पब्लिशस टेरेन्शिअस एफर: (सु. १८५–१५९ इ. स. पू.) श्रेष्ठ रोमन सुखात्मिकाकार. ‘टेरेन्स’ ह्या नावाने तो सामान्यतः ओळखला जातो. उत्तर आफ्रिकेतील कार्थेज येथे तो जन्मला. बहुधा तो एखाद्या आफ्रिकन जमातीचा असावा. गुलाम म्हणून त्याला रोममध्ये आणण्यात आले होते. त्याचा मालक टेरेन्शिअस ल्यूकेनिअस हा एक सेनेटर असून उदार वृत्तीचा होता. टेरेन्सची व्यक्तिगत गुणवत्ता लक्षात घेऊन त्याने टेरेन्सला शिक्षण दिले आणि पुढे मुक्तही केले. ‘सिपिओ आफ्रिकेनस मायनर’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्याप्रेमी रोमन सेनापतीच्या खास वाङ्मयीन वर्तुळात टेरेन्सचा अंतर्भाव होता. Andria (इ. स. पू. १६६, इं. भा. द वूमन ऑफ अँड्रॉस) ही टेरेन्सची पहिली नाट्यकृती. टेरेन्सच्या काळातील एक ज्येष्ठ नाटककार सिसिलिअस स्टेशिअस ह्याला टेरेन्सने ही नाट्यकृती वाचून दाखवली हे वाचन चालू असता सिसिलिअस भोजन करीत होता टेरेन्सचे नाटक त्याला इतके आवडले, की त्याने टेरेन्सला स्वतःबरोबर सन्मानाने भोजनास बसविले, अशी एक आख्यायिका आहे. ह्या नाटकाखेरीज टेरेन्सने अन्य पाच नाटके लिहिली. ती अशी : Hecyra (इ. स. पू. १६५, इं. भा. द मदर इन लॉ), Heauton timoroumenos(इ. स. पू. १६३, इं. भा. द सेल्फ-टॉर्मेंटर), Eunchus (इ. स. पू. १६१, इं. भा. द यूनक), Phormio (इ. स. पू. १६१, इं. भा. फोर्मिओ)व Adelphi (इ. स. पू. १६०, इं. भा. द ब्रदर्स). ह्या नाट्यकृती निश्चितपणे कधी लिहिल्या गेल्या, ह्याबद्दल ऐकमत्य नसले, तरी उपर्युक्त वर्षे त्या त्या नाटकाचा लेखनकाल म्हणून सामान्यतः मान्य झालेली आहेत. टेरेन्सच्या सर्व नाट्यकृती उपलब्ध आहेत. ह्या नाट्यकृतींच्या व्हॅटिकन येथील एका हस्तलिखितात तर त्यांतील विविध व्याक्तिरेखांची चित्रेही रेखाटलेली आहेत.
टेरेन्सच्या काळातील रोमन सुखात्मिकाकारांसमोर ग्रीक नव-सुखात्मिकेचा आदर्श होता. ॲरिस्टोफेनीस ह्या विख्यात ग्रीक सुखात्मिकाकाराच्या निधनानंतर अवतरलेली ग्रीक नव-सुखात्मिका ही आचार विनोदिनीला (कॉमेडी ऑफ मॅनर्स) अधिक जवळची होती. सर्वसाधारणांच्या जीवनांतून तिची संविधानके घेतलेली असत. प्रेमी युगुलांची साहसे हा ह्या सुखात्मिकांचा एक नेहमीचा विषय. ⇨ मिनँडर, आपॉलोडोरस ऑफ कारिस्टस आणि डिफिलस ह्या ग्रीक नवसुखात्मिकाकारांच्या आधारे टेरेन्सने आपल्या नाट्यकृती रचल्या तथापि आपल्या कलादृष्टीला अनुसरून आवश्यक ते स्वातंत्र्यही त्याने घेतले. उदा., ‘द वूमन ऑफ अँड्रॉस’ लिहीत असताना मिनँडरच्या Andria ह्या सुखात्मिकेबरोबरच Perinthia ह्या दुसऱ्या सुखात्मिकेतील सामग्रीही टेरेन्सने उपयोगात आणली आहे. ‘द यूनक’ही नाट्यकृती मिनँडरच्या Eunuchus आणि Kolax (इं. शी. फ्लॅटरर) अशा