जपान : औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक. क्षेत्रफळ ३,७७,३८९ चौ.कि.मी. लोकसंख्या (ओकिनावासह) १०,८४,३०,००० (१९७३). विस्तार सु. २४° उ. ते ४६° उ. व १२३° पू. ते १४७पू. राजधानी टोकिओ. आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर ३,४०० बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. या देशातील चार मुख्य बेटांची नावे दक्षिणेकडून उत्तरेकडे अनुक्रमे क्यूशू (४१,९७१ चौ. कि.मी.), शिकोकू (१८,७६४), होन्शू (२,२३,३७७) आणि होक्काइडो (७८,५१०) अशी आहेत. या देशाच्या पश्चिमेस जपानी समुद्र असून त्याची जास्तीत जास्त पूर्व-पश्चिम रुंदी ८८५ किमी. भरते. तो काही जागी ३,००० मी. पर्यंत खोल आहे. या देशाचे नैर्ऋत्य टोक म्हणजे क्यूशू बेटाचा उत्तर किनारा, आशिया खंडाच्या मुख्य भूमीपासून १८७ किमी. अंतरावर असून ते मुख्य भूमीपासून त्सुशिमा आणि कोरिया या सामुद्रधुन्यांमुळे विलग झाले आहे. या देशाच्या दक्षिणेकडे पूर्व चिनी समुद्र आणि पूर्वेस उत्तर पॅसिफिक महासागर आहे. उत्तरेस रशियन मुख्य भूमीपासून होक्काइडो हे बेट २८२ किमी. अंतरावर असून ते रशियाच्याच सॅकालीन व कूरील बेटांच्या दक्षिण टोकांपासून अनुक्रमे ४० किमी. व १८ किमी. अंतरावर आहे. दुसरे महायुद्ध चालू असताना व तत्पूर्वी जपानने मँचुरीया, कोरिया व आग्नेय आशियाचा बराचसा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. पण त्या युद्धात शेवटी या देशास पराभव पतकरावा लागल्याने त्या सर्वांवरील ताबा जपानला सोडून द्यावा लागला. १९६८ मध्ये बोनिन व्हाल्केनो बेटे आणि १९७२ मध्ये रिऊक्यू बेटे (२,३२५ चौ.किमी.) जपानला परत मिळाली.

उपखंड द्विपीय स्थानाचे फायदे व तोटेही जपानला मिळाले आहेत. उदा., सामुद्रधुन्या या कधी कधी खंदकासारख्या उपयुक्त ठरल्या आहेत, तर द्विपकल्पामुळे तुटकपणा जाणवला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सागरीमार्ग पश्चिम यूरोप ते सुएझमार्गे अतिपूर्वेकडे जपानला जातो. तसेच उत्तर अमेरिका व यूरोप येथून जवळच्या उत्तर ध्रुवमार्गाने जाणारी विमाने रशियावरून जपानला जातात.

भूवर्णन : नवजीवन आणि चतुर्थक महाकल्पात पॅसिफीक महासागराभोवतालच्या प्रदेशात भूपृष्ठाच्या हालचाली फार मोठ्या प्रमाणात होऊन महासागराच्या किनाऱ्यास समांतर अशा अनेक वलीपर्वतश्रेण्या तयार झाल्या. यांपैकी काही पर्वतश्रेण्या आशिया खंडाच्या मुख्य भूमीवर आढळतात, तर काही किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर तयार झालेल्या दिसतात. मुख्य भूमीपासून विलग असलेल्या पर्वतश्रेण्यांचा पायथा पॅसिफीक महासागराच्या तळभागावर असून या पर्वतांची उंची सु. ६,०९० ते ९,००० मी. आहे. या पर्वतश्रेण्यांचे महासागराच्या पाण्यावर डोकावणारे माथे म्हणजेच त्या ठिकाणी दिसणारी लहानमोठी बेटे अशीच तयार झालेली असून त्यांच्या व मुख्य भूमीच्या मध्ये जपानी समुद्र आणि पूर्व चिनी समुद्र हे पॅसिफीक महासागराचे भाग आढळतात. जपानच्या पूर्वेकडे महासागराची खोली एकदम वाढत गेली आहे. तेथे ९,००० मी. पेक्षाही जास्त खोलीचे डोह तयार झाले आहेत.

जपान देशाच्या ७५% पृष्ठभाग डोंगराळ आणि पर्वतव्याप्त आहे. जपानची बेटे जगाच्या भूकंपपट्ट्यात येत असल्याने अजूनही तेथे भूपृष्ठाच्या हालचाली होत असतात. या देशात दरवर्षी भूकंपाचे सु. ७,५०० धक्के बसतात. त्यांपैकी १,५०० धक्के मनुष्याला जाणवण्याइतके मोठे असतात, मात्र ४–५ वर्षाच्या कालखंडात एखादा धक्का एवढा मोठा असतो, की त्यामुळे वित्तहानी व प्राणहानी फार मोठ्या प्रमाणावर होते. सप्टेंबर १९२३ मध्ये व डिसेंबर १९४६ मध्ये अशा प्रकारचे मोठे भूकंप जपानमध्ये झाले होते.

भूकंपाचा परिणाम जपानच्या भूरचनेवर झालेला आहे. अनेक ठिकाणी पृष्ठभागावर प्रस्तरभंग रेषा दक्षिणोत्तर गेलेल्या दिसतात. पुष्कळ ठिकाणी विभंगकडे तयार झालेले दिसतात. होन्शू बेटाच्या मध्यभागी दक्षिणोत्तर एक मोठा विभंगद्रोण गेलेला आहे. त्याला ‘फोसा मॅग्ना’ म्हणतात.

जपानमधील भूपृष्ठाच्या हालचालीमुळे काही ठिकाणी जमिनीचे आधोगमन झाले आहे, तर काही ठिकाणी तिचे उद्‌गमन झाले आहे. ज्या ठिकाणी समुद्रकाठचा प्रदेश खाली खचला, तेथे मोठ्या खाड्या किंवा सामुद्रधुन्या तयार झाल्या आहेत. सितौची अंतर्देशीय समुद्र हा अशाच रितीने जमीन खाली खचल्यामुळे तयार झाला असून त्यात अनेक लहानलहान बेटे तयार झालेली आहेत. ज्या ठिकाणी समुद्रकिनारा खाली खचला, त्या ठिकणी नद्यांच्या मुखाशी ‘रिया’ किनारा तयार झालेला दिसतो. तोहोकू जिल्ह्यातील सानूरिक किनारा या दृष्टीने प्रसिद्ध आहे. याउलट टोटोरी, इशिकावा, शोनाई इ. विभागातील समुद्रकिनारा वाळूची भर पडून तयार झाल्याने तेथील वाळूच्या दांड्यांमागे खारकच्छे तयार झाली आहेत.

जपानमध्ये नद्यांनी तयार केलेल्या मैदानांचे दोन प्रकार दृष्टीस पडतात. ज्या भागात नद्यांनी गाळ पसरवून दिला आहे, अशा ठिकाणी गाळाची मैदाने बनली आहेत. ही मैदाने बहुधा समुद्रकाठाजवळ दिसून येतात. अंतर्भागात ज्या ठिकाणी नद्यांनी आपली खोरी तयार केली आहेत, तेथे काही ठिकाणी जमिनीचे उद्‌गमन झाल्याने नद्यांच्या खोऱ्यांत तटमंच निर्माण झाले आहेत.

जपानमध्ये आजपर्यंत अनेक वेळा ज्वालामुखींचे उद्रेक झालेले आहेत. या देशात ज्वालामुखींचा एक पट्टा समुद्रकिनाऱ्याला जवळजवळ समांतर गेला असून दुसरा पट्टा फूजियामा पर्वतापासून ओगासावारा बेटापर्यंत गेलेला आहे. या दोन पट्ट्यांत जागृत व मृत अशी एकूण २६५ ज्वालामुखे आहेत. त्यांपैकी ऐतिहासिक काळात ३० मुखांतून स्फोट झाल्याची नोंद आहे. गेल्या शतकात २० ज्वालामुखांतून स्फोट झाला होता. वर सांगितलेल्या पट्ट्यांत निरनिराळ्या प्रकारची व आकाराची ज्वालामुखे व त्यांमुळे तयार झालेले शंक्वाकृती पर्वत आढळतात. या ज्वालामुखांभोवती लाव्हारसाचे व राखेचे मोठमोठाले ढीग साचलेले आहेत.

जपानमधील बरेचसे ज्वालामुखी देशाच्या अंतर्भागातील पर्वतप्रदेशात आढळतात. मध्य होन्शूमध्ये फोसा मॅग्नाजवळच अनेक लहानमोठी ज्वालामुखे असून जपानी लोक ज्यास अत्यंत पवित्र मानतात तो फूजियामा पर्वत (३,७७६ मी.) तेथेच आहे. जपानमधील सर्वांत उंच पर्वतशिखर तेच होय. ओंटाके (३,०६३ मी.), नोरीकूरा (३,०२६ मी.), हाकसान (२,७०२ मी.) इ. महत्त्वाची ज्वालामुखे पर्वतांतच तयार झाली असून यात्सुगातके (२,८९९ मी.) आणि तैसेन (१,७१३ मी.) सारखी काही ज्वालामुखे सखल भागात तयार झाली आहेत. या देशात गरम पाण्याचे अनेक झरेही दिसून येतात. जपानमध्ये खनिज पाण्याचे एकूण १,२०० झरे असून त्यांपैकी ७०० गरम पाण्याचे आहेत.

भूपृष्ठाची घडण, भूहालचाली व हवामान या तिन्ही गोष्टींचा परिणाम जपानच्या भूरचनेवर झालेला आहे. अनेक द्विपकल्पांचा व बेटांचा मिळून या देशाचा ७५% पृष्ठभाग पर्वतमय व डोंगराळ आहे. या डोंगराळ भागातील चढउतारांचे प्रमाण १५° पेक्षा अधिक आहे. जपानमधील फक्त १५ टक्के भूभाग सपाट व मैदानी आहे.


जपानच्या उत्तरेस असलेल्या रशियाच्या सॅकालीन व कूरील या बेटांतील पर्वतश्रेण्या त्यांच्या दक्षिणेस असलेल्या होक्काइडो या बेटात विस्तारलेल्या आढळतात. याच दोन पर्वतश्रेण्या आणखी दक्षिणेस होन्शू बेटात जाऊन तेथे चुबू नावाने एकत्र मिळालेल्या आहेत. याच पर्वतप्रदेशास जपानी आल्प्स असे म्हटले जाते. या पर्वतप्रदेशाच्या दक्षिणेस पुन्हा या दोन श्रेण्या एकमेकींपासून विलग झाल्या असून, त्यांच्या दरम्यानचा दक्षिणोत्तर खोऱ्याच्या भूप्रदेश खाली खचल्यामुळे तेथे होन्शू व शिकोकू यांदरम्यानचा पूर्वपश्चिम सु. ४३५ किमी. विस्ताराचा जपानचा अंतर्देशीय समुद्र तयार झाला आहे. त्याच्या पश्चिमेस शिमोनोसेकी ही मोक्याची अरुंद सामुद्रधुनी आणि पूर्वेस ओसाका आखातावर ओसाका व कोबे ही प्रसिद्ध मोठी बंदरे आहेत. त्याच्या नैर्ऋत्येस या दोन श्रेण्या पुन्हा क्यूशू व शिकोकू या बेटांतून गेलेल्या आढळतात. होन्शू बेटावर मध्यवर्ती पर्वतश्रेणीत बिवा सरोवराजवळ फक्त एक मोठी खिंड आहे. तिच्यातून पश्चिमेकडे जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर जाता येते. यामुळेच त्याच्याजवळ वसलेल्या क्योटो शहराला पूर्वी राजधानीचे वैभव प्राप्त झाले होते.

जपानमध्ये ध्रुवीय किंवा वाळवंटी प्रदेशातील भूमिस्वरूपांखेरीज इतर सर्व प्रकारची भूमिस्वरुपे आढळतात. पर्वतांचे उतार ओबडधोबड आहेत. जलद वाहणाऱ्या नद्यांमुळे पर्वतप्रदेशाची झीज सतत होत असून उताराच्या प्रदेशातून मृदा वाहून जात आहे. जमिनीची धूप ही या भागातील महत्त्वाची समस्या होय. डोंगरांच्या उतरणींवर पायऱ्यापायऱ्यांचा उतार करून ही धूप थांबविणाच्या प्रयत्न सतत चालू असतो.

जपानमध्ये लहानमोठे एकूण ३६ सखल प्रदेश आहेत. त्यात किनारपट्टीवरील मैदानांचा व पर्वतांतर्गत सखल प्रदेशांचा समावेश होतो. या सर्व सखल प्रदेशांचे क्षेत्रफळ ६५,००० चौ. किमी. पेक्षा कमीच म्हणजे देशाच्या क्षेत्रफळाच्या जेमतेम १७·०६% इतके भरेल. या सखल प्रदेशांत खालील मैदानी प्रदेशांचा प्रामुख्याने समावेश होतो : (१) टोकिओ आणि योकोहामा यांच्या परिसरातील कांटो मैदान (पूर्व होन्शू), (२) नागोयाच्या परिसरातील नोबी किंवा नागोय मैदान (पूर्व मध्य होन्शू), (३) जपानच्या अंतर्देशीय समुद्राच्या उत्तरेस पसरलेले कनसाई मैदान. याच मैदानात ओसाका, कोबे आणि क्योटो ही महत्त्वाची औद्योगिक शहरे वसली आहेत. (४) एशिगो किंवा नीईगाता मैदान (वायव्य होन्शू), (५) सेंदाई मैदान (ईशान्य होन्शू), (६) सेत्सू किंवा किनाई मैदान (मध्य होन्शू), (७) इशिकारी–युफुत्सू सखल प्रदेश (होक्काइडो), (८) सूकुशी सखल मैदान (उत्तर क्यूशू).

वरील सर्व मैदाने नद्यांनी तयार केलेली असून ती सुद्धा अगदी सपाट नाहीत. काही ठिकाणी तर उद्‌गमनामुळे उंचावलेल्या व त्यानंतर तयार झालेल्या अशा दोन पातळ्यांवरील सपाट प्रदेश दिसून येतात. किनारपट्टीतील मैदानांवर सागरी लाटांच्या कार्याचा परिणामही झालेला आढळतो. टोकिओच्या पश्चिमेच्या कुफू द्रोणीसारखे काही पर्वतांतर्गत सपाट प्रदेशही आहेत.

जपानला २७,२०० किमी. लांबीचा किनारा प्राप्त झालेला आहे. या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी लहानमोठ्या खाड्या, आखाते व उपसागर आढळतात. त्यामुळे तेथे असंख्य लहान मोठी बंदरे तयार झाली आहेत. जपानचा अंतर्देशीय समुद्र हे देखील एक मोठे नैसर्गिक बंदरच होय. जपानच्या दक्षिण होन्शूच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील टोकिओ, योकोहामा, नागोया व क्युशूच्या पश्चिम किनाऱ्यावरील नागासाकी, कुमामोटो, कागोशिमा यांसारखी अनेक नैसर्गिक बंदरे तयार झाली असून, तेथे मासेमारीसाठी अनुकूल क्षेत्र तयार झाले आहे.

पण जपानचा सर्वच किनारा काही दंतुर नाही. वाकासा ते तोयामाचा उपसागर वगळल्यास जपानचा बराचसा समुद्रकिनारा सरळ आहे. होन्शू बेटात टोकिओ उपसागराच्या उत्तरेकडचा किनारा सेंदाई मैदानापर्यंत बराचसा सरळ आहे. पुढे मात्र तो पुन्हा तुटक तुटक झालेला आहे. होक्काइडो बेटाचा किनारा काही भाग सोडल्यास बराचसा सरळ आहे. सर्वसाधारणपणे ज्या भागात समुद्रकाठाशी मैदाने तयार झाली आहेत, तेथे किनारा सरळ असून नद्यांच्या मुखाशी वाळूचे दांडे व टेकड्या तयार झाल्या असून त्या समुद्रकिनाऱ्यास समांतर गेलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी जेथे पूर्वी नैसर्गिक सुरक्षित व खोल बंदरे होती, त्या ठिकाणी नद्यांनी त्यांच्या मुखाशी गाळ पसरविल्याने तेथील बंदरे उथळ झाली आहेत. टोकिओ, नागोया व ओसाका ही बंदरे आता अशीच उथळ झाली आहेत. टोकिओ, नागोया व ओसाका ही बंदरे आता अशीच उथळ झाली आहेत. त्यामुळे टोकिओ आणि ओसाका या दोन मोठ्या शहरांना खोल पाण्यासाठी अनुक्रमे योकोहामा आणि कोबे येथील कोल बंदरांवर अवलंबून रहावे लागते. गाळ काढून ही बंदरे खोल केली जात आहेत.

भूरचनेच्या दृष्टीने जपानचे चार प्राकृतिक विभाग पडतात : (१) होक्काइडो बेटांचा मुख्य भाग, (२) ईशान्य विभाग, (३) मध्य विभाग व (४) नैर्ऋत्य विभाग.

(१) होक्काइडो बेटाचा मुख्य भाग : या बेटाचा मध्य भाग पर्वतरांगांनी बनलेला असून या पर्वतप्रदेशाच्या पूर्व भागात काही जागृत ज्वालामुखे आहेत. तेथील काही पठारी भाग राखेने बनलेला असून त्यातून वाहणाऱ्या  नद्यांची खोऱी रुंद आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या दोन पर्वतश्रेण्या ज्या ठिकाणी येऊन मिळतात, तेथे ‘इशिकारी’ मैदान बनलेले आहे.

(२) ईशान्य विभाग : या विभागात होन्शू बेटाचा उत्तर भाग व होक्काइडो बेटाचे नैर्ऋत्य द्वीपकल्प यांचा समावेश होतो. या विभागात दक्षिणोत्तर तीन पर्वतश्रेण्या पसरल्या असून त्यांच्यामध्ये सखल प्रदेश तयार झाले आहेत. पर्वतश्रेण्यांची उंची २,४०० मी. असून मध्यवर्ती पर्वतश्रेण्यांवर अनेक ज्वालामुखे आहेत. पश्चिमेकडे समुद्रकाठावर तीन मैदानी प्रदेश असून येतात. त्यापैकी निगाना मैदान सर्वांत मोठे होय. पूर्वेकडे काही मैदानी भाग असून तो सेंदाई मैदानाचाच एक भाग होय.

(३) मध्य विभाग : तीन पर्वतश्रेण्या या विभागाच्या मध्यभागी येऊन तेथे एक मोठा व उंच (३,००० मी.) पर्वतप्रदेश तयार झाला आहे. त्यालाच जपानी आल्प्स असे म्हणतात. होन्शू बेटाच्या मांडणीची जी सर्वसाधारण दिशा आहे, तिला काटकोन करून या पर्वतप्रदेशातच फोसा मॅग्ना नावाची एक दक्षिणोत्तर खचदरी (विभंगद्रोणी) तयार झाली असून त्यात अनेक ज्वालामुखे आहेत. दरीच्या दक्षिण टोकाशी असलेला फूजियामा हा सर्वांत उंच (३,७७६ मी.) ज्वालामुखी पर्वत होय. पर्वतप्रदेशाच्या पूर्वेस कांटे मैदान व दक्षिणेस नोबी मैदान आहे.

(४) नैर्ऋत्य विभाग: या विभागात नैर्ऋत्य होन्शू, शिकोकू आणि क्यूशू बेटांचा समावेश होतो. अर्वाचीन घडीचे पर्वत व सखल प्रदेश या ठिकाणी आढळतात. नैर्ऋत्य होन्शूत ग्रॅनाइटच्या अनेक टेकड्या आहेत. त्याच्या दक्षिणेस जमीन खाली खचल्यामुळे अंतर्देशीय समुद्र तयार झाला आहे. त्यात अनेक लहान मोठी बेटे आहेत.

मृदा : जपानमध्ये मृदांचे विविध प्रकार आढळतात. भूरचना, ज्वालामुखींचे उद्रेक व हवामान या तीन गोष्टींचा परिणाम त्यांच्या निर्मितीवर झालेला आहे. येथे मृदांचे कमीत कमी पाच प्रकार तरी स्पष्ट दिसून येतात:

(१) उत्तर जपानमधील पडझोल मृदा : येथील थंड व दमट हवामानामुळे राखी रंगाची, पातळ अशी पडझोल मृदा तयार झाली आहे.

(२) दक्षिण जपानमधील तांबडी व पिवळी मृदा : दक्षिण जपानमधील उष्ण व दमट हवामानामुळे खडकांचे जांभीकरण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या मृदा तयार होतात व त्यात लोखंड आणि ॲल्युमिनियमचा अंश बराच असतो.


(३) पर्वतप्रदेशातील उभ्या उताराच्या प्रदेशात अपक्व, पातळशा मृदेचा थर आढळतो.

(४) ज्वालामुखींच्या पट्ट्यात अम्ल लाव्ह्यापासून तयार झालेली मृदा. उपयुक्ततेच्या दृष्टीने ही मृदा तितकीशी महत्त्वाची नाही.

(५) समुद्रकाठच्या मैदानी प्रदेशातील गाळाची मृदा : ही अतिशय सुपीक असून त्या ठिकाणी भाताची शेती होते. ही देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या जेमतेम १४% आहे.

नद्या : जपानमधील जलप्रवाहांवर तेथील भूरचनेचा व पर्जन्याचा परिणाम झालेला दिसून येतो. तेथील नद्या लहान पण जलद वाहणाऱ्या आहेत. ऋतुमानानुसार त्यांच्या पात्रांतील पाण्याचे प्रमाण कमीजास्त होते. नीईगाता मैदानातून जाणारी शिनानो (३६९ किमी.) व पश्चिम होक्काइडोमधून वाहणारी इशिकारी (३६५ किमी.) या दोन नद्या अपवाद म्हणून सोडल्यास बाकी सर्व नद्यांची लांबी ३२० किमी. पेक्षा कमीच आहे.

जपानमधील बहुतेक नद्यांचा उगम पर्वतप्रदेशातून झालेला आहे. तेथे त्यांनी खोल दऱ्या तयार केल्या आहेत. पुढे त्या डोंगरातून वाट खोदून काढून मैदानी भागात येऊन संथपणे वाहतात. ज्या मैदानी भागाचे भूपृष्ठाच्या हालचालींमुळे उद्‌गमन झाले आहे, तेथे नद्यांनी आपल्या पात्रात गाळाची भर टाकल्याने त्यांची खोरी सभोवतालच्या सखल प्रदेशांपेक्षा थोडी वर उंचावली आहेत. अशा प्रदेशात त्यांचे प्रवाह दोन्ही बाजूंस तयार झालेल्या नैसर्गिक पूरतटामधून समुद्रकिनाऱ्याकडे गेलेले दिसून येतात. अशा प्रकारची परिस्थिती प्रामुख्याने समुद्रकाठच्या मैदानी प्रदेशात जाणवते. या मैदानी प्रदेशात नद्यांची पात्रे सभोवतालच्या सखल प्रदेशापेक्षा थोड्या उंचावर असल्याने नदीतील पाणी कालव्यांद्वारे अथवा पाट काढून उताराच्या प्रदेशाकडे सहज नेता येते. त्यामुळे पाणी-पुरवठ्याची सोय झाली आहे. मात्र कधी कधी या नद्या आजूबाजूच्या प्रदेश जलमय करून टाकतात. अशा नद्यांची पात्रे उथळ असल्याने त्यांचा वाहतुकीसाठी जलमार्ग म्हणून फारसा उपयोग करता येत नाही. त्यांच्या खोऱ्यातून लहानलहान होड्यांनी किंवा तराफ्यांद्वारे थोड्या फार प्रमाणात वाहतूक होते. ऋतुमानाप्रमाणे नद्यांतील पाण्याचा साठा कमीजास्त होत असला, तरीही त्यांचा उपयोग वीज उत्पादनासाठी केला जातो.

सितौची नावाचा अंतर्देशीय समुद्र होन्शू बेटाच्या नैर्ऋत्य भागी तेथील जमीन खाली खचल्यामुळे तयार झाला आहे. या समुद्राच्या काठी किकी नावाचा मैदानी प्रदेश असून ओसाका, कोबे आणि क्योटोसारखी औद्योगिक शहरे तेथे वाढील लागली आहेत. सितौची अंतर्देशीय समुद्र, व्यापारमार्ग व मासेमारीचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

खनिज संपत्ती : जपानमध्ये विविध प्रकारची खनिजे मिळत असली तरी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे सोडल्यास इतर खनिजांचा साठा फारच कमी आहे. बॉक्साइट, निकेल आणि मॅग्नेशियम यांचा तर पूर्ण अभाव आहे. अशुद्ध लोखंडाचे साठे फारच कमी आहेत. या साठ्यांतील लोखंडाचे प्रमाणही कमी आहे. होन्शू बेटाच्या ईशान्ये भागात, कामाइशीजवळ हे साठे आढळतात. तांब्याचे प्रमुख साठे होन्शू बेटात, टोकिओच्या उत्तरेस व ईशान्येस आणि शिकोकू बेटाच्या उत्तर भागात आहेत. तांब्यासाठी दिवसेंदिवस देशातल्या देशात मागणी वाढत असल्याने पूर्वीप्रमाणे ते निर्यात केले जात नाही. जपानमध्ये शिसे फारच थोड्या प्रमाणात मिळते. जास्त मुबलक प्रमाणात होन्शू बेटाच्या मध्यभागी व उत्तर भागी आढळते. याच बेटाच्या मध्यपूर्व भागात व होक्काइडोच्या दक्षिण भागात पुरेसे क्रोमाइट मिळते. सोने आणि चांदीचे हल्लीचे उत्पादन देशाची गरज भागविण्याइतके आहे. मात्र मँगॅनीज, निकेल, कथील, टंगस्टन, मॉलिब्डिनम् आणि बॉक्साइट या खनिजांची फारच कमतरता आहे. अधातू खनिजांपैकी इमारतीचे दगड, चुनखडीचे खडक आणि जिप्सम इ. खनिजे जपानमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या देशात गंधकाचे मोठे साठे आहेत. मिठाचे उत्पादन गरजेच्या चतुर्थांशाहून कमी आहे.

जपानमध्ये शक्तिचे साधन म्हणून दगडी कोळसा, खनिज तेल व पाणी (जलविद्युत्) यांचा उपयोग करण्यात येतो. एकूण शक्तिपैकी ३७% कोळशापासून, ३३% खनिज तेलापासून व २०% जलविद्युत् म्हणून मिळवली जाते. दगडी कोळशाचा दर्जा फारसा चांगला नाही. धातुकामासाठी आवश्यक असा विशिष्ट प्रकारचा कोळसा येथे आढळत नाही. दगडी कोळशाचे साठे होक्काइडो, होन्शू आणि क्यूशू बेटांत आहेत. होन्शू बेटात लहानलहान साठे विखुरलेले आहेत. जपानमध्ये लिग्नाइट जातीच्या कोळशाचे साठे सापडतात. जपानमधील दगडी कोळसा समुद्रकाठच्या प्रदेसात सापडत असल्याने त्याची जलमार्गाने वाहतूक करणे सोपे जाते. मात्र चांगल्या दर्जाचा कोळसा बाहेरून मागवावा लागतो.

खनिज तेलाचे साठे वायव्य होन्शूत (आकीता आणि नीईगाता क्षेत्रांत) व होक्काइडोच्या मध्यवर्ती भागात आहेत. पण साठ्यांचे प्रमाण व उत्पादन कमी आहे. खनिज तेलाचे वार्षिक उत्पादन एकूण गरजेच्या फक्त १०% आहे. बाकीचे तेल बाहेरून आयात करावे लागते. मुबलक पाऊस व डोंगराळ प्रदेश यांमुळे जपानमधील संभाव्य जलशक्तिचे प्रमाण ७६·५ दशलक्ष किवॉ. आहे. त्यापैकी ७५% म्हणजे ३८५·६७ दशलक्ष किवॉ. ता. इतक्या शक्तिचे उत्पादन आजकाल केले जाते. विद्युत् निर्मितीची केंद्रे जरी सर्वदूर पसरली असली, तरी त्यांचे सर्वांत जास्त प्रमाण देशाच्या मध्य आणि ईशान्य भागांत आढळते.

हवामान :    जपानच्या दक्षिणोत्तर बृहत् विस्तार, आशिया खंडातील त्याचे पूर्व किनाऱ्यावरील स्थान, त्या देशातील पर्वतश्रेण्यांची मांडणी व उंची, सभोवतालचे समुद्र व सागरी प्रवाह या सर्व गोष्टींचा परिणाम जपानच्या हवामानावर झाला आहे.

हिवाळ्यात आशिया खंडाच्या अंतर्गत भागात तपमान गोठण बिंदूपेक्षा बरेच खाली उतरते व तेथे ध्रुवीय प्रदेशातील थंड हवेचा दाट थर जमिनीवर तयार होतो. त्यामुळे वायुभाराचे प्रमाण वाढते. त्यामानाने पॅसिफिक महासागरावरील हवा उबदार असते व तेथील वायुभार तुलनेने कमी असतो. अशा परिस्थितीत आशियाच्या अंतर्गत भागाकडून थंड वारे जपानच्या समुद्रावरून पूर्वेस जपानकडे वाहू लागतात. हे वारे समुद्रावरील बाष्प धारण करतात आणि जपानच्या पश्चिम किनारी प्रदेशातील हवामानात बदल घडवून आणतात. या थंड पण दमट वाऱ्यांमुळे जपानच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या प्रदेशातील हिवाळ्यातील तपमान खाली उतरते व तेथे हिवाळी पाऊस पडतो. जपानच्या मध्यवर्ती पर्वतश्रेण्यांमुळे पूर्व-काठावरील प्रदेश पर्जन्यछायेत राहतात व तेथे हिवाळ्यातही हवामान उबदार असते. उन्हाळ्यात परिस्थिती बदलते. यावेळी वारे पॅसिफिक महासागरावरून पश्चिमेस व वायव्येस वाहतात आणि ते जपानच्या वाताभिमुखी प्रदेशास (पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशात) भरपूर पाऊस देतात.

