जाकार्ता : द्‌जाकार्ता. इंडोनेशिया प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ४५,४२,१४६ (१९७१ अंदाजे). हे विषुववृत्ताच्या दक्षिणेस सु. ६७० किमी., जावाच्या वायव्य किनाऱ्यावर, जावा उपसागराला मिळणाऱ्या लीवुंग (चिलीव्हाँग) नदीच्या मुखावर वसले असून राजधानीमुलूख ५७८ चौ. किमी. आहे. येथील तपमान १८·९ से. ते ३७·२ से. व आर्द्रता पुष्कळदा १००% असते.

आधुनिक जाकार्ता येथे पूर्वी जाकार्ता गाव होते. तेथील सुलतानाकडून १६१९ मध्ये यान पीटर्सन कोएन या डच नाविक वसाहतकऱ्याने हे बळाने घेऊन येथे बटेव्हिया नावाचे गाव वसविले. ते नंतर डच ईस्ट इंडिया कंपनीचे ठाणे झाले. १६९९ च्या भूकंपाने बटेव्हियाचे बरेच नुकसान झाले. सिंगापूरच्या वाढीमुळे बटेव्हियाचे महत्त्व कमी झाले परंतु भोवतालच्या कॉफी, सिंकोना आणि रबर यांच्या यशस्वी लागवडीमुळे ते पुन्हा वाढले. नेपोलियनी युद्धांच्या काळात बटेव्हिया अल्पकाळ ब्रिटिशांच्या ताब्यात होते. दुसऱ्या  महायुद्धात ते दोस्त राष्ट्रांनी  लढविले होते, परंतु जपान्यांनी ते घेतले. १९४५ मध्ये डॉ. सूकार्णो यांनी येथून इंडोनेशियाच्या स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताकाची घोषणा केली आणि १९४९ मध्ये ते जाकार्ता नावाने राजधानी म्हणून घोषित झाले.

जुने जाकार्ता म्हणजे आधुनिक जाकार्ताचा ‘जाकार्ता कोट’ हा विभाग होय. तेथे पूर्वी मुख्यतः डच व्यापारी व अधिकारी, त्यांचे इंडोनेशियन नोकर-चाकर व चिनी व्यापारी राहत. चिनी व्यापाऱ्यांना वेगळे काढल्यावर त्यांनी ‘चायना टाउन’ ही आपली वेगळी वस्ती केली. व्यापार पुष्कळसा त्यांच्याच हाती असे. स्वातंत्र्योत्तर काळात परकी राज्यकर्त्यांप्रमाणे बहुतेक चिनी लोकांनाही हाकलून देण्यात आले व तद्देशीय लोक प्रचंड संख्येने शहरात येऊन लोकवस्ती एकदम वाढली.

जुन्या शहरातील १६९५ मधील पोर्तुगीज चर्च, १७०८ मधील गव्हर्नर जनरलचा बंगला यांसारखे काही अवशेष शिल्लक असले, तरी आता शहराचा बराच कायापालट झाला आहे. जुनी लाकडी डच पद्धतीची घरे व तद्देशीयांच्या गवती छपरांच्या झोपड्या अजून दिसत असल्या, तरी नवीन पद्धतीची घरे, प्रशस्त रस्ते, त्यांच्या कडेला वाढणारे वृक्ष, मधूनच जाणारे कालवे, सुंदर बगीचे इत्यादींमुळे नव्या-जुन्याचे मजेदार मिश्रण दिसून येते. रस्त्यांवर हातगाड्या, घोडागाड्या, मोटारी, बस, मिनी बस आणि मुख्य म्हणजे तीनचाकी सायकलरिक्षा अशी सर्व प्रकारची वाहने दिसतात. मोठमोठ्या दुकानांप्रमाणेच रस्त्याच्या कडेला उघड्यावर मांडलेली चित्रविचित्र दुकानेही आहेत. नदी व कालवे यांचा उपयोग वाहतूक, स्नान, कपडे धुणे वगैरे अनेक प्रकारच्या कामांसाठी करण्यात येतो. 

जाकार्तात लोखंडाच्या भट्ट्या, मार्गारीन व साबण यांचे कारखाने, छापखाने, मद्यांचे व कातडी कमावण्याचे कारखाने, लाकूड कापण्याच्या व कापडाच्या गिरण्या आहेत परंतु शहराचे मुख्य महत्त्व देशाच्या राज्यकारभाराचे केंद्र याप्रमाणेच आयात-निर्यात व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून आहे. शहराच्या पूर्वेला ‘तांजुंग प्रीऑक’ विभागात अद्ययावत बंदर निर्माण केलेले आहे. येथून रबर, कोयनेल, चहा, इमारती लाकूड व देशात होणारी इतर उत्पादने गोळा होऊन निर्यात होतात व पक्का माल, यंत्रे, इंधन इ. माल आयात होऊन देशभर वाटला जातो.

शहर व बंदर यांदरम्यान केमाजोरान हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांशी जाकार्ता लोहमार्गांनी व सडकांनी जोडलेले असून टपाल, तारायंत्र, दूरध्वनी, आकाशवाणी इ. संपर्कसाधनांचे ते केंद्र आहे. इंडोनेशिया विद्यापीठाचा महत्त्वाचा भाग जाकार्तात असून इतरही विद्यापीठे आणि अकादमी येथे आहेत.

अध्यक्ष सूकार्णो यांचा इस्तानो मर्डेकाचा राजवाडा, चौदामजली ‘हॉटेल इंडोनेशिया’, आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी बांधलेले बुंग कार्नो क्रीडाकेंद्र, एक लाख प्रेक्षक बसू शकतील असे त्याचे प्रेक्षागार व सेन्यन प्रेक्षागार, एक लाख मुस्लिम एकदम प्रार्थना करू शकतील अशी जगातील सर्वांत मोठी, परंतु अद्याप अपूर्ण असलेली मर्डेका मशीद, अध्यक्षीय निवासासमोरील ३७ मी. उंचीचे पश्चिम इरियन स्मारक आणि वसाहतीच्या शृंखला तोडण्याचे दृश्य दाखविणारे त्यावरील ९ मी. उंचीचे ब्राँझचे शिल्प ही जाकार्ताची खास आकर्षणे आहेत.

कुमठेकर, ज. ब.