दोन नाटकांच्या आधारे उभी केलेली आहे. Adelphi साठी तर मिनँडर आणि डिफिलस ह्या दोघांच्या नाट्यकृतींचा वापर टेरेन्सने केला. मूळ ग्रीक नाट्यकृतींच्या संदर्भात अशा प्रकारचे स्वातंत्र्य घेऊन त्या ‘विटाळल्या’बद्दल टेरेन्सला त्याच्या हयातीतच टीका सहन करावी लागली होती. ल्यूशस हा नाटककार अशी टीका करणाऱ्यांत प्रमुख होता. काही उमराव मित्रांच्या साहाय्याने टेरेन्स आपली नाटके रचतो, असाही एक आरोप त्याच्यावर केला जात असे. ‘दे सेल्फ टॉर्मेंटर’ ह्या नाट्यकृतीला लिहिलेल्या प्रवेशकात टेरेन्सने ह्या आरोपाचा उल्लेख केलेला आहे. ‘सिपिओ आफ्रिकेनस मायनर’ ह्याच्या वर्तुळातील काही व्यक्ती टेरेन्सच्या नाट्यलेखनात सहभागी असाव्यात, असे मानण्याकडे उत्तरकालीन रोमनांचा कल होता.
टेरेन्सच्या उपर्युक्त सहा नाट्यकृतींत ‘द ब्रदर्स’ ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. ही एक विचारप्रवर्तक नाट्यकृती आहे. परस्परविरोधी स्वभावांचे दोन भाऊ तीत दाखविले आहेत. एक अत्यंत कठोर शिस्तीचा भोक्ता, तर दुसरा निकोप आणि विकासानुकूल अशा स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. शिस्तप्रिय भावाला दोन मुले आहेत. त्यांपैकी एकाला तो स्वतः वाढवतो आणि दुसऱ्याला आपल्या स्वातंत्र्यप्रिय भावाकडे सोपवतो. अखेरीस असे दिसून येते, की स्वातंत्र्यप्रिय भावाने सांभाळलेला मुलगा अधिक उमदा आणि जबाबदारीने वागणारा झाला. मुलांना शिक्षण कसे दिले पाहिजे, ह्यासंबंधीचा एक प्रकारचा उदारमतवादी दृष्टिकोण ह्या सुखात्मिकेत प्रत्ययकारीपणे मांडण्यात आलेला आहे.
नाट्यकृतीच्या घाटाबद्दल टेरेन्स फार जागरूक असे. गुंतागुंतीच्या कथानकाची बंदिस्त गुंफण तो अत्यंत कौशल्याने करी. दोन संविधानकांची एकात्म, परिणामकारक मांडणी हे त्याच्या नाट्यरचनेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. ‘द मदर-इन-लॉ’ ह्या एकाच नाट्यकृतीचा अपवाद वगळता, हे दोन संविधानकांचे तंत्र त्याने सर्वत्र वापरलेले आहे. कथानकातील गुंतागुंत वाढवीत नेऊन प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरणे हे टेरेन्सचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. नाटकाच्या प्रवेशकातून त्याच्या कथानकाची पार्श्वभूमी सांगण्याचा किंवा त्यातील महत्त्वाचे दुवे सुचविण्याचा तत्कालीन काही नाटककारांचा संकेत टेरेन्सने पाळला नाही. नाटककार म्हणून स्वतःचे समर्थन करण्यासाठी आणि आपल्या टीकाकारांना उत्तरे देण्यासाठी त्याने प्रवेशकांचा उपयोग करून घेतला. स्थूल, बटबटीत विनोद त्याने टाळला आणि आपल्या सुखात्मिकांत प्रहसनात्मकता येणार नाही ह्याचीही त्याने दक्षता घेतली. श्रीमंत नायक, त्यांची प्रेमप्रकरणे, त्यांत