जपानच्या दक्षिण व आग्नेय किनाऱ्यांजवळून कुरोसिवो नावाचा गरम सागरी प्रवाह हा नेहमी वाहत असतो. त्सुशिमा सामुद्रधुनीजवळ या प्रवाहास दोन फाटे फुटतात. त्यांपैकी पश्चिमेकडील फाटा जरी फारसा प्रभावी नसला, तरी तो जपानच्या पश्चिम किनाऱ्यावरून बराच उत्तरेस जातो व त्या किनाऱ्यावरील हवामानावर परिणाम करतो. या गरम प्रवाहांच्या अभावी हिवाळ्यात पश्चिम जपानमध्ये तपमान आहे त्यापेक्षा आणखी खाली गेले असते. या कुरोसिवो प्रवाहाची पूर्व शाखा जपानच्या पूर्व किनाऱ्याने उत्तरेस ३६° उ. अक्षवृत्तापर्यंत जाते व पुढे ती पूर्वेकडे वळते.


जपानच्या उत्तरेस असलेल्या ओखोट्स्क समुद्राकडून कूरील किंवा ओयाशियो नावाचा थंड पाण्याचा प्रवाह जपानच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरून दक्षिणेस ३९° उ. अक्षवृत्तापर्यंत येतो. या थंड प्रवाहामुळे होक्काइडो आणि उत्तर होन्शू या भागांतील समुद्रकाठच्या प्रदेशाचे तपमान खाली उतरते. या प्रवाहावरील थंड हवा व कुरोसिवोवरील उबदार हवा एकत्र येऊन धुके तयार होते, तसेच त्या ठिकाणी समुद्र मासेमारीस अनुकूल झाला आहे.

याप्रमाणे ऋतुमानानुसार जमिनीवरून येणारे वारे व सागरी वारे यांचा परिणाम आळीपाळीने जपानच्या हवामानावर होतो. त्यामुळे हवामानानुसार जपानचे दोन मुख्य भाग पडतात. ३७° उ. अक्षवृत्तावरून जानेवारीची ०° से. ची समताप रेषा जाते. या अक्षवृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेश म्हणजे उत्तर जपान व दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे दक्षिण जपान. उत्तर जपान समशीतोष्ण कटिबंधात येतो. येथील हिवाळा प्रदीर्घ, थंड व फार कडक असतो. त्यावेळी तपमान गोठणबिंदूखाली जाते व बर्फ पडते. याउलट दक्षिण जपानचा प्रदेश उपोष्ण कटिबंधात मोडतो. तेथील उन्हाळा गरम व दमट असतो. उन्हाळ्यातील तपमान २०° से.पेक्षा अधिक असते, हिवाळ्यात ते गोठणबिंदूजवळ म्हणजे जवळजवळ ४° से. असते.

जपानचे हवामान दमट असून तेथील पर्जन्यमान ८५ सेंमी. ते २५० सेंमी.पर्यंत आढळते. दक्षिण जपानमध्ये पावसाचे प्रमाण १५० सेंमी. ते २५० सेंमी. असते, उत्तरेकडे ते एकदम कमी होत जाते. जपानमध्ये पाऊस मुबलक व जवळजवळ वर्षभर पडतो, पण कमाल पर्जन्यमानाचा काल हा पूर्व-पश्चिम किनारी प्रदेशांत वेगवेगळा असतो. पश्चिम किनाऱ्यावर तो हिवाळ्यात असतो, तर पूर्व किनाऱ्याच्या प्रदेशात तो उन्हाळ्यात असतो. पाऊस मुबलक असूनही जपानला शहरांसाठी व कारखान्यांसाठी पाण्यांचा तुटवडा भासतो. ४०% पुरवठ्यासाठी नद्यांपेक्षा भूमिगत पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. समुद्र हटवून उद्योगधंद्यासाठी जेथे भूमी संपादन केली आहे. तेथे हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. अल्पावधीत वेगाने केलेल्या औद्यागिक प्रगतीमुळे जपानला हवेचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण व जलटंचाई यांस तोंड द्यावे लागत आहे. शिवाय इतर आर्थिक व सामाजिक स्वरूपाचे नवीन उत्पन्न झालेले प्रश्न आहेत ते वेगळेच.

अनेक गोष्टींमुळे या सर्वसाधारण स्वरूपाच्या हवामानात स्थानिक स्वरूपाचा बदल झालेला आढळतो. अक्षांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, जमिनीच्या उताराची दिशा, फॉन वारे, समुद्रकिनाऱ्याशी निर्माण होणारे धुके (ज्या ठिकाणी भिन्न तपमानांचे सागरी प्रवाह एकमेकांना येऊन मिळतात अशा सागरी क्षेत्रात), उन्हाळ्याच्या उत्तरार्धात व शरद ऋतूच्या पूर्वार्धात (सप्टेंबर महिन्यात) येणारे वादळी वारे (टायफून), त्सुनामी लाटा इ. सर्व गोष्टींचा परिणाम जपानच्या निरनिराळ्या भागांतील हवामानावर होतो.

वनस्पती : मुबलक पावसामुळे जपानमध्ये नैसर्गिक वनस्पतींची वाढ फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ही वनस्पती प्रामुख्याने पर्वतप्रदेशाच्या उतरणीवर वाढल्याने तेथे मनुष्याकडून पूर्वकाळात मोठ्या प्रमाणात लाकूडतोड होऊ शकली नाही. आज जपानच्या एकूण क्षेत्रापैकी ६०·३ % क्षेत्रात अरण्ये आढळतात ही अरण्ये तीन प्रकारची आहेत : (१) सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये, (२) मिश्र जातींची अरण्ये व (३) उपोष्ण कटिबंधातील रुंदपर्णी सदारहीत अरण्ये.

(१) सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये : ही अरण्ये होक्काइडो बेटात व उत्तर होन्शूच्या उंच प्रदेशात आढळतात. जपानमधील एकूण अरण्यक्षेत्रापैकी ३३% क्षेत्र या प्रकारच्या अरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या अरण्यांत स्प्रूस, फर, लार्च आणि बर्च जातींचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात.

(२) मिश्र जातींची अरण्ये : ही अरण्ये होन्शू बेटाच्या व उत्तर भागात ३७° उ. अक्षवृत्ताच्या उत्तरेस आढळतात व त्यांनी नैसर्गिक वनस्पतींच्या एकूण क्षेत्रांपैकी १७% क्षेत्र व्यापलेले आहे. या प्रदेशात प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वृक्ष आढळतात. ओक, मॅपल, पॉपलर, ॲस्पेन, सीडार, सायप्रस आणि पाइन इ. जातींचे वृक्ष या अरण्यांत आढळतात.

(३) उपोष्ण कटिबंधीय रुंदपर्णी सदाहरीत अरण्ये :  दक्षिण जपानमध्ये ही आढळतात व त्यांनी एकूण नैसर्गिक वनस्पतींच्या क्षेत्रापैकी अर्धेअधिक (५०%) क्षेत्र व्यापलेले आहे. ओक, लॉरेल, कर्पूर, मॅन्गोलिया, पाइन व बांबू इ. झाडे या अरण्यांत वाढलेली आढळतात.

जपानमध्ये वृक्षारोपण मोठ्या मेहनतीने व व्यापक प्रमाणात करण्यात येते. गेल्या काही वर्षात या देशात दरवर्षी ३० कोटी या प्रमाणे रोपे लावण्यात आलेली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करूनही जपानची लाकडासंबंधाची गरज पूर्णांशाने भागत नाही. इमारती लाकूड व अरण्यांतून प्राप्त होणारे इतर पदार्थ यांना जपानमध्ये फार मागणी आहे. घरे, कागद, रेयॉन, जहाजे इ. माल तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. लाकूड हा जपानी आर्थिक जीवनाचा आविभाज्य भाग झालेला आहे.

नैसर्गिक वनस्पतींशिवाय जपानमधील उद्यानांची जगभर ख्याती आहे. जपानमधील अनेक स्थळे या योजनाबद्ध उद्यानांसाठी प्रसिद्ध असून ‘बोनसॉय’ सारखा वनस्पतिप्रकार जपानने अजरामर केला आहे.

प्राणी :    जपानमध्ये फार थोडे सस्तन प्राणी आहेत. त्यांपैकी काहींची संख्या रोडावली असून काही प्राणी तर नामशेष झाले आहेत. उदा., पर्वतप्रदेशात आढळणारी हरणे व लांडगे यांचे अस्तित्व गेल्या शतकातच नाहीसे झालेले दिसते. होन्शू बेटातील उंच प्रदेशात जपानी बकरे व काळवीट आढळतात. होक्काइडोमध्ये तपकिरी अस्वले व उत्तर होन्शूमध्ये काळी अस्वले असून माकडे, कोल्हे व बॅजर हे वन्य प्राणी पुष्कळ आढळतात. रानडुक्कर, ऑटर, खारी व ससे यांची संख्याही बरीच मोठी आहे. जपानमध्ये पक्ष्यांची विविधता विशेषतः पर्वतप्रदेशात खूपच आहे. बगळे, करकोचे, बदके, हंस इ. पाणपक्षी आणि घारी, गिधाडे, ससाणे, कबुतरे, कोकीळ, घुबडे इ. पक्ष्यांच्या सु. ४५० जाती आहेत. काही सर्प, सरडे, बेडूक व अनेक प्रकारची कीटकसृष्टी आहे. तथापि सखल, भातशेतीच्या प्रदेशात गाणारे पक्षी आढळत नाहीत. मासे हा जपानी अन्नाचा व निर्यातीचाही महत्त्वाचा घटक आहे. जपानचा किनारा व जवळचा समुद्र मत्स्यसमृद्ध असून मासेमारीत जपानचा क्रमांक पेरूच्या खालोखाल आहे. उत्तरेकडे हेरिंग, कॉड, हॅलिबट, सॅमन, शेवंडा व दक्षिणेकडे सार्डीन, सी ब्रीम, ट्यूना, मॅकरेल या महत्त्वाच्या जाती सापडतात. किनारी व खोल सागरी मासेमारीप्रमाणेच देवमाश्याच्या शिकारीसाठी जपानी मासेमार दूर दूर जातात. सागरी शैवलाचे उत्पादनही मोठे आहे. कार्प, गोल्डफिश व ईल यांचे उत्पादनही गोड्या पाण्यात होते.

वाघ, दि. मु.

इतिहास : जपानी बेटांवर केलेल्या पुरातत्वीय उत्खननांत निरनिराळ्या जागी मानवाच्या अस्थी आणि अश्मायुधे सापडली आहेत. त्यांवरून पुराणाश्मयुगात व मध्य-पुराणाश्मयुगात जपानात कोणत्या तरी रूपात मानवी वस्ती असावी. अर्थात ती कोणत्या प्रकारची होती आणि त्या वेळी कशा प्रकारची समाजव्यवस्था होती, यांविषयी विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही.


नवाश्मयुगाच्या प्रारंभापासून पुष्कळच पुरावा आणि साधने उपलब्ध झाली असल्याने त्या काळाचे चित्र बरेचसे स्पष्ट होत जाते. ज्याला आपण तात्पुरता ७–८ हजार वर्षांपूर्वीचा कालखंड समजू, त्यापासून नवाश्मयुगाची वैशिष्ट्यद्योतक अशी दगडांची व हाडांची आयुधे, जनावरांची शिंगे आणि मृत्पात्रे सापडतात. मृत्पात्राच्या बाह्यांगावर गुंतागुंतीचे नक्षीकाम आढळते. शिंपल्याचे अनेक ढीग आणि राहत्या घराचे अवशेषही सापडतात. अर्थात शिंपल्या-खवल्यांचे ढीग किनारपट्टीत आढळत असल्याने, त्या काळातील माणूस आपली उपजीविका शिकार आणि मासेमारीच्या साहाय्याने करीत असावा, असे म्हणता येते. छोट्या कुटुंबांची वाडी बनत असावी, अशा छोट्या वाड्या एकत्र आणण्याची काही व्यवस्था त्या काळी असावी, असे वाटत नाही. ही नवाश्मयुगाची संस्कृती ख्रिस्तपूर्व दुसऱ्या-तिसऱ्या शतकांपर्यंत अविच्छिन्नपणे प्रचलित होती परंतु त्या सुमारास आशियाई भूभागातून नवी संस्कृती द्विपावर पोहोचल्याने द्विपस्थ संस्कृतीने नव्या लोहयुगीन व अश्मयुगीन संस्कृतीचे रूप धारण केले. ताम्र व लोह हे दोन्ही धातू त्याच सुमारास जपानात बाहेरून आले. तांबे सुरुवातीला दैनंदिन व्यवहारात वापरीत असत. पुढे पुढे मात्र त्याचा वापर मुख्यत्वे धार्मिक कार्ये आणि समारंभ यांपुरताच होऊ लागला आणि ते सामाजिक प्रतिष्ठेचे द्योतक बनले. याउलट लोखंडाचा वापर व्यावहारीक साधनांसाठीच होत राहिला व शेतीचे अवजारे, हत्यारे इत्यादींची निर्मिती झाली. त्याच सुमारास शेतीची कला उदयास आली आणि भाताची लागवड होऊ लागल्याने समाजाच्या घडणीत मूलगामी बदल घडून आला.

पूर्वीच्या भटक्या शिकारी जीवनाकडून हळूहळू वस्ती करून एका जागी स्थिर राहण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. वाड्यांचा आकारही वाढू लागला. परिणामतः श्रीमंत आणि गरीब असे सामाजिक विकेंद्रीकरण झाले. सत्ताधारी वर्ग निर्माण झाला. इ.स. पहिल्या शतकात उत्तर क्यूशूमधील एका वाडीची लेकसंख्या एवढी मोठी झाली की, तिने चीनमधील लोयांग या शहरी आपला प्रतिनिधी पाठविला अणि त्या देशाशी आपले संबंध प्रस्थापित केले. तिसऱ्या शतकात जपानमधील यामातोच्या राणीने चीनशी मैत्रीचे संबंध जोडले. चीनच्या इतिहासावरील तत्कालीन ग्रंथांत हिमिकांच्या दरबारी राहणीचा आणि जपानी समाजाच्या चालीरीतींचा वृत्तांत आढळतो. यामातो सत्ता म्हणजे तत्कालीन वाडी-राज्याचे प्रतीक असून त्यात उत्तर क्यूशूमधील तीस वाड्यांचा समावेश होता.

राष्ट्रविकास अणि उमरावशाही : आजच्या जपानी सम्राटांच्या पूर्वसूरींच्या नेतृत्त्वाखाली जपानी राष्ट्राचा उदय झाला असण्याची शक्यता असून ही घटना तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धापासून चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत घडली असावी. जपानी इतिहासाचा प्राचीन साधनग्रंथ म्हणजे कोजीकी. त्यात जपानी राष्ट्राची निर्मिती जिम्मू नावाच्या सम्राटाने ख्रि. पू. ६६० च्या आसपास केली, असे म्हटले आहे परंतु या विधानाच्या पुष्ट्यर्थ कोणताही सबळ पुरावा दिलेला नाही.

चार मुख्य जपानी द्वीपांपैकी सर्वांत मोठ्या होन्शू या बेटावरील यामातो या मध्यवर्ती प्रांतातील मोठ्या शहरी साम्राज्याची राजधानी असे व तेथेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे राजसत्ता हस्तांतरित होत असे. त्यामुळे शाही दरबाराला यामातो चोतेई किंवा यामातोचा शाही दरबार हे नाव लाभले होते. राष्ट्राच्या एकीकरणानंतर अगदी प्रारंभापासूनच यामातो साम्राज्याची राजकीय व लष्करी सत्ता मोठी होती. त्यामुळे मध्य होन्शूमधून क्यूशू, शिकोकू व उत्तरेकडील प्रांतांत राज्यकारभार चालविणे, त्यास शक्य होते. या सम्राटांनी कोरियन द्वीपकल्पावरही स्वारी करून येथील दक्षिण भागात आपली वसाहत स्थापन केली होती.

सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत राजमुखत्यार असलेल्या राजपुत्र शोतोकू याने आपल्या नेतृत्त्वाखाली आशिया खंडातून विविध सांस्कृतिक आचारविचारांची आयात करून जपानी संस्कृती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. शोतोकूच्या प्रभावामुळे देशांत बौद्ध धर्माचा सार्वत्रिक प्रसार झाला. त्याबरोबरच शासनाचे सूत्र तयार करण्यात येऊन विद्या आणि कला यांचाही द्रुतगतीने विकास साधण्यात आला. शोतोकूच्या आज्ञेने बांधलेले होऱ्युजी मंदिर आजही उभे असून ते जगातील सर्वांत पुरातन लाकडी वास्तू आहे.

सातव्या शतकाच्या मध्यकाळात पुन्हा राजकीय सुधारणेची लाट आली. या सुधारणेचे नाव ताइका-नो-काइशिन म्हणून ज्ञात आहे. यात ताइका ही जपानमध्ये वापरलेली पहिलीच युगसंज्ञा असून काइशिनचा अर्थ सुधारणा असा आहे. तीत चीनच्या शासनपद्धतीवर आधारलेला ‘रित्सुऱ्यो’ नावाचा लिखित कायदा अस्तित्त्वात आला. तेव्हापासून राज्यकारभारात या कायद्याचे पालन होऊ लागले. आठव्या शतकाच्या मध्यकाळातही सम्राट शोमूच्या कारकीर्दीत चिनी संस्कृतीची प्रशंसा जपानात होत असे आणि जे जे चिनी असेल त्याचा उत्सुकतेने व हिरिरीने स्वीकार होत असे. जपानी उमरावांनी आपल्या राहणीत चिनी रीतिरिवाजांचे आदर्श अनुसरले. सम्राट शोमूची बौद्ध धर्मावर उत्कट श्रद्धा होती आणि त्याने आपल्या नारा या राजधानीत बुद्धाचा पुतळा उभारला होता. शक्य तो बौद्ध धर्माला राष्ट्रीय धर्माचे स्थान प्राप्त व्हावे, यासाठी त्याने प्रयत्न केले.

आठव्या शतकाच्या शेवटी सम्राट कामूच्या राजवटीत देशाची राजधानी नाराहून हलवून क्योटोला स्थापण्यात आली. तेव्हापासून एकोणिसाव्या सतकाच्या उत्तरार्धापर्यंत तेथेच जपानची राजधानी व जपानी सम्राटांचे निवासस्थान राहिले. राजदरबार क्योटोला प्रस्थापित झाल्याने उमराव प्रबळ झाले आणि त्यांनी राजसत्ता हस्तगत केली. उमरावांची विलासी संस्कृती वाढीला लागून दीर्घकाळ फोफावत राहिली. पुढे थांग राजघराण्याच्या चिनी संस्कृतीचे आगमन झाले. ती आत्मसात करण्यास व पचविण्यास काही काळ लागला आणि तदनंतर हळूहळू खऱ्या अर्थाने स्वतंत्र जपानी संस्कृतीचा विकास होऊ लागला. नव्या युगाने जपानला दरबारी महिला मुरासाकी शिकिबू हिने लिहिलेली सुंदर व प्रदिर्घ ⇨ गेंजी मोनोगातारी  (युवराज गेंजीची कहाणी) ही कादंबरी दिली. या कादंबरीत तत्कालीन दरबारी जीवनाचे जिवंत चित्र आढळते. या कालखंडात निर्माण झालेल्या कलासाहित्यात जपानी लोकांच्या स्वभावातील मार्दवाचे व संवेदनशीलतेचे प्रतिबिंब आढळते.


सरंजामशाहीचे युग :   दरबारी मंडळी आणि उमराव क्योटोमधील आपल्या ऐषआरामात मशगुल राहिले असतानाच खेड्यापाड्यांतील शेतकरीवर्गामध्ये हळूहळू नवे सामर्थ्य वाढीस लागले. पूर्वी राजधानीच्या परिसरात राहणारे जमीनदार आपल्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी केंद्रीय सत्तेवर अवलंबून असत, म्हणजेच दरबार किंवा सम्राट यांना संरक्षक मानीत. पण हळूहळू त्यांना स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण शस्त्रबळाने करावे लागले. स्वसंरक्षणासाठी शस्त्रसज्ज झालेल्या या लोकांचे हळूहळू लष्करी सत्तेत रूपांतर झाले. राजघराण्यातील व दरबारातील आश्रय घेण्याचे धोरण त्यांनी अंगीकारले. तसेच दरबार व राजघराणे यांच्याशीही संबंध राखण्याचा प्रयत्न त्यानी केला. जनतेत मान असलेल्या शेतकरी योद्ध्यांचे नेतृत्व उमरावांकडे आले. या संरक्षक लष्करामधूनच पुढे जपानवर आपली आधिसत्ता गाजवणारा ⇨सामुराई  हा योद्ध्यांचा वर्ग उदयास आला. या वर्गात दोन गट होते : ताइरा व मिनामोतो. सम्राटाची व दरबारी लोकांची मर्जी संपादन करण्यासाठी या दोन्ही गटात स्पर्धा चाले. त्यांमध्ये चकमकीही होत. अखेर बाराव्या शतकाच्या शेवटी, मिनामातो घराण्याने मिनामातो-नो-योरितोमो याच्या नेतृत्त्वाखाली ताइरा गटाला कायमचे नेस्तनाबूद केले आणि सम्राटाने योरितोमोची शोगुन किंवा सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. त्याने आपली सरसेनापतिपदाची गादी पूर्व होन्शू विभागातील कामाकुरा येथे स्थापन केली. अशा प्रकारे जपानमध्ये लष्करी राजवटीचा एक कालखंड सुरू झाला व तो पुढे सातशे वर्षे टिकला.

या कामाकुराच्या लष्करी शासनात शोगुन हाच वस्तुतः देशावर सत्ता गाजवीत असे आणि निरनिराळ्या जिल्ह्यांच्या स्थळी आपले हस्तक नेमत असे. हे हस्तक स्थानिक करवसुली, इतर प्रशासन व संरक्षण यांचे अधिकार स्वतःकडे घेत. ते शोगुनशी वतनबद्ध असत आणि आपल्या क्षेत्रापुरते लष्करी व नागरी प्रशासन पाहत. त्याबद्दल त्यांना शोगुन जमिनी व बिरुदे देई.

शोगुन ह्याच्या हातात सत्ता गेली, तरी प्रारंभीच्या काळात दरबाराचा प्रभाव टिकून होता. तथापि हळूहळू कामाकुरामध्ये सत्तारुढ असलेल्या शोगुनची सत्ता वाढत गेली. शेवटी दरबारी कामकाजात ढवळाढवळ करण्यापर्यंत वा गादीचा वारस ठरविण्यापर्यंत त्याची मजल गेली. तेराव्या शतकाच्या मध्यावर आशियातील अनेक देश पादाक्रांत करण्यात यशस्वी झालेल्या मंगोलियाने जपानवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. क्यूशू बेटावर दोनदा समुद्रातून हल्ले झाले परंतु मंगोल वंशाचे लोक दर्यावर्दी नसल्यामुळे जपानी सामुराई योद्ध्यांनी हे हल्ले यशस्वीपणे परतविले. नंतर चौदाव्या शतकाच्या प्रारंभी कामाकुराच्या शोगुनचे सामर्थ्य कमजोर होऊ लागल्याने सम्राट गोदाइगो याने दरबाराकडे गाजकीय सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच खटाटोपानंतर त्याला आपला हेतू साधण्यात यश लाभले परंतु ते अल्पजीवी ठरून सामुराईनी पुन्हा देशावर ताबा मिळवला आणि कामाकुराऐवजी क्योटोमध्ये आपली लष्करी राजवट चालू केली. तिचे नेतृत्व आशिकागा ताकाउजीकडे होते. या लष्करी सत्तेचे आसन किंवा केंद्र क्योटोजवळील मुरोमाची येथे असल्याने त्याला मुरोमाची लष्करी शोगुन शासन हे नाव पडले.

या नव्या लष्करी राजवटीचे सामर्थ्य सुरुवातीपासून स्थानिक सरंजामदारांच्या मानाने कमीच होते. हे सरंजामदार ‘दाइम्यो’ (मोठे नाव ) या नावाने ओळखले जात आणि अनेक जिल्ह्यांवर राज्य करीत. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात कौटुंबिक मालमत्तेच्या वारसाप्रकरणी शोगुन आणि दाइम्यो यांत वितुष्ट आले व भयानक यादवी युद्धाला तोंड लागले. त्यात क्योटो शहराची राखरांगोळी झाली. शोगुनची शासकीय सत्ता परिणामी नष्ट झाली आणि अनेक स्थानिक सरदारांत सत्तेसाठी लाथाळी सुरू झाली. या कालखंडाला युद्धाचा कालखंड म्हणतात. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थापित सत्तेची उचलबांगडी आणि त्या जागी नव्या घराण्याच्या शोगुनची स्थापना हेच आहे. हा काळ जवळजवळ शंभर वर्षांचा ठरला.

या यादवीच्या काळात जपानचा यूरोपीय राष्ट्रांशी प्रथम संबंध आला. दक्षिण क्यूशूच्या टानेगाशिमा बेटाच्या किनाऱ्यावर एक पोर्तुगीजांचे जहाज वादळामुळे आश्रयास आले. त्यानंतर मात्र स्पेन व पोर्तुगालच्या व्यापारी जहाजांचे येणेजाणे हळूहळू वाढत गेले. ख्रिस्ती धर्मप्रचारक जपानात येऊ लागले आणि त्यांनी आपल्याबरोबर यूरोपीय संस्कृतीचे ज्ञानभंडार आणले. दारूगोळा आणि तोफखाना नव्याने माहीत झाल्याने जपानमधील युद्धतंत्र बदलले. बंदुकीच्या दारूमुळे जुन्या युद्धपद्धतीचा, कालखंडाचा शेवट करण्यात व मोठमोठ्या युद्धपिपासू नेत्यांचा पराभव करण्यात ओदा नोबुनागाने यश मिळविले. अशा प्रकारे ओदा नोबुनागाने देशाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू केली आणि ती पुढे तोयोतोमी हिदेयोशीने पूर्णत्त्वाला नेली. हिदेयोशीनंतर तोकुगावा एइयासु शोगुन झाला आणि त्याने एडो–सध्याचे टोकिओ–येथे गादी स्थापन केली. त्यावेळेपासून तोकुगावा घराण्याने देशभरच्या दाइम्योवर म्हणजे स्थानिक जहागिरदारांवर कडक निर्बंध घातले व वर्गव्यवस्था स्थापन केली. तसेच ख्रिस्ती धर्मांकडे असलेला विविध वर्गांतील असंख्य लोकांचा ओढा ध्यानी घेऊन आणि त्यामुळे शांततेस धोका निर्माण होतो, म्हणून त्यावर त्याने बंदी घातली. त्यानंतर जपानात परकीयांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आणि जपान्यांना परदेशप्रवासालाही मनाई करण्यात आली. परदेशी व्यापारावर निर्बंध घालण्यात आले. त्या वेळी केवळ हॉलंड व चीन या राष्ट्रांशी नागासाकीजवळील देशिमा बंदरातून व्यापार करण्यास परवानगी असे.

याप्रमाणे तोकुगावा शासनाने इतर देश आणि जपान यांच्यातील सारे संपर्क तोडून अंतर्गत राज्यकारभारावर सर्व लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जपानला अडीचशे वर्षांचा शांततेचा कालखंड लाभला. या दीर्घ कालखंडात देशात सुबत्ता होती. तसेच खास जपानी कला-विद्यांची प्रगती झाली आणि नागरी संस्कृतीचा सर्वांगीण विकास झाला. जगभर प्रसिद्ध पावलेल्या जपानी कलाकृती याच काळात निर्माण झाल्या. निक्कोचे भव्य वास्तुशिल्प, लाकडी ठशांनी छापण्याची अनुपम पद्धती (उकियो-ए), भव्य रंगमंचाचे तंत्र आणि ⇨ काबुकी नाट्य  ही सारी याच कालखंडाची देणगी आहे.

एकीकडे जगाकडे पाठ फिरवून तोकुगावा शासन शांततामय कालखंडाचा पुरेपूर लाभ घेत असता, बाह्य जग मात्र झपाट्याने बदलत होते. औद्योगिक क्रांतीमुळे आणि भांडवलशाहीच्या उदयामुळे जगातील यूरोपीय देश बाजारपेठांच्या आणि कच्च्या मालाच्या शोधात होते. १८५३ मध्ये अमेरिकेच्या नौदलाचे एक जहाज कॅ. पेरीच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकन अध्यक्षांचे एक पत्र घेऊन जपानला पोहोचले त्यात जपानचे दरवाजे जगाला खुले करण्याची विनंती होती व खुले न केल्यास ते जबरदस्तीने उघडू, अशी धमकीही होती. जपान लष्करी शक्तीच्या बाबतीत कमकुवत असल्यामुळे जपानला अमेरिकेशी मैत्रीचा तह करावा लागला (१८५४). त्यापाठोपाठ इंग्लंड, रशिया आणि नेदर्लंड्स यांच्याशी तह झाले. १८५८ मध्ये व्यापारी करार पुरे करून जपानने वरील चारी राष्ट्रांशी जपानबरोबर व्यापार करण्यास मान्यता दिली व फ्रान्सशीही तसाच तह केला. या साऱ्यांचा परिणाम म्हणून देशातील राजकीय यंत्रणेबाबत दाइम्यो आणि शोगुनचे मंत्री यांच्यामध्ये वाद माजले. शोगुनला पदच्युत करण्यासाठी अनेक चळवळी झाल्या. परिणामतः १८६७ मध्ये तोकुगावा शोगुनला अधिकाराचा त्याग करणे भाग पडले आणि पुन्हा एकदा सत्ता नाममात्र का होईना, पण सम्राटाच्या हाती आली. अशा प्रकारे देशातील सामुराई सत्तेचा शेवट झाला.

