पेशावर : पाकिस्तानातील याच नावाच्या जिल्ह्याचे, विभागाचे आणि वायव्य सीमा प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या २,६८,३६८ (१९७२). इतिहासप्रसिद्ध लष्करी केंद्र असलेले हे शहर खैबर खिंडीच्या पूर्वेस सु. १७ किमी. वर मोक्याच्या ठिकाणी बारा नदीच्या डाव्या तीरावर बसले आहे. टेकड्यांनी वेढलेल्या पेशावरच्या खोऱ्यातील सखल अशा मरूद्यानात विकसित झालेले हे या भागातील सर्वांत मोठे शहर असून, पाकिस्तानच्या आर्थिक, सांस्कृतिक व लष्करी जीवनात त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे शहर महामार्ग, हवाईमार्ग व लोहमार्ग यांनी मोठमोठ्या शहरांशी जोडले आहे. प्राचीन गांधार देश व सम्राट कनिष्क (इ. स. पहिले शतक) यांच्या या राजधानीस पुरुषपूर म्हणत. अकबराने यास पेशावर म्हणजे सरहद्दीचे गाव हे नाव दिले. १८४८ नंतर पेशावर ब्रिटिश अंमलाखाली आले. येथील हवामान उष्ण,कोरडे आणि विषम असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२.७ सेंमी.आहे.

कृषिमहाविद्यालयाचा परिसर, पेशावर.

शतकानुशतके पेशावर हे मध्य आशियातील व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. अफगाण व्यापाऱ्यांनी समरकंद, बूखारा, काबूल इ. शहरांशी याचा व्यापारी संबंध प्रस्थापित केला होता. लोकर, लोकरी वस्तू, रेशीम, किंमती खडे, गालिचे, पुश्तिन (मेंढ्यांच्या कातड्याचे कोट) यांचा येथे चालणारा व्यापार महत्त्वाचा आहे. येथील खवानी बाजारात व्यापारी सुकामेवा, लोकरीच्या वस्तू, गालिचे इत्यादींची देवाणघेवाण करतात. येथे औषधे, साखर, अन्नप्रक्रिया इत्यादींचे कारखाने असून रेशमी व लोकरीचे कापड, भांडी, पादत्राणे, फर्निचर, गालिचे इत्यादींची निर्मिती केली जाते. तेथील पेशावर विद्यापीठ (१९५०) व कृषी महाविद्यालय हा वायव्य सीमा भागातील शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. याच्या जवळच शहाजीकी ढेरी येथे बुद्ध स्तूपाचे अवशेष आहेत. तद्वत तेथे १९०९ मध्ये राजा कनिष्काची अवशेषमंजूषा सापडली असून तीमध्ये बुद्धाचे चिताभस्म आहे, असे मानतात. पेशावर येथील संग्रहालयात पहावयास मिळणारे गांधार शैलीचे विविध नमुने, बला हिस्सार किल्ला, महाबतखानाची मशीद, कॉफी हाउस, नगरभवन, अनेक बागा व शोभिवंत बाजार इ. प्रवाशांची आकर्षणे आहेत.

ओक, द. ह.