येणाऱ्या अडचणी हे आणि अशांसारखे विषय मिनँडरसारख्या ग्रीक नव-सुखात्मिकाकारांनी हाताळले होते तेच टेरेन्सच्या सुखात्मिकांतून अपरिहार्यपणे आलेले असले, तरी सर्वसाधारणांपेक्षा अधिक नागर आणि सुसंस्कृत अभिरुचीच्या प्रेक्षकांना त्याच्या नाटकांचे विशेष आवाहन होते. त्या काळच्या सुखात्मिकांतून सामान्यतः आढळणाऱ्या नृत्य-गायनालाही त्याने आपल्या नाटकांत कमीच वाव ठेवला. म्हणून, लोकप्रियतेच्या बाबतीत टेरेन्सची नाटके कमी यशस्वी ठरली. घाट व रचनाकौशल्य ह्यांकडे वाजवीपेक्षा अधिक लक्ष पुरविल्यामुळे ह्या दोन्ही संदर्भांत टेरेन्सच्या नाट्यकृतींत एक प्रकारची यांत्रिक परिपूर्णता आलेली असली, तरी त्यामुळे त्यांतील नाट्याचा जोम आणि सामर्थ्य काही प्रमाणात उणावल्याचा अनुभव येतो आणि संविधानकही काहीसे संथपणेच पुढे सरकते, अशी टीका टेरेन्सच्या नाटकांवर झालेली आहे. असे असले, तरी त्याने केलेल्या व्यक्तिरेखनातून मानवी स्वभावाचे सहानुभूतिपूर्वक निरीक्षण करण्याची त्याची जी विलोभनीय प्रवृत्ती प्रकट झालेली आहे, तिचा गौरवपूर्ण उल्लेखही समीक्षकांनी केलेला आहे.
लॅटिन साहित्यातील एक अभिजात नाटककार म्हणून टेरेन्स ख्याती पावला आहे. रोमन साम्राज्याच्या अंतापर्यंत त्याच्या नाट्यकृती आस्थेने वाचल्या आणि अभ्यासिल्या जात होत्या. सिसेरो (रोमन वक्ता आणि मुत्सद्दी) व हॉरिस (रोमन भावकवी व उपरोधकार) ह्यांनी टेरेन्सच्या नाट्यकृतींतील अनेक अवतरणांचा उपयोग करून घेतलेला आहे. मध्ययुगातही त्याची नाटके मान्यता पावली. दहाव्या शतकात रोसव्हिटा नावाच्या जोगिणीने टेरेन्सच्या नाटकांपासून प्रेरणा घेऊन सहा लॅटिन सुखात्मिका रचल्या. सोळाव्या शतकात फ्रेंच आणि इटालियन नाटककारांवर आणि रेस्टोरेशन कालखंडातील इंग्रज नाटककारांवर टेरेन्सच्या नाटकांचा प्रभाव होता.
टेरेन्सचा मृत्यू कसा झाला, ह्यासंबंधी निश्चित स्वरूपाची माहिती मिळत नाही. असे म्हणतात, की ग्रीसला त्याने भेट दिली होती परंतु तेथून तो रोमला परत आला नाही. परत येताना आजाराने वा त्याचे गलबत समुद्रात बुडाल्याने त्याला मृत्यू आला असावा. स्विटोनिअस (इ. स. सु. ७०–सु. १६०) ह्याने टेरेन्सचे एक चरित्र लिहिले आहे. जॉर्ज डक्वर्थ ह्यांनी संपादिलेल्या द कंप्लीट रोमन ड्रामा (२ खंड, १९४२) ह्या ग्रंथात इतर रोमन नाटककारांबरोबर टेरेन्सच्या नाट्यकृतींचेही इंग्रजी अनुवाद अंतर्भूत आहेत. सदर नोंदीत उल्लेखिलेले इंग्रजी अनुवाद ह्याच ग्रंथातील होत.
संदर्भ : 1. Beare, William, The Roman Stage, 3rd ed. New York, 1965.
2. Duckworth, George E. The nature of Roman Comedy, Princeton (N.J.), 1952.
3. Norwood, G. The Art of Terence, Oxford, 1923.
कुलकर्णी, अ. र.