पेरिविंकल : लिटोरिनिडी कुलातील समुद्रकिनाऱ्यावर राहाणाऱ्या गोगलगाईचे हे लौकिक नाव आहे. त्यांचा प्रसार सर्व जगभर आहे. त्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकात, दगडात, भरती-ओहोटीच्या भागात आणि चिखलात आढळतात. उष्ण कटिबंधीय प्रकार कच्छ वनस्पतींच्या आधारमुळांवर राहतात. त्यांच्या सु. ८० जाती (काहींच्या मते शेकडो) असून त्या मुख्यत: शाकाहारी आहेत. त्यांपैकी १० पश्चिम अटलांटिक किनाऱ्यावर आढळतात. सामान्य पेरिविंकल (लिटोरिना लिटोरिया) उत्तर यूरोप व ईशान्य उत्तर अमेरिकेत खडकाळ किनाऱ्यावर विपुल आढळतो. त्याचे कवच जड, थबकडे (बसकट), भोवऱ्यांसारखे असून त्याला सहा किंवा सात वेढे असतात. तसेच ते अणकुचिदार टोकाचे असते व त्याचे छिद्र गोल असते. त्याचा रंग तपकिरी ऑलिव्ह किंवा जवळजवळ काळा असतो व कवचाची उंची १.२५ सेमी. ते २.५ सेंमी. पेक्षा जास्त असते. तो शैवले व इतर सागरी वनस्पतींवर आणि मृदुकाय (मॉलस्क) व कवचधारी (क्रस्टेशइयन) यांसारख्या लहान अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांवर उपजीविका करतो.
पूर्वी पेरिविंकला अन्न म्हणून महत्त्व होते. विशेषत: ब्रिटिश बेटे, फ्रान्स व नेदर्लंड्स येथील गरीबांचे ते अन्न होते. १८५८ पासून त्यांचा मिष्टान्न म्हणून उपयोग होऊ लागला आणि अजूनही त्यांचा खप भरपूर होतो. यूरोपात समुद्रकिनाऱ्यावरील शहरांत फेरीवाले पोरिविंकल विकताना आढळतात. फ्रान्समध्ये ते सामान्यत: खूप मीठ घातलेल्या थोड्या पाण्यात उकडून घेतात. नंतर मांसाचे ‘पेरिविंकल सूप’ बनवितात, लोण्याबरोबर खातात किंवा विविध प्रकारचे सॉस बनवितात. तसेच ते विस्तवावर भाजूनही खातात.
जमदाडे, ज. वि.
“