आधुनिक कालखंड :   ज्या वेळी तोकुगावा शोगुनने सत्तात्याग केला, तेव्हा सम्राट मेजी अवघा सोळा वर्षांचा होता. त्यामुळे नव्या कारभारावर दरबारी अधिकाऱ्याचे नियंत्रण राहिले. अधिकाऱ्यांत सांजो सानेमी व इवाकुरा तोमोमी या उल्लेखनीय व्यक्तींखेरीज खालच्या थरातील काही सामुराई अधिकारी–उदा., साइगो ताकामोरी, ओकुबो तोशिमिची व किदो ताकायोशी–इत्यादींचा समावेश होता. सरंजामशाही नष्ट करणे, देशाचा आधुनिक राष्ट्र म्हणून विकास करणे व प्रगत राष्ट्रांच्या शक्य तो बरोबरीचे स्थान मिळविणे, ही उद्दिष्टे ठेवून नव्या शासनाने अनेक प्रभावी उपाय अंमलात आणले.


या सुधारणेच्या मोहिमेची सुरुवात एडो राजधानीचे प्राचीन नाव बदलून टोकिओ म्हणजे पूर्वेकडील राजधानी असे ठेवले व सम्राटांचे निवासस्थान तेथे हलविणे, या घटनेने झाली. स्थानिक दाइम्योंना त्यांच्या जमिनी दरबारच्या प्रशासनाकडे परत कराव्यात, असा आदेश देण्यात आला आणि सामुराईनी शस्त्रसंन्यास घेऊन सामान्य नागरिक व्हावे, असे ठरविण्यात आले. सक्तीच्या लष्करी भरतीचे कायदे करण्यात आले आणि राजदरबाराच्या हाती लष्करी हालचालींचे सर्व अधिकार सुपूर्द करण्यात आले. ह्या सुधारणांसोबतच रेल्वे, टपाल, तार इ. दळणवळणाच्या सोयी हळूहळू करण्यात आल्या आणि आधुनिक पद्धतीने कारखाने उभारण्यात आले. विचारविश्वातही नव्या व उदारमतवादी कल्पना पसरू लागल्या आणि मानवाचे नैसर्गिक हक्क यांसारख्या गोष्टींची सर्वत्र चर्चा होऊ लागली. जनतेचे अधिकार प्रस्थापित करण्यासाठी वा त्यांत वाढ करण्यासाठी चळवळी होऊ लागल्या. शेवटी जनताजागृतीच्या वातावरणाची दखल घेऊन सरकारने योग्य प्रकारचे संविधानात्मक शासन निर्माण करण्याचा निश्चय केला. त्यानुसार १८८९ मध्ये संविधान निर्माण करण्यात आले व शासनाची विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायसंस्था अशा तीन विभागांत वाटणी झाली. सामान्य जनता विधिमंडळाच्या कार्यात निर्वाचित प्रतिनिधींमार्फत सहभागी होऊ शके. मतदानाचा अधिकार मात्र फारच मर्यादित होता व पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या अवघी एक टक्का होती.

१८९४ मध्ये कोरियावरील वर्चस्वाबाबत चीन व जपान यांत युद्ध जुंपले व त्यात जपान विजयी झाला. त्यामुळे जपानला लिआउडुंग द्वीपकल्प, तैवान आणि पेस्कदोरेस यांवर ताबा मिळाला. याशिवाय २० कोटी टेल (चिनी नाणे) एवढी रक्कम नुकसानभरपाईखातर मिळाली. नंतर रशिया, जर्मनी आणि फ्रान्स यांनी लिआउडुंग द्वीपकल्प जपानने चीनला परत करावे अशी मागणी केली. कारण अतिपूर्वेकडील शांततेस जपानचा कायमचा धोका निर्माण होईल, असे त्यांचे म्हणणे होते. जपानने त्यांची मागणी स्वीकारली परंतु रशियाने त्या द्वीपकल्पात आपले पाय पसरावयाला सुरुवात केली आणि या राजनैतिक झगड्यांचा शेवट रशिया-जपान युद्धात १९०४ साली झाला. याही युद्धात जपान विजयी झाले. कोरियामधील जपानच्या वर्चस्वाला मान्यता मिळून चीनच्या ग्वांगटुंग इलाख्यात आणि दक्षिण सॅकालीनच्या दक्षिणेकडील भागात पट्टेदारीचे (भाडेपट्टीचे) अधिकार जपानला प्राप्त झाले. या दोन युद्धांमुळे जपानची भांडवली अर्थव्यवस्था सुधारली व जपानची जगातील बलशाली राष्ट्रांत गणना होऊ लागली. १८५८ पासून सतत एकतर्फी तहनामे स्वीकारणाऱ्या जपानला सारे तह नव्याने सुधारून घेता आले. १९०२ साली इंग्लंडशी जपानने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि १९०५ साली त्यांत आणखी वाढ झाली.

पहिल्या महायुद्धास १९१४ मध्ये सुरुवात होताच जपानने इंग्लंडशी केलेल्या मैत्रीच्या तहानुसार मदतीचा हात पुढे करून जर्मनीबरोबर युद्ध जाहीर केले व चीनमधील जर्मनीच्या पट्टेदारीने बळकाविलेल्या शँटुंग या प्रदेशात आपले पाय रोवले तसेच पॅसिफिक महासागरातील जर्मनीची अनेक बेटे काबीज केली. मित्र राष्ट्रांच्या सागरी मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्याने भूमध्ये समुद्राकडे आपले आरमारही रवाना केले. पुढे १९१९ साली पॅरिस येथे भरलेल्या बड्या पाच राष्ट्रांच्या शांतता परिषदेत जपानने भाग घेतला. या परिषदेमुळे उदयास आलेल्या राष्ट्रसंघाच्या स्थायी समितीवर सभासद म्हणून त्याची निवड झाली. पुढे दहा वर्षे जपानची परराष्ट्रनीती राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टांना पोषक होती. १९२१ व १९३० साली भरलेल्या परिषदांतही जपानने भाग घेतला. या परिषदांना अमेरिकन व ब्रिटिश नौदलातील लष्करी जहाजांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात यश आले.

दरम्यानच्या काळात महायुद्धाचा परिणाम म्हणून वाढलेल्या व्यापारामुळे व औद्योगिक विकासाच्या धोरणामुळे जपानमध्ये झपाट्याने आर्थिक प्रगती झाली. राजकारणाच्या क्षेत्रातही निरनिराळ्या पक्षांचे बळ वाढले आणि त्यामधून सम्राटाने निवडलेल्या मंत्रिमंडळाऐवजी राजकीय पक्षाचे मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आले. १९२५ साली २५ वर्षे वयांवरील सर्व पुरुषांना मताधिकार देण्यात आला.

१९२९ साली जपानी अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या लाटेत सापडली. बड्या राष्ट्रांच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून धरणे जपानला कठीण होऊ लागले. अमेरिकेने जपानी स्थलांतरितांसाठी अधिक कडक कायदे केले. त्याच वेळी चीनमध्ये राष्ट्रवादाला जोर चढल्यामुळे चीनने जपानी चलनावर बहिष्कार घातला व जपानच्या मँचुरियामधील हितसंबंधांना आणि अधिकारांना धोका उत्पन्न झाला. राजकीय पक्षांचे मंत्रिमंडळ देशाच्या समस्या सोडविण्यास उणे पडत आहे, म्हणून अधिक प्रबळ सरकार स्थापन करण्याची गरज आहे, असे जपानी लष्करी पुढाऱ्यांनी प्रतिपादन केले. अशा तऱ्हेने १९३१ मध्ये मँचुरियात ठेवलेल्या जपानी लष्कराने मँचुरिया प्रकरण उपस्थित करून त्या निमित्ताने मँचुरिया व्यापला. मँचुरिया हे नाममात्र स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्यात आले आणि अखेरचा चिनी सम्राट फू-यी हा कळसूत्री बादशाह गादीवर बसविण्यात आला.

राष्ट्रसंघाने जपानच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आणि जपानी लष्कर मँचुरियामधून काढून घेण्यास सांगितले परंतु जपानने राष्ट्रसंघातून अंग काढून घेतले. या घटनेनंतर जपानी लष्कराने शासनाची सर्व सूत्रे हाती घेऊन देशाची लष्करी पायावर उभारणी केली. १९३७ पासून जपानने चीनशी उघड युद्ध सुरू केले व चीनचे अनेक प्रदेश व्यापले. १९३९ साली दुसऱ्या जागतिक महायुद्धाला यूरोपात तोंड फुटताच जपानने जर्मनी व इटलीशी मैत्रीचा तह केला. फ्रेंच इंडोचायनावर हल्ला करून तो प्रदेश व्यापला परंतु अमेरिका, ब्रिटन, चीन व नेदर्लंड्स यांनी जपानची आर्थिक नाकेबंदी करण्यात यश मिळविले. याला प्रत्युत्तर म्हणून १९४१ मध्ये जपानी आरमाराच्या मदतीने जपानी हवाई दलाने पर्ल हार्बरवर हल्ले चढविले आणि अशा प्रकारे अमेरिका व इंग्लंड यांविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला जपानी लष्कराची सरशी होऊन जपानने खूप मोठे क्षेत्र व्यापले. त्यात मानिला, सिंगापूर, जावा, सुमात्रा व रंगून हे प्रदेश होते. पण लवकरच अमेरिकेने उलट हल्ले केले आणि जपानी सैन्याची अनेक क्षेत्रांत पीछेहाट झाली. १९४५ पासून पुढे जपानी बेटांवरील अमेरिकन हवाई हल्ल्यांचा जोर सतत वाढता राहिल्याने जपानचा पराभव स्पष्ट दिसू लागला. त्याच वर्षीच्या एप्रिलमध्ये जर्मनीने शरणागती पतकरली व यूरोपातील युद्ध संपुष्टात आले. जुलैमध्ये इंग्लंड, अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्या पॉट्सडॅम परिषदेतील जाहीरनाम्यानुसार जपानकडे या तीन राष्ट्रांतर्फे बिनशर्त शरणागतीची मागणी करण्यात आली. यानंतर ऑगस्टमध्ये हीरोशीमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकण्यात आले. रशियन फौजा मँचुरियात घुसल्या. हे होईतो जपान आपल्या साधनसामग्रीच्या बाबतीत कफल्लक झाल्याने पॉट्सडॅम जाहीरनाम्याच्या मागणीप्रमाणे त्याने दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती पतकरली. शरणागतीच्या अनुषंगाने जपानमध्ये दोस्त राष्ट्रांच्या सेना जनरल मॅक्आर्थरच्या नेतृत्त्वाखाली शिरल्या आणि त्यांनी विस्तृत प्रमाणावर लोकशाही सुधारणा घडवून आणल्या. १९४५ च्या नवीन संविधानात असे गृहीत धरण्यात आले की, देशाची सार्वभौम सत्ता जनतेच्या हाती असून सम्राट हा केवळ राष्ट्राचे व जनतेच्या ऐक्याचे प्रतीक आहे. या संविधानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यात युद्धाचा विचार सोडून दिला असून आंतरराष्ट्रीय मतभेद दूर करण्याचा उपाय म्हणून युद्धाचा वापर करण्याचा अधिकार जपानला नाकारला आहे. तसेच शस्त्रसज्जताही त्यात नाकारली असून युद्धाचा धिःकार करण्यात आला आहे.


१९५१ साली एक शांतता परिषद भरविण्यात आली व तीमध्ये शांततेच्या तहावर तसेच जपान-अमेरिकेच्या सुरक्षिततेच्या करारावर सह्या करण्यात आल्या. या दोन तहांच्या अंमलबजावणीनंतर जपानची व्याप्त भूमी मुक्त होऊन जपानला स्वतंत्र देशाचा दर्जा पुन्हा प्राप्त झाला. १९५९ मध्ये संयुक्त राष्ट्रे यांत जपानला प्रवेश मिळाला.

महायुद्धानंतर फार थोड्या अवधीतच जपानची अर्थव्यवस्था पुन्हा सावरली. १९५६ पर्यंत खनिज संपत्तीत आणि औद्योगिक निर्मितीत युद्धपूर्व काळाच्या तुलनेने दुपटीने वाढ झाली होती. तेव्हापासून अर्थव्यवस्थेचा विकासवेग जपानने सातत्यपूर्वक टिकविला आहे. मात्र १९७४ साली अचानक वाढलेल्या खनिज तेलाच्या भावामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला जोराचा धक्का बसला.

तारो, सोकामोतो (इं.);  खडपेकर, श्रीकृष्ण (म.)

राजकीय स्थिती: जागतिक राजकारणाच्या पटावर स्वतंत्र बलशाली राष्ट्र म्हणून जपानने आपले स्थान टिकविल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात त्याचा पराभव झाला आणि दोस्त राष्ट्रांच्या संयुक्त सैनिकदलांनी जपान देश व्यापला गेला. तथापि १९५२ मध्ये शांततेच्या तहावर सही करून जपानने आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळविले. युद्धातील पराभवानंतर धडाकेबंद पुनर्निर्माणाचा मार्ग स्वीकारून आपली आर्थिक घडी बसविण्यात जपानने एवढे यश मिळविले आहे की, जगातील औद्योगिक क्षेत्रातील अतिप्रगत राष्ट्रांत जपानची गणना केली जाते. एवढेच नव्हे, तर आशिया खंडातील आपल्या भौगोलिक स्थानामुळे चीन व भारताच्या बरोबरीने जपानला आंतरराष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

जपानची उमरावशाही शासनव्यवस्था म्हणजे तोकुगावा शोगुन. त्याचा १८६७ मध्ये शेवट झाला आणि सम्राटपदाचे पुनरुज्जीवन होऊन मेजी शासन अस्तित्त्वात आले. यामुळे विस्कळित देशाला आधुनिक राष्ट्राचे स्वरूप येण्यास आवश्यक असलेले एकीकरण घडून आले. १८६९ च्या मेजी संविधानानुसार जपानला संविधानात्मक राजेशाही प्राप्त झाली. ही घटना दुसऱ्या महायुद्धानंतर १९४७ साली अमेरिकेच्या लष्करी प्रशासनाने बदलली. या नव्या संविधानानुसार जनता ही  ‘सार्वभौम’ असून बादशाह किंवा सम्राट जनतेच्या ऐक्याचे प्रतीक आहे, असे मानले जाते. जुनी उमरावशाही मात्र नष्ट करण्यात आली. नवे संविधान संसदीय लोकशाही पद्धतीचे असून त्याचा आधार सार्वत्रिक प्रौढ मतदान हा आहे. या संविधानाप्रमाणे मूलभूत मानवी हक्कांच्या रक्षणाची हमी दिलेली आहे. संविधानातील वादग्रस्त अशा नवव्या कलमानुसार, ‘आंतरराष्ट्रीयझगड्यांच्या किंवा तंट्यांच्या निकालासाठी युद्धमार्ग वर्ज्य केला असूनयुद्धाखातर कोणतीही विशेष यंत्रणा देश उभारणार नाही’, असे आश्वासन दिले आहे. या कलमाच्या हेतूबाबत मात्र विविध मते आहेत. या कलमाप्रमाणे जपानला भूसेना, नौसेना आणि वायुसेना उभारण्याचा अधिकार नाही, असे काहींचे मत होते तर स्वसंरक्षणासाठी तो अधिकार आहे, असे काही लोक प्रतिपादतात. जनतेच्या सार्वभौम हक्कांची प्रतीक असणारी ‘डाएट’ किंवा जपानी संसद द्विसदनी असून तीत ‘प्रतिनिधि-सदन’ व ‘सल्लागार सदन’ (हाउस ऑफ कौन्सिलर्स) यांचा समावेश होतो. प्रतिनिधि-सदनात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या ४६७ असून त्याचा कार्यावधी ४ वर्षांचा असतो. १९६४ च्या सुधारित सार्वजनिक पद निर्वाचन विधीप्रमाणे ही संख्या ४८६ झाली. ‘सल्लागार सदन’ म्हणजे युद्धपूर्व ‘उमराव सभे’चे आधुनिक रूप असून त्यांत २५० सभासद असतात. त्यांपैकी १५० ची निवड शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींमधून होते आणि उरलेल्या १०० जागांसाठी देशभर मतदान होते आणि म्हणूनच यांना ‘राष्ट्रीय मतदार संघाचे प्रतिनिधी’ मानण्यात येते. या सदनातील सभासद आपल्या पदावर सहा वर्षे राहू शकतात. यांच्यापैकी अर्ध्यांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. प्रतिनिधिसदनाचे अधिकार मात्र सल्लागार सदनाहून श्रेष्ठ मानले जातात. या दोन सदनांतील मतभेदांचे निराकरण करण्यासाठी स्थायी समिती (स्टँडिंग कमिटी) ची स्थापना करण्यात आली आहे.

जपानमधील संसदीय मंत्रिमंडळपद्धतीचे इंग्लंडच्या संसदीय पद्धतीशी साम्य आहे. या मंडळात पंतप्रधानाखेरीज, राज्यमंत्री, तेरा शासकीय विभागांचे प्रमुख, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री वगैरे असून या मंत्र्यांपैकी अर्ध्यांहून अधिक दोन सदनांपैकी एकाचे तरी निर्वाचित सभासद असावे लागतात. सर्व निर्णयांची जबाबदारी संसद व मंत्री संयुक्तपणे स्वीकारतात. मंत्रिमंडळाबाबत प्रतिनिधी सभेने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो. अन्यथा प्रतिनिधि-सदन बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात.

महायुद्धोत्तर राजकीय पद्धतीत जपानने लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे स्थानिक स्वायत्तता व सत्तेचे विकेंद्रीकरण यांवर अधिक भर देण्यात आला. सर्व जपान जवळजवळ ५० शासन गटांत विभागलेला असून त्या प्रत्येक गटात पुन्हा अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या स्थानिक संस्थांचे व गटांचे कार्यकारी प्रमुख आणि सभासद जनतेच्या मतदानाने निवडले जातात. या निर्वाचितांना परत बोलावण्याचा वा कायदे घडविण्याचा आणि तो लागू करण्याचा अधिकार जनतेचा असतो. स्थानिक शासनसंस्था शिक्षण, औद्योगिक व आर्थिक विकास आणि नागरी स्थापत्य अभियांत्रिकी यांच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारते. तरीही स्थानिक आर्थिक तूट भरून काढण्यासाठी या प्रशासनसंस्थांना राष्ट्रीय अनुदानांवर अवलंबून रहावे लागते.

महायुद्धोत्तर नवीन संविधानाने न्यायालयांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची हमी दिलेली आहे. न्यायसंस्थेत सर्वोच्च न्यायालय, प्रांतिक व जिल्हा न्यायालये, कौटुंबिक न्यायालय इत्यादींचा समावेश होतो. यांखेरीज दोन अपील न्यायालये आहेत. सरन्यायाधीशाची नेमणूक मंत्रिमंडळाच्या शिफारशीप्रमाणे केली जाते. अन्य न्यायाधीशांचीही नेमणूक मंत्रिमंडळच करते. कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांची नेमणूक करताना मंत्रिमंडळ सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी स्वीकारते.

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले परंतु पुढे त्यांपैकी केवळ पाचच पक्ष प्रभावी ठरले. १९५५ मध्ये उदारमतवादी व लोकशाहीवादी पक्षांनी एकत्र येऊन उदार लोकशाहीवादी पक्ष जन्मला आणि हाच पक्ष सर्वांत प्रबळ बनला. या पक्षाला जपानमधील उद्योगपती, शेतकरी व सरकारी नोकर यांचा पाठिंबा आहे. १९४७ मध्ये समाजवादी पक्ष निवडणुकीत प्रभावी होता आणि त्याने समाजवादी संमिश्र सरकार बनविले होते परंतु १९५१ मधील शांतता तह व अमेरिका-जपान सुरक्षा करार यांबाबत मतभेद होऊन समाजवादी पक्षात डावेउजवे गट अशी फाटाफूट झाली पण १९५५ मध्ये त्यांच्यात एकोपा झाला. १९६० मध्ये उजव्या गटाने पक्षाबाहेर पडून नवीन लोकशाही समाजवादी पक्षाची स्थापना केली. युद्धोत्तर काळानंतर साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्ष कायदेशीर ठरला असूनही संसदेत (डाएट) तो फारच थोड्या जागा मिळवू शकला परंतु तो सामुदायिक संघर्षाच्या योगाने परिणामकारक ठरत आहे. चिनी-सोव्हिएट झगड्याच्या प्रसंगी जपानी साम्यवादी पक्षाने चीनची बाजू उचलून धरली परंतु लवकरच त्याने चीनची कास धरण्याचे सोडून आपली स्वतंत्र भूमिका जाहीर केली. १९६४ मध्ये अस्तित्त्वात आलेल्या ‘कोमेई’ या नवबौद्ध सोका-गाक्काई पंथाच्या राजकीय शाखेने स्थानिक संस्थांत व सल्लागार मंडळांत बऱ्याच जागा काबीज केल्या होत्या परंतु या पक्षाची लोकप्रियता बरीच कमी झालेली आहे. पुढे दिलेल्या १९७२ मधील निवडणूक आकडेवारीवरून प्रतिनिधि-सदनातील पक्षीय बलाबलाचे चित्र स्पष्ट दिसते : उदार लोकशाहीवादी पक्ष २७१, समाजवादी पक्ष ११८, कम्युनिस्ट पक्ष ३८, कोमेई पक्ष २९, लोकशाही समाजवादी पक्ष १९, इतर २, अपक्ष १४.

फुकूओ, नोदा (इं); खडपेकर, श्रीकृष्ण (म.)

जपानची संरक्षणव्यवस्था : जपानच्या सेनेला ‘स्वरक्षण सेना’ म्हटले जाते. कारण जपानमध्येच राहून जपानवरील आक्रमणास तोंड देणे एवढेच तिचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. सप्टेंबर १९४५ पर्यंत ‘साम्राज्य सेना’ या नावाने जपानी सेना ओळखली जाई. १८५३ पूर्वी जपानी संरक्षण संघटना सरंजामी पद्धतीची होती. सामुराई योद्धे या संघटनेचे प्रमुख घटक होते. त्यांचा पराभव झाला किंवा ते अवमानित झाले, तर ते ‘हाराकिरी’ म्हणजे आत्महत्या करीत. १८५३ मध्ये सामुराईंना निवृत्त करण्यात आले. ग्रेट ब्रिटन व जर्मनीच्या सल्ल्याने भूसेना व नौसेना यांची पुनर्रचना करण्यास आरंभ झाला. १९०४–०५ मध्ये रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राचा जपानने पराभव केला. आशियातील आघाडीचे राष्ट्र म्हणून जपानला जागतिक मान मिळाला त्यामुळे साम्राज्य स्थापण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण होऊन जपानने दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात आशियातील बऱ्याच राष्ट्रांवर अंमल बसविला तथापि या महायुद्धात शेवटी जपानचा पराभव झाला.

जपानी संरक्षकबलाचे ऐतिहासिक दृष्ट्या दोन कालपर्व होतात : पहिला दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा व दुसरा त्यानंतरचा. २५ जुलै १९२७ रोजी जनरल तानाका याने सम्राट हिरोहिटो यांना एक निवेदन सादर केले. त्यात जगावर अधिसत्ता स्थापण्याविषयीची योजना होती. प्रथम चीन, मंगोलिया काबीज करणे व नंतर हिंदुस्थान, आग्नेय आशिया व शेवटी यूरोप जिंकणे अशी ती योजना होती. चीन पादाक्रांत करण्यात जरी अपयश येणार असे दिसले, तरी जपानने ७ डिसेंबर १९४१ रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवामागे आवाक्याबाहेरच्या लष्करी व नाविक मोहिमा, कच्च्या मालाचा तुटवडा ही कारणे आहेत. ऑगस्ट १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांनी जपान व्यापून त्याला पूर्णपणे नि:शस्त्र केले. दुसऱ्या कालपर्वात १९४७ सालच्या जपानी संविधानाच्या नवव्या कलमान्वये युद्ध करणे हा गुन्हा ठरविण्यात आला. १९५०–५३ मध्ये झालेल्या कोरियातील युद्धामुळे संरक्षणनीतीत बदल करणे क्रमप्राप्त झाले. जपानातील दोस्त राष्ट्रांचे सैन्य कोरियात संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या वतीने लढण्यास पाठविण्यात आले. दोस्त राष्ट्रांचे सरसेनापती जनरल मॅक्आर्थर यांनी ७५,००० पोलिसांचे एक राष्ट्रीय पोलीस राखीव दल सज्ज करण्याचा आदेश जपानी शासनाला दिला. त्याकरिता अमेरिकेने साहाय्यही दिले. दलाची संघटना संरक्षकसेनेप्रमाणेच होती परंतु त्यावर लष्करी नियंत्रणाऐवजी मुलकी नियंत्रण होते. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच लोक कल्याणकारी कार्यात आणि राष्ट्रीय व प्रांतीय मुलकी पोलिसांना साहाय्य करणे अशी कामे या नवीन राखीव दलास देण्यात आली. २८ एप्रिल १९५२ रोजी शांतता तह अंमलात आल्यावर संरक्षक बलवृद्धीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला. १ ऑगस्ट १९५२ रोजी राष्ट्रीय पोलीस व सागरी सुरक्षा दल यांचे एकीकरण करून त्यास राष्ट्रीय संरक्षण कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आणले. राष्ट्रीय राखीव पोलीस व सागरी स्वरक्षण दलास अनुक्रमे ‘राष्ट्रीय स्वरक्षण बल’ आणि ‘किनारी स्वरक्षण बल’ अशी नवी नावे देण्यात आली. १ जुलै १९५४ रोजी जपानचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुनरुज्जीवन झाले. तेव्हा देशातील राजकीय परिस्थिती व आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेऊन नवीन संरक्षण संघटना उभारण्यात आली. वायुदल स्थापण्यात आले त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वरक्षण व किनारी स्वरक्षण बलांस अनुक्रमे भूसंरक्षण सेना व सागरी संरक्षण सेना, अशी नावे देण्यात आली. राष्ट्रीय संरक्षण नीतीविषयी शासनाला सल्ला देण्याकरिता जुलै १९५६ मध्ये राष्ट्रीय संरक्षण समिती स्थापण्यात आली. १९५७ मध्ये परत संरक्षणसेना व संरक्षणसामग्री वाढविण्याची आणि आधुनिकीकरणाची चतुर्वार्षिक योजना कार्यान्वित करण्यात आली. १९६० मध्ये अमेरिकेबरोबर एक सुधारित असा संरक्षण तह करण्यात आला.

जपान जरी औद्योगिक उत्पादनात त्याचप्रमाणे यांत्रिक-तांत्रिक क्षेत्रांत प्रगत आहे, तरी पेट्रोल, अन्नधान्ये व इतर कच्चा माल त्यास आयात करावा लागतो. शिवाय रशिया, चीन इ. शेजारी राष्ट्रांचे सामर्थ्यही त्यास लक्षात घ्यावे लागते. जपानच्या महत्त्वाच्या जलमार्गावर अडथळे आणू शकतील अशी काही राष्ट्रे आहेत. क्षेत्रफळ लक्षात घेता अणुयुद्ध झाल्यास जपानला आत्मरक्षणासाठी हालचाल करण्यास पुरेसा प्रदेश नाही. चीन-रशियांमधील बिघडलेल्या संबंधामुळे आज जरी धोका नसला, तरी भविष्यकाळात व विशेषतः अण्वस्त्रांचा प्रसार झाल्यास संकट उभे राहणे अटळ आहे. या पार्श्वभूमीवर जपानी संरक्षणनीती अधिष्ठित आहे. जनताकल्याणाकडे लक्ष ठेवून देशभक्ती वाढीस लावणे व संरक्षणाचा भक्कम पाया घालणे, राष्ट्राची क्षमता व आवाका लक्षात ठेवून परिणामकारी संरक्षण संघटना व सैन्य सज्ज ठेवणे आणि जोपर्यंत संयुक्त राष्ट्रे परिणामकारक नाहीत, तोपर्यंत अमेरिकेच्या सहकार्याने आक्रमणाला तोंड देणे ही जपानी संरक्षणनीतीची सूत्रे आहेत.

भूसेनेत १,५५,००० सैनिक १३ डिव्हिजन १ तोफखाना ब्रिगेड ८ साहाय्यक ब्रिगेड १,१८० रणगाडे व लहानमोठी प्रक्षेपणास्त्रे आहेत. अमेरिकन धर्तीच्या नौसेनेत ३९,००० सैनिक १५ पाणबुड्या व २९ विनाशिका आहेत. वायुसेनेत ४२,००० सैनिक सु. ४४५ लढाऊ विमाने ६ प्रक्षेपणास्त्र पलटणी इ. आहेत. संरक्षणखर्च सु. ४,४८४ दशलक्ष डॉलर आहे.

जपान हे एकच राष्ट्र असे आहे की, ज्याने अणुबाँबच्या विध्वंसक शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. आत्मरक्षणासाठी अणुबाँब व अण्वस्त्रे बनवावीत, अशी विचारसरणी पुढे येत आहे. जपानजवळ आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणूनच अण्वस्त्रनिर्मितीला बंदी घालण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांसंबंधी जपानने फारशी उत्सुकता दाखविलेली नाही. अमेरिका अण्वीय छत्रसंरक्षण जपानला देईल, असे वाटते.

