग्य केला कृषी, पशुपालन, व्यापार यांना उत्तेजन दिले आणि नगरे व ग्रामे वसविली. पहिला अभिषिक्त राजा म्हणून त्याचे नाव अजरामर झाले आहे (शतपथब्राह्मण ५.३.५.४). त्याच्या नावावरून भूमीला पृथ्वी (पृथुराजाची) हे नाव पडले असे समजतात.

मिराशी, वा. वि.