जॅकोबाइट पंथ : एक ख्रिस्ती धर्मपंथ. कॉप्ट्स व मोनोफिझाइट्स यांसारखाच पण रोमन कॅथलिक आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स या पंथाशी संबंध नसलेला असा हा एक जुना ख्रिस्ती धर्मपंथ आहे. सुरुवातीस या पंथाचे अनुयायी सिरिया व इराकमध्ये प्रामुख्याने होते. म्हणूनच ‘सिरियन ऑर्थोडॉक्स (वा जॅकोबाइट) चर्च’ या नावानेही हा पंथ ओळखला जातो. या पंथाच्या अनुयायांची जागतिक संख्या सु. २,००,००० आहे. सेंट जेम्स हा आपल्या पंथाचा संस्थापक असल्याचा दावा जरी या पंथाचे लोक करीत असले, तरी सहाव्या शतकातील इडेसाचा बिशप जेकब बॅराडी (४९०–५७८) हाच ह्या पंथाचा संस्थापक असण्याची जास्त शक्यता आहे. सु. ५४३ मध्ये जेकबची तुर्कस्तानात इडेसाचा बिशप म्हणून नेमणूक करण्याबाबत सम्राट जस्टिनियन याची पत्नी राणी थिओडोरा ही मोनोफिझाइट पंथाचीच असल्यामुळे तिने मध्यस्थी केली. त्यानंतर तो मोनोफिझाइट पंथाचा प्रमुख नेता झाला.
इराक, भारत व सिरिया या देशांत ह्या पंथाचे अनुयायी मुख्यत्वे आढळतात. टर्की, लेबानन, जॉर्डन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथेही ते थोड्याफार प्रमाणात आहेत. ह्या पंथाच्या सामूहिक प्रार्थना (लिटर्जी) सिरियाक भाषेत आहेत. अँटिऑकचा पेट्रिआर्क हा त्यांचा प्रमुख. त्याचे वास्तव्य प. सिरियात होम्स येथे असे.
आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला