जरदाळू : (हिं. झरदालू, खुबनी इं. ॲप्रिकॉट लॅ. प्रूनस आर्मेनियाका कुल-रोझेसी). सु. ९-१० मी. उंचीचा हा वृक्ष मूळचाचीन व मध्य आशिया येथील असून आर्मेनियामार्गे त्याचा प्रसार भारत, इराण, ईजिप्त व ग्रीस या देशांत झाला. आर्मेनियात तो अनेक वर्षे लागवडीत होता व त्यावरून लॅटिन नावातील जातिवाचक शब्द दिला गेला. अलेक्झांडर द ग्रेट यांच्या कारकीर्दीत त्याचा युरोपात प्रवेश झाला. वायव्य हिमालयात तो भरपूर आढळतो. तो उत्तर भारतात काश्मीर, हिमाचल प्रदेश, कुलू आणि कुमाऊँमध्ये हल्ली लागवडीत आहे. तसेच सिरिया, इराण व इराक येथेही त्याची लागवड आहे. व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची लागवड हल्ली अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, इटली, फ्रान्स, स्पेन इ. प्रदेशांत आढळते. याच्या खोडावरची साल लालसर आणि पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती, ५-९ सेंमी. लांब, टोकदार व दातेरी असतात. देठ प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त). फुले लालसर, एकेकटी, बिनदेठाची असून संरचना गुलाब गणात [(रोझेलीझ] वर्णिल्याप्रमाणे. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे पिकल्यावर पिवळट लालसर, मोठ्या आवळ्याएवढी असतात. त्यांच्यातील गर्द पिवळट लालसर मगज (गर) गोड व खाद्य असतो. आठळीवर एका बाजूस जाड कंगोरा असतो. बीज गर्द तपकिरी व खाद्य असते. सुकी फळे किंवा डबाबंद फळे यांना व्यापारी महत्त्व आहे. मगज व बिया अनेक खाद्यपदार्थांत वापरतात (उदा. मिठाई, आईसक्रिम इ.). बियांचे तेल सौंदर्यप्रसाधने, औषधे व स्वयंपाक यांत वापरतात तसेच दिव्यांत जाळण्यास व केसांना लावण्यासही वापरतात. इंधन व खत म्हणून पेंड उपयुक्त असते. फळांतील मगजात शर्करा, थायामीन, लोह आणि अ जीवनसत्त्व असते एकूण खाद्य भाग ८६ टक्के असतो. आठळीची टरफले सक्रियित (अधिक क्रियाशील केलेल्या) कार्बनाकरिता वापरतात. लाकूड करडे भुरे व त्यावर गर्द तपकिरी कर्बुरण (चित्रविचित्र रंगाच्या आकृती) असते ते मध्यम कठीण असून विविध प्रकारे त्याचा उपयोग करतात
परांडेकर, शं. आ.
जरदाळूला समशीतोष्ण हवामान लागते. थंडीचा कडाका त्याला अपायकारक असतो. सच्छिद्र, सकस, निचऱ्याची गाळवट जमीन याच्या लागवडीस योग्य समजतात. कैशा, न्यू कॅसल, रॉयल, शिप्ली अर्ली व सेंट अँब्रोझा या प्रकारांची लागवड करण्याची शिफारस केली जाते. जंगली जरदाळू किंवा सप्ताळूच्या खुंटावर चांगल्या जरदाळूचे डोळे भरून केलेली कलमे ६-८ मी. अंतरावर लावतात. कलम लावून वर्ष झाल्यावर त्याला आकार देण्याकरिता जमिनीपासून ५०-७५ सेंमी. उंचीवर त्याचा शेंडा छाटतात. खोडाच्या बाजूंकडून फांद्या फुटू देऊन त्याच्या विस्ताराला आकार आणला जातो. राखलेल्या ३-५ फांद्यांची पहिल्या हंगामाच्या अखेरीला छातीइतक्या उंचीवर छाटणी करतात. पुढे तिसऱ्या-चौथ्या वर्षी व नंतर विस्तारात दाटी न होईल अशा प्रकारे फांद्या छाटल्यास विस्ताराच्या मध्यभागी सुर्यप्रकाश मिळून शुंडिका येऊन त्यांच्यावर फुलांचा बहार येतो. झाडांवर फळे दाट लागतात. चांगली पोसली जाऊन मोठी व्हावी म्हणून ती विरळ करतात. लागवडीनंतर ४-५ वर्षांनी फळे येऊ लागून पुढे ३०-३५ वर्षांपर्यंत ती येत रहातात. पक्व फळे खातात आणि काही वाळवितात. वाळविलेले जरदाळू अफगाणिस्तानातून भारतात येतात.
चौधरी, रा. मो.
जरदाळूवरील रोगांमध्ये खैरा किंवा डिंक्या हा एकच रोग महत्त्वाचा आहे. तो स्यूडोमोनस वंशातील सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्याचा प्रादुर्भाव खोडावर, फांद्यांवर व फळांवर आढळून येतो व त्या जागी डिंकासारखा पदार्थ तयार झालेला आढळतो. रोगट भाग कापून नष्ट करतात. या रोगाशिवाय पानावरील ठिपके, तपकिरी तांबेरा इ. लहानसहान रोगही यावर आढळतात.
रुईकर, स. के.
“