पेरू – २ : दक्षिण अमेरिकेतील एक प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ १२,८५,२१५ चौ. किमी. लोकसंख्या १,६५,८०,०९६ ( १९७७ अंदाज ). पश्चिमेस पॅसिफिक महासागर, उत्तरेस एक्वादोर, ईशान्येस कोलंबिया, पूर्वेस ब्राझील, आग्नेयीस बोलिव्हिया आणि दक्षिणेस चिली यांनी तो सीमित झाला आहे. लीमा हे राजधानीचे शहर असून, लोकसंख्या ३९,०१,००० ( १९७५ अंदाज ) आहे.
भूवर्णन : पेरूचे प्राकृतिक दृष्ट्या मुख्यत्वे तीन विभाग पडतात: समुद्रकिनारपट्टीचा अरुंद वाळवंटी पट्टा, मध्यभागातील उंच दऱ्याखोऱ्यांनी व्याप्त पर्वतश्रेणी ( अँडीज ) आणि पूर्वेकडील जंगलमय डोंगराळ व सखल मैदानी प्रदेश ( माँटॅना ).
(१) समुद्रकिनारपट्टीचा अरुंद वाळवंटी पट्टा : वायव्येकडून आग्नेयीकडे जाणारी किनारपट्टी २,२६९ किमी. लांब असून तिची रुंदी १६ किमी. पासून १५० किमी. पर्यंत आहे. थंड हंबोल्ट समुद्रप्रवाहामुळे हा प्रदेश अधिक निर्जन झाला आहे. या भागात भूकंपाचे अधूनमधून धक्के बसतात. या अरुंद मरुभूमीतून सु. ५२ नद्या वाहतात व यांत ४० मरुद्याने आहेत. या परिसरात ऊस व कापूस ही पेरूची दोन प्रमुख पिके घेतली जातात. येथील बहुतेक नद्या अँडीजमध्ये उगम पावतात. त्यांतील फार थोड्या ( सु. १० ) नद्यांनाच वर्षभर पाणी असते तथापि या प्रदेशातच पेरूची लीमा, चीक्लायो, त्रूहीयो ही शहरे व कायाओ, मॅटरनी ही प्रमुख बंदरे आहेत. नदीकाठच्या सुपीक गाळाच्या जमिनीमुळे व कालव्यांच्या जाळ्यामुळे पेरूच्या या वाळवंटी भागाचे समृद्ध शेतजमिनीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे हा प्रदेश म्हणजे पेरूच्या आर्थिक जीवनाचा गाभा आहे. येथील शेती, शहरांभोवती केंद्रित झालेला व्यापार व बंदरे यांमुळे या प्रदेशात देशातील २५ % हून अधिक वस्ती आढळते. किनाऱ्याजवळ असलेल्या लोव्होस व चींचा या बेटांवर खतांचे कारखाने आहेत.
(२) अँडीज पर्वतश्रेणीचा मध्यभाग : हा भाग ‘सिएरा’ या नावाने प्रसिद्ध असून त्याची रुंदी सु.३२० किमी. आहे. हा मुख्यत: तीन पर्वतश्रेणींचा बनला असून समुद्रकिनाऱ्यास समांतर असलेल्या पश्चिमेकडील श्रेणीस कॉर्डिलेरा ऑक्सिडेंटल, मधल्या श्रेणीस सेंट्रल कॉर्डिलेरा व पूर्वेकडील श्रेणीस कॉर्डिलेरा ओरेंटाल म्हणतात. कॉर्डिलेरा ऑक्सिडेंटल श्रेणीतील वास्कारान हे सर्वांत उंच ( ६,७६८ मी.) शिखर असून त्याखालोखाल एल् मीस्ती हे ज्वालामुखी शिखर ( ५,८३७ मी. ) आहे. पूर्वेकडील पर्वतश्रेणीत पाऊस भरपूर पडतो आणि त्या भागातूनच नद्यांचे उगम आढळतात. पूर्व व पश्चिम पर्वतश्रेणींदरम्यान देशाच्या दक्षिण भागात आल्तीप्लानो पठार असून आग्नेयीकडील दोन पर्वतश्रेण्यांत ३,८१२ मी. उंचीवर ðतितिकाका सरोवर आहे.याच्याभोवती कसण्यायोग्य जमीन असून गवताची कुरणे आहेत. यांमुळे या प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. कूस्को व आरेकीपा ही दोन मोठी शहरे तसेच डोंगराळ भागातील मेंढपाळी, लामा व अल्पाका या प्राण्यांची पैदास यांमुळे या भागात दूधदुभत्याचा धंदाही मोठ्या प्रमाणावर चालतो. या प्रदेशातील वस्ती मुख्यत: इंडियनांची आहे. [ →अँडीज पर्वत ].
(३) पूर्वेकडील जंगलमय व मैदानी प्रदेश : माँटॅना या भागात पेरूतील एकूण मैदानी भागाच्या निम्म्याहून अधिक मैदानी प्रदेश असून त्याचे दोन नैसर्गिक विभाग पडतात : अँडीजच्या पूर्वेकडील उतार व त्याच्या पूर्वेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मैदानी प्रदेश. पहिल्या भागात दऱ्या व खोरी असून हा उष्ण कटिबंधीय प्रदेश जंगलव्याप्त आहे. पूर्वेकडील उतारावर हिमनद्या आढळतात. या प्रदेशातील अँडीजमधून उगम पावणाऱ्या मारान्यॉन, नापो, पास्ताझा या आग्नेयवाही व ऊक्याली, ऊरूबांबा इ. उत्तरवाहिनी नद्या पुढे ॲमेझॉनला मिळतात. या नदीखोऱ्यांच्या भागातही घनदाट जंगले असून वस्ती फार तुरळक आढळते. तसेच या प्रदेशात शेतीयोग्य सुपीक जमीन बरीच असून अद्याप तिचा कसण्यासाठी फारसा उपयोग झालेला दिसत नाही.
हवामान : पेरूतील हवामान नैसर्गिक प्रदेशांनुसार भिन्नभिन्न आहे. किनारपट्टीतील हवामान काही भागातील दमटपणा व हंबोल्ट या शीत समुद्रप्रवाहाजवळचे थंड हवामान वगळता एकूण आल्हाददायक असते. शीत हंबोल्टमुळे अगदी किनाऱ्यालगतचे तपमान कधीकधी गोठणबिंदूच्याही खाली जाते. लीमा येथे वर्षांला सरासरी ३.९० सेंमी. पाऊस पडतो. सिएरा प्रदेशातील हवामान सामान्यत: कोरडे, समशीतोष्ण व आरोग्यकारक असून तपमानातील बदल मुख्यत्वे पर्वतांच्या उंचीवर अवलंबून असतात. उदा., वांग्काइओ या सु. ३, ३२५ मी. उंचीवरील शहराचे तपमान विषुववृत्त सान्निध्यात असूनही – ३.९० से. ते २३.९० से.यांदरम्यान असते. याउलट माँटॅना मैदानी प्रदेशातील हवामान उष्ण दमट आहे. या विषुववृत्तीय सपाट प्रदेशात प्रतिवर्षी सरासरी २५४ सेंमी. हून अधिक पाऊस पडतो.
वनस्पती व प्राणी : भिन्न हवामान व भूरचनेतील विविधता यांमुळे पेरूत अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. किनाऱ्यावरील मरुभूमीत वनस्पतींचे प्रमाण अल्प असून नदीकाठी शमी व ताडासारखी झाडे, मेस्कीट, निलगिरी, ऑलिव्ह व काही प्रमाणात फळझाडे आढळतात. अधूनमधून वाळवंटी झुडुपेही दिसतात. सिएरा प्रदेशात गवताची कुरणे असून निलगिरी, कोकाची झुडुपे व अनेक औषधी वनस्पती आहेत. कोका ही पेरूची वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असून तीपासून कोकेन हे मादक द्रव्य तयार करतात. यांशिवाय समशीतोष्ण हवामानातील इतर अनेक वनस्पतीही येथे उगवतात. माँटॅना या सपाट प्रदेशातील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विपुल जंगलसंपत्ती आहे. या भागात ५८,००० चौ. किमी. घनदाट अरण्य आहे व त्यातून ॲमेझॉनसह १८ प्रमुख नद्या व सु. २०० उपनद्या वाहतात. त्यामुळे वनस्पतींचे विविध प्रकार व आकार पाहावयास मिळतात. त्यांतील एबनी, मॉहॉगनी, सीडार, ड्रायवुड, सिंकोना, सार्सापरिला, बार्बास्को, व्हॅनिला वगैरे काही महत्त्वाचे वनस्पतिप्रकार होत. सिंकोनापासून क्विनीन तयार करतात. सार्सापरिला, बार्बास्को, व्हॅनिला या औषधी वनस्पती आहेत. रबराचेही येथे उत्पादन होते. यांशिवाय तंतूच्या विविध प्रकारच्या वनस्पती भरपूर असून फुलझाडांचाही भरणा आहे.
