जमेका : कॅरिबियन समुद्रातील वेस्ट इंडीज बेटांपैकी एक बेट व ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्र.१७° ४३’ ते १८°३२’ उ. व ७६°११’ ते ७८°२१’ प. क्षेत्रफळ ११,५२५ चौ. किमी. लोकसंख्या १९,७२,१३० (१९७०). याच्या उत्तरेस १४५ किमी. वर क्यूबा, पूर्वेस जमेका खाडी व १९२ किमी. वर हैती व वायव्येस सु. ९६० किमी. वर पनामा असून जमेकाची जास्तीत जास्त लांबी २३१ किमी., रुंदी ३५ ते ८२ किमी. आहे. पेद्रो बॅंक आणि मरॅंट ही निर्मनुष्य बेटे तसेच केमॅन, टूर्क्स व कायकोस ही बेटे जमेकाच्या आधिपत्याखाली आहेत. जमेकाची राजधानी किंग्स्टन आहे.

भूवर्णन : जंगल व पाणी यांचा प्रदेश या अर्थाने मूळ आरावाक इंडियनांनी या बेटांस जमेका नाव दिले. जमेकाचा बहुतेक प्रदेश ज्वालामुखीजन्य डोंगराळ असून ब्ल्यू मौंटन हे सर्वोच्च शिखर २,२५६ मी. उंच आहे. पूर्वपश्चिम पसरलेल्या, अग्निजन्य व चुनखडक यांचे थर असलेल्या डोंगररांगांमधून विस्तीर्ण पठारे, दऱ्याखोरी आढळतात. जमेकाची किनारपट्टी दंतुर असून अनेक आखाते व बंदरे त्यावर आहेत. ब्लॅक, मिनो, कोब्रे वगैरे बऱ्याच नद्या जमेकात असल्या, तरी ब्लॅकशिवाय सर्वच लहान आहेत. बॉक्साइट व जिप्सम यांचे मोठे साठे आहेत. सोने, लोखंड, मँगॅनीज, तांबे, कोबाल्ट, जस्त, शिसे इ. खनिजेही जमेकात आहेत, तथापि यांतील बरीचशी खनिज संपत्ती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नाही. येथील हवामान सागरी व विषुववृत्तीय प्रकारचे आहे. जमेकाच्या किनारपट्टीवर हवामान २४–२७ से. असते. अंतर्भागात उंचीनुरूप हवामानात फरक पडतो. वार्षिक सरासरी पर्जन्य २१२·५ सेंमी. असते. तथापि अधूनमधून येणाऱ्या वादळांचा तडाखा जमेकाला चांगलाच जाणवतो. नैसर्गिक अरण्ये उरलेली नाहीत मात्र उत्तर व ईशान्येस जंगले असून त्यांत बांबू, मॉहॉगनी, पाइन, निलगिरी, सीडार, मोह, रोजवुड इ. वृक्ष आढळतात. रानडुक्कर, सरीसृप आणि अनेक जातींचे पक्षी व बेटावर आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : १४९४ साली या बेटांचा शोध कोलंबसाने लावला. त्याआधी किमान ५०० वर्षांपासून तेथे आरावाक इंडियनांची वस्ती होती. अमेरिकेतील स्पॅनिश साम्राज्याच्या वाटेवर असल्याने सोळाव्या शतकात स्पॅनिशांनी येथे वसाहत स्थापन केली. मूळ इंडियनांची हकालपट्टी करून स्पॅनिशांनी आफ्रिकेतील निग्रो गुलामांची आयात सुरू केली. १६६५ मध्ये जमेका इंग्रजांनी काबीज केले व १६७० मध्ये स्पॅनिशांनी त्यावरील इंग्रजांचा हक्क मान्य केला. स्पेनकडे अमेरिकेची लूट नेणाऱ्या स्पॅनिश जहाजांवर हल्ला करणाऱ्या ब्रिटिश चाच्यांचे हे सुरुवातीला आवडते ठिकाण होते. नंतर येथे ऊस, कोको, कॉफी, केळी इत्यादींच्या लागवडी सुरू झाल्या. १८३४ नंतर गुलामगिरी कायद्याने नष्ट झाली. जमेकातील गुलाम स्वतंत्र झाले. बरेच निग्रो लहान प्रमाणावर डोंगराळ भागात शेती करू लागले, म्हणून ब्रिटिश जमीन-मालकांनी चिनी व भारतीय नोकरांची भरती केली. अमेरिकेचे यादवी युद्ध, जकात, संरक्षणात बदल, निग्रोंच्या दंगली इत्यादींमुळे एकोणिसाव्या शतकात जमेकात अशांतताच होती. शैक्षणिक, आरोग्यविषयक व राजकीय सुधारणांमुळे ही अशांतता कमी झाली, तथापि १९३० ची जागतिक आर्थिक मंदीची लाट जमेकाला चांगलीच जाणवली. त्यातच लोकसंख्येची झपाट्याने झालेली वाढ, केळ्यांच्या लागवडीवरील रोग आणि राजकीय जागृती यांमुळे निर्माण झालेल्या तणावासाठी १९४४ साली येथे स्वायत्त राज्यकारभाराची घटना बनविण्यात आली. १९५८ साली जमेका वेस्ट इंडीज राष्ट्रसमूहात सामील झाले, तथापि १९६१ साली हे त्यातून बाहेर पडले. ६ ऑगस्ट १९६२ रोजी जमेका स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीर झाले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बनविलेल्या नवीन संविधानानुसार जमेका ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. द्विसदनी सभागृहांपैकी सिनेट २१ सदस्यांचे असून त्यांतील १३ पंतप्रधानांच्या व ८ विरोधी पक्षनेत्यांच्या सल्ल्यानुसार गव्हर्नर जनरल नेमतो. ५३ सदस्यांचे लोकसभागृह दर पाच वर्षांनी सार्वत्रिक प्रौढ मतदारांनी निवडलेले असून निवडलेले व निवडून देणारे जमेकाचे किमान १२ महिने रहिवासी असावे लागतात. महान्यायवादीचीही निवड होते व तो मंत्रिमंडळाचा कायदेसल्लागार असतो. बहुमतवाल्या पक्षाचे मंत्रिमंडळ बनते. पंतप्रधानाच्या सल्ल्याने इंग्लंडची राणी जमेकाच्या गव्हर्नर जनरलची नेमणूक करते. पीपल्स नॅशनल पार्टी व जमेका लेबर पार्टी असे दोन राजकीय पक्ष जमेकात असून १९७२ च्या निवडणुकीत पीपल्स नॅशनल पार्टीला बहुमत मिळाले आहे. किंग्स्टन व सेंट अँड्र्यू मिळून महानगरपालिका व १२ पॅरिश कौन्सिल यांच्या द्वारा स्थानिक कारभार चालतो. येथील न्यायव्यवस्था ब्रिटिश पद्धतीवरच आधारलेली आहे. स्वातंत्र्यानंतर संरक्षणाची जबाबदारी जमेकावरच असल्याने येथे लहान प्रमाणावर संरक्षण विभाग कार्य करू लागला असून १९६८ साली त्यात ८२ अधिकारी व २,९२० इतर लोक होते.

