जमखंडी : भूतपूर्व संस्थानची राजधानी  व कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २९,९८१ (१९७१). हे बेळगावच्या ईशान्येस सु. ११३ किमी., कोल्हापूरच्या पूर्वेस सु. १०९ किमी., विजापूरच्या नैर्ऋत्येस सु. ६५ किमी. आणि कुडची रेल्वे स्थानकापासून सु. ५५ किमी. आहे. येथे अनेक हातमाग असून रेशमी कपड्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. तसेच व्यापार-धंदा, शिक्षण आणि उद्योगधंदे यांच्या एकत्रीकरणामुळे हे भरभराटीस येत आहे. संस्थानी अंमलातील अनेक सुंदर इमारती येथे असून ‘दरबार हॉल’चा वापर महाविद्यालयाचे सभागृह म्हणून करण्यात येतो. उमा-रामेश्वर हे प्रमुख दैवत असून त्याचा वार्षिक उत्सव सहा दिवस चालतो तसेच एप्रिलमध्ये जनावरांचा मोठा उत्सवही भरतो.

कापडी, सुलभा