अँडीज पर्वतातील लामा, अल्पाका हे माणसाळलेले प्राणी तसेच व्हिकुना आणि उंटासारखा ग्वानाको इ. प्राण्यांसाठी पेरू देश प्रसिद्ध आहे, यांशिवाय उंच प्रदेशात व्हिस्काचा, चिंचिल्ला, काँडर हे प्राणी आढळतात. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील दाट जंगलात व मैदानी प्रदेशात माकडे, मगरी, जॅगुआर, नरभक्षक पिर्हान्हा मासा, प्यूमा, टॅपिर, विविध प्रकारचे साप तसेच रॉबिन, फ्लायकॅचर, फिंच, पारवे, बदके इ. अनेक जातींचे पक्षी आढळतात. माँटॅना प्रदेशात पोपट, फ्लेमिंगो व उष्ण कटिबंधीय प्रदेशातील इतर पक्षी आहेत. आर्थिक दृष्ट्या पाणकोळी, पाणकावळा, गल, गॅनेट हे पक्षी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या पक्ष्यांची व त्यांच्या विष्ठेपासून बनणाऱ्या खताची ( ग्वानो ) मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
इतिहास : पेरूच्या प्राचीन इतिहासाविषयी फारशी विश्वसनीय माहिती ज्ञात नाही. तथापि पुरातत्त्वीय अवशेषांवरून अँडीज पर्वतश्रेणींच्या परिसरात अखंड पाषाणस्तंभी अवशेष आढळले. त्यांवरून अँडियन संस्कृती या प्रदेशात इ. स. पू. ३५०० – १००० च्या दरम्यान नांदत असावी. तितिकाका सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ तसेच डोंगरांवरही प्राचीन अवशेष आढळले आहेत. त्यांवरून तेथील आसमंतातही लोकवस्ती असावी. इ. स. पू. २५०० नंतर त्यांच्यात झपाट्याने सुधारणा झाली आणि ते स्थिर वस्ती व शेती करून राहू लागले. लीमा येथील तत्कालीन पिरॅमिड प्रसिद्ध आहे. या लोकांचे यांत्रिक ज्ञान तसेच शिल्पकलेतील व वास्तुकलेतील कौशल्य प्रगत होते. पुढे अँडीजच्या उंच प्रदेशात राहणाऱ्या व शेतकी आणि लामांची पैदास यांवर गुजराण करणाऱ्या इंका आणि केचुआ इंडियन जमातींनी कूस्को खोऱ्यात इं स. १२०० च्या सुमारास नवीन साम्राज्य स्थापन केले. दक्षिण कोलंबिया ते उत्तर अर्जेंटिना या विस्तृत प्रदेशात इंकांनी अनेक सुधारणा करून त्यावर आपली पकड पक्की केली. इंका वास्तूंचे भव्य अवशेष त्यांच्या गत वैभवाची साक्ष देतात [ → इंका].
स्पॅनिश आक्रमक या प्रदेशात येईपर्यंत इंका साम्राज्याचे केंद्र कूस्को येथे होते. त्याच्या परिघात हल्लीचे पेरू, बोलिव्हिया, एक्वादोर हे देश आणि कोलंबिया, चिली व अर्जेंटिना यांच्या काही भागांचा समावेश होता. आक्रमकांच्या आगमनापूर्वीच सम्राट वायना कापाक हा मरण पावला, मात्र त्याने आपले साम्राज्य मोठा मुलगा वास्कार व धाकटा आतावाल्पा यांमध्ये वाटून दिले होते. यात धाकट्यास कूस्को वगैरे सुपीक प्रदेश मिळाल्याने यादवी होऊन इंका सत्ता खिळखिळी होऊ लागली. पनामाहून स्पॅनिश वसाहतकार फ्रांथीस्को पिझारो हा नोव्हेंबर १५३२ मध्ये काहामार्का येथे पोहोचला. त्याने सम्राट आतावाल्पा यास विश्वासघाताने कैद करून १५३३ मध्ये ठार केले. १५३५ पर्यंत स्पेनची सत्ता या प्रदेशात प्रस्थापित झाली. जानेवारी १५३५ मध्ये पिझारोने लीमा ही नवीन राजधानी स्थापन करून सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला. पेरूत मिळालेली प्रचंड लूट अनपेक्षित होती आणि तीवरून पिझारो व त्याचा सहकारी द्येगो दे आल्माग्रो यांमध्ये यादवी युद्ध होऊन दोघेही मरण पावले. या भांडणामुळे जवळजवळ पावशतक पेरूमध्ये अराजक माजले होते. [→ पिझारो बंधु]. यानंतर १८१५ पर्यंत काही तुरळक उठाव इंडियन व स्थानिक गोऱ्यांनी केले पण ते अयशस्वी झाले.
व्हेनेझुएला हा भाग वगळता १५४४ मध्ये द. अमेरिकेतील सर्व स्पॅनिश वसाहतींची लीमा ही राजधानी झाली. पेरूच्या स्वातंत्र्य चळवळीस देशाबाहेरच प्रारंभ झाला. या चळवळीच्या प्रारंभकाळात होसे दे सान मार्तीन व सिमॉन बोलीव्हार या दोन व्यक्ती महत्त्वाच्या होत्या. चिलीमध्ये स्पॅनिशांचा पराभव केल्यावर सान मार्तीनने स्पेनच्या सत्तेचा शेवटचा बालेकिल्ला हाणून पाडण्याकरिता १८२० मध्ये पेरूत प्रवेश केला. स्पेनच्या राजप्रतिनिधीने आपल्या सैन्यासह लीमा सोडले व सान मार्तीनने तेथे २८ जुलै १८२१ मध्ये पेरूचे स्वातंत्र्य जाहीर केले. तथापि स्पेनचे बरेच सैन्य अद्यापि पेरूत होते आणि सिमॉन बोलीव्हार व सान मार्तीन हे दोघेही ते नामशेष करण्यासाठी प्रयत्नशील होते. ग्वायाकील येथील ऐतिहासिक भेटीतच याचा निर्णय झाला. मार्तीनने सप्टेंबरमध्ये पेरू सोडले. बोलीव्हारशी संघर्ष टाळण्याकरिता त्याने हा सत्तात्याग केला असावा. बोलीव्हारने पुढील स्वातंत्र्यलढ्यात स्पॅनिश सत्तेवर सतत प्रहार करून पेरू व कोलंबियातील आपल्या सैनिकांची मदत घेतली. त्यांनी हूनीन व आयाकूचो या लढायांत स्पेनचा पूर्ण पराभव केला ( १८२४ ). १८२६ मध्ये कायाओ काबीज झाल्यावर स्पॅनिश सत्ता संपुष्टात आली.