जपानची सेना केवळ स्वरक्षणाच्या दृष्टीने संघटित आहे. तिच्यात आक्रमणक्षमता नाही. अमेरिकेच्या अण्वीय साहाय्यावर जपानी संरक्षणक्षमता अवलंबून आहे. तथापि क्षात्रपरंपरेच्या दृष्टीने व वैज्ञानिक, तांत्रिक दृष्टीने जबरदस्त सेना उभारणे जपानला कठीण नाही.

दीक्षित, हे. वि.


आर्थिक स्थिती : मेजी राजवटीच्या पुन:स्थापनेपासून (१८६८)जपानच्या अर्थव्यवस्थेची जलद वाढ होत गेली. सरंजामशाही तोकुगावा राज्यकर्त्यांच्या शेकडो वर्षाच्या अंमलाखाली राहिल्यानंतर विसाव्या शतकामध्ये जपान हा अनेक मोठ्या औद्योगिक देशांपैकी एक म्हणून अभ्युदयास आला. कृषियोग्य जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांची कमतरता असूनही, जपानी लोकांची कष्ट करण्याची प्रवृत्ती, उत्साह व कल्पकता यांच्या योगे जपानी अर्थव्यवस्थेची वेगाने भरभराट होत गेली. गेल्या शंभर वर्षांच्या काळात जपानी अर्थव्यवस्थेने लक्षणीय प्रगती केली. स्थूल राष्ट्रीय उत्पादन ३० ते ४५ पटींनी वाढले. गेल्या शतकात जपानची लोकसंख्या दहा कोटींच्या घरात पोहोचली. प्रतिमाणशी उत्पादन १० ते १५ पटींनी वाढले आहे.

१८८० पासून प्रत्येक दहा वर्षांच्या काळातील होत गेलेल्या जपानी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग जलद असला, तरी जागतिक अर्थव्यवस्था व विदेश व्यापारस्थिती ह्यांमध्ये होत गेलेले बदल आणि वारंवार झालेली युद्धे यांमुळे त्यात पुष्कळ प्रमाणात चढउतार होत असलेले दिसून येतात.

जपानच्या आर्थिक विकास-प्रक्रियेवर वेळोवेळी झालेल्या युद्धांचा मोठाच परिणाम झालेला आहे. १८९५ मध्ये चीनवर मिळविलेला विजय हा जपानला अतिशय लाभप्रद ठरला. एका वर्षाच्या आयात-किंमतीइतकी खंडणी जपानला सुवर्णाच्या स्वरुपात चीनकडून मिळाली. चीन-जपान युद्ध चालू असताना व नंतरच्या काळातही, जपानचे उद्योगधंदे प्रथमच मोठ्या प्रमाणात वाढू लागले. याउलट रशियाबरोबरचे युद्ध (१९०४–०५) जपानला फार महाग पडले. खंडणी मिळू शकली नाही व अर्थव्यवस्थेची गतीही मंदावली परंतु त्यानंतर पहिल्या महायुद्धामुळे जपानला मोठी संधी मिळाली. या युद्धात जपानला लष्करीदृष्ट्या कामगिरी करावयाची नसल्याने, देशातील उद्योगधंद्याच्या विकासावर पूर्ण लक्ष व शक्ती केंद्रित करता आली आणि त्यामुळे निर्यातीलाही मोठ्या प्रमाणावर उत्तेजन देणे शक्य झाले. दुसरे महायुद्ध म्हणजे जपानच्या अर्थव्यवस्थेवर महान अरिष्ट ठरले. आर्थिकदृष्ट्या दुसऱ्या महायुद्धामुळे जपानला आर्थिक वृद्धीची १८ वर्षे गमवावी लागली आणि परिणामी उत्पादकता, स्थूल राष्ट्रीय उत्पादन व वैयक्तिक सेवन ह्यांची दरडोई पातळी युद्धपूर्व स्थितीपर्यंत यावयास १९५४ साल उजाडावे लागले. या युद्धामुळे जपानची ३० लक्ष माणसे प्राणास मुकली त्याचप्रमाणे साम्राज्य, देशीतील एकूण यंत्रसामग्री, साधने, उपकरणे, अवजारे, इमारती व घरे ह्या प्रत्येकाचा चौथा हिस्सा गमवावा लागला. देशातील बहुतेक मोठी व महत्त्वाची शहरे नष्ट झाली. अर्थव्यवस्था संपूर्णतया विस्कळित झाली, सर्व गोष्टींची टंचाई निर्माण झाली, उत्पादनात खंड पडला व चलनवाढीने थैमान घातले. दोस्त राष्ट्रांच्या ताब्यातच सबंध देश सात वर्षे राहिला. कोरियन युद्धाने (१९५०–५३) मात्र जपानला आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभारावयाला मोठी संधी दिली. कोरियातील युद्धप्रयत्नांना पुष्टी देण्याकरिता अमेरिकेने जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेला डॉलरखर्च, त्याचप्रमाणे परदेशी होत असलेली जपानी मालाची मोठ्या प्रमाणावरील निर्यात ह्या दोन्ही गोष्टींमुळे जपानला अत्यावश्यक असे परदेशी चलन मिळाले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होण्यास मोठे प्रोत्साहन लाभले. व्हिएटनामी युद्धाचेही जपानच्या अर्थव्यवस्थेवर असेच अनुकूल परिमाण झाले.

जपानी अर्थव्यवस्था अशा प्रकारे जरी चढउतारांच्या हेलकाव्यांत सापडलेली दिसत असली, तरी अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन प्रवृत्ती विकासप्रमाणाचे गतिवर्धन व अधिक विकासक्षमता यांकडेच वळताना आढळून येते. मेजी अभ्युदयानंतरच्या पहिल्या पंधरा वर्षांत (१८८५ पर्यंत) उत्पादनात फारशी वाढ झाली नाही. शासनाने सरंजामशाहीचे अवशेष नष्ट केले, यादवी युद्धाला पायबंद घातला, राजकीय स्थैर्य निर्माण केले आणि नवनवीन संस्थांची उभारणी करावयास प्रारंभ केला. १८८० ते १९१० या काळात अर्थव्यवस्थेचा सरासरी वार्षिक विकासदर ३·८% होता १९१०–४० या कालखंडात विकासदर ४·६% झाला. औद्योगिक उत्पादनाने वेग घेतला, विशेषतः अवजड उद्योग व मूलोद्योग यांची वेगाने प्रगती झाली.  ही प्रक्रिया विशेषत्त्वाने १९३० पासून पुढे घडत गेली. त्यानंतरच्या युद्धोत्तर पुनर्रचनाकाळात म्हणजे १९५४–६७ पर्यंत अर्थव्यवस्थेच्या विकासाचा सरासरी वार्षिक दर १०·१% होता. या विकासदराशी जगात कोठेही तुलना होऊ शकत नाही. याच अल्पशा काळात स्थूल राष्ट्रीय उत्पादन ३.५ पटींनी वाढल्याचे तसेच जपानच्या औद्योगिक आकृतिबंधात विविधता आणि अत्याधुनिकता आल्याचे आढळते.

जपानचा आर्थिक इतिहास म्हणजे खाजगी उद्योग, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि साहाय्यकारी शासकीय धोरण यांच्या संमिश्रणाने बनलेली यशोगाथाच आहे. जपानी अर्थव्यवस्थेला खुला व्यापार आणि वस्तू, श्रम व पैसा यांची अंतर्गत स्पर्धाशील बाजारपेठ या दोहोंची सुरेख साथ लाभली. श्रमशक्ती, भांडवल व कच्चा माल ह्यांचा अत्यंत फायदेशीर व सम्यक उपयोग जपानने केला आहे.

गेल्या काही वर्षांत आर्थिक विकासाचा दर झपाट्याने वाढवून जपानने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. याचे प्रमुख कारण म्हणजे, औद्योगिक उत्पादनामध्ये विलक्षण झपाट्याने झालेली वाढ हे होय. १९६२ साली औद्योगिक उत्पादनात जी वाढ झाली होती, त्या पातळीच्या ३००% अधिक वाढ १९७१ साली झालेली आढळते. परिणामी, आर्थिक दृष्ट्या जगामध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने व रशिया यांच्या नंतर जपान हे तिसऱ्या क्रमांकाचे आर्थिक राष्ट्र मानले जाते. अनेक ‍निर्मिती उद्योगांच्या वस्तूंचा उत्पादक देश म्हणून जपानचा दुसरा वा तिसरा क्रमांक लागतो, तर जहाजबांधणी उद्योगात जपानची जगातील प्रमुख राष्ट्रांत गणना होते. १९६०–७० या दशकात जपानच्या निर्यात व्यापारात चौपट वाढ झाली असून १९७० च्या सुमारास जपानचा निर्यात व्यापार एकूण जागतिक व्यापाराच्या सु. ७% झाल्याचे आढळते.

अशी ही जलद आर्थिक प्रगती असूनही, इतर प्रगत देशांचे व जपानचे जीवनमान यांची तुलना केल्यास जपानचे जीवनमान अद्यापिही खालच्या पातळीवर आहे, असे दिसून येते. १९७० साली जपानचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन १,५८३ डॉ. होते व तरीही त्याचा जगात पंधरावा क्रमांक होता. हळूहळू जीवनमान-पातळी उंचावत आहे व सध्याच्या विकासदरांची पातळी लक्षात घेतल्यास १९८८ च्या सुमारास जपान हे जगातील सर्व देशांमधील पहिल्या क्रमांकाचे संपत्तिमान व वैभवशाली राष्ट्र बनू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

कृषी : शेती हा जपानमधील प्रमुख व्यवसायांपैकी एक असला, तरी त्याचे महत्त्व हळूहळू कमी होत आहे. मेजी राजवटीच्या पुनःस्थापनेच्या वेळी कृषि व्यवसायात सु. ८०% श्रमिक गुंतलेले होते. १९६० च्या पुढील काळात हाच आकडा २३ टक्क्यांवर आला. १९५० पासून शेतमजुरांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत गेली तरुण शेतकरी वर्गाचा लोंढा शहरांकडे वळू लागला. अनेक अडचणी असूनही कृषिउद्योग कार्यक्षम व अधिक उत्पादकता असणारा उद्योग म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण व पश्चिम भागांत पावसाचे प्रमाण बरेच आहे त्यामुळे या भागांत वर्षातून दुबार पिके काढण्यात येतात : उन्हाळ्यात भाताचे, तर गहू हे हिवाळी पीक म्हणून काढतात. देशाच्या उत्तर व पूर्व भागांत हिवाळी पीक काढणे अतिहिमवृष्टी व धुके यांमुळे दुरापास्तच असते. जपानमधील भूमी बऱ्याच प्रमाणात लाव्हारसापासून बनलेली असल्याने शेती फार कष्टाची ठरते. जमिनीची धूप एवढ्या प्रचंड प्रमाणावर होत असते की, देशाच्या बहुतेक भागांत शेतकऱ्यांना खनिज व रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक झाले आहे.


पारंपारिक जपानी शेतीची वैशिष्ट्ये म्हणजे लहान आकाराची शेते व श्रमप्रधान शेती. खतांचा अधिकाधिक वापर, जलसिंचन, सोपान शेती, अनेक पिके व आडपीक काढणे आणि प्रतिरोपण ही शेतीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. कमी आकारमानाच्या शेतांचे प्रमाण मोठे असल्याने मशागत अतिशय काळजीपूर्वक केली जाते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी देशात सघन शेतीचा मोठा प्रसार झाला होता परंतु युद्धोत्तर काळात कृषिविद्येत व तंत्रविद्येत असे महत्त्वपूर्ण बदल घडून आले. रासायनिक खते व कृषि-रासायनिके (उदा., जंतुनाशके इ.) ह्यांच्या वापरात होत गेलेली प्रचंड वाढ तांदूळ व इतर पिकांच्या उच्च पैदाशीच्या जातींची केलेली अधिकाधिक लागवड, मांस, दूधपदार्थ, फळफळावळ व भाज्या यांच्या उत्पादनात आणि कृषियंत्रांच्या वापरात झालेली मोठ्या प्रमाणावरील व अतिजलद वाढ, ही प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. १९७० मधील निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात कृषिउत्पादनाचा सु. ८% वाटा होता. अर्थव्यवस्थेच्या इतर विभागांशी तुलना करता कृषिविभागातील दरमाणशी उत्पादनाचे प्रमाण फारच कमी आहे. जपानी कृषिक्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक लहानलहान व अकार्यक्षम शेततुकडे हे होय. १९७० साली सु. ६०,७०,२९० हे. शेतजमीन ५३ लक्ष शेतकरी कुटुंबे कसत होती. १९७० च्या पुढील काळात सु. ३० लक्ष ग्रामीण कुटुंबांकडे प्रत्येकी ०·८ हेक्टराहूनही कमी शेतजमीन असून कित्येक शेतकऱ्याना आपली मिळकत वाढविण्याकरिता अन्य कामेही करावी लागत. मुख्यतः होक्काइडो प्रांतात १० ते १२ हेक्टरांपर्यंतच्या मोठाल्या जमिनी आढळतात. लागवडीस आणलेल्या एकूण जमिनीपैकी जवळजवळ निम्मी जमीन (सु. ४८%) भात या जपानच्या प्रमुख पिकासाठी कसली जाते. त्याखालोखाल महत्त्वाची इतर पिके गहू, बार्ली, बटाटे, सोयाबीन व चहा ही होत. इतर पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्याना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाते. १९७३ साली ५६·५ लक्ष हे. जमीन लागवडीस आणण्यात आली. तीपैकी भातशेतीखाली २६·२ लक्ष हे. जमीन व चहा, मलबेरी, हेंप यांसारख्या औद्योगिक (नगदी) पिकांकरिता २,३८,३०० हे. जमीन कसण्यात आली होती. त्याच वर्षी कृषिक्षेत्रात पुढीलप्रमाणे यंत्रावजारे वापरात होती : ३६ लक्ष मशागतयंत्रे व ट्रॅक्टर आणि १३ लक्ष भुकटी फेकयंत्रे. गेली काही वर्षे जपानला अंतर्गत सेवनाकरिता १५ ते २० टक्के तांदळाची आयात करावी लागे परंतु आता परिस्थिती पालटली असून तांदळाचे अत्युत्पादन होत असल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याचे कारण आहारामधील बदलांमुळे तांदळाच्या मागणीमध्ये घट निर्माण झाली आहे, त्याचबरोबर तांदळाच्या नवीन जातींपासून फार मोठ्या प्रमाणावर भातउत्पादन होत आहे. १९७३ मधील प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे. टन) : तांदूळ १२२·०, बार्ली १·७१, गहू २·०२, बटाटे १९·९, रेशीम व कोकून १·०५, सोयाबीन १·१८ आणि तंबाखू १·४५. बीट सारखेचे उत्पादन अंतर्गत मागणीच्या फक्त २० टक्के होत असल्याने ती क्यूबा, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या देशांकडून आयात करावी लागते. रेशीम उत्पादनाचे प्रमाण बरेच कमी झाले असूनही आजदेखील जपानची रेशीम उत्पादनात संबंध जगात पहिला क्रम लागतो. १९७२ साली फळफळावळीचे उत्पादन असे होते (आकडे लक्ष मे. टन) : पिअर ४·४३, सफरचंदे ९·५९, द्राक्षे २·६९, पर्सिमन फळे ३·०७, नारिंगे ३५·६८ व पीच २·४८.

डोंगराळ प्रदेश, लोकसंख्येचा ताण आणि जमिनीचा गुरचरणाऐवजी अन्नधान्ये पिकविण्यासाठी अधिककरून वापर या तिन्ही कारणांमुळे जपानमध्ये गवताळ कुरणे व चराऊ जमिनीचे क्षेत्र फारच मर्यादित आहे. १९७३ साली पशुधन पुढीलप्रमाणे होते (आकडे लाखांत) : गुरे ३५·९० (गाई १७.८), मेंढ्या ०·१७, बकरे १·३७, घोडे ०·७९, डुकरे ७४·९, कोंबड्या २,३२२·८. जपानमध्ये दूधउत्पादन वाढत आहे १९७२ साली ते ४९·४ लक्ष मे. टन होते.

भूसुधारणांना १९४६ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळच्या जपानी शासनाने ६६% जमीन युद्धपूर्व कमी किंमतीत विकत घेतली आणि कसदारांना सवलतीच्या दरात पुन्हा विकली. परिणामी १९५५ च्या सुमारास कुळे कसत असलेली जमीन पूर्वीच्या मानाने २५ टक्के राहिली आणि भूसुधारणांच्या पूर्वी कसणूक करणारे कूळप्रमाणे ६७ टक्के होते, ते नंतर ९ टक्क्यांवर आले.

अधिक महत्त्वाच्या पिकांच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, सरासरी भूधारणक्षेत्राचे आकारमान वाढविणे आणि ग्रामीण व नागरी उत्पन्नांमधील विषमता कमी करणे, असे शासनाचे कृषिविषयक धोरण आहे. भाताच्या लागवडीखालील क्षेत्र कमी करून ते अन्य उत्पादनासाठी (फळफळावळ, पालेभाज्या व तंबाखू) वापरावे व त्याबद्दल भात उत्पादकांस काही भरपाई द्यावी, असाही शासनाचा प्रयत्न चालू आहे. सरासरी भूधारणक्षेत्राचे आकारमान १९७७ पर्यंत १·६१ हेक्टरपर्यंत व्हावे, असे ठरविण्यात आले आहे.

जंगलसंपत्ती : जपानमध्ये मुबलक वृक्षसंपत्ती आहे. १९६५ मध्ये सु. २·५९ कोटी हे. जमीन जंगलव्याप्त असून सु. १·०१ कोटी हे. जमीन सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलांनी, तर सु. १·३३ कोटी हे. जमीन रुंदपानी वृक्षांच्या जंगलांनी व्यापलेली होती. १९७२ साली जंगले व गवताळ प्रदेश २५२·८ लक्ष हे. जमीन (एकूण जमिनीच्या ७०%) व सु. २१·०३ लक्ष घ.मी. लाकूड उपलब्ध होते. १९७१ साली औद्योगिक उपयोगाकरिता ६३० लक्ष घ.मी. व निरनिराळ्या प्रकारचे लाकूड पुढीलप्रमाणे मिळाले (लक्ष घ.मी.) : कापीव लाकूड २६३.२५, लगदा ६०·१९, पिट लाकूड ५·७३, प्लायवुड ८·५५, इतर ११४.८१, एकूण ४५२·५३. जंगलांपैकी बराच भाग दुर्गम्य तरी आहे किंवा इंधनोपयोगी आहे. एकूण जंगलव्याप्त क्षेत्रापैकी ६७% क्षेत्र खाजगी मालकीचे असून, तेही बहुसंख्य लघु धारकांमध्ये विभागलेले आहे. उर्वरित क्षेत्र सरकारी मालकीचे असून त्याच भागात मोठ्या प्रमाणावर पुनर्वनरोपण करण्यात येत आहे.

जपानमधील जंगले इंधन, इमारती लाकूड, कागद व रेयॉन यांकरिता लगदा पुरवीत असल्याने जपानच्या अर्थव्यवस्थेला साहाय्यभूत ठरली आहेत. पुष्कळशी घरे अद्यापही लाकडाचीच बांधण्यात येतात. डोगराळ प्रदेशांचे वैपुल्य, मुबलक पर्जन्यवृष्टी आणि भूकंप, वादळे व महापूर यांचे सातत्य यांमुळे वनव्यवस्थापन व जमिनीचे धूपनियंत्रण ह्या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक बनल्या आहेत.


खनिजसंपत्ती : जपानची खनिजसंपत्ती जरी विविध प्रकारची असली, तरी खनिजांचे साठे लहान असल्यामुळे त्यांच्या उत्पादनाचा मेळ मागणी-पुरवठ्याशी लावणे कठीण जाते. यांशिवाय खनिजांचा दर्जा हलका असून खनिजसाठे दूरदूरच्या भागांत विखुरलेले असल्यामुळे, खाणउद्योगात बरेच छोटे उत्पादक गुंतलेले आहेत खाणी फारशा कार्यक्षम नसल्यामुळे अद्ययावत खाणउद्योगाच्या कार्यपद्धती या छोट्या उत्पादकांना अवलंबिता येत नाहीत. अत्यंत महत्त्वाच्या खनिजांमध्ये कोळसा, तांबे, जस्त, शिसे व चांदी ही मोडत असून, इतर अनेक खनिजांचे (चुनखडी, तेल, नैसर्गिक वायू, गंधक व सोने) अल्प प्रमाणावर उत्पादन होते. निकेल, कोबाल्ट, बॉक्साइट, नायट्रेटे, सैंधव, पोटॅश, फॉस्फेट आणि खनिज तेल ह्यांचा देशात पूर्ण अभाव आढळतो.

दगडी कोळसा हे देशाचे सर्वांत महत्त्वाचे खनिज होय. १९७२ मधील त्याचे उत्पादन २·८२ कोटी टन होते, तथापि त्यायोगे जपानची केवळ ४५% मागणीच पुरी होत होती जपानच्या कोळशाचा दर्जा दुय्यम प्रतीचा असून त्याचे उत्पादनही अवघड असते उत्पादन परिव्यय खूप असतो. ७० टक्क्यांहून अधिक कोळशाची (कोकिंग कोल) बाहेरून आयात करावी लागते. क्यूशू व होक्काइडो या भागांत देशातील एकूण कोळसा-साठ्यांपैकी ४० टक्क्यांहून जास्त कोळशाचे उत्पादन होते. १९६९ साली या दोन कोळसा-उत्पादन केंद्रांमधून एकूण कोळसा-उत्पादनाच्या ९०% उत्पादन झाले. परदेशाहून मागविण्यात येणाऱ्या स्वस्त दराच्या कोळशामुळे उत्पन्न झालेली तीव्र स्पर्धा आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून तेलाकडे देण्यात आलेले अधिक लक्ष यांमुळे कोळसाउद्योग अडचणीत आला. १९६९ साली शासनाने कोळसाउद्योगाची पुन्हा उभारणी करणारा एक नवा कार्यक्रम आखला. कोळसाउद्योगाचे राष्ट्रीयीकरण न करण्याचा निर्धार शासनाने केलेला असून त्या उद्योगास आर्थिक साहाय्य व व्याजरहित कर्ज देण्याचे शासनाने ठरविले. या कार्यक्रमाची इतर वैशिष्ट्ये अशी : कोळसाउत्पादकांस शासकीय साहाय्य, या उद्योगाचे सुयोजन, सम्यक वितरणव्यवस्था. देशात उत्पादनयोग्य असे कोळसा साठे ३२० कोटी टनांचे असावेत, असा अंदाज आहे.

१९७२ मधील महत्त्वाचे खनिजउत्पादन तक्ता क्र. १ वरून स्पष्ट होईल.

तक्ता क्र. १

खनिजाचे नाव उत्पादन लक्ष

मे.टन/लिटर/घ.मी.

द. कोळसा २८२·०
लिग्नाइट १·०२
जस्त २·८१
लोहखनिज ७·९९
लोहपायराइट २५·९०
मँगॅनीज २.६०
चुनखडी १,३४२·५८
क्रोमाइट २,४८१·९०
तांबे १·१२
शिसे (हजार टन) ६३,४४९·00
टंगस्टन १५·५४
ॲल्युमिनियम १०·०९
मॉलिब्डिनम ४·१८
सोने (हजार किग्रॅ.) ७,५५९·00
चांदी (किग्रॅ.) ३·१२
अशुद्ध तेल (लिटर) ८·३३
नैसर्गिक वायू (घ.मी.) ५·००

तेलाचे साठे देशात अतिशय तुटपुंजे असून एकूण जागतिक तेलसाठ्यांच्या ०·०१% तेलसाठा असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. नवनवीन तेलखाणी शोधल्याखेरीज उपलब्ध साठे एकविसाव्या शतकाच्या सुमारासच संपण्याची भीती व्यक्तविण्यात येते. तेलसाठे असलेला पट्टा उत्तर होन्शूपासून होक्कोइडोमधील इशिकारी -यूफुत्सू खोऱ्यापर्यंत पसरलेला आहे. देशातील जवळजवळ सर्वच तेलउत्पादन होन्शूमधून–विशेषतः आकीता व नीईगाता जिल्ह्यांतून-होत असते. १९६०–७१ या काळात तेलउत्पादन ४८ टक्क्यांनी वाढले. नैसर्गिक वायुनिर्मिती होन्शू प्रांतात होते. दक्षिण कांटो व नीईगाता हे नैसर्गिक वायू उत्पादनाचे दोन प्रमुख जिल्हे होत. वरील काळातच नैसर्गिक वायूचे उत्पादन बरेच वाढले.

सबंध जगात अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हिएट रशिया ह्यांच्या खालोखाल पोलाद उत्पादक देश म्हणून जपानचा तिसरा क्रमांक लागत असला, तरी अंतर्गत लोहखनिजाचे उत्पादन अतिशय मर्यादित, हलक्या दर्जाचे व तुटपुंजे आहे. त्यामुळे जपानला मुख्यतः अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, मलेशिया, फिलिपीन्स व भारत या देशांवर लोहखनिजांच्या आयातीसाठी अवलंबून रहावे लागते. उत्तर होन्शू प्रांतात लोहखनिजाच्या खाणी आहेत. लोहखनिजाचे उत्पादनक्षम एकूण साठे ३·४० कोटी टन असल्याचा अंदाज आहे. तांबे हे जपानचे सर्वांत महत्त्वाचे धातुखनिज आहे. लहान खाणींतून तांबेनिर्मिती करतात. होन्शू व शिकोकू प्रांतांत तांब्याच्या मोठ्या खाणी आहेत. १९७० साली १·२० लक्ष टन तांब्यांचे उत्पादन झाले तथापि मागणी याहीपेक्षा अधिक आहे. गिफू जिल्ह्यात कामीओका येथे जस्ताचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. १९७० पासून दरवर्षी सु. २·८० लक्ष मे.टन जस्तखनिज उत्पादित करण्यात आले. जस्ताच्या बाबतीतील निम्मी गरज यामुळे भागू शकते.

मत्स्योद्योग : मोठा मच्छीमारी देश म्हणून जपानचा सबंध जगात पेरू देशानंतर दुसरा क्रम लागतो. १९७० साली जपानने ९३ लक्ष टन मासे पकडून आपला नजीकचा प्रतीस्पर्धी देश रशिया ह्याला मासे उत्पादनात २८ टक्क्यांनी मागे टाकले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक अतिप्रभावी मच्छीमारी राष्ट्र म्हणून जपानचा नावलौकिक असला, तरी मत्स्योद्योगापुढे काही महत्त्वाच्या गंभीर समस्या उभ्या आहेत. त्यांपैकी काही या उद्योगाच्या मूलभूत दोषांमुळे निर्माण झाल्या आहेत, तर काही इतर मच्छीमारी देशांबरोबर उद्‌भवलेल्या मासेमारीचे हक्क व क्षेत्र ह्यांसंबंधीच्या मतभेदांतून निर्माण झाल्या आहेत. अमेरिका व कॅनडा या देशांशी सॅमन माशांवरून, तर रशियाशी ओखोट्स्क समुद्र व इतर रशियन पाणक्षेत्रे यांवरून, दक्षिण कोरिया व चीन ह्यांच्याशी आपापल्या पाणक्षेत्राचा उपयोग जपानला मच्छीमारीसाठी किती प्रमाणात करू द्यावा यावरून, ऑस्ट्रेलियाशी आराफुरा समुद्रात पर्ल माशांवरून आणि इंडोनेशियाशी जलक्षेत्राच्या मालकीवरून वाद निर्माण झाले आहेत. परिणामी, १९६०–७० या दशकात सबंध जगाचे मासेमारी उत्पादन ७२ टक्क्यांनी, तर जपानचे केवळ ५० टक्क्यांनीच वाढल्याचे दिसून येते. १९६७ साली देशात १५ मोठे मच्छीमार कारखाने असून त्यांद्वारा एकूण मासेउत्पादनापैकी १८% उत्पादन केले जात होते. या उद्योगाच्या मधल्या स्तरावर सु. दहा हजार लहान मच्छीमार कारखाने असून ते ४० टक्क्यांहून अधिक मासेउत्पादन करतात. सर्वांत खालच्या स्तरावर सु. २·५ लक्ष मच्छीमार कुटुंबे असून त्यांच्याकडून उर्वरित मासेउत्पादन होते. १९६० पासून मत्स्योद्योग पदार्थांच्या निर्यातीमध्ये वाढ होत आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जागतिक मासेमारी उद्योगाच्या उत्पादनापैकी ५० ते ६६% उत्पादन जपानच्या मत्स्योद्योगाद्वारे केले जात होते. १९६८ मध्ये हे प्रमाण १३·५ टक्क्यांवर आले. जपान हा व्हेल मासेमारीमध्ये एक अग्रेसर देश आहे. १९७२ मध्ये व्हेलतेलाचे उत्पादन ६२,००० मे. टन झाले आणि त्यासाठी १४,०३९ व्हेल पकडावे लागले. त्याच सालचे सर्व प्रकारचे मासेउत्पादन (व्हेल सोडून) १०२ लक्ष मे. टन झाले. सॅमन, कॉड, ट्यूना व व्हेल हे माशांचे प्रमुख प्रकार असून मत्स्योद्योगात सहा लाखांवर माणसे गुंतली आहेत कोळ्यांच्या पाच हजार सहकारी संस्था असून सदस्यसंख्या पाच लाखांवर आहे.


