पर्किन, सर विल्यम हेन्री : (१२ मार्च १८३८–१४ जुलै १९०७). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. ॲनिलीन रंजक [→ रंजक व रंजकद्रव्ये] या पहिल्या कृत्रिम रंजकाचा शोध त्यांनी लावला व त्यामुळे अँनिलीन रंजक उद्योगाचा पाया घातला गेला. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे शिक्षण सिटी ऑफ लंडन स्कूल व रॉयल कॉलेज ऑफ केमेस्ट्री येथे ऑगस्ट डब्ल्यू. फोन होफमन यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आणि पुढे त्यांचेच सहकारी म्हणून ते काम करू लागले. होफमन यांच्या एका प्रबंधामुळे त्यांनी क्विनिनाच्या संश्लेषणाचे (कृत्रिम रीत्या तयार करण्याचे ) काम हाती घेतले. यासंबधी संशोधन करताना अशुद्ध अँनिलिनाचे पोटॅशियम डायक्रोमेटाने ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] करून १८५६ मध्ये त्यांना एक काळा पदार्थ मिळाला व त्यापासून रंजनाचा गुणधर्म असणारा निळसर पदार्थ त्यांनी वेगळा केला. हाच पहिला अँनिलीन रंजक होय व तो ॲनिलीन पर्पल, टायरीयन पर्पल वा मॉव्ह या नावांनी ओळखला जातो. १८५६ आणि १८५७ मध्ये त्यांनी त्याच्या उत्पादनाचे एकस्व (पेटंट) घेऊन हॅरोजवळ एक कारखाना सुरू केला.

इ. स. १८५८ मध्ये त्यांनी व बी. एफ्. डुपा यांनी ग्लायसीन या ⇨ॲमिनो अम्लाचे व १८६१ मध्ये टार्टारिक अम्लाचे संश्लेषण केले. मंजिष्ठाच्या मुळांपासून तयार करण्यात येणाऱ्‍या अँलिझरीन या लाल रंजकाच्या संश्लेषणास त्यांनी अँथ्रॅसिनापासून ॲलिझरीन तयार केले पण ती प्रक्रिया औद्यौगिक दृष्ट्या यशस्वी झाली नाही. १८६९ मध्ये पर्किन यांनी ॲलिझरिनाच्या उत्पादनाचे एकस्व घेतले. त्यांनी इतर बऱ्‍याच रंजकांचे, सुवासिक पदार्थांचे व औषधांचे संश्लेषण करण्याविषयी तसेच संबंधित कार्बनी संयुगे तयार करण्याविषयी संशोधन केले. टोंका बीन इत्यादींमधील कुमारीन हा गंधयुक्त घटक त्यांनी १८६८ मध्ये तयार केला. तसेच त्यांनी सॅलिसिल अल्कोहॉलाच्या (सॅलिजेनिनाच्या) संरचनेविषयी संशोधन केले. १८७४ नंतर त्यांनी उत्पादन व्यवसायातून निवृत्त होऊन फक्त संशोधनाकडेच लक्ष दिले. १८७८ मध्ये सिनॅमिक अम्लासारख्या अतृप्त (ज्यांच्या संरचनेतील कार्बन अणू एकमेकांस एकापेक्षा जास्त बंधांनी जोडलेले असतात अशा) अम्लांच्या निर्मितीसाठी उपयुक्त असलेली प्रसिद्ध पार्किन विक्रिया शोधून काढली.

यानंतर त्यांनी एखादा पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता त्याची ध्रुवित प्रकाशाच्या (एका विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्‍या प्रकाशाच्या) प्रतलाचे घूर्णन (वलन) करण्याची क्षमता व त्या पदार्थाची रासायनिक संरचना (त्यातील अणूंची मांडणी) यांच्यात असणाऱ्‍या संबंधाविषयी अभ्यास केला. त्यावरून त्यांनी विविध मूलद्रव्ये व मूलके (निरनिराळ्या रासायनिक विक्रियांमध्ये तसेच राहणारे परंतु स्वतंत्र अस्तित्व नसलेले अणुगट) यांच्या चुंबकीय क्षेत्रात ध्रुवित प्रकाशाच्या प्रतलाचे घूर्णन करण्याच्या क्षमतेने गणन गणन केले. या त्यांच्या अभ्यासामुळे एखाद्या संयुगातील –CH2–गटांची संख्या, शर्करांमधील –OH गटांचा प्रभाव, संयुगातील अतृप्ततेचे मान, समपक्ष-विपक्ष रूप व प्रकाशीय समघटक [→ त्रिमितीय रसायनशास्त्र] यांसंबंधी महत्त्वाची माहिती प्रस्थापित होण्यास मदत झाली.

इ. स. १८६६ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना रॉयल सोसायटीतर्फे १८७९ साली रॉयल पदक आणि १८९९ साली पदक देण्यात आले. होफमन व लव्हॉयझर या पदकांचाही त्यांना बहुमान मिळाला. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थेच्या अमेरिकन विभागातर्फे पर्किन यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने सुरूव केलेले पदक त्यांनाच प्रथम १९०७ मध्ये देण्यात आले. १९०६ साली त्यांना ‘नाइट’ हा किताब मिळाला. ते सडबरी येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.