देशात गणराज्यात्मक संविधान असावे असे १८२२ च्या लीमा येथील काँग्रेसमध्ये ठरले होते, तथापि बोलीव्हारला निमंत्रित केल्यामुळे मार्तीनचे वर्चस्व कमी झाले व काही काळ बोलीव्हार हा हुकूमशहा झाला. कोलंबियासह पेरूचे महासंघराज्य करण्याची त्याची इच्छा होती. १८२६ मध्ये आजन्म अध्यक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आली.तो कोलंबियात गेला असताना पेरूमध्ये यादवी सुरू झाली. या यादवीत बोलीव्हारला पदच्युत करण्यात आले व नवीन संविधान अंमलात आले. वसाहती राज्यात वैभवात चढलेल्या कित्येक श्रीमंत पेरूवासियांना स्वातंत्र्य नको होते. शिवाय या सत्तास्पर्धेत बहुतेक लष्करी सेनानी होते. त्यांनी अनेकविध संविधाने अंमलात आणल्यामुळे शासनात अस्थिरता निर्माण झाली. स्वातंत्र्यापासून या वेळेपर्यंत पेरूच्या एकूण पंधरा घटना झाल्या होत्या. मध्यंतरी १८३६ मध्ये पेरू व बोलिव्हिया यांचे जनरल आंद्रेस सांताक्रूस याच्या नेतृत्वाखाली संघराज्यही बनविण्यात आले. हे संघराज्य १८३९ साली मोडले व सांताक्रूसला देशत्याग करावा लागला. त्याच्यानंतर अधिकारावर आलेला गामारा याने बोलिव्हियावर हल्ला केला, त्यात तो मारला गेला (१८४२). यानंतर १८४५ मध्ये रामाँ कास्तीया (१८४४ – ५० व १८५५ – ६२)राष्ट्राध्यक्ष झाला. त्याने देशाची आर्थिक घडी नीट बसवून दळणवळणाची साधने वाढविली. त्याच्या कारकीर्दीत १८६० पासून अंमलात आलेले गणराज्यात्मक संविधान १९२० पर्यंत होते. कास्तीयानंतर भ्रष्टाचार, लाचलुचपत व कर्जबाजारीपणा यांमुळे पेरूतील शासन पोखरले गेले. त्यातच स्पेनशी युद्ध उद्भवले व स्पेनने कायाओ बंदरावर हल्ला केला. इतर देशांच्या मदतीने पेरूने या युद्धात स्पेनचा पराभव केला. स्पेनने पेरूचे स्वातंत्र्य १८७९ मध्ये मान्य केले. दरम्यान होसे बाल्ता (१८६८ – ७२)याने रेल्वेसारखे लोकोपयोगी कार्यक्रम कार्यवाहीत आणले. त्यानंतर पहिला नागरी राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्वेल पार्दो (१८७२ – ७६) निवडून आला. १८७९ मध्ये किनाऱ्यावरील नायट्रेट व ग्वानो यांनी समृद्ध असलेल्या प्रदेशावरून पेरू व चिली यांच्यात युद्ध झाले आणि त्यात पेरूला तारापाका, ताक्ना व आरीके हे जिल्हे गमवावे लागले. त्यांपैकी शेवटचे दोन दहा वर्षांकरिता ओलीस होते पण चिलीने ते परत केले नाहीत. अखेर १९२९ मध्ये तडजोड होऊन बहुतांश ताक्ना जिल्हा पेरूस परत मिळाला. याच युद्धात (१८८१ – ८३) चिली सैन्याने लीमाचा ताबा घेतला. त्या बेबंदशाहीत तेथील खजिना व राष्ट्रीय ग्रंथालय लुटले गेले.
या युद्धानंतर पेरूत काही काळ अराजक माजले. १८८६ मध्ये जनरल आंद्रेस कासेरेस (१८८६ – ९०) राष्ट्राध्यक्ष झाला. त्याने परक्या भांडवलदारांस सवलती देऊन त्यांच्याकडे राष्ट्रीय रेल्वेमार्ग ६६ वर्षांकरिता गहाण टाकला. १८९४ – ९५ मध्ये देशभर यादवी माजली. नीकोलास प्येरोलाने बंड केले आणि तो राष्ट्राध्यक्ष झाला ( १८९५ – १८९९ ). त्यानंतर होसे पार्दो राष्ट्राध्यक्ष म्हणून दोनदा निवडून आला ( १९०४ – ०८ व १९१५ – १९ ).
दरम्यान १९०८ ते १९१२ आणि १९१९ ते १९३० या कालखंडात आउगूस्तो बेर्नार्दीनो लेगीआ याने देशावर अनियंत्रित सत्ता गाजविली. १९२० मध्ये एक नवी उदारमतवादी घटना मान्य करण्यात आली होती पण लेगीआने ती गुंडाळून ठेवली. त्याच्या कारकीर्दीत आर्थिक सुधारणा झाल्या. पेरू – बोलिव्हिया यांच्या वादातील लवादाचा निवाडा अर्जेंटिनाने १९०९ मध्ये दिला, परंतु बोलिव्हियाने तो नाकारला. युद्धाचा संभव होता पण प्रदेशांची देवाण-घेवाण होऊन ते संकट टळले. एक्वादोरबरोबरही सीमावादावरून युद्ध झाले असते, पण अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील व अर्जेंटिना यांच्या मध्यस्थीने ते टळले.
लेगीआविरूद्ध १९३० मध्ये लष्करी उठाव होऊन लूईस सांचेस सेरो १९३१ मध्ये सत्तेवर आला. त्याने १९३३ मध्ये नवीन संविधान तयार करून अंमलात आणले. जागतिक मंदीच्या काळात पेरूमध्ये डाव्या गटाचा ‘आप्रा’ (अलिआन्सा पाप्यूलार रेव्होल्यूशनारिया अमेरिकाना) हा पक्ष बळावत हेता. म्हणून १९३२ च्या सुमारास सेरोने त्या पक्षाच्या आया या नेत्यास कैद करून त्याच्या काही समर्थकांना हद्दपार केले. त्यानंतर सेरोचा खून झाला (१९३३) आणि जनरल बेनाव्हीदेस (१९३३ – ३९) याच्याकडे घटना समितीने राज्यकारभार सोपविला. त्याने इटलीतून सल्लागार बोलावून आपले लष्कर व गुप्त पोलीस यांची संघटना फॅसिस्ट पद्धतीवर केली. १९३६ च्या निवडणुकीत आप्रा पक्षाच्या उमेदवारांस अधिक मते पडण्याचा संभव दिसताच बेनाव्हीदेसने त्यांची मते अवैध ठरविली व आपली मुदत तीन वर्षांनी वाढवून घेतली. त्याच्या कारकीर्दीत पेरूमध्ये इटली आणि जपान या देशांनी भांडवल गुंतवून व्यापार वाढविला.
दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्वक्रीत मान्वेल प्रादो (१९३९ – ४५) हा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याची मते प्रागतिक होती. महायुद्धकाळात तो दोस्त राष्ट्रांच्या बाजूला राहिला. १९४२ मध्ये पेरूतील राष्ट्रविरोधी कारवायांवर त्याने जबर नियंत्रणे घातली. युद्धकालीन निकडीमुळे नवीन रस्ते, जलविद्युत् आणि पोलादप्रकल्प शक्य होऊन मजूर व गुलामीत जखडलेले इंडियन यांच्या सुधारणेचे प्रयत्नही शक्य झाले. याबरोबर प्रागतिक विचारांचे वारेही वाहू लागले आणि ते ओळखून प्रादोने १९४५ सालची निवडणूक निर्वेध होऊ दिली. पेरूच्या इतिहासातील ही एकच खुली निवडणूक होय. निवडणुकीत आप्राचे उमेदवार लोकपक्षाच्या नावाखाली उभे राहून निवडून आले. संयुक्त मंत्रिमंडाळात आप्रा पक्षास प्रथमच स्थान मिळाले. या मंत्रिमंडाळाने पेरूची आर्थिक व्यवस्था व आधुनिकीकरण तसेच लोकशाहीची बैठक पक्की करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे उजव्या गटाने असहकार पुकारून शासन कुंठित केले. त्याच्या विरोधात ३ ऑक्टोबर १९४८ रोजी आप्रा पक्षाने उठाव केला परंतु तो फसला. २९ ऑक्टोबर १९४८ रोजी उजव्या गटाने सुसंघटित उठाव करून जनरल ऑद्रिया यास अधिकारावर आणले. त्याने आप्रा व कम्युनिस्ट या पक्षांस अवैध ठरविले. १९५६ मध्ये प्रादो पुन्हा निवडून आला. १९६२ च्या निवडणुकांत