आर्थिक व सामाजिक स्थिती : जमेकाचे आर्थिक जीवन केळी, कोको, नारळ, लिंबू गटातील फळे, कॉफी, ऊस, तंबाखू इत्यादींवर अवलंबून आहे. यांपैकी बहुतेक वस्तू निर्यात होतात. त्याबरोबरच साखर, रम व इतर मद्ये, गूळ, खोबरे, डबाबंद फळे, पिर्मटो (जमेका मिरी) इ. वस्तूही जमेकातून मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. अन्न धान्यापैकी जमेकाची ८०% गरज येथेच भागते. बॉक्साइट साठा असणाऱ्यात व उत्पादनात जमेका अग्रेसर असून १९६३ साली जागतिक उत्पादनाच्या २५% बॉक्साइट उत्पादन जमेकात झाले होते. बॉक्साइटशिवाय निर्यातीचे महत्त्वाचे खनिज जिप्सम होय. १९५० पासून कारखान्यांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू असून बॉक्साइट शुद्धीकरण, साखर, कापड, साबण, सिमेंट, तेल शुद्धीकरण, सिगारेटी इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. जमेकाला मत्स्यसंपत्तीचाही मोठा लाभ झाला आहे. जमेकाचा बहुतांशी व्यापार अमेरिका, इंग्लंड व कॅनडा या देशांशी होतो. किंग्स्टन हे महत्त्वाचे बंदर असून २५% माल येथून निर्यात होतो. देशात आणखी १२ महत्त्वाची बंदरे असून माँटीगो बे व पोर्ट अँटोनीओ या बंदरांतून मुख्यतः केळी व साखर तसेच पोर्ट एस्क्वीव्हेल व ओचो रीओस बंदरांतून बॉक्साइट निर्यात होते. किंग्स्टन व माँटीगो बे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून सर्व प्रमुख शहरी विमानतळ आहेत. देशात ३२८ किमी. ची रेल्वे असून ४,११६ किमी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले आहे. १९७२ साली देशात १० टपालकचेऱ्या व १९७३ साली ८१,८४९ दूरध्वनियंत्रे होती. दोन नभोवाणी केंद्रे असून १९७० साली १,००० माणसांमागे १९८ रेडिओ व २२ दूरचित्रवाणीयंत्रे होती. जमेका डॉलर हे येथील अधिकृत चलन असून १९७० साली ते १.२० अमेरिकन डॉलर बरोबर होते.

