जलसिंह : हा प्राणी पिन्निपीडिया गणाच्या ओटॅरीइडी कुलातील असून उत्तर अमेरिकेचा पश्चिम भाग, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्या किनारपट्ट्यांवर म्हणजेच पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागराचा दक्षिण भाग आणि दक्षिण हिंदी महासागर यांत आढळतो. यांचे ६ वंश व १२ जाती आहेत. कॅलिफोर्नियातील झॅलोफस कॅलिफोर्निॲनस ही विशेष माहिती असलेली जाती पुष्कळ प्राणिसंग्रहालयांत बाळगलेली असते. स्टेलर जलसिंह (यूमेटोपिअस जूबेटा) ही सगळ्यांत मोठी जाती असून नराची लांबी ३५०–३६० सेंमी. असते.
जलसिंह ⇨सीलांसारखे दिसतात, पण ते अस्सल सील नाहीत. जलसिंहांना लहान पण स्पष्टपणे दिसणारा बाह्य कर्ण असतो, खऱ्या सीलांना तो नसतो. खऱ्या सीलांचे पश्चपक्ष (हालचालींसाठी उपयुक्त असे रुंद व चापट अवयव, फ्लिपर) पुढच्या बाजूला वळू शकत नाहीत जलसिंहांचे वळू शकतात.
जलसिंहाचे शरीर लांब व सडपातळ असते. त्यावर एक अग्र आणि एक पश्च अशा पक्षांच्या दोन जोड्या असतात. पक्ष जाड, मजबूत आणि उपास्थिमय असून वल्ह्यांसारखे असतात. त्यांच्यावर लहान नखर (नख्या) असतात. मागच्या जोडीतील पक्ष पुढच्या बाजूला वळवून त्यांनी शरीराला आधार देता येत असल्यामुळे जमिनीवर चालताना किंवा धावताना या प्राण्याला चारही पक्षांचा उपयोग पायांसारखा करता येतो. पोहण्याकरिता मुख्यतः पुढच्या पक्षांचा उपयोग केला जातो. झॅलोफस कॅलिफोर्निॲनस हा जलसिंह एका तासात १७ किमी. अंतर पोहून जाऊ शकतो. जलसिंहांच्या काही जाती दर वर्षी नियमितपणे दूरवर स्थलांतर करतात.
हे प्राणी दिनचर व रात्रिंचर आहेत. ह्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते, पण घ्राणेंद्रिय व श्रवणेंद्रिय ह्यांची अपुरी वाढ झालेली असते. आपले मजबूत शरीर शत्रूच्या अंगावर झोकून देऊन त्याला सुळ्यांनी फाडून हे शत्रूपासून आपले रक्षण करतात.
शरीराची लांबी १५०–३५० सेंमी. आणि वजन ३४–१,१०० किग्रॅ. असते. नर मादीपेक्षा बराच मोठा असतो. काही जातींचे नर मादीच्या दुप्पट किंवा त्यापेक्षाही मोठे असतात आणि त्यांच्या मानेच्या स्नायूंची अतिशय वाढ झालेली असते. शेपूट आखूड असते. शरीरावरील केस चरबट असून त्यांच्या खाली अगदी बारीक केस असतात. शरीराचा रंग पिवळसर, तांबूस तपकिरी, काळपट किंवा काळा असतो. केसाळ त्वचेखाली चरबीचा बराच जाड थर असतो.
जलसिंह संघचारी (गटागटाने राहणारे) आहेत. विशेषतः प्रजोत्पादनाच्या काळात त्यांचे फार मोठे कळप आढळतात. निवांत उपसागर, तुटक खडकाळ बेटे, समुद्रकिनारा इ. ठिकाणी ते आसरा घेतात. प्रजननक्षेत्रात नर प्रथम येतात आणि ते आपआपली क्षेत्रे निश्चित करतात. नंतर या ठिकाणी माद्या येतात व थोड्याच काळाने त्यांना पिल्ले होतात. या प्राण्यांत बहुपत्नीत्व आढळते. प्रत्येक नराबरोबर ५–४० किंवा त्यांपेक्षाही जास्त माद्या असतात. पुष्कळदा माद्यांची ही संख्या नराचे सामर्थ्य आणि उग्रता अवलंबून असते. गर्भावधी २५०–३६५ दिवसांचा असतो. पिल्लांची काळजी फक्त आई घेते. जन्मल्यानंतर पिल्ले सामान्यतः दोन आठवडे पोहत नाहीत. ती सु. ३-४ महिन्यांची झाल्यावर आई त्यांचे दूध तोडते.
ओटॅरीइडी कुलातील काही जलसिंहांना ‘फर सील’ म्हणतात. यांच्या अंगावरील चरबट बाह्य केसांच्या खाली दाट मऊ केसांचा अथवा ‘फर’चा जाड थर असतो. या फरला बरीच किंमत येत असल्यामुळे तिचा पद्धतशीर व्यापार चालतो. फर सीलांपासून चरबीही मिळते.
जलसिंह आणि फर सील मुख्यतः मासे व स्क्विड यावंर उदरनिर्वाह करतात, पण हे कवचधारी प्राणीही खातात. नर एका दिवसात सु. १८ किग्रॅ. अन्न सहज खाऊ शकतो. पिल्लांना जन्म दिल्यावर माद्या भक्ष्य मिळविण्याकरिता मधूनमधून समुद्रात जातात पण प्रजोत्पादनाच्या काळात नर उपाशीच राहतो.
जोशी, मीनाक्षी.
“