विद्युतशक्ती : वीजनिर्मितीमध्ये जगात जपान एक अग्रेसर राष्ट्र आहे. देशात विपुल जलसंपत्ती आहे. डोंगराळ प्रदेशामध्ये जलविद्युत निर्मितीला फार मोठा वाव आहे. शिमांटो, टेन्‌ऱ्यू, टोने व कीसो नद्यांवर प्रामुख्याने जलविद्युत् निर्माण केली जाते. त्याचप्रमाणे टोहोकू व क्यूशू प्रांतांतही जलविद्युत्‌निर्मिती होते. जलविद्युत्‌निर्मितीच्या विकासामधील अडचणी लक्षात घेता, एकूण वीजउत्पादनाच्या ७५% वीजपुरवठा औष्णिक विद्युत्‌निर्मितीकेंद्रांपासून मिळतो. १९७० साली ८०,०८९ लक्ष किवॉ. ता. जलविद्युत् (एकूण पुरवठ्याच्या २२%) निर्माण झाली. १९६८ साली वीजनिर्मितीत अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हिएट रशिया यांच्या खालोखाल जपानचा तिसरा क्रमांक होता. ऑक्टोबर १९६५ मध्ये जपानचा पहिला आण्विक अभिकारक प्रतिवर्षी १·२ लक्ष किवॉ. याप्रमाणे टोकिओ-योकोहामा-छीबा प्रदेशाला वीजपुरवठा करू लागला. १९७२ साली ८५३ लक्ष किवॉ. वीजउत्पादन होऊ शकेल एवढी क्षमता देशात होती. त्याच वर्षी ४,२८४·८ लक्ष किवॉ. ता. वीजउत्पादन झाले. १९७१ च्या सुमारास देशात चार आण्विक अभिकारक शक्तिनिर्मितीकेंद्रे कार्य करीत होती आणखी अशी नऊ केंद्रे १९७५ पर्यंत कार्यवाहीत येणार होती. या सर्वांमुळे ३,६०० मेवॉ. वीजउत्पादनक्षमता उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. जपानमधील बहुतेक अभिकारक अमेरिकेच्या साहाय्याने बांधण्यात आले असून, १९८० च्या सुमारास जपानी तंत्रज्ञ स्वतःच अभिकारक उभारु शकतील अशी शक्यता आहे. १९८५ साली देशात एकूण वीजनिर्मितिक्षमता तीस ते चाळीस हजार मेवॉ. इतकी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

उद्योग : औद्योगिक क्षेत्रात जपानची जी विलक्षण व अतिजलद प्रगती घडून आली, तिचे तीन कालखंड पडतात व त्यांमध्ये निर्मितिउद्योगांची आघाडी हे जपानच्या आर्थिक विस्ताराचे व यशाचे गमक मानले जाते. १८६८ सालापासून जपानचा विकास होऊ लागल्याचे आढळते. १८६८ मधील सरंजामशाहीची सत्ता झुगारून देऊन १९१८ पर्यंतच्या ५० वर्षांच्या कालखंडात (पहिला टप्पा) इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा निर्मितीउद्योगांचे उत्पादन झपाट्याने वाढले. १९१८ च्या सुमारास जपान हा जगामधील एक महत्त्वाचा सामर्थ्यवान देश म्हणून गणला जाऊ लागला. दुसरा कालखंड १९१८ पासून दुसरे महायुद्ध सुरू होईपर्यंतचा. या काळात जागतिक महामंदीने बहुतेक सर्व देशांना भयंकर तडाखा दिला जपानही तीमधून सुटला नाही तथापि इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा अधिक लवकर व अधिक वेगाने जपान तीमधून सावरला आणि याही खेपेस, आशियामध्ये सर्व बाजूंनी त्याची आक्रमक वृत्ती दृग्गोचर झाली. याही वेळी निर्मितीउद्योगांनी, विशेषतः अवजड उद्योगांनी, विकासाचा उच्चांक गाठला. दुसरे महायुद्ध संपल्यापासून जपानच्या औद्योगिक विकासाचा तिसरा कालखंड सुरू होतो. दुसऱ्या महायुद्धात जपानची सर्व बाजूंनी भयंकर हानी झाली, तरीही तो तीमधून अतिशय आश्चर्यकारक रीतीने सावरला आणि याही खेपेस, निर्मितीउद्योगांची प्रचंड हानी होऊनही विकासाच्या बाबतीत त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली. अर्थात यावेळी व्यापार व अर्थकारण या क्षेत्रांनीही आपली प्रगती साधली. गेल्या काही वर्षांत जपानचा औद्योगिक विकासदर इतर कोणत्याही बिगरसाम्यवादी औद्योगिक देशापेक्षा अधिक असल्याचे आढळते. निर्मितीउद्योग जपानच्या निर्यात व्यापाराचा कणाच मानले पाहिजेत. जपानच्या बहुतेक आयातीचा वापर हेच उद्योग करतात.

औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीने जपानमधील उद्योगांची चार समूहांत विभागणी करता येते. पहिला समूह यंत्रे आणि यंत्रसामग्री उद्योगांचा. यामध्ये विद्युत्‌यंत्रे व यंत्रसामग्री आणि दळणवळण सामग्रीउद्योग हेही येतात. १९५५ पासून जपान हा जगामधील जहाजबांधणी करणारा अग्रेसर देश बनला असून जगातील एकूण जहाजांच्या बांधणीपैकी ५० टक्के बांधणी एकट्या जपानमध्ये होत असते. एप्रिल १९७३ ते एप्रिल १९७४ या काळात एकूण नोंदलेली १६१.८ लक्ष टनभाराची जहाजे देशात बांधण्यात आली त्यांपैकी १२८ लक्ष टनभाराच्या जहाजांची निर्यात करण्यात आली. ऑक्टोबर १९७२ मध्ये ‘ग्लॉबटिक टोकिओ’ नावाचे ४.७७ लक्ष भारवस्तू टनभार असलेले जगातील सर्वांत मोठे तेलटाके जहाज (टँकर) बांधण्यात आले. इतर वाहतूक सामग्रीमध्ये मोटारगाड्या, ट्रक, बसगाड्या, मोटारसायकली व स्कूटर आणि सायकली त्याचप्रमाणे रेल्वेएंजिने आणि अन्य रेलसामग्री ह्यांचा समावेश होतो. १९७२ साली यांत्रिक हत्यारे, मोटारी व टायर यांचे उत्पादन अनुक्रमे १,६४,५५३ ४०,२२,२८९ व ४·१२ लक्ष टन होते.

जपानचा इलेक्ट्रॉनिकी उद्योग गेल्या काही वर्षात अतिशय झपाट्याने विकास पावला असून सध्या हा देश या उद्योगाच्या बाबतीत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून रेडिओ, दूरचित्रवाणीसंच तसेच अनेक गृहोपयोगी उपकरणे मोठ्या संख्येने निर्यात केली जात आहेत. हा उद्योग इलेक्ट्रॉनिकी जनित्रे, चलित्रे व इतर अवजड सामग्री निर्माण करतोच, त्याशिवाय तो स्वयंचलित साधने, इलेक्ट्रॉनीय संगणक, त्याचप्रमाणे संदेशवहन व प्रक्षेपण सामग्रीचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो. १९७३ साली पुढील वस्तूंचे प्रचंड उत्पादन झाले (आकडे लक्षांत) : रेडिओ २४५, दूरचित्रवाणीसंच १२४, कॅमेरे ५७३. खालील वस्तूंचे १९७२ मधील उत्पादनही प्रचंड होते. (आकडे लक्षात) : दूरध्वनियंत्रे ४८·४, शिवणयंत्रे ४४·६१ धुलाईयंत्रे ४२·०१, प्रशीतक ३४·५५.

दुसरा औद्योगिक समूह धातुउद्योगांचा असून त्यांचा एकूण उत्पादनामध्ये १९६७ साली १७·१ टक्के वाटा होता. यांमध्ये लोखंड-पोलाद हा उद्योग सर्वांत मोठा गणला जातो. जपानला मोठ्या प्रमाणावर लोहखनिज, कोक कोळसा यांची व काही वेळा कच्च्या लोखंडाचीही आयात करावी लागते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी (१९४३) देशात ७७ लक्ष टन अशोधित पोलादाचे उत्पादन झाले १९७२ मध्ये त्याचे ९६९ लक्ष, कच्च्या लोखंडाचे ७४०·५५ लक्ष, तर वेल्लित पोलादाचे (रोल्ड स्टील) ८२५·५० लक्ष मे. टन उत्पादन झाले. सिमेंट उत्पादन ६६२·८९ लक्ष मे. टन झाले.

तिसरा औद्योगिक समूह रसायन उद्योगांचा आहे. रसायन उद्योगांचा उत्पादनमूल्याच्या दृष्टीने अलोह-धातुद्योग, यंत्रोद्योग, तेल आणि कोळसा व लोखंड आणि पोलाद या उद्योगांनंतर पाचवा क्रम लागतो. गेल्या काही वर्षांत ह्या उद्योगसमूहाने अतिजलद प्रगती केली आहे.

कापड व वस्त्रोद्योग हा चौथा सर्वांत मोठा उद्योगसमूह. रोजगारीच्या दृष्टीने मात्र कापडउद्योग हा रसायन उद्योग वा धातुउद्योग या समूहांपेक्षा मोठा आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जपानमध्ये कापडउद्योगाजवळ १३० लक्ष चात्या होत्या १९६४ मध्ये त्यांची संख्या ८४·२ लक्ष झाली. १९७२ साली कापड उत्पादन पुढीलप्रमाणे झाले : सुती धागा ५·५५ लक्ष मे. टन, सुती कापड २२,६४० लक्ष चौ. मी., लोकर धागा १,९६,४०० मे. टन लोकरीचे कापड ४,७९० लक्ष चौ. मी., रेयॉन कापड १२,७१० लक्ष चौ. मी., संश्लिष्ट धाग्याचे कापड २७,१८० लक्ष चौ.मी., रेशीम १,८२० लक्ष चौ. मी.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील जपानी अर्थव्यवस्थेच्या विकासाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निर्मितीउद्योगाने केलेली जलद आणि विस्मयजनक प्रगती. १९६० नंतरच्या काळात तर विविध उत्पादित पदार्थांमध्ये व वस्तूंमध्ये संख्या, गुणवत्ता, विविधता व कार्यक्षमता या चार दृष्टींनी फारच विलक्षण प्रगती दिसून आली आहे. परिणामी, जपान आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक राष्ट्र बनले आहे व त्याच्या उत्पादित मालाला जगाच्या स्पर्धाशील बाजारपेठांमध्ये फार मोठी मागणी असल्याचे आढळते. १९५६ पासून जहाजबांधणी उद्योगात जपान जगातील आघाडीचे राष्ट्र असून अशोधित पोलाद, कृत्रिम रबर, ॲल्युमिनियम, गंधकाम्ल, प्लॅस्टिके, सिमेंट, मोटरगाड्या, शुद्धीकृत तांबे व सूत उत्पादन यांमध्येही तो देश प्रमुख उत्पादक-देशांपैकी एक मानतात. जगामधील मोठे व सर्वांत अद्ययावत कारखाने जपानमध्ये आहेत. १९६८ साली जगातील सर्वांत मोठ्या ११ झोतभट्ट्यांपैकी ८ झोतभट्ट्या एकट्या जपानमध्ये होत्या. १९७१ साली जपानमध्ये ६,४३,५५२ कारखाने (सर्व आकारमानाचे) आणि ११४·६ लक्ष कामगार होते.


निर्मिति उद्योगाच्या सर्व विभागांनी १९५० पासून प्रगती केली असली, तरी लोखंड व पोलाद, यंत्रे व यंत्रसामग्री, पेट्रोरसायने आणि प्रगत इलेक्ट्रॉनिकीय उत्पादने यांमध्येच विशेष प्रगती झाल्याचे आढळते. याचेच निदर्शक म्हणजे १९६० साली वरील सर्व वस्तूंचे जे उत्पादन होते, त्यामध्ये १९७१ साली जवळजवळ तिप्पट वाढ झाली होती पेट्रोरसायनोद्योगाच्या जलद वाढीमुळे हे शक्य झाले.

जपानने ही जी आश्चर्यकारक औद्योगिक प्रगती साधली, तिची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर व अतिशय जलद रीतीने जपानने केलेली भांडवलगुंतवणूक हे होय.

१९६१–७० या दशकात जपानने आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा जवळजवळ ३३ टक्के हिस्सा भांडवलगुंतवणुकीकडे वळविला. त्यापैकी अर्धाअधिक भाग भांडवली उद्योगांकडे वळविण्यात आला. त्यामध्ये लोखंड व पोलाद उद्योग तसेच यंत्रनिर्मितीउद्योग यांना वाढणारी अंतर्गत बाजारपेठ तर मिळालीच, त्याचबरोबर या उद्योगांची उत्पादनक्षमता व कार्यप्रणाली ह्या दोन्हींमध्ये विलक्षण वाढ झालेली दिसून आली. शासकीय आकडेवारीनुसार निर्मितीउद्योगांमधील कामगार उत्पादकता १९६३–६९ या कालखंडात दुपटीने वाढली. १९६८ साली जपानमधील कामगार उत्पादकता ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी, फ्रान्स व इटली या देशांच्या कामगार उत्पादकतेपेक्षा अंदाजे ३५ टक्क्यांनी मोठी होती.

औद्योगिक विकासाचे दुसरे महत्त्वात्त्वाचे कारण म्हणजे जपानने अद्ययावत नवप्रवर्तनांचा सतत केलेला पाठपुरावा आणि वापर. शासकीय आकडेवारीनुसार १९५५–६५ दरम्यान निर्मितीउद्योगांमधील कामगार उत्पादकता ४४ टक्क्यांनी वाढली तिचे कारण तंत्रविद्येमधील अद्ययावत ज्ञानाचा जपानने करून घेतलेला वापर हे होय. जरी इतर प्रगत देशांच्या तंत्रविद्येचे जपानी लोकांनी यशस्वी रीत्या अनुकरण केले, तरी त्यांनीही स्वतः अनेक नवप्रवर्तने कार्यवाहीत आणली. सध्या देखील बहुतेक जपानी उद्योगांची प्रवृत्ती अशी असते की, इतरांनी लावलेले शोध आत्मसात करावयाचे, त्यांचा व्यापारी उपयोगासाठी अवलंब करावयाचा आणि त्यांवरून स्वस्त किंमतीच्या परंतु दर्जेदार वस्तूंचे उत्पादन करावयाचे.

प्रगत देशांचे हे अद्ययावत तंत्रज्ञान जपानला जे मिळाले, ते काही परदेशी उद्योगधंद्यांनी जपानमध्ये केलेल्या प्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारा नव्हे. कारण ही गुंतवणूक फार थोडी होती. जपानला पुढील तीन प्रमुख मार्गांनी अद्ययावत तंत्रज्ञान मिळाले : (१) अद्ययावत यंत्रसामग्रीची व साधनांची आयात (२) विदेशी तंत्रज्ञ व जाणकार ह्यांचे सहकार्य आणि (३) शिक्षण. शिक्षणामध्ये पुढील प्रकार येतात : जपानी तंत्रज्ञांना विदेशी पाठविणे, परदेशी प्रशिक्षक व मार्गदर्शक ह्यांना जपानमध्ये बोलावणे, जपानी शिक्षणपद्धती विकसित करणे, कार्यांतर्गत प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब आणि क्रमाक्रमाने विदेशी तंत्रज्ञ व प्रशिक्षक, मार्गदर्शक ह्यांच्या जागी प्रशिक्षित जपानी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे. याचा परिणाम असा झाला की, व्यवस्थापकीय, अभियांत्रिकीय आणि तांत्रिक कौशल्ये-कसबे ह्यांमध्ये केवळ वाढच झाली असे नव्हे, तर त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर विस्तार होत गेला. जपानी कंपन्यांनी विदेशी कंपन्यांबरोबर तांत्रिक सहकार्य तसेच परवाना व्यवस्था यांसंबंधी करार केले व अनेक पेटंटे खरेदी केली. सु. ४,००० हून अधिक पेटंटे कार्यवाहीत आणली गेली असून, त्याबाबतीत अमेरिकन कंपन्यांनी मोठाच हातभार लावल्याचे दिसते.

जपानमधील मोठ्या उद्योगांचे १९६० च्या पुढील काळात त्रिविध स्वरुप आढळते : पुनःपूंजीयन (टाय-अप्स), विलीनीकरण व दुसरी कंपनी ताब्यात घेणे (टेकओव्हर). १९५०–६० या दशकात जपानमधील ‘फेअर ट्रेड कमिशन’ या मक्तेदारी उद्योगांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने वर्षाला सु. ४०० विलीनीकरण-अर्ज मंजूर केले, तर १९६१–७० या दशकात या अर्जांची संख्या प्रतिवर्षी ९०० पर्यंत गेली. ‘यावाता स्टील कंपनी’ व ‘फुजी स्टील कंपनी’ या दोन पोलाद कंपन्यांचे विलीनीकरण १९६९ मध्ये मान्य करण्यात येउन ‘निप्पॉन स्टील कॉर्पोरेशन’ या मोठ्या पोलाद कंपनीची स्थापना करण्यात आली. या विलीनीकरणामुळे निप्पॉन स्टील कॉर्पोरेशन अशोधित पोलादाचे उत्पादन करणारी अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन’ नंतरची जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी झाली.

जपानमध्ये अनेक लहान आकाराच्या कंपन्या आहेत. १९६८ मध्ये अशा प्रकारचे सु. ६·०३ लक्ष छोटे निर्मिती-उद्योग असून त्यांपैकी ५·२२ लक्ष कारखान्यांत विसांहून कमी कामगार गुंतलेले होते. निर्मिती-उद्योगातील श्रमशक्तीच्या २७% कामगार या छोट्या कारखान्यांमध्ये असले, तरी ह्या कारखान्यांकडून एकूण उत्पादनांच्या १२% उत्पादन मिळू शकते. यांपेक्षा मोठे कारखाने १०० पेक्षा अधिक परंतु १,००० पेक्षा कमी कामगार नेमतात अशा कारखान्यांमधून एकूण उत्पादनाच्या ४०% उत्पादन व ३३% रोजगारी उपलब्ध होऊ शकते. ७०० प्रचंड उद्योगांमध्ये प्रत्येकी १,००० वर कामगार काम करीत असून निर्मिती-उद्योगांतील एकूण श्रमशक्तीच्या १७% कामगार व एकूण उत्पादनाच्या २९% उत्पादन या प्रचंड उद्योगांद्वारा उपलब्ध होते. सर्वसाधारणतः छोटे उद्योग हे अन्नपदार्थ, कापडवस्त्रे, लाकूड, चामडी आणि तयार कपडे यांसारख्या वस्तूंचे उत्पादन करण्यात गुंतलेले आढळतात.

एकूण श्रमशक्ती १ जुलै १९७४ रोजी ५२६·३ लक्ष असून तिचे विभाजन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षात) : कृषी व जंगलविभाग ६८·४, मासेमारी ४·१०, खाणकाम १·४०, बांधकाम उद्योग ४४·७, निर्मिती-उद्योग १४०·७, वाणिज्य व अर्थकारण १२७·९, वाहतूक, संदेशवहन आणि लोकोपयोगी सेवाउद्योग ३७·५, सेवा व्यवसाय ८१·५ शासकीय सेवा: १९·०.

जपानी कामगार संघटना तशा नवोदितच आहेत. दुसऱ्या महायुद्धापूर्वी देशात अनेक कामगार संघटना होत्या तथापि दुसऱ्या महायुद्धकाळात जपान अमेरिकन सैन्याच्या ताब्यात असताना, अमेरिकनांनी जपानी कामगारांकरिता संघटन करण्याचे, मालकांबरोबर सामुदायिक वाटाघाटी करण्याचे आणि संप करण्याचे हक्क मिळतील असे कायदेकानू केले, तेव्हा जपानी कामगार संघटनांत चैतन्य निर्माण झाले.

१९७३ साली ६५,४४८ कामगार संघटनांचे १२१ लक्ष कामगार सदस्य होते. कामगार संघटना उद्योगानुसारी आहेत. ‘फेडरेशन ऑफ आर्यन अँड स्टील वर्कर्स युनियन्स’ किंवा ‘फेडरेशन ऑफ टेक्स्टाईल वर्कर्स युनियन्स’ ह्यांसारख्या महासंघांशी तसेच चार राष्ट्रीय कामगार महासंघांशीही अनेक कामगार संघटना संलग्न आहेत. तथापि त्या त्या कामगार संघटनांना मालकांशी वाटाघाटी करण्याची मुभा असते. फेडरेशन युनियन्स व राष्ट्रीय कामगार महासंघ हे वेतनदर आणि अन्य मागण्या यांविषयी सर्वसाधारण धोरण आखतात. जपानच्या कामगार संघटनांचे वैशिष्ट्य म्हणजे कामगार संघटना व व्यवसाय संघटना यांमध्ये कामगार सदस्यत्व वा आंतरकामगार संघटना ह्यांवरून भांडणे किंवा स्पर्धा होत नाहीत. ग्रेट ब्रिटन, इटली वा अमेरिकेची संयुक्त संस्थाने या औद्योगिक दृष्ट्या विकसित देशांतील औद्योगिक संबंध-स्थितीपेक्षा जपानमधील औद्योगिक संबंध व वातावरण निश्चितच चांगले असल्याचे आढळते. चार राष्ट्रीय कामगार महासंघ पुढीलप्रमाणे : (१) सोह्यो (जनरल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स) – डाव्या गटाचा व राजकारणात अतिशय भाग घेणारा. हा महासंघ सर्वांत मोठा असून त्याचे ४० टक्के कामगार सदस्य आहेत. १९७३ मध्ये त्याचे ४3·४ लक्ष कामगार सभासद होते. (२) डोमेई कैगी (जॅपनीज कॉन्फेडरेशन ऑफ लेबर) – हा दुसऱ्या क्रमांकाचा, मवाळ आणि राजकारणात कमी प्रमाणात भाग घेणारा महासंघ असून सदस्यसंख्या १७% आहे. याची सदस्यसंख्या २२·८ लक्ष होती (१९७३). (३) चूरित्सू रोरेन (फेडरेशन ऑफ इंडिपेंडंट युनियन्स) – सदस्यसंख्या १०%. १३·७ लक्ष कामगार सदस्य (१९७३). (४) शिन्सांबेत्सू (नॅशनल फेडरेशन ऑफ इंडस्ट्रियल ट्रेड युनियन्स) – कामगार सदस्यसंख्या १ टक्का. सर्वव्यापक औद्योगिक नीतीची आवश्यकता, सत्तेचे केंद्रीकरण आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रीय कामगार महासंघ यांच्यामध्ये ऐक्य ह्यांसंबंधीच्या समस्या १९६० च्या पुढील काळात उद्‌भवल्या.


जपानचा विकास वेगाने होत असतानाच वेतनदरही झपाट्याने वाढत आहेत. १९६५–७० मध्ये वास्तव मजुरी (वेतन) ५० टक्क्यांनी वाढली, तर नामित वेतने ७५% वा त्यांहून अधिक वाढली. युद्धपूर्व–जपानमध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पादन २०० डॉ. होते परंतु १९४६ मध्ये ते १०० डॉ.हूनही खाली गेले. १९७० च्या सुमारास दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन १,७९५ डॉ. झाले. १९६९ च्या सुमारास कामावर असलेल्या सर्व लोकांचे सरासरी मासिक उत्पन्न ६४,३०० येन (१७९ डॉ.) होते. पुरुषांची प्राप्ती सरासरीने ७५,९०० येन, तर स्त्रियांची ३६,८०० येन होती. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून सामाजिक कल्याणसेवांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून येते. १९७० च्या अर्थसंकल्पात १५% रक्कम समाजकल्याणार्थ राखून ठेवण्यात आली होती. सामाजिक विम्यात आरोग्य, निवृत्तिवेतन, बेकारी, कामगार हानिपूर्ती ह्यांसंबंधीच्या विम्यांचा समावेश होतो. शासनाने ८०० च्या वर आरोग्यकेंद्रे सबंध देशभर उभारली आहेत. १९७३–७४ च्या अर्थसंकल्पात सामाजिक कल्याणाकरिता २,११,४५३ कोटी येन राखून ठेवण्यात आले होते.

व्यापार, अंतर्गत : जपानमधील विपणनसेवा गुंतागुंतीच्या व भिन्न प्रकारच्या आहेत. रस्त्यावरील फिरस्ते व्यापारी व फेरीवाले खाद्यपदार्थांचा व काही ग्राहकोपयोगी वस्तूंचा पुरवठा करतात. विक्रीकेंद्रांमधून खाद्यपदार्थांचे विविध प्रकार, कापड व वस्त्रे, घरगुती व इतर वस्तू विक्रीस ठेवलेल्या असतात. विविध वस्तूंची दुकाने शेकडो असून त्यांच्या शंभरांवर संघटना आहेत. जपानमधील पहिल्या विभागीय भांडाराची १९१० मध्ये स्थापना झाली. १९६४ मध्ये अशा भांडारांची संख्या २९२ होती. साखळी दुकानेही मोठ्या प्रमाणावर चालतात. ग्राहक, कृषिक व मच्छीमारीच्या सहकारी संस्थांचेही प्रमाण बरेच आहे. १९६६ मध्ये अंतर्गत व्यापारात ७१·२० लक्ष लोक गुंतलेले असून त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात १७% वाटा होता. घाऊक व किरकोळ व्यापार करणाऱ्या दुकानांची संख्या सु. १६·६१ लक्ष होती. त्यांपैकी ८२% दुकानांचे स्वरूप लहान असून त्यांमध्ये प्रत्येकी चार पेक्षाही कमीच माणसे कामाला होती.

किरकोळ व्यापारात रोखीचे व्यवहार चालू असतातच, तथापि हप्तेबंदी विक्रीचे विविध प्रकार ग्राहकप्रिय होऊ लागले आहेत. भित्तिपत्रके, जाहिराती, प्रदर्शने व अन्य प्रकारांनी मालाची विक्री वाढविण्याची प्रगत पश्चिमी राष्ट्रांतील तंत्रे जपानमध्येही जलद अवलंबिली जात आहेत. दैनिक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व विशेष प्रकाशने तसेच रेडिओ व दूरचित्रवाणी या माध्यमांचा जाहिरातींकरिता वापर केला जातो.

व्यापार, विदेश :   विदेश व्यापार तर आधुनिक जपानी अर्थव्यवस्थेचा कणाच होय. जपानच्या आर्थिक विकासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विदेश व्यापारात झालेली अतिजलद वाढ. १९६० पासून देशाचा  निर्यातव्यापार प्रतिवर्षी सरासरी १६ टक्क्यांनी वाढला त्याच काळात जागतिक निर्यात व्यापारात ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळते. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधील निर्यात व्यापाराचा हिस्सा १९७० मध्ये १०% होता प. जर्मनीचा हाच दर २०%, तर ग्रेट ब्रिटनचा २२% होता. निर्यातीत झालेल्या वाढीमुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात १४ टक्क्यांनी, तर देशातील लोखंड व पोलाद आणि मोटारनिर्मिती या दोन्ही उद्योगांच्या उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळते.

निर्यात व्यापारात प्रभावीपणे झालेल्या या वाढीची कारणे अशी : औद्योगिक उत्पादनातील वाढते वैविध्य, प्रगत विक्रय उत्तेजन तंत्रांचा अधिकाधिक वापर आणि निर्यात स्पर्धाशीलता. कामगार उत्पादकतेत झपाट्याने वाढ झाल्याने वेतन दर वाढलेले असतानाही जपानी कारखानदारांना आपापल्या वस्तूंच्या निर्यात किंमती, जागतिक बाजारपेठेतील प्रमुख स्पर्धक कारखानदारांच्या वस्तूंच्या किंमतीपेक्षा खालच्या पातळीवर ठेवणे सुलभ झाले. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर महत्त्वाचे यूरोपीय प्रगत देश ह्यांच्यापेक्षा जपानच्या निर्यात  किंमती १० ते १५ टक्क्यांनी खाली असल्याचे आढळून येते.

जपानच्या निर्यात व्यापारामध्ये १९६० पासून एक महत्त्वाचा बदल झाल्याचे आढळते. १९५८ मध्ये एकूण  निर्यात व्यापारात कापडवस्त्रोद्योग यांचा ३३% हिस्सा होता १९७० मध्ये हेच प्रमाण १२·५ टक्क्यांपर्यंत घसरले. यंत्रे व यंत्रसामुग्रीच्या निर्यातीमध्ये दसपटींनी वाढ झाली व त्यांचा एकूण निर्यात व्यापारातील हिस्सा ४६·३ टक्क्यांपर्यंत वाढला. इतर महत्त्वाचे निर्यात पदार्थ म्हणजे धातू व धातूनिर्मितिउद्योगांचे पदार्थ आणि रसायने. अन्नपदार्थांच्या निर्यातीचे पूर्वीचे महत्त्व आता बरेच घटले आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने जपानचा सर्वांत मोठा ग्राहकदेश असून तो जपानच्या एकूण निर्यातीच्या ३३% वस्तू खरीदतो. आग्नेय आशिया हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक व त्यानंतर पश्चिम यूरोप.

आयात व्यापारामध्ये प्रतिवर्षी सरासरी १५ टक्के वाढ होत असल्याचे दिसते. जीवनमानात होत असलेली वाढ व आयात नियंत्रणे रद्द करण्याचा शासनाचा विचार या गोष्टी लक्षात घेतल्यास, आयातीचे प्रमाण वाढेल अशी शक्यता दिसते. निर्यात सतत वाढत असल्याने आयातवृद्धी होऊनही जपानचा व्यापारशेष अनुकूल राहील, हे उघड आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती प्रतिकूल असल्यामुळे जपानच्या आयातीमध्ये कच्चा माल, अन्नपदार्थ व इंधने यांचे प्रमाण अधिक आढळते. १९७० मध्ये धातू आणि इतर महत्त्वाचा कच्चा माल यांचे आयात प्रमाण ३०%, इंधने २१% व अन्नपदार्थ १४% होते. जपानचे मोठे आयातदार देश म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (एकूण आयातीच्या ३०%), त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इराण, कॅनडा, इंडोनेशिया प. जर्मनी, फिलीपीन्स, सौदी अरेबिया व मलेशिया हे होत.

अर्थकारण : १, ५, १०, ५० आणि १०० येनची नाणी तसेच १००, ५००, १,०००, ५,००० आणि १०,००० येनच्या बँक ऑफ जपानच्या कागदी नोटा व्यवहारात प्रचलित असून विदेश विनिमयदर एप्रिल १९७६ मध्ये २९९ येन = १०० डॉलर असा होता.

देशातील आधुनिक बँकिंग पद्धतीचा विकास १८७२ पासून सुरू होतो. ‘द निप्पॉन गिंको’ (बँक ऑफ जपान) ही १८८२ मध्ये स्थापन झाली. तिचे भांडवल १० कोटी येन असून सप्टेंबर १९७३ मध्ये तिच्या ठेवी १,५२,५६३ कोटी येन होत्या. एक अतिशय सुविकसित बँकिंग पद्धती जपानच्या आर्थिक विकासाला वित्तपुरवठा करण्यात फार प्रभावी कार्य करीत आहे. बँका केवळ अल्पमुदतीच नव्हे, तर दीर्घमुदतीही कर्जपुरवठा करतात. १९५८–६८ या काळात जपानी उद्योगधंद्यांना बाहेरून मिळालेल्या एकूण वित्तनिधीपैकी वित्तसंस्थांनी (खाजगी व शासकीय) ८५·५ टक्के द्रव्य पुरविले. या एकूण द्रव्यनिधीपैकी ७७ टक्के द्रव्य खाजगी बँकांकडून मिळाले.


राष्ट्रीय वित्तसंस्थांवर नियंत्रण करणाऱ्या दोन संस्था : एक बँक ऑफ जपान, दुसरी वित्तमंत्रालय. बँक ऑफ जपान ही इतर देशांतील मध्यवर्ती, बँकांप्रमाणेच कार्य करते. देशाचा अर्धाअधिक कर्जव्यवहार सु. १०० व्यापारी बँका व तीन दीर्घमुदती पतसंस्था (‘ऑल बँक्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या) यांद्वारा पाहिला जातो. यामध्ये सर्वांत महत्त्वाच्या बँका म्हणजे १६ नागरी बँका. यांपैकी कित्येक बँकांना प्रदीर्घ इतिहास आहे. झैबात्सू या नावाने ओळखले जाणारे दुसऱ्या महायुद्धपूर्वकाळातील मोठे उद्योगधंदे व या बँका यांचे अतिनिकटचे संबंध होते. किंबहुना या झैबात्सूंनीच आपल्याला वित्तपुरवठा होण्याकरिता अशा बँका स्थापन केल्या होत्या. नागरी बँकांच्या २,००० हून अधिक शाखा सबंध देशभर कार्य करीत असून त्या बँकांची मत्ता एकूण व्यापारी बँकांच्या मत्तेच्या ७० टक्के आहे. उर्वरित ३० टक्के मत्ता ६५ स्थानिक बँका व ७ न्यासबँका ह्यांची भरते. परदेशी हुंडणावळीचे व्यवहार करणाऱ्या पूर्वीच्या ‘योकोहामा स्पिसी बँके’चे ऑगस्ट १९५४ मध्ये ‘बँक ऑफ टोकिओ’ असे नामरूपांतर करण्यात आले. बँक ऑफ टोकिओ जपानचे २५ टक्के विदेश विनिमय व्यवहार हाताळते. इतर विदेश विनिमय बँकांत १३ नागरी बँका व जपानची औद्योगिक बँक मोडतात. ‘जपानी औद्योगिक बँक’ ही उद्योगधंद्यांना गुंतवणूक भांडवलासाठी दीर्घमुदती कर्जे देणारी एक विशेष बँक आहे. ‘लाँग टर्म क्रेडिट बँक ऑफ जपान’ ही देखील उद्योगांसाठी अर्थप्रबंध करते. या दोन बँकांच्या कार्याला ‘जपान डेव्हलपमेंट बँके’ची साथ मिळाली आहे.

खाजगी बँका करीत नसलेल्या आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने अनेक विशेष संस्था स्थापन केल्या आहेत. उदा., ‘जपान निर्यात-आयात बँक’ अवजड उद्योगधंद्यांच्या वस्तूंची निर्यात व कच्च्या मालाची आयात करण्याकरिता तसेच परदेशांतील भांडवल गुंतवणुकीस प्रोत्साहान देण्याकरिता पतपैसा उपलब्ध करते ‘गृहनिवसन कर्ज निगम’ उद्योगसंस्थांना आपल्या कामगारांची घरे बांधण्याकरिता कर्जे देतो, तर ‘कृषी, वन आणि मच्छीमारी अर्थप्रबंध निगम’ त्या त्या उद्योगाला आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य करतो. अतिशय छोट्या उद्योगधंद्यांच्या प्रवर्तकांना मोठ्या वित्तसंस्थांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ‘पीपल्स फिनान्स कॉर्पोरेशन’ स्थापण्यात आली आहे (१९४९), तर १० कोटी येन किंवा त्यांहून कमी भांडवल त्याचप्रमाणे ३०० पेक्षा कमी कामगार असणाऱ्या  लघुउद्योगांकरिताही ‘लघुउद्योग वित्तप्रबंध निगम’ शासनाने स्थापिला आहे. प्रत्येक मोठ्या शहरात समाशोधनगृह असून त्यांची एकूण संख्या ८० आहे. टोकिओ व ओसाका येथील समाशोधनगृहे सर्वांत मोठी आहेत. जपानी बॅँकांच्या विदेश-शाखांच्या संख्येत अतिजलद वाढ होत असून सध्या अशा १०० शाखा आहेत त्यांपैकी बँक ऑफ टोकिओच्याच ४० शाखा आहेत. १९८०–८५ च्या सुमारास यांमध्ये आणखी १०० शाखांची भर पडेल असा अंदाज आहे. १९७४ मध्ये सबंध जगातील पहिल्या सर्वांत मोठ्या ५० बँकांमध्ये एकट्या जपानच्या १४ बँका होत्या.

जपानमध्ये कोणत्याही विमाकंपनीस आयुर्विमा आणि इतर विमाविषयक (आग, सागरी अपघात वगैरे) व्यवहार एकाच वेळी करता येत नाहीत. देशात जीवन आणि इतर बाबींसंबंधी विमाव्यवहार करणाऱ्या  चाळिसांवर जपानी विमाकंपन्या असून बऱ्याच परदेशी विमा कंपन्याही आहेत. आयुर्विमा कंपन्यांच्या चालू मालमत्तेपैकी ६० टक्के रक्कम कर्जस्वरूपात औद्योगिक क्षेत्रास पुरविली जाते. व्यापारी बँका, दीर्घमुदती पतपुरवठा करणाऱ्या बँका तसेच न्यास बँका यांच्याप्रमाणे आयुर्विमा कंपन्यांनी औद्योगिक भांडवल पुरविण्याच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

देशातील महत्त्वाचे शेअरबाजार टोकिओ, हीरोशिमा, फुकुओका, नागोया व ओसाका येथे असून लहान शेअरबाजार क्योटो, कोबे, नीईगाता व साप्पोरो येथे आहेत. टोकिओ शेअरबाजार हा सर्वांत मोठा व महत्त्वाचा असून त्याचे ८३ सभासद आहेत. १९६० मध्ये या शेअरबाजारात ५९९ कंपन्यांच्या शेअरांचे व्यवहार चालत असत १९६८ अखेर ही संख्या १,२४२ झाली. दुसऱ्या महायुद्धापूर्वी बहुतेक सर्व भागभांडवल झैबात्सूंच्या मालकीचे असे तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र भागभांडवलाची मालकी जनसामान्यांपर्यंत विस्तारली. परिणामी वैयक्तिक भागभांडवलाच्या मालकीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येते.

खाजगी भागधारकांची संख्या दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी १६·७ लक्ष होती ती १९६२ मध्ये १६१ लक्ष, तर मार्च १९६८ मध्ये १७९·३ लक्ष झाली. अंदाजे १८० लक्ष लोक म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के लोक भागधारक आहेत. हे प्रमाण ग्रेट ब्रिटनमधील प्रमाणाएवढे असून फक्त अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत याहून अधिक प्रमाण आहे. १९६८ च्या सुमारास सूचित शेअरांपैकी ४१ टक्के शेअर खाजगी लोकांकडे, तर उर्वरित संस्थांच्या मालकीचे असल्याचे आढळून आले. जपानी शेअर व रोखे यांमधील परदेशी कंपन्यांची गुंतवणूक १९५६ मध्ये केवळ ९५ लक्ष डॉ. होती ती १९६८ मध्ये ५,५०० लक्ष डॉ. एवढी वाढली. यावरून जपानी अर्थव्यवस्था केवढ्या प्रचंड प्रमाणात व झपाट्याने विकास पावत आहे, हे स्पष्ट होते.

राष्ट्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीस दरवर्षी ऑगस्टमध्ये प्रारंभ होतो. एप्रिलमध्ये अर्थसंकल्प संसदेस सादर करण्यात येतो. १९७२–७३ च्या अर्थसंकल्पातील महसुलांच्या बाबी पुढीलप्रमाणे (आकडे कोटी येनमध्ये) : मुद्रांक : ९,१३,०५० सार्वजनिक बंधपत्रे : २,३१,००० मक्तेदारी नफा : ३२,४३८ इतर : ३५,४०६. खर्चाच्या बाबी : सामाजिक सुरक्षा १,६८,२१६.७ शिक्षण आणि विज्ञान : १,३६,०७४ संरक्षण : ८२,१४०.१ सरकारी बांधकामे : २,६४,०९८.६ स्थानिक अर्थकारण : २,३६,५९९.५ निवृत्तिवेतने : ३६,७७३.६ संकीर्ण : २,८७,९९२.४.

दुसऱ्या महायुद्धपूर्वकाळात अप्रत्यक्ष करांचे प्रमाण प्रत्यक्ष करांपेक्षा अधिक होते परंतु युद्धोत्तर काळात जपानने आपल्या करपद्धतीमध्ये बदल करून तिच्यात प्रत्यक्ष करांवर अधिक भर दिला. सर्वांत महत्त्वाचे कर म्हणजे प्राप्तिकर, निगमकर व मद्यार्क-कर हे होत. या तीन करांपासूनचे १९६९ च्या अर्थसंकल्पातील उत्पन्न एकूण राजस्वाच्या ७८ टक्के होते.

करभाराचे पुनर्वाटप होण्यासाठी १९६९ मध्ये शासनाने करपद्धतीत सुधारणा केल्या. लहान व मध्यम वर्गांतील प्राप्तिदारांवरील करांचे ओझे कमी होण्यासाठी प्राप्तीवरील करांमध्ये घट करण्यात आली. मात्र त्याचबरोबर, निर्यातीस प्रोत्साहन, तंत्रविद्येचा विकास व छोट्या उद्योगधंद्यांचे आधुनिकीकरण या तीनही गोष्टी साधण्यासाठी निराळ्या करयोजना राबविण्यात आल्या. स्थानिक करांपैकी, मालमत्ता करामध्ये बरीच घट करण्यात आली. त्याचप्रमाणे वैयक्तिक भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली. प्रमाणित आकारमानाचे कुटुंब (पाचजणांचे कुटुंब) वर्षाकाठी ९,३५,०९३ येन किंवा त्यांपेक्षा कमी मिळवीत असेल, तर त्या कुटुंबाच्या मिळकतीवर कर नाही, असे धोरण ठरविण्यात आले. १ जून १९६१ रोजी शासनाने नवे जकात सूचिपत्रक तयार केले. १९१० सालानंतरचे हे पहिले नवे सूचिपत्रक. मूल्यानुसार जकातदर आकारण्यात येतात. जकातदर खालच्या पातळीवरील असतात. आयात नियंत्रण व नियमन हे अशा जकातींपेक्षा प्रत्यक्ष आयात परवाने देऊन, परदेशी हुंडणावळीवर तसेच पतीवर निर्बंध घालून अंमलात आणले जाते. महत्त्वाच्या वस्तूंच्या उत्पादनार्थ आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर जकात बसविली जात नाही अथवा अल्प दराची जकात आकारतात. खाद्यपदार्थ व आवश्यक वस्तू यांबाबतही असे धोरण आहे.


परदेशी गुंतवणूक :   शासकीय सांख्यीकीनुसार जपानमधील एकूण प्रत्यक्ष परदेशी भांडवल गुंतवणूक ३० जून १९६८ पर्यंत ५,५०० लक्ष डॉ. होती. १९६८ च्या एका सर्वेक्षणानुसार ५१९ परदेशी कंपन्यांपैकी २९ टक्के कंपन्यांची बहुतेक मालकी परदेशस्थ मूळ कंपनीकडेच असल्याचे आढळले. एकूण कंपन्यांपैकी ६५ टक्के अमेरिकन कंपन्या होत्या. त्यानंतर पुढीलप्रमाणे क्रम होता : स्वित्झर्लंड (४१ कंपन्या), ग्रेट ब्रिटन (२६), प. जर्मनी (२५), फ्रान्स (१८) आणि कॅनडा (१३). १९६८–६९ सालामधील नवीन भांडवल गुंतवणूक १० कोटी डॉलरहून अधिक नव्हती.

देशांतर्गत व परकीय कंपन्यांवर विस्तृत व विविध प्रकारचे निर्बंध लादलेले असतात. वस्तू, उत्पादन, किंमतनिर्धारण व विस्तार यांबाबतीत सर्व महत्त्वाच्या उद्योगधंद्यांना मार्गदर्शन केले जाते. १९६० चा परकीय गुंतवणूक अधिनियम अद्यापही जारी असून त्यायोगे, जपानी अर्थव्यवस्था सुव्यवस्थित चालण्यास साहाय्यभूत ठरेल, अशा परदेशी भांडवलास निवडक तत्त्वांवर देशात गुंतवणूकीस मान्यता मिळते. परकीय कंपन्यांना त्याबाबतची बोलणी शासनाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योग मंत्रालयाबरोबर करावी लागतात.

जपानी कंपन्यांनी जपानबाहेर भांडवल गुंतविण्यास १९६५ च्या पुढे प्रारंभ केला, त्याची तीन प्रमुख कारणे आहेत : (१) जपानमध्ये जाणवत असलेला जागेचा अभाव. जपानचे क्षेत्रफळ जरी ग्रेट ब्रिटनच्या दीडपट असले, तरी ८० टक्के क्षेत्र डोंगराळ आहे. उर्वरित सपाट भागात गेल्या २० वर्षांच्या प्रचंड औद्योगिकीकरणामुळे नवीन उद्योग उभारावयास जागाच शिल्लक राहिलेली नाही. (२) कामगार टंचाई आणि (३) देशातील जल व वायू यांचे झपाट्याने होत असलेले प्रदूषण. १९६९ पासून जपानी कंपन्यांनी अतिशय वेगाने परदेशात भांडवल गुंतविण्यास प्रारंभ केला. १९७३ च्या जागतिक तेल अरिष्टामुळे हा वेग जरी मंदावला असला, तरी १९८५ च्या सुमारास जपानची परदेशी भांडवल गुंतवणूक ९०० कोटी डॉलरच्या घरात जाईल, असा शासकीय अंदाज आहे. असे असले तरी, परदेशी भांडवल गुंतवणूकीत सबंध जगात अमेरिकेनंतर जपानचाच दुसरा क्रमांक लागतो. प्रतिवर्षी सु. ६ ते ८ कोटी डॉ. याप्रमाणे जपानी कंपन्यांची परदेशात भांडवल गुंतवणूक होत असते.

वाहतूक व संदेशवहन : एकोणिसाव्या शतकाच्या मध्यासही बहुसंख्य जपानी पायीच प्रवास करीत. लहान गाड्या, ढकलगाड्या, बैलगाड्या, पालख्या हीच काय ती प्रवाससाधने उपलब्ध होती. टोकिओ आणि योकोहामा ह्यांमध्ये पहिला लोहमार्ग १८७२ साली बांधण्यात आला इतरत्रही असेच मार्ग, अनेक पूल व बोगदे बांधण्यात आले. याच सुमारास लोखंडी जहाजे व आधुनिक बंदरे बांधावयास सुरुवात झाली. रस्ते बांधणीस मात्र या इतर वाहतूकमाध्यमांच्या मानाने बराच उशीर झाला.

जपानची मोठी शहरे म्हणजे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची व मालाची प्रचंड आवक-जावक असलेली आकर्षणकेंद्रे बनली आहेत. टोकिओच्या महानगरीय लोकसंख्येच्या दृष्टीने (२·२० कोटी) ते वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्रस्थान ठरले आहे. त्यानंतरचे मोठे वाहतूक केंद्र ओसाका, तिसरे मोठे वाहतूक केंद्र म्हणजे नागोया (लोकसंख्या ६६ लक्ष). ही सर्व महानगरे मोठ्या व आंतरराष्ट्रीय बंदरांनी जोडलेली आहेत. कीटा-क्यूशू, फुकुओका, साप्पोरो, सेंदाई व हीरोशीमा ही वाहतुकीच्या दृष्टीने इतर महत्त्वाची शहरे होत.

आंतरशहरी किंवा आंतरप्रदेशीय प्रवासी व माल वाहतूक सर्वांत मोठ्या दोन महानगरीय प्रदेशांतून रेल्वे, रस्ते, किनारीय जलमार्ग व हवाई मार्ग यांद्वारा होत असते. क्यूशू (तिसरे सर्वांत मोठे बेट) व होन्शू (सर्वांत मोठे बेट) हे दोन्ही प्रदेश समुद्रांतर्गत लोहमार्गीय बोगद्याने तसेच दुमजली बसगाड्या धावू शकतील, अशा भुयारी रस्त्यानेही जोडलेले आहेत. हे दोन्ही प्रदेश सध्या एका मोठ्या झुलत्या पुलाने जोडण्यात येत आहेत. होक्काइडो व होन्शू ही दोन्ही बेटे भुयारी लोहमार्गांनी (अंतर ६१ किमी.) जोडण्यात येत असून हे बांधकाम १९७८ साली पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. यापैकी २२·५ किमी. मार्ग सागराच्या पोटातून जातो. चौथे मोठे बेट शिकोकू हे होन्शू बेटाशी तीन मोठ्या पुलांनी जोडण्याची योजना आहे. प्रमुख बेटाभोवतालची अनेक लहान लहान बेटे प्रमुख बेटांना पुलांनी जोडण्यात आल्याने जपानचे ‘द्वीपसमूहांचा देश’ हे अभिधान हळूहळू नाहीसे होऊ लागले आहे. संदेशवहन सुविधांचे जाळे तसेच टपालसेवाव्यवस्था उत्कृष्ट असणाऱ्या जगातील काही देशांपैकी जपान हा एक देश आहे.

रस्ते : जपानची एकूण प्रगती व जपानमधील मोठ्या प्रमाणावरील मोटारगाड्या ह्यांच्या संदर्भात जपानी रस्त्यांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. ३१ मार्च १९७२ रोजी देशातील सर्व रस्त्यांची (नागरी व स्थानिक–ग्रामीण रस्ते धरून) एकूण लांबी १०,३७,७६३ किमी. होती. तथापि यांपैकी सु. / रस्ते मोटरगाड्यांना वापरण्याजोगे नाहीत. राष्ट्रीय मार्गांची लांबी ३२,८१८ किमी. असून त्यांपैकी २८,६७२ किमी. मार्ग फरसबंदीचा होता. १९७० च्या सुमारास टोमेई एक्स्प्रेस-वे (टोकिओ व नागोया यांना जोडणारा) आणि मीशिन एक्स्प्रेस-वे (नागोया व कोबे यांना जोडणारा) यांसारखे काही द्रुतमार्ग बांधण्यात आले. १९७० पासून एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या दोन टक्के वाटा रस्तेबांधणीसाठी खर्चण्यात आल्याचे दिसते. १९२० पर्यंत जपानमधील बहुतेक रस्ते पादचाऱ्याकरिता राखून ठेवले जात घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या वाहनांसही त्यांच्या वापरास बंदी व लोकसंख्येच्या मानाने मर्यादित भूमिक्षेत्र अशा दोहोंचाही जपानच्या रस्ते विकासावर फार मोठा परिणाम झाल्याचे आढळते.

जपानमध्ये मोटरगाड्या व तिचाकी ट्रक यांच्या संख्येत आश्चर्यकारक रीत्या प्रचंड वाढ झालेली आहे. १९३५ साली त्यांची संख्या केवळ १·२५ लक्ष होती १९७३ च्या अखेरीस त्यांची संख्या २·४५ कोटी होती (१,४४७ लक्ष मोटारी व १०० लक्ष ट्रकगाड्या). फक्त अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतच यापेक्षा मोटरींची अधिक संख्या आढळते. जगातील मोठ्या राष्ट्रांमध्ये प्रत्येक एकक क्षेत्रफळामागे मोटरगाड्यांचे सर्वाधिक प्रमाण असणारा जपान हा एकमेव देश आहे. मोटरगाड्यांचे प्रमाण फार असलेल्या देशांपेक्षाही जपानमध्ये ट्रकगाड्यांचे प्रमाण फार मोठे आहे. फक्त १९७० सालीच मोटरगाड्या ट्रकगाड्यांहून अधिक होत्या. १९७० पासून ट्रकगाड्यांनी वाहून नेलेल्या मालाचे प्रमाण हे रेलगाड्यांनी वाहून नेलेल्या मालाच्या प्रमाणापेक्षाही अधिक असल्याचे आढळते. मोठे ट्रक व आधान-पात्र सेवा (कंटेनर सर्व्हिस) यांचीही झपाट्याने वाढ होत आहे. स्वतःच्या मोटरीने कामाला जाणाऱ्याच्या संख्येत फार मोठी वाढ होत आहे. मोटरवाहतुकीपासून निर्माण होणारे प्रदूषण कसे टाळता येईल, ही व अन्य समस्या ह्यांच्या निरसनार्थ विविध तंत्रविद्याविषयक उपकरणे व साधने यांचा अभ्यास तसेच रस्तेवाहतुकीची कार्यक्षमता व सुरक्षितता यांच्यात वाढ कशी होईल, यांसंबंधीही विचार व संशोधन चालू आहे.


रेल्वे :   रस्ते वाहतूक व हवाई वाहतूक या साधनांच्या तीव्र स्पर्धेला तोंड देऊनही प्रवासी व माल या दोहोंच्या वाहतुकीचे महत्त्वाचे कार्य रेल्वे करीत आहे. १९७२ साली जपानी लोहमार्गांची लांबी सु. २७,५१७ किमी. असून (सरकारी मालकीच्या–जपान राष्ट्रीय रेल्वे–लोहमार्गांची लांबी २०,९२४ किमी. आणि खाजगी कंपन्यांचे लोहमार्ग : ६,५९३ किमी.) त्यांपैकी १२,२९२ किमी. लोहमार्गांचे विद्युतीकरण झाले होते (सरकारी : ६,६८५ किमी., खाजगी : ५,६०७ किमी.). जपानमधील पहिली आगगाडी टोकिओ ते योकोहामा बंदर अशी १८७२ मध्ये सुरू झाली. ब्रिटिश अभियंत्यांनी हा लोहमार्ग ब्रिटिश भांडवलानिशी १८७२ मध्ये बांधला. त्या वेळी एतद्देशीयांनी त्याविरुद्ध तीव्र विरोध व्यक्त केला होता राष्ट्रीयवाद्यांना परकीय लोकांनी चालविलेले हे आर्थिक व राजकीय आक्रमण पसंत नव्हते परंतु पहिला लोहमार्ग बांधून झाल्यावर विरोध मावळला. ओसाका–कोबे हा लोहमार्ग १८७४ मध्ये, तर क्योटोपर्यंतचा लोहमार्ग १८७७ मध्ये बांधून झाल्यावर जपानी अभियंते मोठ्या वेगाने लोहमार्ग बांधू लागले. १८९१ मध्ये क्योटो येथे विजेवर चालणारा पहिला लोहमार्ग बांधण्यात आला. ही वीजही देशाच्या पहिल्या विद्युत् निर्मितिकेंद्रामधून निर्माण झाली होती. नंतरच्या काही वर्षांत आशियामध्ये बव्हंशी जपाननेच आंतरशहरी व उपनगरी लोहमार्गांचे विस्तृत जाळेच तयार केले. १९२७ साली टोकिओच्या भागात पहिला भुयारी लोहमार्ग बांधण्यात आला. नवनवीन लोहमार्ग मोठ्या प्रमाणावर बांधण्याचे हे कार्य दुसऱ्या महायुद्धापर्यंत झपाट्याने चालू होते परंतु दुसऱ्या महायुद्धात झालेल्या जपानच्या पराभवामुळे पुढे काही काळ हे लोहमार्ग बांधण्याचे काम थंडावले. १९५५ पासून पुन्हा लोहमार्ग बांधण्यास प्रारंभ झाला. भुयारी लोहमार्गांच्या बांधकामास विशेष जोर आला. १९७२ च्या सुमारास टोकिओ, ओसाका, नागोया, साप्पोरो व योकोहामा ह्या शहरांत भुयारी लोहमार्गव्यवस्था कार्यवाहीत होत्या. यांपैकी टोकिओ भुयारी लोहमार्ग सर्वांत मोठा (सु. १२९ किमी.) असून त्यांपैकी १०६ किमी. लोहमार्ग जमिनीतून गेलेला आहे.

जपानने एकरूळी मार्गपद्धती व्यापारी तत्त्वावर १९६४ मध्ये सुरू केली. टोकिओ ते टोकिओ आंतरराष्ट्रीय विमानतळ (हानेडा) अशी १३ किमी. वाहतूक या एकरूळी मार्गावरून होऊ लागली. १९६९ मध्ये एकरूळी वाहतूक लांबी २४ किमी. होती. होन्शू बेट आणि होक्काइडो जोडणाऱ्या आणि सीकान बोगद्यामधून जाणाऱ्या सु. ५६ किमी. लांबीच्या एकरूळी मार्गावरील (विजेवर चालणारी वाहतूक) बांधकामास १९७१ मध्ये सुरुवात झाली.

‘जपान राष्ट्रीय रेल्वे’ च्या नव–टोकैडो लोहमार्गावर १९६४ पासून पूर्णपणे स्वयंचलित, विद्युतचलित आणि दुहेरी मार्गावरून टोकिओ–ओसाका अशी तासाला २०९ किमी. वेगाने धावणारी आगगाडी सुरू झाली. १९७२ मध्ये पुढे ओकायामापर्यंत लोहमार्ग वाढविण्यात आले. याहीपुढे क्यूशू बेटावरील हाकाटापर्यंत हाच लोहमार्ग वाढविण्याच्या कामास डिसेंबर १९७४ मध्ये प्रारंभ झाला. १९७१ मध्ये टोकिओ व ओसाका ह्या दोन शहरांना जोडणाऱ्या (सु. ५१५ किमी.) व वरील वेगाने धावणाऱ्या ३८ अतिजलद आगगाड्या सुरू करण्यात आल्या. त्या फक्त नागोया व क्योटो ह्या दोन स्थानकांवरच थांबतात. अशाच प्रकारच्या पण कमी जलदगतीने धावणाऱ्या तसेच ११ स्थानकांवर थांबणाऱ्या ६८ आगगाड्या दैनंदिन प्रवासी वाहतूक करू लागल्या. अशा प्रकारची लोहमार्गीय वाहतूक भलतीच किफायतशीर ठरली असून तीमध्ये गंभीर अपघात प्रमाण शून्य होते.

नव-टोकैडो लोहमार्गावर मालवाहतूक करण्याच्या योजनेची कार्यवाही तसेच देशातील सर्व मोठी शहरे लोहमार्गांनी जोडण्याची योजना–ज्या योजनेस ‘ न्यू ट्रंक रेल्वे सिस्टिम’ असे म्हणतात– १९७०–७५ या काळात कार्यवाहीत आणण्यात आली. टोकिओपासून बाहेर जाणारे तीन लोहमार्गांचे बांधकामही सुरू झाले. १९७२ सालातच रेल्वेचा कमाल वेग तासाला सु. २५० किमी. पर्यंत वाढविण्यात आला. १९८५ पर्यंत सु. ७,००० किमी. लांबीचे अतिद्रुत मुख्य लोहमार्ग व १०,००० किमी. लांबीचे द्रुत लोहमार्ग बांधण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे. सध्याच्या अतिद्रुत आगगाड्यांचा वेग तासाला २०० किमी. आहे तो ५०० किमी. पर्यंत नेण्याची शासनाची योजना आहे. मोठ्या शहरांतून आगगाड्यांमधून आढळणारी भयंकर गर्दी ही लोहमार्गी वाहतुकीची एक जटिल समस्या आहे.