कोणासच निर्णायक मते न मिळाल्याने डाव्या गटाच्या भीतीने लष्कराने सत्ता हाती घेऊन १९६३ मध्ये पुन्हा निवडणूक घेतली. तीत फेर्नांदो बेलाऊन्दे तेरी हा राष्ट्राध्यक्ष झाला परंतु अर्थसंकल्पातील त्रुटी, चलनफुगवटा व परराष्ट्रांशी असलेले संबंध असमाधानकारक वाटल्याने लष्कराने बंड करून सत्ता हाती घेतली (१९६८) आणि जनरल व्हान व्हेलास्को आल्व्हारादो हा अध्यक्ष झाला. या वेळेपासून पेरूची राजकीय सूत्रे पूर्णत: लष्करी अधिकाऱ्यांच्या हाती गेली राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान या व्यक्ती लष्करातील असून केवळ मंत्रिमंडळात बदल होत. आल्व्हारादोने संविधान बरखास्त करून एकतंत्री हुकुमशाही अंमल प्रस्थापित केला. वरकरणी लोकशाही पुन्हा रूजविण्याची त्याची इच्छा होती. त्याने देशातील नैसर्गिक संपत्तीचा विकास करून आर्थिक घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला पण १९७० च्या भूकंपाने ५० हजार माणसे मृत्युमुखी पडल्याने आर्थिक ताण वाढला. १९७२ मध्ये त्याने मंत्रिमंडाळात काही फेरबदल केले. परराष्ट्रमंत्री म्हणून जॅरिनला नेमले. १९६८ पासून सु. १० – १२ वर्षे पेरूत जवळजवळ लष्करी अंमलच आहे. १९७५ मध्ये जन. फ्रांथीस्को मोरालेस बेर्मूदेसने राष्ट्राध्यक्षपद बळकावले व जन. हॉर्हे फेर्नांदेस माल्दोनादो याची पंतप्रधान व मुख्य लष्करी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. यानंतर नागरी शासन लवकरच सत्तारूढ होईल, अशी घोषणा करण्यात आली पण देशातील एकूण परिस्थिती विचारात घेता माल्दोनादोचा राजीनामा घेण्यात आला व त्याच्या जागी जन. गॅलिआनी पंतप्रधान झाला (१६ जुलै १९७६). त्याने आणीबाणी जाहीर करून मच्छीमारी धंद्याचे झालेले राष्ट्रीयीकरण रद्द केले संपांना बंदी घातली, वृत्तपत्रे बंद केली आणि १९८० पासून देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालेल, अशी घोषणा केली. १९७७ मध्ये ‘तूपाक आमारू’ योजना (१९७७ – ८०) प्रसिद्ध करण्यात आली तीमध्ये जुलै १९७९ पर्यंत नवीन संविधान तयार करणे तसेच १९८० मध्ये घेण्यात यावयाच्या सार्वत्रिक व अध्यक्षीय निवडणुका यांसंबंधीच्या तरतुदींचा समावेश होता. अध्यक्ष फ्रांथीस्को बर्मूदेस यांना ते जरी लष्करी सेवेतून निवृत्त होत असले, तरी अध्यक्षपदावर राहण्याविषयी सांगण्यात आले. लोकशाहीच्या मार्गांवर वाटचाल करण्याच्या दृष्टीने देशात लादलेली १४ महिन्यांची आणीबाणी ऑगस्ट १९७७ मध्ये, तर वृत्तपत्रांवरील अभ्यवेक्षणाची सक्ती नोव्हेंबर १९७७ मध्ये उठविण्यात आली. जानेवारी १९७८ मध्ये पंतप्रधानावर जन. ऑस्कर मोलीना पॅलोशिआ यांची नियुक्ती करण्यात आली. १ फेब्रुवारी १९७९ रोजी पॅलोशिआ पंतप्रधानपदावरून निवृत्त झाले व त्यांच्या जागी जन. पेद्रो रिश्तर प्रादा यांची नियुक्ती करण्यात आली.
राजकीय स्थिती : १९६८ पूर्वी पेरू लोकसत्ताक गणराज्य होते व राष्ट्राध्यक्ष हा सर्वसत्ताधीश होता. ही राज्यघटना १९३३ सालची होती व तत्पूर्वी एकूण १० राज्यघटना होऊन गेल्या होत्या. प्रतिनिधिमंडळ (चेंबर ऑफ डेप्यूटीज) व राज्यमंडळ (सीनेट) अशी द्विसदनी संसद (काँग्रेस) होती व त्यांत अनुक्रमे १४० व ४० सदस्य होते. राष्ट्रपतीबरोबरच सदस्यांची सहा वर्षांकरिता निवडणूक होत असे. एकूण देशाचे २३ विभाग असून त्यांवरील विभागप्रमुख राष्ट्रपती मंत्रिमंडाळाच्या सल्ल्याने नेमत असे. विभाग १४९ प्रांतांमध्ये व प्रांत १,६७२ जिल्ह्यांमध्ये विभागलेले होते. यांवरील प्रमुख अधिकारीही सरकारनियुक्त असत. न्यायखात्यामधील अत्युच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या उमेदवारांच्या यादीतून संसद निवडत असे. सर्वोच्च न्यायालय लीमा येथे आहे. याशिवाय विभागीय न्यायालये व प्रांतिक न्यायालये असून शहरांमध्ये छोटी न्यायालये आहेत.
आंतरराष्ट्रीय राजकीय पक्षांवर १९३३ च्या घटनेने बंदी घातलेली होती. अशा पक्षांच्या सदस्यांना कोणत्याही सार्वजनिक पदावर जाता येत नसे. १९६८ साली लष्कराने मुलकी सत्ता नष्ट करून ती आपल्या ताब्यात घेतली. सध्या ( १९७९ ) घटना रद्द करण्यात आली असून संसद बरखास्त करण्यात आली आहे. न्यायव्यवस्थादेखील नव्याने संघटित करण्यात आली आहे. आर्थिक स्वयंपूर्णता हे नव्या सत्तेचे मुख्य उद्दिष्ट आहे, पेट्रोलियम खाणींचे राष्ट्रीयकरण, शेतीसुधारणा, जलसंपत्तीचे राष्ट्रीयीकरण, खाणविषयक कायदा, उद्योगविषयक कायदा व बँकांचे राष्ट्रीयीकरण हे नवीन सरकारने हाती घेतलेले प्रमुख कार्यक्रम होत.
२० ते २५ वर्षांमधील नागरिकांना २ वर्षांची लष्करी नोकरी सक्तीची आहे परंतु या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. पेरूचे खडे सैन्य ३२,००० आहे. देशात सात लष्करी विभाग असून लहानसे हवाईदल व नौदलही आहे. कायाओजवळ नाविक प्रशाला असून, तिच्यासमोरच सान लोरेंसो बेटावर पाणबुड्यांचा तळ आहे.
आर्थिक स्थिती : पेरूच्या आर्थिक स्थितीवर त्याच्या भौगोलिक विभाजनाचा जबरदस्त परिणाम झालेला आहे. सबंध देशाचा विचार करता पेरू देश गरीब व मागासलेला आहे परंतु किनारपट्टीस हे विधान लागू पडत नाही.
देशाचे आर्थिक जीवन अद्याप शेतीप्रधानच आहे. कामकारी वर्गापैकी ५० % लोक १९६१ मध्ये शेतीव्यवसायात होते तथापि देशातील २ टक्के जमीनच शेतीखाली होती. निर्मितिउद्योग वाढत आहेत पण लॅटिन अमेरिकेतील मोठ्या देशांच्या मानाने ते फारसे उल्लेखनीय नाहीत. हा देश मासेमारी व माशांच्या कुटीच्या उत्पादनात जगात आघाडीवर आहे.
पेरूच्या तिन्ही प्राकृतिक विभागांत शेतीची बरीच वाढ करता येईल परंतु ती करण्यास लागणारे भांडवल देशाजवळ नाही. रासायनिक उद्योग नसल्याने खतांचे उत्पादन करता येत नाही, पोलादाच्या अभावी यांत्रिक उद्योग नाहीत, म्हणून या गोष्टी आयात कराव्या लागतात आणि आर्थिक ताण वाढतो.
किनारपट्टीवरील मरुभूमीत पाणी खेळविल्याने तेथील जमिनीत ऊस व कापूस मोठ्या प्रमाणात पिकतात. लांब धाग्याचा ‘तँग्विस’ नावाचा मुलायम कापूस हे पेरूचे वैशिष्ट्य होय. स्थानिक व परकीय लोकांच्या मालकीचे मोठमोठे मळे या भागात आहेत. येथे तांदूळही खूप पिकतो आणि दक्षिण भागात द्राक्षे, अननस व ऑलिव्ह ही फळे भरपूर होतात.
याउलट डोंगराळ भागातील शेती लहान तुकड्यांत वाटलेली असून ती इंडियन जमातींच्या मालकीची आहे. हे लोक पेरणी मात्र सामुदायिक पद्धतीने करतात. ही बटाट्याची मूळ जन्मभूमी असून त्याबरोबरच येथे बार्ली व किनोआ नावाचे नाचणीसारखे धान्य खूप पिकते. जंतुनाशकांस उपयोगी बार्बास्को व कोकेनकरिता लागणारे कोका या वनस्पती पूर्व भागात निपजतात. पेरूची कृषिअर्थव्यवस्था विविधस्वरूपी आहे. प्रमुख पिके ऊस, बटाटे, मका, तांदूळ, इतर धान्ये, कापूस व कॉफी अशी आहेत. १९७७ च्या सुमारास कायद्यानुसार मालकी गमावलेल्या १०५ लक्ष हे. जमिनीपैकी ७० लक्ष हे. जमीन सहकारी कृषिसंस्थांच्या ताब्यात देण्यात आली. पेरू देश अवर्षणप्रवण असल्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात जलसिंचन कार्यक्रम हाती घेतला आहे. १९८० च्या सुमारास १.१८ लक्ष हे. जमीन पाण्याखाली येईल अशी अपेक्षा आहे. १९७६ मध्ये पेरूचे कृषिउत्पादन ३.३ % नी वाढले. त्यामुळे १५ % अन्नधान्याची आयात कमी करणे शक्य झाले. १९७६ मधील प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते: ( आकडे हजार मे. टनांत ) : साखर : ८,७९२ बटाटे : १,६६७ मका : ७२६ भात : ५७० बार्ली : १५० गहू : १२७ कापूस : १६५ कॉफी :६५ सफरचंदे : ८० संत्री : २५७ लिंबू जातीची फळे : ९६.
दक्षिणेकडील डोंगराळ भागात मुख्यत: गाई, बैल व मेंढ्यांची निपज होते. उंट जातीचे पण आकाराने लहान असे लामा, अल्पाका व त्यांची मिश्रसंतती उंचावरील थंड प्रदेशात आढळते. हे सर्व पशुधन पेरूच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे अंग आहे. लामा, आल्पाका व व्हिकुना यांची लोकर परकीय चलनार्जनात महत्त्वाची भर टाकते. १९७६ मध्ये देशात खालीलप्रमाणे पशुधन होते: ( आकडे लक्षांमध्ये ) : मेंढ्या : १७४.५३ गुरे : ४२.७० घोडे : १३ . २७ डुकरे : २१.४२ बकऱ्या: २०.२१ आणि कोंबड्या २५०.
पेरूच्या पूर्व प्रदेशात अपार वनसंपत्ती आहे, परंतु दळणवळणाच्या अपुरेपणामुळे अद्यापि तिचा म्हणावा तेवढा उपयोग करण्यात आलेला नाही. सीडार, मॉहॉगनी व वॉलनट या वृक्षांपासून व्यापारी उत्पादन योजना आखण्यात येत आहेत. मऊ लाकडापासून कागदउत्पादनास नव्यानेच प्रारंभ झाला आहे.
खनिज संपत्तीबद्दल पेरूची ख्याती आहे. बिस्मथच्या उत्पादनात पेरू सर्व जगात अग्रेसर आहे. चांदीच्या उत्पादनात त्याचा तिसरा, तर तांब्याच्या उत्पादनात पाचवा क्रमांक लागतो. शिसे, जस्त,लोखंड, सोने या खनिजांचे उत्पादन येथे होते. पेरूतील खाणी ३,००० ते ४,५०० मी. उंचीवर असून एक खाण तर ५,१०० मी. वर आहे. देशातील एकूण खनिज उत्पादनापैकी ५० % हून अधिक उत्पादनावर शासानाचे नियंत्रण आहे. १९७७ मध्ये तांब्याच्या निर्यातीचे प्रमाण ४ लक्ष टनांवर पोहोचले.
खनिज तेल हे पेरूचे महत्त्वाचे उत्पन्न परंतु उत्तरेकडील तीन प्रमुख खाणींचे उत्पादन कमी होत आहे आणि ज्ञात तेलसाठा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर्वेकडील ॲमेझॉन खोऱ्यातील काही भागांत तेलसाठ्यांची शक्यता दिसल्याने त्या प्रदेशात संशोधन सुरू आहे. ७,७०० लक्ष बॅरल अशुद्ध तेलाचे साठे देशात असून पेट्रोलियम उद्योग हा ‘पेट्रोपेरू’ या शासकीय निगमाच्या अखत्यारीत आहे. १९७७ मध्ये तेलाचे उत्पादन प्रतिदिनी १,००,९०० बॅरल एवढे होऊ लागले, तथापि देशाची अंतर्गत मागणी प्रतिदिनी १.२० लक्ष बॅरल एवढी असल्याने अधिक उत्पादनाच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. मे १९७७ मध्ये ८५२ किमी. लांबीचे ट्रान्स-अँडियन नॉर-पेरूआनो तेलनळ टाकण्यात आले. हे पूर्णपणे कार्यवाहीत आल्यावर पेट्रोपेरू तेलखाणींमधून ४०,००० बॅरलचे प्रतिदिनी उत्पादन होईल. १९७८ पासून आणखी तेलनळ टाकण्याचे काम चालू असून ते पूर्ण झाल्यावर तेलाबाबत देश स्वयंपूर्ण होण्याची शक्यता आहे. १७ संयंत्रे असलेला व १०० कोटी डॉलर खर्चाचा ‘बायोव्हार’ हा प्रचंड खनिज तेल रसायन प्रकल्प १९८२ मध्ये पूर्ण होऊन कार्यान्वित होईल असा अंदाज आहे.
पेरूतील निर्मितिउद्योग मुख्यत: देशातच खपणाऱ्या उपयुक्त वस्तू तयार करणारे आहेत. कापड उद्योग पेरूतील सर्वांत जुना उद्योग होय. तरीही त्यास आयातकर लादून संरक्षण द्यावे लागतेच. पेरूमध्ये २०० च्यावर कापडगिरण्या व असंख्य हातमाग आहेत. १९७२ मध्ये १६,१०० मोटारींची जुळणी करण्यात आली. १९७५ मध्ये देशात पुढीलप्रमाणे उत्पादन झाले ( आकडे हजार मे. टनांत ) कोळसा : सु. ८५ अशुद्ध तेल : ( १९७६ ) ३,७०८ नैसर्गिक वायू: ( घ.मी. ) ५,५०,००० सिमेंट : १,९३६ लोहखनिज : सु. ५,०६७ कच्चे लोखंड: ३०७ अशोधित पोलाद : ४४३ शिसे : ७० जस्त : ६७ तांबे : ५३ टंगस्टन सांद्रणे : ०.७ सोने : ( औंस ) ८६ चांदी : ( औंस ) सु. ३८,००० मासेकूट : ६८७ खनिज तेलपदार्थ : ५,४७०. संपत्तीचे पुनर्विभाजन करणे आणि अर्थव्यवस्थेचे चार विभागांत संघटन करणे ही शासनाची प्रधान उदिष्टे असून, शासकीय, सामाजिक मालमत्ताविषयक उद्योगधंदे, औद्योगिक गट-समूह असणाऱ्या खाजगी कंपन्या व छोटे व्यवसाय हे ते चार विभाग होत. १९६८ – ७६ च्या दरम्यान शासनाने राष्ट्रीयीकरणाची कास धरली आणि त्या दृष्टीने वाटचाल केली, तथापि १९७६ मध्ये शासनाने उत्पादन घटकांचे पुनर्संघटन करण्याऐवजी मध्यवर्ती व्यवस्थापनावर अधिक भर दिला.
देशातील एकूण श्रमबल ( एकूण लोकसंख्येच्या ३० % ) १९७६ मध्ये अंदाजे ५० लक्ष होते. त्यापैकी ४० % अर्धरोजगार असलेले वा बेकार होते. १९७२ मधील श्रमविभाजन पुढीलप्रमाणे होते : कृषी, पशुपालन व मासेमारी : २० लक्ष निर्मितिउद्योग : ६.११ लक्ष बांधकाम : १.८३ लक्ष खाणकाम : ९८,००० शासन : ३.१७ लक्ष वाणिज्य : ४.७५ लक्ष सेवा : ४.७७ लक्ष. कामगार संघटनांचे सु. २० लक्ष सभासद असून त्यांपैकी कृषिविषयक संघटनांमध्ये १५ लक्ष, तर औद्योगिक संघटनांमध्ये ५ लक्ष सभासद आहेत. ‘कॉन्फेडरेशन जनरल दे त्राबाजादोरेस देल पेरू’ हा प्रमुख कामगार महासंघ असून इतर दोन महासंघ आहेत.
