पेप्सू : पंजाबातील संस्थानांचा १५ जुलै १९४८ रोजी स्थापन झालेला एक संघ. क्षेत्रफळ २६,१५६ चौ. किमी. लोकसंख्या ३४,६८,६३१ (१९५१). राजधानी पतियाळा.
पेप्सू हे ‘पतियाळा अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन’ चे संक्षिप्त रूप होय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करण्याच्या धोरणानुसार या संघाची स्थापना होऊन त्यात पंजाबातील पतियाळा, कपुरथळा, मालेरकोटला, नाभा, जींद, फरीदकोट, नालगढ व कालसिया या संस्थानांचा समावेश करण्यात आला. संस्थाने विखुरलेली असल्याने संघात प्रादेशिक सलगता नव्हती. राज्यघटनेप्रमाणे केलेल्या राज्यांच्या ए, बी, सी, डी या गटांपैकी बी गटात या संघाचा समावेश केला होता. १९५६ च्या भाषावर राज्यपुनर्रचनेच्या अंमलबजावणीमुळे पेप्सूचा अंतर्भाव तत्कालीन पंजाब राज्यात करण्यात आला. १९६६ साली पंजाबचे पुन्हा विभाजन होऊन पंजाब व हरयाणा अशी दोन स्वतंत्र राज्ये स्थापन झाल्यावर ही संस्थाने पंजाब राज्यात गेली. या भागातील बहुतेक लोक पंजाबी भाषिक असून त्यांची भारतातील सर्वोत्तम शेतकऱ्यांत व शूर लढवय्यांत गणना होते.
उपाध्ये, मु. कृ. फडके, वि. शं.
“