पा ले र्मो : प्राचीन पॅनॉर्मस, अरबी खालेसा. इटलीमधील सिसिली या स्वायत्त प्रदेशाचे व पालेर्मो प्रांताचे राजधानीचे ठिकाण व प्रमुख बंदर. लोकसंख्या ६,७३,१६३ (१९७६). हे सिसिली बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर पालेर्मो उपसागराच्या शिरोगामी आणि काँका दऑरो या सुपीक व सुंदर मैदानी प्रदेशाच्या टोकाला वसले असून वार्षिक पर्जन्यमान सु. ८४ सेंमी. आहे. ख्रिस्तपूर्व आठव्या-सहाव्या शतकांत फिनिशियनांनी हे स्थापिले. कार्थेजियन, रोमन, व्हँडल, बायझेटिन, अरब, नॉर्मन, होअन्श्टाउफन, अँजव्हिन, सिसिलियन इत्यादींच्या सत्तांतरांनंतर १८६० मध्ये गॅरिबॉल्डीने जिंकले व पुढच्याच वर्षी ते इटलीत समाविष्ट झाले. दुसरा रॉजर व दुसरा फ्रेड्रिक यांचया कारकीर्दी म्हणजे पालेर्मोच्या कलात्मक, सांस्कृतिक व व्यापारविषयक वैभवाचे सुवर्णयुगच मानतात. जहाजबांधणी, पोलाद, काच, लाकडी सामान, कापड, सिमेंट, कातडी वस्तुनिर्मिती इ. उद्योगधंदे येथे चालतात. या बंदरातून प्रामुख्याने लिंबू जातीची फळे, मद्ये, लाकडी सामान, काच, कापड यांची निर्यात व धान्य, मांस, कोळसा, कागद, यंत्रे, धातू, रसायन उत्पादने, खते यांची आयात केली जाते. हे रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग आणि जलमार्ग यांनी महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडलेले आहे. अकराव्या-बाराव्या शतकांतील नॉर्मन – बायझंटिन चर्च, बाराव्या-पंधराव्या शतकांतील कॅथीड्रल आणि त्यांतील दुसरा रॉजर व दुसरा फ्रेड्रिक यांच्या कबरी, अनेक राजवाडे, रोमन व ग्रीक शिल्पकला, पुरातत्त्वविद्या व मानवजातिविज्ञान यांविषयीची वस्तुसंग्रहालये कलावीथी, भव्य रंगमंच, उद्याने, आकदमी, पालेर्मो विद्यापीठ (१७८१), ग्रंथालय, खगोलीय वेधशाळा, ऐतिहासिक व कौशल्यपूर्ण स्मारके इ. प्रेक्षणीय ठिकाणांमुळे एक पर्यटनकेंद्र म्हणूनही पालेर्मोस महत्त्व लाभले आहे.
चौधरी, वसंत.