अन्नधंद्यांमध्ये साखर, मासे, मांस, लोणी व चीज, पावरोटी व तेल हे प्रमुख होत. जगातील माशांच्या कुटीच्या एकूण उत्पादनापैकी निम्मे उत्पादन पेरूमध्ये होते आणि या उत्पादनाचा देशाच्या परदेशी हुंडणावळीत २० % हिस्सा आहे. १९७३ मध्ये मत्स्योद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले व ‘पेस्कापेरू’ नावाचा एक सरकारी निगम स्थापण्यात आला तथापि उत्पादनामध्ये विशेष प्रगती दिसून न आल्यामुळे या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण १९७६ मध्ये रद्द करण्यात आले. पेस्कोपेरू निगमाचे अद्यापिही माशाच्या कूटउद्योगावर नियंत्रण आहे. मत्स्योत्पादन प्रतिवर्षी सरासरी १,३०,००,००० टन होते. माशांची कुटी करताना तेल काढण्याचा धंदादेखील चालतो परंतु अप्रगत तंत्रज्ञानामुळे तेल संपूर्णपणे काढले जात नाही. सागरातील असंख्य माशांवर चरणारे अगणित पक्षी पेरूच्या उजाड बेटावर जी विष्ठा टाकतात, तिला ‘ग्वानो’ म्हणतात. जगातील उत्कृष्ट नैसर्गिक खतांत ग्वानोची गणना होत असून हाही पेरूच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे [ → ग्वानो].
अर्थकारण व व्यापार : सोल हे देशाचे चलन असून एक सोल १०० सेतँव्होंमध्ये विभागलेला आहे. ५,१०,२०,२५ व ५० सेतँव्हो आणि १,५ व १० सोल यांची नाणी, तर ५,१०,५०,१००,२००, ५०० व १,००० सोलच्या नोटा वापरात आहेत. डिसेंबर १९७७ पासून विदेश विनिमय दर १ अमेरिकन डॉलर = ११७.०४ सोल व १ पौंड स्टर्लिंग = २१४.३६ सोल असा झाला. देशातील बँकिंग व्यवस्थेवर शासनाचे प्रत्यक्ष नियंत्रण आहे. ‘सेंट्रल रिझर्व्ह बँक’ ही मध्यवर्ती बँक असून तिच्याकडे व ‘बँको दे क्रेदितो’ या खाजगी क्षेत्रातील बँकेकडे परदेशी हुंडणावळ व्यवहाराधिकार आहेत. यांशिवाय शासकीय संस्थांचे सर्व आर्थिक व्यवहार पार पाडणारी नॅशनल बँक, शासकीय उद्योग-व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणारी तसेच खाजगी कंपन्यांना तांत्रिक व आर्थिक साहाय्य करणारा निगम, कृषिविकासार्थ शेतकऱ्यांना कर्जे देणारी बँक, उद्योगांच्या विकासासाठी साह्यकारी बँक, खनिजउद्योगांस अर्थसाहाय्य करणारी बँक इ. बँका आहेत. सात व्यापारी बँका, सहा प्रादेशिक बँका असून १६ परदेशी बँकांच्या शाखा कार्य करीत आहेत. लीमा येथे शेअरबाजार असून देशात १९ विमाकंपन्या आहेत. १९७६ च्या अर्थसंकल्पात महसूल व खर्च अनुक्रमे ११,१३९.७ कोटी सोल व १७,५९३.३ कोटी सोल असून सु. ९० टक्के महसुली उत्पन्न प्राप्तिकर, मालमत्ता कर, आयात-निर्यात शुल्क, उत्पादन व सेवन कर यांपासून, तर सु. १० टक्के इतर बाबींपासून मिळते. खर्चाच्या बाबींमध्ये शिक्षण, संरक्षण, वित्त व व्यापार, सरकारी बांधकाम व विकास, शासन व पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य व कल्याण या गोष्टी येतात. १९७५ पासून पेरूची अर्थव्यवस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटकांमुळे बिघडत गेली व आर्थिक विकास दरात घट येत गेली (१९७४ मध्ये ६.६% , तर १९७६ मध्ये ३%). १९७६ मध्ये चलनवाढीचे प्रमाण फार मोठे म्हणजे ४५ % होते. अंतर्गत बचतपातळीमध्ये झालेली घट, त्याचबरोबर तांब्याच्या जागतिक किंमतीत व अँकोव्ही माशांच्या निर्यातीत झालेली घट या गोष्टी या सर्वाला कारणीभूत होत्या. १९७६ च्या अखेरीस शासनाचे परदेशी कर्ज ४०० कोटी डॉलरचे झाले. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने १९७६-७७ मध्ये विविध प्रकारच्या उपायांचा अवलंब केला.
पेरूच्या निर्यात व्यापारात प्रामुख्याने खनिजे ( तांबे, चांदी, शिसे, जस्त), मासेकूट व इतर पदार्थ, ग्वानो खत, कॉफी, साखर, कापूस, खनिज तेल व तज्जन्य पदार्थ, लोकर आणि इतर वस्तू यांचा अंतर्भाव असतो तर आयात व्यापारात कच्चा माल व उत्पादक पदार्थ, तसेच इंधने व वंगणतेले, भांडवली वस्तू, उपभोग्य वस्तू आणि इतर वस्तू यांचा समावेश होतो. १९७६ सालचा पेरूचा निर्यात व आयात व्यापार अनुक्रमे १२८.१२ कोटी डॉ. व २१०.०० कोटी डॉ. एवढा होता. लॅफ्टा ( लॅटिन अमेरिकन फ्री ट्रेड असोसिएशन ), अँडियन समूह, सेला ( लॅटिन अमेरिकन इकॉनॉमिक सिस्टिम ) आणि इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँक ( आयएडीबी ) यांचा पेरू सदस्य आहे.
वाहतूक व संदेशवहन : १९७२ मध्ये सर्व सार्वजनिक लोहमार्गांचे राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन त्यांचे व्यवस्थापन ‘पेरूव्हियन नॅशनल रेल्वेज’ ( एनाफेर ) कडे सोपविण्यात आले. १९७६ मध्ये सरकारी व खाजगी लोहमार्गांची लांबी अनुक्रमे ३,२९२ किमी. व ५२७ किमी. होती. सेंट्रल. सदर्न व ताक्ना-आरीका असे तीन लोहमार्ग एनाफेरच्या नियंत्रणाखाली येतात. ‘सेंट्रल रेल्वे’ हा ५१३ किमी. लांबीचा जगातील सर्वांत उंचीवरचा ( ४,८१८ मी.) लोहमार्ग समजण्यात येतो. डोंगराळ भागांतील खाणकेंद्रे आणि पूर्व प्रदेशातील मांतारो नदीखोऱ्यातील अन्नधान्यकेंद्रे ही लीमाशी जोडण्याचे महत्वाचे कार्य हा मार्ग करतो. ह्या लोहमार्गांवर ६६ बोगदे व ५९ पूल आहेत. १९७६ मध्ये देशात रस्त्यांची एकूण लांबी ५६,९४० किमी. होती. त्यांपैकी ५,९४९ किमी. डांबरी होते. ‘पॅन अमेरिकन हायवे’ हा एक्वादोरच्या सरहद्दीवरून किनाऱ्याकिनाऱ्याने लीमापर्यंत जातो. ‘ट्रान्स-अँडियन हायवे’ मुळे लीमा व पूकाल्पा ही शहरे जोडलेली आहेत. १९७६ मध्ये देशात २,७८,२६४ मोटारी व १,५६,२९५ व्यापारी वाहने होती. कायाओ ह्या बंदरातूनच पेरूचा बव्हंशी व्यापार चालतो, तथापि उत्तर पेरूमध्ये सालाव्हेरी, पाकाझमायो, पाइता ही बंदरे धरून खोल पाण्याची सात बंदरे आणि दक्षिण पेरूमध्ये सान वॉन ह्या बंदरासहित चार बंदरे आहेत. चींबोते हे जगातील सर्वांत मोठे मासेमारी बंदर समजण्यात येते. १९७६ मध्ये ‘एनापूपेरू’ ह्या शासकीय जहाजवाहतूक संस्थेने बंदरांच्या विकासार्थ २०० कोटी सोलची गुंतवणूक केली त्याचप्रमाणे १९७७ मध्ये किनारी जलवाहतूक व ॲमेझॉन नदीवरील बंदरांचा विकास करण्यासाठी आणखी ९२.