जमेकाच्या लोकसंख्येपैकी सु. ७६% आफ्रिकी निग्रोवंशीय, १५% निग्रो व यूरोपीय यांचे मिश्रण असलेले, १%चिनी, ३% भारतीय व ०·८ टक्का यूरोपीय वंशाचे आहेत. लोकसंख्येपैकी बहुसंख्य ख्रिस्ती पंथोपपंथांचे असून त्यांखेरीज हिंदू, बौद्ध, मुसलमान, ज्यू हेही आढळतात. भारत व आफ्रिकेतून आलेल्या लोकांमध्ये अद्याप स्मृतिगत रिवाज, श्रद्धा, आचार असले तरी बरीच वर्षे मूळ संस्कृतीपासून तुटल्यामुळे आणि पाश्चात्त्यांशी संबंध आल्यामुळे त्यांच्या सद्यःसंस्कृतीत बदल आढळतो. जमेकाची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. ६ ते १५ वर्षांच्या मुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत आहे. १९६९ साली येथे ७९५ शाळा व ३,५९,९५८ मुले होती. प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव मात्र येथे जाणवतो. किंग्स्टन येथे कृषी, कला व तंत्र यांची विद्यालये आहेत. १९६२ साली किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विद्यापीठ निघाले असून त्याच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये येथे निघाली आहेत.


क्षय, कृमी व गुप्तरोग हे येथील महत्त्वाचे रोग असून शासकीय व खाजगी पातळीवर सामाजिक कल्याणाच्या योजना कार्यान्वित आहेत. जमेकात १९६७ मध्ये १,२५९ डॉक्टर, १६३ दंतवैद्य, ३,७१२ सुइणी व ४,८६९ परिचारिका होत्या.

आरोग्यदायी हवामान, नित्य उत्सवसम वातावरण, अमेरिकेच्या निकटवर्ती स्थान यांमुळे जमेकाला प्रवाशांची ये-जा मोठी आहे. गेल्या काही वर्षांत देशाच्या परदेशी हुंडणावळीपैकी ३८% या प्रवाशांमुळे आलेली होती. १९७२ साली ४,९३,४८८ प्रवाशांनी या बेटास भेट दिली होती. जमेकाच्या लोकसंख्येत भारतवंशीयांचे प्रमाण मोठे असल्याने भारताला जमेकाबाबत जिव्हाळा असणे स्वाभाविक आहे.  

शाह, र. रू.

जमेका डॉक्टर बर्ड (राष्ट्रीय पक्षी) व लिग्नम व्हिटी (राष्ट्रीय फूल), जमेकाजमेकातील ऊस तोडणीकेळी : जमेकातील एक प्रमुख उत्पादनकिंग्स्टन शहराचे विहंगम दृश्य, जमेकाबॉक्साइटच्या खाणीचे दृश्य, जमेका