८ कोटी सोलची गुंतवणूक केली. व्यापारी तत्त्वावर हवाई वाहतुकीस १९२८ मध्ये प्रारंभ झाला. ‘एरोपेरू’ ही शासकीय अंतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानकंपनी आहे. आणखी चार विमानकंपन्या अंतर्गत हवाई वाहतूक करतात. लीमाजवळील होसे चावेस हा आंतरराष्ट्रीय विमानतळ असला, तरी लीमाजवळच दुसरा एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याची व पहिला विमानतळ अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी वापरण्याची योजना आहे. यांशिवाय देशभर दीडशेवर विमानतळ विखुरलेले आहेत. लूरीन येथे असलेल्या एका भू-उपग्रह संदेशवहन केंद्रामुळे पेरूचा इंटेलसॅट – ३ द्वारा अमेरिकेची संयुक्त संस्थाने व यूरोप यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. १९७५ मध्ये देशात ३,३३,३४६ दूरध्वनी असून एकट्या लीमामध्येच २,४५,७०१ ( सु. ७५ % ) होते. तारमार्गांची लांबी २६,१२१ किमी. होती. नभोवाणी व दूरचित्रवाणी केंद्रे शासनाच्या नियंत्रणाखाली असून सर्व नभोवाणी केंद्रांमध्ये शासनाचा २५ % हिस्सा असतो. १९७३ मध्ये स्थापन झालेल्या ‘टेलेसेंट्रो’ या दूरचित्रवाणीच्या संयुक्त प्रकल्पामध्ये शासनाचे ६६ % भागभांडवल गुंतलेले आहे. देशात १५३ नभोवाणी केंद्रे- पैकी लीमामध्ये २९ – असून ७ दूरचित्रवाणी केंद्रे लीमामध्ये, तर १६ प्रांतांमध्ये ४५ सहक्षेपण केंद्रे होती. १९७६ मध्ये देशात २०.५ लक्ष रेडिओ संच व ५ लक्ष दूरचित्रवाणी संच होते. लीमामध्ये १० दैनिके असून त्यांपैकी ला क्रॉनिका, ओजो, एक्स्ट्रॉ (एक्स्प्रेसोचे सायंदैनिक), अल्तिमा होरा (सायंदैनिक), एक्स्प्रेसो यांचा खप लाखावर असून ला प्रेन्सा व एल कोमर्सिओ ह वृत्तपत्रेही महत्त्वाची आहेत. देशातील इतर शहरांतून २८ दैनिके प्रसिद्ध होतात. नियतकालिकांपैकी द अँडिअन रिपोर्ट, इकॉनॉमिस्टा पेरूआना, एकॉस. इंडस्ट्रियल पेरूआना, लीमा टाइम्स, ला व्हिदा ॲग्रिकोला इ. प्रसिद्ध आहेत.
लोक व सामाजजीवन :पेरूमध्ये गोरे लोक सु. १२ % आहेत. साधारणत: इंडियन लोक लहानलहान खेड्यांतून अलगअलग राहतात. बहुतेक निरक्षर आहेत. यांत शुद्ध इंडियन ५० % व मिश्रवंशीय ४० % आहेत. इंडियन जमातींत ‘केचुआ’ व ‘आयमारा’ या जमाती मुख्य असून त्यांची वस्ती अँडीज पर्वतराजीतील उंच पठारांवर आढळते. त्यांपैकी काही लोकांनी पाश्चात्य संस्कृती आत्मसात केली आहे पण बऱ्याच जमाती अद्यापि पारंपरिक पद्धतीने राहतात. जवळजवळ १०० जमाती ज्ञात असून त्यांपैकी २५ जमातींची माहिती मिळते. त्या सर्व माँटॅनाच्या जंगलात राहतात. त्यांचा शहरी लोकांशी क्वचित संपर्क येतो.
येथील लोकांची घरे मातीची व दगडांची असून छपरे धाब्याची असतात. मोठमोठी कुटुंबे एकत्र राहतात. घरांस खिडक्या क्वचितच असतात आणि एखादे कातडे टांगून दरवाजाचे काम भागते. काही घरे ताडांच्या पानांनी शाकारलेली असतात.बिछाना म्हणजे लामा किंवा मेंढ्या यांची कातडी. किनारपट्टीवरील लोकांचा तांदूळ, मका, कडधान्ये आणि केळी, आंबे व अंजिरे यांसारखी फळे तसेच सरडे, डुकरे, कोंबडी इ. प्राण्यांचे मांस, मासे हा आहार आहे. आहारात हे लोक तिखट खूप वापरतात आणि पाण्याऐवजी ‘चिचा’ नावाची मक्यापासून केलेली दारू पितात. डोंगराळ मुलखातील लोक मुख्यत: बटाटा आणि ओकास नावाची वनस्पती यांवर उदरनिर्वाह करतात. त्यांच्या आहारात मांस फार कमी असते. मात्र बार्ली व मका यांसारखी धान्येही ते वापरतात. सपाट मैदानात राहणाऱ्या लोकांचामांस व मासे हा मुख्य आहार आहे. मांसाहारात माकडे, हरिणे, काही जातींचे साप आणि नाना तर्हांचे पक्षी यांचा समावेश होतो. शहरांतील लोक विजार व शर्ट किंवा बुशशर्ट वापरतात. यांशिवाय इंडियन लोकांत ‘पोंचो’ हा ब्लँकेटसारखा कपडा वापरण्याची पद्धत आहे. त्यांच्या बायका नाना रंगांची कलाबतू केलेली परकर-पोलकी वापरतात व अंगावर शाली पांघरतात.
कॅथलिक पंथाचे सर्व सणवार देशभर पाळले जातात. कारण ९० टक्क्यांहून अधिक लोक ह्या धर्माचे आहेत. अल्पसंख्यांक प्रॉटेस्टंट आहेत. १९३३ च्या संविधानानुसार कॅथलिक चर्चला शासनाचे संपूर्ण संरक्षण व प्रसंगोपात्त आर्थिक मदत मिळते. चर्च व शासन यांमधील संबंध एका करारानुसार चालतात. धार्मिक आचारविचारांत जुन्या इंडियन रिवाजांची सरमिसळ झालेली आहे.
सामाजिक विमा हा सक्तीचा असून त्यानुसार आजार, अपंगत्व व वार्धक्य लाभ मिळू शकतात. कामगार व पगारदार यांच्याकरिता वेगवेगळ्या पद्धती आहेत. १९७४ मध्ये जारी करण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षांतर्गत निवृत्तिवेतनाच्या कायद्यान्वये सर्व कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतनाची एक पद्धत ठरविण्यात आली आहे. १९७५ मध्ये देशात १८२ रूग्णालये व ३३,३५० खाटा ९,४४५ डॉक्टर,२,११९ प्रसूतितज्ञ, ११५ औषधविक्रेते व ८,९२० प्रशिक्षित परिचारिका होत्या. साथीच्या रोगांमध्ये लक्षणीय घट, स्वच्छताविषयक सोयींची उपलब्धता व वैद्यकीय सुविधा यांमध्ये पेरूने पुष्कळच प्रगती केली आहे. गृहनिर्माणाबाबतही देशापुढे मोठी समस्या आहे. १९६२ मध्ये शासनाने स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय गृहनिवसन बँके’ कडून शासकीय क्षेत्रातील सर्व संस्थांच्या गृहनिर्माणप्रकल्पांना अर्थसाहाय्य मिळते. कमी खर्चाच्या खाजगी संस्थांच्या घरबांधणी प्रकल्पांना व योजनांसही ही बँक कर्जे देते. १९७० मध्ये भूकंपपीडित क्षेत्रातील गृहनिवसन योजनांसाठी शासनाला संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाकडून २.१० लक्ष डॉलरचे साहाय्य मिळाले.
भाषा व साहित्य : पेरूच्या अधिकृत भाषा स्पॅनिश व केचुआ ह्या आहेत परंतु अनेक इंडियन आपापल्या जुन्या बोली भाषा बोलतात. पेरूतील लेखकांनी स्पॅनिश भाषा समृद्ध बनविली आहे. काव्य, नाट्य, कादंबरी, निबंध, ललितकला इ. सर्व क्षेत्रांत अनेक नामवंत पेरूव्हियनांनी मान्यता मिळविलेली आहे. रिकार्दो पाल्मा (१८३३ – १९१९) पेरूच्या सर्वोत्कृष्ट लेखकांपैकी एक मानला जातो. तो टीकाकार आणि इतिहासकार म्हणूनही प्रसिद्ध होता. होसे सांतोस चोकानो (१८७५ – १९३४), व्हायेहो थेसार (१८९५ – १९३८) हे नामांकित कवी व्हेंतूरा गार्थीआ काल्देरॉन (१८६६ – १९५९), सीरो आलेग्रीआ (१९०९ – ६७) हे प्रसिद्ध लेखक व कांदबरीकार म्हणून विख्यात आहेत. इका साम्राज्याचा वैभवशाली भूतकाळ व इंडियन जमातींची करुण सद्य:स्थिती हे लेखकांचे स्फूर्तिविषय होत. डॉ. हूल्यो तेल्लो (१८६० – १९४७) हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पुरातत्त्ववेत्ता, तर फ्रांथीस्को गार्थीआ काल्देरॉन (१८८३ – १९५३) व हॉर्हे बासाद्रे (१९०३- ) हे ख्यातनाम इतिहासकार होत. होसे सॅबोगाल (१८८८- ), युलिआ कोदेसिदो (१८९३- ), फर्नांदो दे सिसलो (१९२५- ) हे उल्लेखनीय चित्रकार होत.
शिक्षण : १९६८ मध्ये जारी करण्यात आलेल्या शैक्षणिक सुधारणांनुसार देशातील शिक्षणपद्धती त्रिस्तरीय करण्यात आली. पहिल्या स्तरामध्ये सहा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना बालोद्यान वा शिशुविहार संस्थांमध्ये पाठविले जाते. दुसऱ्या स्तरावर मूलभूत शिक्षण असून ते ६ ते १५ वर्षे वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीचे करण्यात आले आहे. तथापि त्याची अंमलबजावणी करणे, विशेषत:ग्रामीण भागात, कठीण जाते. यापुढील शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण. हे विद्यापीठपूर्व व विद्यापीठीय शिक्षण होय. यूनेस्कोच्या मदतीने अधिकृत स्पॅनिश व स्थानिक बोलीभाषा यांतून शिकवू शकतील असे शिक्षक तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १९७६ मध्ये देशात पुढीलप्रमाणे शैक्षणिक सुविधा होत्या : बालोद्याने २,३४५,विद्यार्थी १,९१,१२३ व शिक्षक ५,००९ प्राथमिक शाळा २०,२८३,विद्यार्थी ३०,७९,३०७, शिक्षक ७७,४४८ माध्यामिक शाळा २,१६०, विद्यार्थी ११,०२,३०३, शिक्षक ४०,५७५ उच्च माध्यमिक शाळा ५७, विद्यार्थी २९,७६८, शिक्षक १,३५७ विद्यापीठे ३३, विद्यार्थी १,८३,२३३ व शिक्षक ११,५००. यांशिवाय लीमातील कॅथलिक विद्यापाठ चर्चतर्फे चालविले जाते. लीमातील सान मार्कोस विद्यापीठ हे जगप्रसिद्ध असून दक्षिण अमेरिकेतील सर्वांत जुने आहे ( १५५१ ). केंद्रीय शिक्षण खात्याचे शैक्षणिक पद्धतीवर नियंत्रण असूनसुद्धा अनेक संस्था कॅथलिक धर्मपीठाने चालविल्या आहेत. १९७५ मध्ये देशातील साक्षरतेचे प्रमाण ६८ टक्के होते. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणारीही काही विद्यालये आहेत. पेरूतील राष्ट्रीय ग्रंथालय दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखिते आहेत. याशिवाय राष्ट्रीय अभिलेखागार व राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय ही जगप्रसिद्ध असून इंका व त्यापूर्वीच्या संस्कृतींचे अनेक अवशेष त्यांत ठेवले आहेत. यांशिवाय ललित कलांचे संग्रहालय व इतर दोन संग्रहालये प्रसिद्ध आहेत.
कला व क्रीडा : यूरोपीयांचा येथे प्रवेश होण्यापूर्वी शेकडो वर्षे अगोदर इंका इंडियन हे स्थापत्य व शिल्प यांमध्ये प्रगत होते. त्यांनी बांधलेल्या भव्य इमारतींचे व शिल्पांचे अवशेष अद्यापही आढळतात.एतद्देशीय लोक मातीच्या व धातूंच्या आकर्षक वस्तू बनविण्यात आणि रंगीबेरंगी कपडे विणण्यात वाकबगार होते. तीच परंपरा अद्यापही इंडियनांमध्ये आढळते. त्यांत स्पॅनिश लोकांमुळे पाश्चात्य संस्कृतीची भर पडली आहे.
शहरांत टेनिस, मुष्टियुद्ध व कुस्त्या हे खेळ लोकप्रिय असून लीमामध्ये बैलझोंबीची दोन मैदाने आहेत. तथापि सामान्य लोकांत कोंबड्यांची झुंज, फुटबॉल, व्हॉलिबॉल, घोड्यांच्या शर्यती हे खेळ अधिक आवडते आहेत.
महत्त्वाची स्थळे : पेरूमधील कूस्को व माचू पीक्चूतील इंका अवशेष ही मोठी आकर्षणे आहेत. दुर्गम पर्वतांत लुप्त झालेले माचू पीक्चू शहर १९११ मध्ये ज्ञात झाले. लीमा या राजधानीच्या शहरात स्पेनच्या साम्राज्याचे वैभव पहावयास सापडते. देशातील पर्वतराजींमधील मनोहारी सृष्टिसौंदर्य तसेच ३,८५० मी. उंचीवरील तितिकाका सरोवर या गोष्टी पर्यटकांना आकृष्ट करून घेतात. १९७६ साली देशाला २,६४,०१५ पर्यटकांनी भेट दिली.
स्पॅनिश साम्राज्यकालीन वास्तुशिल्पे, फिकट पांढऱ्या रंगाच्या ‘सिलार’ नावाच्या दगडांनी बांधलेल्या इमारतींमुळे शहराला पडलेले ‘श्वेतनगर’ हे नाव व मोहक सृष्टीसौंदर्य यांकरिता आरेकीपा (लोकसंख्या ३,०४,६५३ – १९७२) प्रसिद्ध आहे. इंकाकालीन वास्तूंकरिता प्रसिद्ध असलेले कूस्को शहर (१,२०, ८८१) कायाओ (२,९६,२२०) हे देशाचे प्रमुख बंदर त्रूहीयो (२,४१,८८२) हे औद्योगिक व व्यापारी केंद्र असून इंकापूर्व भग्नावशेषांसाठी प्रसिद्ध आहे. चींबोते (१,५९,०४५) हे जगातील सर्वांत मोठे मच्छीमारी बंदर समजले जाते. प्यूरा (१,२६, ७०२) हे शेतमालाचे मोठे केंद्र आहे. वांकायो (१,१५,६९३) ही देशातील शेतमालाची एक मोठी बाजारपेठ असून इंडियनांच्या वस्त्रोद्योगांसाठी तसेच वसाहतकालीन आकर्षक वास्तुशिल्पांसाठी विख्यात आहे.ईकीटॉस (१,११,३२७) हे ॲमेझॉन नदीवरील महत्त्वाचे बंदर असून ते नदीमुखापासून आत ३,७०० किमी. वर आहे.
पेरूच्या पुरातन संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडत आहेत. खनिज व प्राणिज संपत्तीने समृद्ध असणाऱ्या या देशात अनेक गोष्टींचा तुटवडा भासत आहे. अंतर्गत दळणवळण ही एक महत्त्वाची समस्या असून गृहनिर्माण, आरोग्य, निरक्षरता या महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. (चित्रपत्रे ९, ३८).
संदर्भ :1.Disselhoff, H. D., Trans. Daily Life in Ancient Peru, New York, 1967.
2.Handelman H. Struggle in the Andes : Peasant Political Mobilisation in Peru, Austin ( Tex.). 1975
3. Lanning, E. p. Peru Before The Incas, Ontario, 1968.
4. Lockhart, J. M. Spanish Peru, 1532 – 1560, Ontario, 1968.
5. Tullis, F. L. Lord and peasant in Peru, Cambridge, 1970.
फडके, वि. शं. शहाणे, मो. शा. गद्रे, वि. रा. देशपांडे, सु. र.
“