जलवाहतूक : फार पूर्वीपासून सागरी वाहतूक करण्यामध्ये जपान प्रसिद्ध आहे. १६०० च्या सुमारास हल्लीच्या ओसाकाच्या दक्षिणेकडील साकाई हे बंदर चीन व आशियाई राष्ट्रे यांच्याशी व्यापार करून भरभराटीस आले परंतु त्यानंतर जवळजवळ अडीचशे वर्षे जपानमधील सरंजामशाही राजवटीने विदेशी व्यापारापासून देशाला वंचित केले होते. परिणामी, नागासाकी हे बंदर वगळता, इतर कोणत्याही बंदरांमधून विदेशी व्यापार होऊ शकला नाही. १८५८ साली विदेशव्यापाराला जपानने आपली दारे पुन्हा खुली केल्यानंतर, काही वर्षांतच मोठी बंदरे भरभराटीस आली. योकोहामा व कोबे ही अनुक्रमे टोकिओ आणि ओसाका व क्योटो यांची बंदरे म्हणून मोठ्या प्रमाणात विकास पावली आहेत. १९७१ साली जगामधील व्यापारी जहाजे असणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून जपान प्रसिद्धी पावला आहे. लायबीरियानंतर जपानचा क्रम लागत असून त्याचा नोंदलेला टनभार ३०५ लक्ष टनांहूनही अधिक आहे–१०० टनांहून अधिक टनभाराची सु. ८,८५० जहाजे जपानच्या व्यापारी ताफ्यात असून, त्यांपैकी प्रवासी वाहतुकीची ६८१ जहाजे, ५,३५७ मालवाहतूक करणारी व १,९३९ तेलटाके जहाजे आहेत (१९७३). या तेलटाके जहाजांपैकी काहींचे वजन प्रत्येकी २·५ लक्ष टनांहूनही अधिक आहे. १९६९ मध्ये योकोहामा हे आघाडीचे आयात व्यापाराचे, तर कोबे हे निर्यात व्यापाराचे अग्रेसर बंदर होते. त्यानंतर टोकिओ, नागोया, ओसाका, कावासाकी, छीबा, मोजी, योक्काइची व शिमीझू ही बंदरे येतात.

हवाई वाहतूक :   अंतर्गत व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या हवाई वाहतुकीस झपाट्याने महत्त्व येत आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी हवाई वाहतूक सीमित झाली होती तथापि १९५३ मध्ये ‘जपान एअरलाईन्स’ (जाल) ही शासनाने सहकार्य दिलेली खाजगी विमान कंपनी स्थापन झाल्यापासून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक फारच किफायतशीर ठरली आहे. १९७० च्या सुमारास जपान जगातील बहुतेक देशांशी जालने व परदेशी विमान कंपन्यांनी जोडला आहे. अंतर्गत हवाई वाहतूकही भरभराटलेली आहे. ‘ऑल निप्पॉन एअरवेज’ ही देशातील दुसरी महत्त्वाची विमान कंपनी आहे. टोकिओ हे हवाई वाहतुकीचे देशातील सर्वांत प्रमुख केंद्र असून (हानेडा विमानतळ) त्याखालोखाल ओसाकाचा (इटामी विमानतळ) क्रम लागतो. सर्व महानगरे हवाई वाहतुकीने एकमेकांशी जोडलेली आहेत. नागोया, साप्पोरो, फुकुओका (इटाझुके विमानतळ) व होक्काइडो (छितोसे विमानतळ) ही इतर मोठ्या विमानतळांची शहरे होत.

जपानमधील दूरध्वनी सेवा ही एका सरकारी निगमाद्वारा उपलब्ध केली जाते. १९७२ मध्ये देशात ३१०·५७ लक्ष दूरध्वनी होते. त्याच वर्षी रेडिओ व दूरचित्रवाणी संचांची संख्या अनुक्रमे २३५ लक्ष व २३८ लक्ष होती. म्हणजेच हे प्रमाण घरटी शेकडा ९९ व ९८ असे पडते. ‘निप्पॉन होसो क्योकाई–एन्. एच्. के.’ (जपान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) हा निमसरकारी ध्वनिक्षेपण निगम असून तो व्यापारी तत्त्वावर चालत नाही व त्याचे संचालक शासनच नेमते. दोन दूरचित्रवाणीची व तीन रेडिओ प्रक्षेपणाची जाळी आणि ३,५०० केंद्रे यांच्या साहाय्याने हा निगम आपले कार्यक्रम पार पाडतो. यांशिवाय देशात बऱ्याच खासगी दूरचित्रवाणी कंपन्या आहेत. दूरचित्रवाणी ध्वनिक्षेपणास १९५३ मध्ये प्रारंभ झाला. रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांना १० सप्टेंबर १९६० पासून प्रारंभ झाला. १९६७ च्या सुमारास एन्‌एच्‌के व इतर ४६ व्यापारी दूरचित्रवाणी कंपन्या रंगीत कार्यक्रम प्रसारित करीत होत्या. १९६७ मध्ये देशात १९,७२६ डाकघरे होती.


पर्यटन : जपानमध्ये पर्यटन हा एक मोठा उद्योग मानण्यात येतो. १९६५ पासून परदेशी पर्यटकांची संख्या प्रतिवर्षी १० टक्क्यांनी वाढत आहे. जपानमधील जंगले व पर्वत, पॅगोडा व मंदिरे, पारंपरिक सण व उत्सव आणि अभिजात काबुकी रंगभूमी या काही गोष्टी म्हणजे पर्यटकांची आकर्षणस्थाने ठरली आहेत. पर्यटन सांख्यिकी पुढील तक्त्यावरून स्पष्ट होईल.

वर्ष

परदेशीपर्यटक प्राप्त रक्कम (लक्ष डॉ.) परदेशांस जाणारे जपानी पर्यटक

परदेशास दिलेली रक्कम (लक्ष डॉ.)

१९७० ८,५४,४१९ २,३२० ९,३६,२०५ ३,१५०
१९७१ ६,६०,७१५ १,७२० १२,६८,२१७ ५,०९०
१९७२ ७,२३,७४४ २,०१० १५,३२,९२८ ७,७५०

पर्यटकांची काळजी घेण्याची कला व व्यवसाय ह्या गोष्टी जपानी लोकांच्या जीवनाचे एक अंगभूत वैशिष्ट्यच मानावे लागेल. त्याचबरोबर पर्यटनाबाबतची अभिरुची जपानी राष्ट्रीय चारित्र्या चाच एक अविभाज्य भाग बनला आहे. १९६० पासून जपानी पर्यटकांची संख्या प्रतिवर्षी ८० टक्क्यांनी वाढत असल्याचे आढळते. त्याचप्रमाणे, जपानी पर्यटक परदेशांत जपानमधील विदेशी पर्यटकांपेक्षा अधिक खर्च करतात, असेही आढळून आले आहे. यामुळे परदेशी हुंडणावळीत एक गंभीर प्रकारचा ‘पर्यटन असमतोल’ (टूरिझम गॅप) निर्माण होतो. जपानी सरकार पर्यटन आकर्षणे वाढवून हा असमतोल दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच परदेशांत ‘जपान पहा’ अशा प्रोत्साहक मोहिमा राबविल्या जात आहेत. सरकार पर्यटन उद्योगामध्ये ‘जपान राष्ट्रीय पर्यटन संघटने’मार्फत भाग घेत असते. ‘जपान पर्यटन कार्यालय’ ही निमसरकारी संघटनाही पर्यटनउद्योगाचे महत्त्व वाढविण्याच्या कामी प्रयत्नशील असते. संयोजित यात्रांद्वारे (पॅकेज टूर) ती संघटना पर्यटकांस आकृष्ट करते.

गद्रे, वि. रा.

लोक व समाजजीवन : जपानचे आदिवासी ऐनू नावाचे लोक साधारणपणे १५,००० असून ते होक्काइडो बेटावर राहतात. चीनमधून व आग्नेय आशियातून काही लोक जपानी बेटांवर अगदी सुरुवातीला राहण्यास गेले असावेत, असा एक समज आहे. त्यानंतरच्या बऱ्याच वर्षांच्या ऐतिहासिक काळात हे सर्व लोक एकमेकांत मिसळून एकरूप झाले.

एडो राजवटीत (१६०३–१८६७) सरदार व इतर दरबारी मानकरी मंडळी सोडल्यास जपानी समाजाचे मुख्य चार वर्ग होते : योद्धे (सामुराई), शेतकरी, कारागीर व व्यापारी. हे वर्ग पिढीजात असत व व्यक्तीला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यास बंदी होती. मेजी राजवटीच्या सुरुवातीला (१८६८–१९१२) ही कडक वर्गव्यवस्था मोडण्यात आली आणि वर्गमुक्त समाजाचे तत्त्व स्वीकारण्यात आले. या काळात बहुसंख्य लोक शेतकरीच होते. १८९० नंतरच्या काळात मात्र औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. त्याबरोबरच कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांचा वर्ग जोरात वाढू लागला, तसाच पांढरपेशा वर्गही वाढला. आधुनिक जपानी समाजाची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल : (१) मोठे उद्योगपती आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी हे लोक वरच्या वर्गात मोडतात. ते साधारणतः २ टक्के आहेत. (२) लहान प्रमाणावर उद्योगधंदे करणारे व पांढरपेशे हे मध्यमवर्गीयांत मोडतात. ते साधारणपणे ३८ टक्के आहेत. (३) उरलेला खालचा वर्ग मुख्यतः कामगार लोकांचा आहे. त्यांत ६० टक्के लोकांचा समावेश होतो. या सर्व वर्गांपैकी मध्यमवर्गीय, विशेषतः पांढरपेशा वर्ग वाढतच चालला आहे.

दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, त्या सुमारास सर्व दरबारी हुद्दे रद्द करण्यात आले. परिणामतः जुनी राजघराणी व सरदारघराणी नष्ट झाली. कायद्याच्या दृष्टीने सम्राट व त्याचे कुटुंबीय एवढेच राजघराण्याचे सदस्य मानले जातात.

जपानमध्ये सामाजिक स्थित्यंतर मुख्यतः शिक्षणावरच अवलंबून आहे. जपानी लोकांना शिक्षणाविषयी जात्याच फार आदर आहे. त्यामुळे शाळकरी मुलेमुली उच्च शिक्षण घेण्यास फार उत्सुक असतात. सुरुवातीचे १४ वर्षांचे सक्तीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ ७० टक्के विद्यार्थी उच्च शालेय शिक्षणासाठी जातात आणि उच्च शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांतील सु. २० टक्के विद्यार्थी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेतात. जपानमध्ये सु. २९१ विद्यापीठे आहेत. शिक्षणाच्या प्रसारामुळे जपानमधील साक्षरतेचे प्रमाण सु. ९८ टक्के आहे.

कुटुंबातील सर्वांत वडीलमुलाकडे वारसाहक्क असण्याची पद्धत जपानमध्ये पुरातन काळापासून चालत आलेली आहे. विवाहानंतरसुद्धा वडीलमुलाने आपल्या आईवडिलांजवळ राहून कुटुंबाची जबाबदारी उचलावी असा दंडक असल्याने साहजिकच त्याला कुटुंबप्रमुखाच्या खालोखाल मानाचे स्थान मिळत असे. कुटुंबातील इतर मुलांना व विशेषतः मुलींना फारच कमी प्रतीचे स्थान असे. त्यांनी सदैव वडिलांच्या अगर थोरल्या भावाच्या आज्ञेत रहावे, असा दंडक असे. विवाह वडीलधारी मंडळी ठरवीत व प्रेमविवाहाला मान्यता मिळणे जवळजवळ अशक्यच असे. या सर्व चालीरीती दुसऱ्या महायुद्धापर्यंत चालू होत्या परंतु त्यानंतर मात्र नागरी कायद्यात बदल झाल्याने कौटुंबिक पद्धतीत व समाजरचनेत पुष्कळसे बदल झाले. याचा परिणाम म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती मोडकळीला आली. पतिपत्नी आणि त्यांची मुले अशी कुटुंबपद्धती अस्तित्त्वात आली. तसेच स्त्रीशिक्षणाचा प्रसार झाल्याने शिक्षित स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करू लागल्या. याशिवाय औद्योगिकीकरण वाढत चालल्याने समाजात विभक्त कुटुंबपद्धतीचा पुरस्कार होऊ लागला. हे एक प्रकारचे मोठेच सामाजिक परिवर्तन म्हणावे लागेल. मात्र ते प्रामुख्याने शहरांतूनच दिसून आले.

नव्या नागरी कायद्यान्वये कुटुंबाची मालमत्ता सर्व मुलांत सारखी वाटली जाते. तसेच आईवडिलांची जबाबदारी फक्त मोठ्या मुलावरच न पडता ती सर्व मुलांत सारखी विभागली जाते. हा नियम शेतकरी कुटुंबांना मात्र लागू नाही कारण शेतजमिनीची सर्व मुलांत सारखी वाटणी करून दिली, तर शेते इतकी लहान होतील की शेती करणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात मात्र बरीचशी शेतकरी कुटुंबे कुटुंबातील एका मुलाची निवड करून त्याला सर्व शेते देऊन शेतीवाडीची आणि आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावर सोपवितात. त्यामुळे वरकरणी तरी अशा कुटुंबांत जुनी एकत्र कुटुंबपद्धतीच आढळते. परंतु कायद्यान्वये मात्र सर्व मुलांचा मालमत्तेवर समान हक्क असल्याने सर्व मुलांचे कुटुंबातील स्थान पूर्वीपेक्षा अधिक समान झाले आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर विवाहपद्धतींतही बराच बदल झाला. वडीलधाऱ्यानी ठरविलेले विवाह अजूनही रूढ आहेतच परंतु प्रेमविवाहांचे प्रमाण वाढले आहे. हा बदल घडून येण्यास बऱ्याच गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत : समाजातील स्त्रियांचे सुधारलेले स्थान, मुलामुलींना शाळेत किंवा इतर संस्थांमध्ये एकमेकांत मिसळावयाची वाढती संधी आणि नवीन छोटी कुटुंबपद्धती यांसारखी अनेक कारणे नमूद करता येतील. दुसऱ्या महायुद्धापूर्वी समाजाला स्त्रीपुरुषांनी एकत्र फिरणे, अगदी पतिपत्नी असले तरीसुद्धा मान्य नव्हते परंतु आता समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. पतिपत्नी सहजीवी आहेत व म्हणूनच सहजीवनाच्या कल्पनेला आता प्राधान्य दिले जाते.


जपानी समाजात धर्म हा मुख्यत्वेकरून सामाजिक चालीरीतींवरच आधारलेला आहे, अध्यात्मावर नव्हे. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती शिंतो-मंदिर व बुद्धमंदिर अशा दोन्हीही देवळांत दर्शनार्थ जाते. शिंतो आणि बौद्ध हे दोन धर्म जपानमध्ये प्रभावी आहेत. मात्र जपानी लोकांचे धर्मविचार सांस्कृतिक वा तत्त्वज्ञानात्मक विचारसरणीवर आधारलेले नाहीत. लोक केवळ मनावरील पूर्वापार संस्कारांमुळेच शिंतो देवळात जाऊन चांगले पीक यावे, मासे पकडण्याचा धंदा अगर इतर कामे चांगली व्हावीत, कुटुंबात किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यांत चांगल्या गोष्टी घडाव्यात, म्हणून प्रार्थना करतात. त्याच कारणाने जपानी लोक अंत्यविधीसाठी वा मृतांच्या आत्म्यासाठी करावयाचे संस्कार बुद्धमंदिरात जाऊन करतात. दोन वेगळ्या गोष्टींसाठी दोन वेगळ्या धर्मांचा उपयोग करण्यात जपानी लोकांना काहीच वावगे वाटत नाही. शिंतोधर्मीय देवालये प्रत्येक शहरात आणि खेड्यापाड्यांतही आहेत. वसंत, ग्रीष्म अथवा शरद ऋतूंमध्ये प्रत्येक देवालयाचा उत्सव असतो. देवळाजवळील प्रदेशात सुगीचे दिवस आले की, त्या देवळात उत्सव होतो. जपानमध्ये सु. ७९,००० शिंतो-मंदिरे आहेत व सु. ७५,००० बुद्धधर्मीय मंदिरे आहेत. बौद्ध धर्मामुळे जपानी समाज, संस्कृती व तत्त्वज्ञान यांमध्ये विपुल भर पडली आहे परंतु अंत्यविधीपुरताच उरलेला बौद्ध धर्म तग धरून राहिला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मोठ्या शहरांतील लोक बौद्धधर्मीय अगर शिंतोधर्मीय मंदिरांशी फारसा संबंध ठेवत नाहीत.

ख्रिस्ती धर्म जपानमध्ये ४०० वर्षांहूनही जास्त काळ प्रचलित आहे परंतु त्याचा प्रसार फारसा जोरात झाला नाही. सर्व देशांत फक्त ९०० कॅथलिक व २,९०० प्रॉटेस्टंट चर्चे असून ख्रिस्तधर्मीय लोक सु. ६५,००० आहेत. ख्रिस्ती धर्म व जपानी संस्कृती यांत मूलभूत भिन्नता असल्याने जपानमध्ये काही मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोक सोडल्यास इतरांच्यात या धर्माचा प्रसार होऊ शकला नाही. जपानमध्ये शिंतो, बौद्ध आणि ख्रिस्ती या प्रमुख धर्मांतूनच काही नवीन पंथ उदयास आल्याचे दिसते. मेजी राजवटीत शिंतो धर्माचा तेन्री-क्यो नावाचा एक नवा पंथ स्थापन झाला. युद्धपूर्व श्योवा राजवटीत बौद्ध धर्माचा ऱ्यू-काई हा पंथ प्रचलित होता. दुसऱ्या महायुद्धानंतर रिश्योकोसेई-काई व सोका-गाक्काई असे दोन नवे पंथ निर्माण झाले. या नव्या पंथात समाजातील खालच्या थरांतील श्रमजीवी लोक जास्त प्रमाणावर आढळतात. सोका-गाक्काई या पंथाला बरेच अनुयायी मिळाल्यामुळे या पंथाने राजकारणातही शिरकाव केला व कोमेई हा राजकीय पक्ष स्थापन केला.

जपानी लोकांचे मुख्य अन्न म्हणजे भात परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र अमेरिकेच्या प्रभावामुळे त्यांच्या जेवणामध्ये पावाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. मांस व दूधदुभत्याचे प्रकारही त्यांच्या जेवणात असतात. सोयाबीनच्या पदार्थांचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणावर होतो.

जपानी स्त्रीपुरुषांत पाश्चिमात्य पोषाखच रूढ आहे. पुरुष घरात किमोनो किंवा युकाता वापरतात. स्त्रिया विवाहप्रसंगी भरजरी किमोनो वापरतात. जपानी स्त्रीवर्गात दागिने फारसे प्रचलित नाहीत.

जपानी घरे मुख्यतः लाकडाचीच बांधलेली असतात. घराच्या आतील दालनांचे विभाजन लाकडाच्या चौकटीवर कागद चिकटवलेल्या सरकत्या पडद्यांनी केलेले असते. यामुळे खोल्या जरूरीप्रमाणे लहानमोठ्या करता येतात. घरात सर्वत्र एक ते दीड इंच जाडीच्या गवताच्या चटया पसरलेल्या असतात. त्या चटयांना तातामी म्हणतात. बैठकीसाठी मोठ्या उशांचा वापर करण्यात येतो. तथापि टेबल, खुर्च्या, मेजे यांचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे.

जागेच्या टंचाईमुळे अलीकडे काँक्रीटचे निवासी गाळे असलेल्या वसाहती बऱ्याच झाल्या आहेत. त्यांत पारंपरिक व पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींच्या गृहरचनांचा समन्वय साधलेला दिसून येतो. मोठ्या शहरांतून सु. ९२ टक्के लोकांकडे दूरचित्रवाणी संच आहेत, सु. ७२ टक्के लोकांकडे विजेची धुलाई यंत्रे आहेत, सु. ५४ टक्के लोकांकडे शीतकपाटे आणि सु. ८० टक्के लोकांकडे शिवणयंत्रे आहेत.

मोरिओका, कियोमी (इं.); देशिंगकर, शरयू (म.)

भाषा-साहित्य : जपानी भाषा ही रिऊक्यू व ओकिनावा या बेटांसह जपानमध्ये सर्वत्र बोलली जाते. सु. ११ कोटी लोक ही भाषा बोलतात. जपानी भाषा कोठल्याही भाषाकुटुंबात मोडत नसल्याने तिचे वर्गीकरण स्वतंत्र रीत्या केले जाते. चिनी व जपानी भाषांचा तसा साक्षात संबंध नसला, तरी प्रदीर्घ सांस्कृतिक संपर्कामुळे अनेक चिनी श़ब्द व वाक्प्रचार जपानीत आढळतात. शब्दचित्रणात्मक चिनी लिपीचाही जपानीने स्वीकार केला मात्र जपानी ही विकारयुक्त भाषा असल्याने, शब्दाला होणारे विकार दर्शविण्यासाठी कालांतराने अदमासे पाऊणशे ध्वनिदर्शक अक्षरे तयार करण्यात आली. जपानी व्याकरणानुसार शब्दांचे तीन वर्ग पडतात : विकाररहित वर्गात नाम, सर्वनाम व संख्यावाचक विकारयुक्त वर्गात क्रियापद, विशेषण व क्रियाविशेषण आणि अव्ययवर्गात शब्दयोगी व उभयान्वयी अव्यये आणि उद्‌गारवाचके यांचा समावेश होतो. जपानी वाक्यरचनेमध्ये सर्वांत आधी कर्ता, नंतर अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म, साधन व शेवटी क्रियापद असा क्रम असतो.

जपानी साहित्याच्या इतिहासाची सुरुवात साधारणतः पाचव्या शतकाच्या सुमारास झाली, असे मानले जाते. प्राचीन जपानी साहित्यावर चिनीचा, तर आधुनिक साहित्यावर पाश्चिमात्य वाङ्‌मयाचा प्रभाव दिसून येतो. तथापि जपानी वाङ्‌मयात जपानच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरेचेही प्रतिबिंब ठळकपणे उमटले आहे. सुरुवातीच्या काळातील मोन्योशू  (आठवे शतक), ⇨ गेंजी मोनोगातारी  (अकरावे शतक), हेके मोनोगातारी  इ. ग्रंथ या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. तोकुगावा सत्तेच्या काळामध्ये (१६००–१८६८) तत्कालीन समाजाच्या विलासी जीवनाचे प्रतिबिंब वाङ्‌मयातून उमटलेले दिसते. उत्तरकालीन मेजी राजवटीमध्ये जपानी साहित्यावर पाश्चात्त्य वाङ्‌मयप्रकारांचा व मुल्यकल्पनांचा प्रभाव दिसून येतो. हा प्रभाव उत्तरोत्तर वाढतच गेला आहे. हागा या-इचि याने लिहिलेला कोकु-बुन्गाकु-शी  हा जपानी वाङ्‌मयाचा इतिहास प्रमाणभूत मानला जातो. ⇨कोजीकी  (७१२) हा पुराणकथासंग्रह, गेंजी मोनोगातारी  (राजपुत्र गेंजी याची कथा), कोकिन्शु  हा काव्यसंग्रह, ⇨ केन्को  या कवीचा त्सुरे–झुरे गुसा  हा संकीर्ण निबंधसंग्रह हे पारंपरिक व अभिजात साहित्याचे काही मानदंड होत. ⇨ नो नाट्य  व ⇨ काबुकी  हे जपानचे वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक नाट्यप्रकार. ‘बुनराकु’ ह्या कळसूत्री बाहुल्यांच्या नाट्यप्रकाराचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन ⇨ चिकामात्सू  या नाटककाराच्या नाटकांतून दिसते. मात्सुओ बाशो याच्या ‘हाइकू’ कविता विशेष प्रसिद्ध आहेत. ‘मोनोगातारी’ या पारंपरिक कथाप्रकारामध्ये जसे खानदानी जीवनाचे चित्रण आढळते तद्वतच ‘सोशी ’ या प्रकारामध्ये सामान्य माणसांचे आयुष्य चित्रित केलेले असते. ‘सोशी’ या प्रकारातूनच आधुनिक कादंबरीचा जन्म झाला. १८६९ नंतरच्या आधुनिक कालखंडात पाश्चात्यांच्या प्रभावाने सर्व लिखाण बोलीभाषेत व जपानी लिपीमध्ये करण्याचे प्रयत्न झाले. त्यातून वर्तमानपत्रे व नियतकालिके मोठ्या प्रमाणावर सुरू झाली, तसेच ‘गेम्बुन इचि’ या प्रकाराचे बोली वाङ्‌मय निर्माण झाले. उकीगुमो  ही फुताबाते शिमे याने लिहिलेली आद्य आधुनिक कादंबरी. तानिझाकी जुन-इचिरो व नोबेल पारितोषिक विजेते ⇨ कावाबाटा  हे जपानी परंपरेतील प्रख्यात आधुनिक कादंबरीकार होत. पाश्चिमात्य वाङ्‌मयाचा प्रभाव विशेषेकरून जपानी कथा-कादंबऱ्यांवर जाणवतो. नाटक आणि काव्य या प्रकारांनी मात्र पाश्चिमात्य आधुनिकतेपासून अलिप्त राहून खास जपानी परंपरेचे जतन केल्याचे दिसून येते. खास जपानी अशी आगळी सौंदर्यदृष्टी व वैशिष्ट्यपूर्ण प्रतीकात्मक शब्दसृष्टी ही जपानी साहित्याची वैशिष्ट्ये होत. [→ जपानी भाषा जपानी साहित्य].


शिक्षण : जपानमधील शिक्षण चार विभागांत मोडते : प्राथमिक शाळा– ६ वर्षे, माध्यमिक शाळा– ३ वर्षे, उच्चतम शाळा– ३ वर्षे, महाविद्यालय– ४ वर्षे. याशिवाय शालान्त परीक्षेनंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम असणारी तांत्रिक विद्यालयेही आहेत. जपानमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे व बऱ्याच अंशी निःशुल्क आहे. या शाळांसाठी प्रवेशपरीक्षा द्यावी लागत नाही. विद्यापीठांसाठी मात्र प्रवेशपरीक्षेची जरूरी असते व अशी परीक्षा बरीच कठीण असते. बऱ्याचशा विद्यापीठांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय आहे.

जपानी शाळा तीन प्रकारच्या आहेत : केंद्रीय शासनाने चालविलेल्या, स्थानिक शासनाच्या आणि खाजगी. बरीचशी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालये, खेडी, गावे आणि शहरे यांमधील स्थानिक शासनसंस्थांनी चालविलेली आहेत परंतु महाविद्यालये व विद्यापीठे मात्र बहुतांशी खाजगी आहेत. सर्व तांत्रिक विद्यालये केंद्र सरकारने चालविलेली आहेत.

शाळांचे कामकाज व आर्थिक व्यवस्था विद्यालयाचे संचालकच करतात, परंतु या नियमालाही काही अपवाद आहेत. शाळा चालविण्यासाठी स्थानिक शासनाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यास,  मध्यवर्ती सरकार आर्थिक मदत देऊन, नियमानुसार शिक्षकांचा अर्धा पगार किंवा शिक्षणसामग्री विकत घेण्यास मदत करते. या मदतीने स्थानिक सरकारला मदत होत असली, तरी विद्यालयीन अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याच्या धोरणात बाधा येते. खाजगी शाळांबाबत मात्र ‘मदत नाही–चौकशी नाही’ हे धोरण स्वीकारले असतानासुद्धा अशा शाळा आपल्या आर्थिक मागण्या वरचेवर मध्यवर्ती सरकारकडे करतात. सरकारी शाळांची जागा या खाजगी शाळा भरून काढतात, म्हणून ही आर्थिक मदतीची मागणी असते.

इतर शैक्षणिक सोयी :   प्राथमिक शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच्या शिशुवर्गासाठी बालोद्यान शाळा जपानमध्ये सर्वत्र आहेत, तसेच नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी रात्रीच्या शाळाही आहेत. तरुणांसाठी चालविलेले खास वर्ग, पत्रद्वारा शिक्षणाची सोय, धंदेशिक्षण संस्था, कारखान्यांनी चालवलेल्या शिक्षणसंस्था, शेतकी शाळा, प्रौढशिक्षण संस्था अशा अनेक तऱ्हेच्या शिक्षणसंस्था जपानमध्ये आहेत. याशिवाय वाचनालये, संग्रहालये आणि दृक्‌श्राव्य वाचनालयेही आहेत.

जपानमध्ये शिक्षणाचा सर्वत्र प्रसार झाला आहे व सक्तीचे शिक्षण जवळजवळ १०० टक्के विद्यार्थ्यांना दिले जाते. १९६५ मध्ये उच्च शिक्षणयोग्य वयाच्या विद्यार्थ्यांपैकी फक्त १५·७ टक्के विद्यार्थीच उच्च शालेय शिक्षण घेत होते. पाश्चिमात्य देशांशी तुलना करता १९६४ मध्ये बालोद्यान शाळेत जाणारी मुले फक्त ३८·९ टक्के होती. जपानमधील शिक्षणाबाबत एक खरी समस्या अशी आहे की, १५ ते १७ वर्षे वयाच्या मुलांपैकी फक्त एक तृतीयांश मुलेच शाळांत अगर इतर प्रशिक्षण विद्यालयांत जातात. या वयाच्या बाकीच्या मुलांसाठी काहीतरी खास शैक्षणिक कार्यक्रम आखण्याची जरूरी आहे. प्रौढशिक्षणामध्येही एक समस्या अशी आहे की, प्रत्येक दुय्यम दर्जाची शाळा असलेल्या विभागात समाज केंद्र हवे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की, अशी केंद्रे दुय्यम शाळांच्या फक्त ७२ टक्केच उपलब्ध आहेत. त्यामुळे या कार्यात बाधा येते. या अडचणी लक्षात घेऊन शिक्षणकार्य व शिक्षणपद्धती यांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

मध्यवर्ती सरकारच्या धोरणानुसारच प्राथमिक व दुय्यम शाळांचा शिक्षणक्रम आखून कार्यवाहीत आणला जातो. त्यात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो : (अ) सदाचार शिक्षण, (आ) विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता वाढवणारे, योग्य ते शास्त्रीय व तांत्रिक शिक्षण, (इ) सर्वांगीण शिक्षण, (ई) प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार शिक्षण.

शिक्षणाला योग्य ते मार्गदर्शन व साहाय्य मिळावे, म्हणून मध्यवर्ती सरकार प्राथमिक व दुय्यम शाळांतील मुलांसाठी चढाओढीच्या परीक्षा ठेवते. उच्चतम शाळेतील मुलांसाठी नोरित्सु-काईहात्सु-केंक्यूजो यांनी खास बौद्धिक चाचण्या ठेवल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रायोगिक ज्ञान व मार्गदर्शन मिळते. त्याचा भविष्यकाळात उपयोग होतो. या परीक्षांच्या योग्यायोग्यतेचा फेरविचार नेहमी चालू असतो.

शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारमान्य वर्ग शासकीय व खाजगी विद्यालयांत आणि विद्यापीठांत आहेत परंतु शिक्षकांसाठी वेगळी महाविद्यालये स्थापन करण्याच्या कल्पनेस जास्त मान्यता मिळत आहे.

कात्सुता, मोरिकाझू (इं.); देशिंगकर, शरयू (म.)

कला-क्रीडा : वास्तुकला :  जपानचे हवामान स्वभावतःच नरम आणि दमट असल्याने वास्तुनिर्मितीत हवेशीरपणाला आणि म्हणूनच असंख्य विवर वातायनांना प्राधान्य मिळाले. सहाव्या शतकात चीनमधून बौद्ध धर्माचे आगमन झाल्यानंतर भव्य अशी मंदिर-वास्तुकला चिनी अनुकरणाने विकसित झाली. सोळाव्या शतकात पाश्चिमात्यांकडून दारूगोळ्याची आयात होऊ लागल्यावर दारूगोळ्यापासून बचाव करण्यासाठी व हल्लेखोरांच्या प्रतिकारासाठी गड आणि कोट उभारले गेले. त्यांचीही गणना खास वास्तुप्रकारांतच करावी लागेल. जपानी, वास्तुशिल्पाची परंपरा खऱ्या अर्थाने मोहरलेली पाहावयाची असेल, तर ती गृहवास्तूंमध्येच शोधावी लागेल. तिचे लक्षणीय अंग म्हणून निवासनिर्मितीत होणाऱ्या अगणित सरकत्या जाळ्यांकडे बोट दाखविता येईल. या जाळ्या (स्क्रीन्स) किंवा पडदे घराच्या अंतरंगात विभाजिका म्हणून खोल्यांची निर्मिती करतात आणि बाहेरील भिंतीचेही काम करतात. गरजेप्रमाणे हे पडदे काढून किंवा सरकवून खोल्या लहानमोठ्या करता येतात. बाह्य भिंतीसाठी या जाळ्यांची काढ-घाल करण्यात येऊन माणसाला निसर्गाच्या सान्निध्यात आणणे किंवा त्याला हवा तो एकांत देणे, हे जपानी वास्तुकलेचे वैशिष्ट्य आहे. यातूनच जपानी बगीच्याचाही विकास झाला. दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे जपानी वास्तुशिल्पातील लाकडाचा वापर व त्याच्या नैसर्गिक सुंदरतेवर दिलेला भर होय. जपानी स्वभावातील निसर्गाच्या व नैसर्गिकतेच्या आवडीमुळे व इमारती लाकडाच्या वैपुल्यामुळे जपानी वास्तुरचनेत लाकडांचा रंग, पोत आणि रेषा यांनाच आगळे स्थान प्राप्त झाले. या वैशिष्ट्याचे दर्शन ‘चा-शित्सू’मध्ये (चहापान-दालन) उठावदारपणे घडते. आजच्या पाश्चात्त्य वास्तुशिल्पांवरही या जपानी वैशिष्ट्यांचा प्रभाव पडला आहे.

मूर्तिकला : जपानी बेटांवर हजारो वर्षांच्या जुन्या मातीच्या प्रतिमा सापडल्या आहेत. परंतु खऱ्या जपानी मूर्तिकलेची सुरुवात सहाव्या शतकातच झाली, असे मानावे लागते. त्यावेळी चीनमधून बौद्ध धर्माचे आगमन झाले आणि बुद्धमूर्तीची गरज निर्माण झाली. आठव्या शतकापर्यंत ही कला १६ मी. उंचीची बुद्धमूर्ती घडविण्याइतपत प्रगत झाली होती. बुद्धप्रतिमा केवळ पंचधातूच्या (ब्राँझच्या ) बनवीत असत असे नाही, तर त्यांसाठी चिकणमाती, लाकूड व लाख यांचाही वापर होई. दहाव्या शतकानंतर मात्र लाकूड हेच मूर्तीकलेसाठी सर्रास वापरलेले दिसते. कारण अनेक प्रकारच्या उत्तम लाकडांची लागवड जपानमध्ये होऊ लागली होती आणि तीक्ष्ण अशी लाकूड कोरण्याची हत्यारेही बनू लागली होती. अकराव्या शतकात अनेक भाग एकत्र जोडून प्रतिमा बनविण्याची कल्पना रुजली आणि त्यातून निरनिराळे लाकडी अवयव एकत्र जोडून मोठ्या मूर्ती तयार होऊ लागल्या.

बुद्धप्रतिमांच्या निर्मितीबरोबरच थोर व्यक्तींच्या पुतळ्यांची निर्मितीही होऊ लागली. हे पुतळे पुजाऱ्याचे किंवा योद्ध्यांचे असत. सोळाव्या शतकात बौद्ध धर्माचा ऱ्हास होऊ लागल्याने बुद्धमूर्तींच्या निर्मितीला उतरती कळा आली, तरी पण अमीर-उमरावांच्या निवासस्थानात खोदीव शिल्पांकन करण्याची कला उदयास आली. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत दागिनेवजा छोटी शिल्पे (नेत्सुके) किंवा वैयक्तिक साजशृंगाराच्या शिल्पवस्तू तयार होऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पुढे परंपरागत लाकडी कलाकृतींच्या बरोबरीने पाश्चात्त्य पद्धतीची शिल्पेही निर्माण होऊ लागली.


चित्रकला : सहाव्या शतकानंतरच्या जपानी चित्रकलेवर चिनी चित्रकलेचा प्रभाव होता, मात्र जपानी लोकांचा कल चित्रकलेकडे विशेषत्त्वाने असल्याने अनेक स्वतंत्र जपानी चित्रशैलीही निर्माण झाल्या. अकराव्या शतकापासून बौद्ध चित्रकलेतही एक प्रकारची जपानी श्रद्धा व राष्ट्रीय अस्मिता डोकावू लागलेली दिसते. याच कालखंडात जपानी चित्राकृतींत निसर्गचित्रण, सामाजिक रीतिभाती आणि लोककथा अवतरू लागल्या. या शैलीला ‘यामातो-ए’ हे नाव मिळाले. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे कौशल्यपूर्ण रीतीने भाव व वातावरण चितारण्यासाठी नाजूक रेषांचा व उबदार रंगांचा वापर हे म्हणता येईल.

चौदाव्या शतकात झेन बौद्ध पंथाची स्थापना झाली व त्यायोगे शाईने केलेले एकवर्णी रंगांकन विकसित झाले. प्रभावी भरदार रेखांकन तसेच गूढ भावाच्या आणि जटिल आशयाच्या अभिव्यक्तीसाठीही साध्या तंत्राचा वापर ही याची वैशिष्ट्ये होत.

सोळाव्या शतकात समाज सुखवादी बनून भौतिक सुखाच्या ओढीने भारलेला होता. त्यामुळे भव्य आकाराची, भडक रंगांची किंवा उठावदारपणे रंगविलेली आलंकारिक चित्रे दिसू लागली. ती मुख्यत्वे गडकोटाच्या शोभेसाठी, श्रीमंत जमीनदारांच्या घरांसाठी व मंदिरांसाठी तयार होत. अठराव्या शतकात पुन्हा आधुनिकतेचे तत्व प्रतिबिंबित करणाऱ्या कितीतरी शैली प्रचारात आल्या परंतु त्यांच्या बरोबरीने परंपरागत शैलीही चालूच राहिल्या. विशेषतः लोकचित्रकलेचे पुनरुज्जीवन करण्याकडे चित्रकार वळले. काष्ठठशांनी चित्रमुद्रण होऊ लागले. त्याचा प्रभाव पश्चिमी चित्रकलेवरही झाला. फ्रान्समधील उत्तरदृक्‌प्रत्ययवादी

(पोस्ट-इंप्रेशनिस्ट) चित्रकारांवर तो प्रभाव प्रामुख्याने दिसून येतो.

जपानी चित्रशैली अनेकविध आहेत. या सर्वच शैली कमीअधिक प्रमाणात रेशमी कापड किंवा कागद, तसेच चिनी शाई किंवा विशेष तलेतर मिश्रणांचे खनिज रंग यांचा वापर करतात. आजही पाश्चात्त्य चित्रणतंत्राचा वापर जपानमध्ये विस्तृत प्रमाणावर होत असला, तरी परंपरागत चित्रशैली अद्यापिही प्रभावी आहेत.

कनिष्ठ कला : जपानमध्ये कनिष्ट कला अनेक प्रकारे विकसित झाल्या आहेत. जपानी लोकांत कलेची जात्याच आवड असल्याने व त्यांची बोटे कलाकुसरीसाठीच तयार असल्याने, केवळ मंदिरे आणि सरंजामशाही यांच्याशी निगडित अशा कलांवर प्रभुत्व मिळवूनच ते थांबले नाहीत, तर जे जे म्हणजे शेजारच्या चीनमध्ये आले, नित्य आणले गेले, ते ते सर्व त्यांनी आत्मसात केले. तीन हजार वर्षांपूर्वीच जपानचा ब्राँझमधील शिल्पांकनाशी संबंध आला होता. त्यानंतर लोखंडी अवजारे व सोनेरुपे यांचा देशात प्रवेश झाला. चौथ्या किंवा पाचव्या शतकापर्यंत चिलखते आणि इतर लष्करी सरंजाम धातूचे बनू लागले होते. सातव्या शतकात चीनच्या थांग घराण्याशी संबंध वाढल्याने अनेक कलातंत्रांचे ज्ञान जपानी लोकांनी मिळविले. याची साक्ष ‘शोसोइन’ या आठव्या शतकातील दुर्मिळ कलाकृतींच्या जतन करून ठेवलेल्या संग्रहावरून पटते. दहाव्या शतकापर्यंत जपानी कनिष्ठ कलांनी मूळ चीनमधून आलेल्या कलांत राष्ट्रीय अस्मिता उठून दिसेल, अशा संकल्पना व तंत्रे यांत प्रगती साधली होती. लाखेच्या कृतींवर सोन्याचांदीच्या चूर्णाचा वापर करून नक्षीकाम करणे, हे खास जपानी वैशिष्ट्य होते. हेच ‘माकी’ तंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळी ‘माकी’ कलाकृतींना चीनमध्ये असाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. बाराव्या व तेराव्या शतकात सामुराई सत्तेच्या वाढीमुळे शस्त्रादींच्या निर्मितितंत्राचा विकास झाला. पुन्हा सोळाव्या शतकात विलासी अभिरुचीच्या जनतेच्या मागण्यांप्रमाणे भपकेबाजपणा आणि प्रदर्शन करण्यासाठी खर्चाची पर्वा न करता अलंकरणामध्ये सोन्याचांदीचा वापर विपुल प्रमाणात होऊ लागला आणि हे वेड लोकांच्या वेषभूषेत व ‘नो’ या नाट्यप्रकाराच्या नेपथ्यातही प्रतिबिंबित झाले. याच सुमारास मातीच्या मूर्तिशिल्पांचा जपानने आपल्या पूर्वपीठिकेमधून विकास साधला आणि देशाच्या निरनिराळ्या भागांत सुंदर रंगीत देखावे व नक्षी असलेल्या मातीच्या वस्तू बनू लागल्या पण त्याच वेळी तयार होणाऱ्या साध्या, अनलंकृत वस्तूंना चहापान-विधीच्या सामग्रीत महत्त्व प्राप्त झाले. नैसर्गिक सहजसुंदरतेचे वेड मृत्पात्रांच्या निर्मितीत त्यांनी व्यक्त केले. वस्तूंच्या नैसर्गिक सौंदर्याबाबतची आग्रही आसक्ती , हे जपानी आलंकारिक कलेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

संगीत : जपानी संगीताच्या उदयाचे चार मुख्य कालखंड अथवा भाग मानले जातात. प्राचीन काळापासून सहाव्या शतकापर्यंतचा हा कालखंड आहे. या काळात साध्या शब्दात व लयबद्ध ठेक्यावर संगीत गाऊन लोक आपल्या भावना व्यक्त करीत असत. या संगीताला जपानी पद्धतीची अगदी साधी बासरी अथवा सहातारी वाद्य यांची साथ असे. या बासरीला कागुरा-बुए आणि सहातारी वाद्याला वा-गोन किंवा यामातो-गोतो म्हणतात. शिंतो देवालयांत होणाऱ्या धार्मिक क्रियाकर्मांच्या प्रसंगी या वाद्यांचा उपयोग होत असल्याने ती आजतागायतही वापरात आहेत. सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या दुसऱ्या कालखंडात चिनी संगीताचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला मात्र ते मूळ जपानी संगीतात मिसळून त्यात बदल झाला. नवव्या शतकाच्या प्रथमार्धापर्यंत जपानचा व्यापार चीन, कोरिया व भारत या देशांबरोबरच चालू होता. परिणामतः चीनमधून आलेल्या इतर गोष्टींबरोबरच चिनी संगीत व संगीताची वाद्ये यांचाही जपानमध्ये प्रवेश झाला. वाद्यांमध्ये शो, हिचिरिकी व शाकुहाची नावाची बासरीसारखी वाद्ये तसेच ताइको आणि त्सुझुमी नावाचे मोठे व लहान ढोलक, शो नावाची दांड्याने ठोकून वाजवायची तबकडी आणि बिवा आणि सो नावाची तारवाद्ये यांचा समावेश होतो. या सर्व वाद्यांचा नृत्याला साथ म्हणूनच उपयोग होत असे. ही वाद्ये सुरुवातीला फक्त राजदरबारांत, सरदार घराण्यांत व महत्त्वाच्या देवळांतच वाजवली जात. या वाद्यांवर वाजवलेले संगीत म्हणजे चिनी संगीताची हुबेहूब नक्कल असे. नवव्या शतकाच्या मध्यापासून मात्र जपानचा व चीनचा संबंध कमी झाला व जपानचे खास वैशिष्ट्य असलेले गा-गाकु (दरबारी संगीत) या काळात उदयाला आले. याच सुमारास बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर सूत्रपठण-ज्याला शोम्यो म्हणतात–लोकप्रिय झाले. नंतरच्या काळात यापासूनच हेईक्योकु, यो-क्योकु, जोरूरी, को-उता व नागा-उता हे संगीताचे प्रकार प्रचारात आले. बाराव्या शतकाच्या शेवटापासून एकोणिसाव्या शतकाच्या प्रथमार्धापर्यंत संगीताचा तिसरा कालखंड मानला जातो. या काळात संगीताचा प्रसार द्रुतगतीने झाला. राजदरबारांचा पगडा कमी झाला, त्यामुळे गा-गाकु हे केवळ पार्श्वसंगीत म्हणूनच प्रचारात राहिले. तथापि शिंतो देवालयांत होणाऱ्या कार्यात त्याचा वापर होत असे. याविरुद्ध बौद्ध धर्माशी संबंधित अशा संगीताला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्याचप्रमाणे हैके-बिवा या प्रकारचे पोवाडेही प्रसिद्ध झाले. हैके-बिवा हे नाव एका प्रसिद्ध पोवाड्यामुळे मिळाले, ज्यात हैके किंवा ताईरा कुटुंबाच्या अधःपाताची गोष्ट पोवाड्याच्या रूपात गात असत. जपानमधील को-उता, जोरूरी, साइमोन, सेक्क्योबुशी इ. लोकप्रिय संगीताला शामिसेन नावाच्या वाद्याची नेहमी साथ असे. सर्वसाधारण जनतेला हे वाद्य फार आवडते. खरे पाहता शामिसेन याचा मूळ शोध चीनमध्ये लागला व १५६२ मध्ये रिऊक्यू बेटांच्या राजाने हे वाद्य प्रथम जपानमध्ये आणले.

चौथ्या कालखंडात म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच्या आधुनिक काळात जपानमध्ये पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव वाढला. मेजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळात पाश्चिमात्य संगीताचे जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुकरण झाले. जपानी लष्कराचा बँडही पाश्चिमात्य धर्तीचा होता. शाळकरी मुलांनाही पाश्चिमात्य चालीची गाणी शिकवली जात. सरकारने पाश्चिमात्य संगीताचे विद्यालयही उघडले. सामाजिक स्थित्यंतराच्या या काळातच ऑर्गन, पियानो, व्हायोलिन ही वाद्ये सर्वसाधारण लोकांत लोकप्रिय झाली. कोतो (हार्प), फू (फ्ल्यूट) व शाकुहाची ही पारंपरिक जपानी वाद्ये आजही प्रचलित आहेत.


नृत्य : काबुकी हा जपानचा खास नृत्यप्रकार मानला जात असला, तरी बु-गाकु व नो-गाकु ही लोकनृत्येही प्रचलित आहेत.

जपानी नृत्यात माई व ओदोरी या दोन्हींचा अंतर्भाव होतो. माईमध्ये शरीराचा वरचा भाग व हात यांच्यामुळे होणाऱ्या भावप्रदर्शनाला जास्त महत्त्व असते आणि खालचा भाग गौण मानला जातो. ओदोरी या प्रकारात पायांची गती व लय यांना फार महत्त्व आहे. संगीतावर तालबद्ध हालचाली करणे हे माई व ओदोरी या दोन्हींतही दिसून येते.

जपानी नृत्याच्या इतिहासात दोन मुख्य कालखंड दिसून येतात : सुरुवातीच्या काळात माईचा उदय झालेला दिसून येतो, तर नंतरच्या काळात ओदोरीचा प्रसार झालेला दिसतो. माई हा नृत्यप्रकार पुरातन काळापासून मध्यकाळापर्यंत प्रसिद्ध होऊन वाढत गेला. त्यातील सर्वांत पहिले प्रकार कुमे-माई, ता-माई आणि यामातो-माई हे होते. सहाव्या शतकाच्या शेवटी चीनमधून एक नवीन नृत्यप्रकार आला व त्याचे बु-गाकु नावाच्या अगदी खास जपानी माई नृत्यप्रकारात रुपांतर झाले. त्यानंतर तेराव्या शतकापर्यंत एनेन्-नो-माई आणि शिराब्योशी-माई असे आणखी दोन माईचेच प्रकार रूढ झाले. त्यानंतरच्या शतकात योद्ध्यांच्या आवडीचे कोवाका-माई, कुसे-माई व नो-माई हे प्रकारही प्रचलित झाले. माई हा नृत्यप्रकार समारंभ प्रसंगासाठी रूढ झाला परंतु ओदोरी मात्र शुद्ध करमणूक या स्वरूपातच राहिला. बु-गाकु आणि नो-गाकु या माई-नृत्यप्रकारांना राजाश्रय होता तसाच सरदार घराणी व देवस्थाने यांचाही आश्रय होता. हे नृत्य खास समारंभप्रसंगी केले जाई. नृत्य दरबारात झाले, तर मानकरी त्यात भाग घेत. देवालयांतील नृत्यांत पुजारी भाग घेत व सरदार घराण्यांच्या नृत्यप्रसंगी त्यांत सामुराई (योद्धे) भाग घेत. काबुकी हा नृत्यप्रकार, फुर्यू नावाच्या एका लोकनृत्याचा व नेन्‌बुत्सु-ओदोरी या प्रकाराचा मिलाफ होऊन व त्यात बरीच सुधारणा होऊन निर्माण झाला आणि काबुकी-ओदोरी हा आणखी नवीनच नृत्यप्रकार प्रचारात आला. तो आजतागायत काबुकी नृत्यनाटकात वापरला जातो. पूर्वी देवदासी हे नृत्य रंगमंचावर करत असत नंतर हा नृत्यप्रकार इतका लोकप्रिय झाला, की हे नृत्य केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी करण्यास सुरुवात झाली. या नृत्यात बदल होत जाऊन त्याचे प्रथम विनोदी नाटकात व पुढे नृत्यनाटकात रूपांतर झाले.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पाश्चिमात्य नृत्यप्रकारांचा जपानमध्ये प्रवेश झाला आणि पहिल्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य नृत्यप्रकार जास्तच लोकप्रिय झाले.

जपानमध्ये कसरतीच्या खेळांनाही नृत्य अशी संज्ञा आहे व असे खेळ लोकप्रिय आहेत. या खेळांना आणि पारंपरिक लोकनृत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

रंगभूमी : जपानी नाट्याचा उगम धार्मिक विधीतून झाला. फार पूर्वी भात पेरणीच्या वेळी केलेल्या उत्सवात, मूकाभिनयाच्या खेळात किंवा पिशाचनिवारणविधीत माणसे राक्षसांची नक्कल करीत असत. जेव्हा चीन, कोरिया यांसारख्या मुख्य देशांबरोबर दळणवळणाचे मार्ग जपानला मोकळे झाले, तेव्हा विशेषतः चीनमधील बु-गाकु, गि-गाकु, सान्-गाकु हे नृत्यप्रकार त्यांच्या जपानीकरणामुळे नाट्यप्रयोगात रूपांतरित झाले. हे नाट्यप्रकार अगदी सुरुवातीला हे-आन् राजवटीत (७९४–११९१) राजदरबारी आणि बहुतांशी सरदार घराण्यातील लोकांच्या करमणुकीसाठी दाखवले जात असत. गि-गाकु हा नृत्यप्रकार बौद्धधर्मीय देवालयांनी संस्कारविधीच्या वेळी वापरला परंतु काळाबरोबर हा प्रकार नाहीसा होत गेला व उरले फक्त मुखवटे. त्यांना गि-गाकु मेन (गि-गाकु मुखवटे) म्हणतात. सान्-गाकु नावाचे चिनी लोकनृत्य जपानच्या खेड्यापाड्यांत तात्काळ लोकप्रिय झाले व त्याचा जपानी लोकनृत्याशी पूर्णपणे मिलाफ झाला.

कामाकुरा राजवटीत (११९२–१३३५) राजकीय सत्ताधारी व सांस्कृतिक गोष्टींचे आश्रयदाते अशी जी सरदारघराणी होती, त्यांची जागा योद्ध्यांच्या घराण्यांनी घेतली आणि त्यांनी देन्-गाकु व सारूगाकुसारख्या लोकनृत्यांना आश्रय दिला. पूर्वी राजाश्रय असलेला बु-गाकु हा नृत्यप्रकार त्यामुळे लोप पावला. त्यानंतरच्या मुरोमाची राजवटीत (१३३६–१५७३) आशिकागा शासनकर्त्यांनी सारू-गाकु या नृत्यप्रकाराला विशेष पाठिंबा दिला आणि कान्‌आमी व झेआमी या दोन सुप्रसिद्ध नटांनी या नृत्याचे रूपांतर नो आणि नो-क्योगेन या नाट्यप्रकारांत केले. नो हे नाट्य योद्ध्यांच्या घराण्यात काही खास प्रसंगी दाखविले जाई.

त्यानंतरची एडो राजवट सामान्य प्रजेच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरली. या काळात सामुराई जरी सामाजिक दृष्ट्या वरच्या थरांतील मानले जात, तरी प्रत्यक्षात मात्र व्यापारी वर्गाचे महत्त्व जास्त होते. याच काळात सामान्य जनतेने जपानी सांस्कृतिक गोष्टींची जोपासना व वाढ करण्यात बराचसा पुढाकार घेतला. त्यातूनच दोन लोकप्रिय नाट्यप्रकारांचा उदय झाला : (१) निनग्यो-जोरूरी हा प्रकार ‘बुनराकु’ म्हणून सर्वश्रुत आहे. (२) काबुकी नाट्य. निनग्यो (बाहुल्या) यांच्या साहाय्याने दाखविलेल्या लोकनाट्यापासून निनग्यो-जोरूरी किंवा ‘बुनराकु’ हे नाट्यप्रकार तयार झाले. बाहुल्यांच्या साहाय्याने केलेल्या या नाटकात सूत्रधार (जोरूरी) शामिसेन नावाच्या तंतुवाद्याच्या साथीवर कथा सांगे. आधुनिक काळात शिम्पा-गेकी, शिन्‌कोकु-गेकी, झेन्‌शिन्‌झा वगैरे नवनाट्यप्रकार उदयाला आले आहेत.

चित्रपट :विदेशी बोलपट जपानमध्ये प्रथम १९२५ मध्ये ‘मोनोइऊ फिरुमू’ (बोलते चित्रपट) या नावाने दाखविले गेले आणि खराखुरा पहिला जपानी बोलपट मादामू तो न्योबो  ‘शोचिकू’ कंपनीने तयार करून १९३१ मध्ये दाखविला. पहिला बोलपट स्टूडिओ पीसीएल् (फोटोग्राफिक केमिकल लॅबोरेटरी) त्याच वर्षी उभारण्यात आला. त्यातूनच पुढे जपानमधील अत्यंत प्रभावी बोलपट निर्मितिसंस्थेचा–तोहो एइगा कंपनीचा – जन्म झाला. आज या कंपनीने जपानी चित्रपट-उद्योगाचा तिसरा हिस्सा काबीज केला आहे. तिच्या बरोबरीने ‘शोचिकू’ व ‘निक्कात्सु’ याही आहेत. १९४२ मध्ये या दोन्ही कंपन्या ‘दाइतो एइगा’ आणि ‘शिको एइगा’ यांत विलीन झाल्या आणि त्यांतूनच ‘दाइएई कंपनी’ निर्माण झाली. १९५१ मध्ये व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविल्या गेलेल्या ‘दाइएई’ निर्मित राशोमोन  या चित्रपटाला पहिले पारितोषिक मिळाले. पहिला जपानी रंगीत बोलपट म्हणून कार्मेन नो किक्यो  या ‘शोचिकू’ निर्मित व देशातच तयार झालेल्या ‘फुजिकलर फिल्म’ वर चित्रित झालेल्या व मार्च १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे नाव घेता येईल. ऑगस्ट १९५३ मध्ये ‘दाइएई’ने पहिला रंगीत चित्रपट जिगोकुमोन  (नरकाचे द्वार) अमेरिकन इस्टमन कलर फिल्मचा वापर करून यशस्वीपणे तयार केला. या चित्रपटामुळे जपानी चित्रपटांत रंगीत चित्रपटांना प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर एप्रिल १९५७ मध्ये ‘दाइएई’ने पहिला रुंद पडद्यावरील चित्रपट (वाइड्स्क्रीन) तयार केला. त्यात त्यांनी सिनेमास्कोप चित्रणपद्धतीचा वापर केला. त्या चित्रपटाचे नाव ओतोरी जो नो हानायोमे  (फिनिक्स किल्ल्यावरील वधू) असे होते. १९५९ नंतर एकापाठोपाठ एक दूरचित्र क्षेपण केंद्रे उभारली गेली. या नवीन माध्यमाच्या अवतारामुळे सिनेमाचे प्रेक्षक कमी होऊ लागले. आज जपानी चित्रपट व्यवसायाला पुन्हा आत्मपरीक्षणाची गरज आहे. तो आजदेखील दूरचित्रवाणीच्या आक्रमक आव्हानाला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी एखाद्या नवीन व प्रभावी अशा मार्गाच्या शोधात आहे.


क्रीडाप्रकार : जपानमधील मूळचे मुख्य दोन खेळ म्हणजे सुमो व जूडो हे कुस्तीचे प्रकार होत. आता मात्र बेसबॉल, टेनिस व व्हॉलीबॉल हे खेळही आवडीने खेळले जातात. जवळजवळ प्रत्येक शाळा, वसाहती व कार्यालये यांचे या खेळांचे स्वतःचेच संच आहेत. जपानी चहापानविधीच्या वेळी जी पुष्परचना करतात, ती मात्र पूर्वापार चालत आलेली आहे. पूर्वापार चालत आलेले खेळ व करमणुकीचे प्रकार व पाश्चिमात्य खेळ व करमणुकीचे प्रकार यांनी जपानी संस्कृती अधिक संपन्न झाली आहे.

नोमा, सेइरोकू; कोकुबू, तामोत्सू (इं.); खडपेकर, श्रीकृष्ण; देशिंगकर, शरयू (म.)

महत्त्वाची स्थळे : सोळाव्या शतकात नारा, क्योटो, कामाकुरा या राजधान्यांव्यतिरिक्त जपानमध्ये एकही शहर नाव घेण्यासारखे नव्हते. यानंतर जमीनदारवर्गाने कुशल कामगार आणि व्यापारी यांना आपल्या राहत्या ठिकाणी जमवून किल्लेवजा शहरे वसविली. जपानमधील जवळजवळ सर्वच शहरांचा उदय अशाप्रकारे शहरे वसविण्यातून झाला आहे.

जटिलता हा जपानचा स्थायीभाव असला आणि जुनाट पारंपारिक आणि क्लिष्ट वृत्तींचा हा देश दुसऱ्या महायुद्धापासून आधुनिक उद्योगधंद्यांचे प्रचंड आगर बनला असला, तरी नव्या-जुन्याचे तसेच पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतींचे मिश्रण येथे पाहावयास मिळते. निसर्गाशी जवळीक आणि यांत्रिक युगातील समस्या यांचा समतोल क्योटो, नारा या उद्यान प्रसिद्ध शहरांत दृष्टीस पडतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने औद्योगिक क्षेत्रात जगामध्ये आघाडी मिळविली असून प्रमुख उत्पादक,  निर्यात करणारा देश अशी ख्याती मिळविली आहे. त्या अनुषंगाने त्याच्या अनेक शहरांची वाढ झपाट्याने झाली आहे. अशा शहरांत टोकिओ, क्योटो, ओसाका, कीटाक्यूशू, कोबे, नागोया इत्यादींचा समावेश करता येईल.

राजधानी टोकिओ हे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व व्यापारी केंद्र असून महत्त्वाचे पर्यटनकेंद्र आहे. उद्योगधंद्यांनी गजबजलेल्या या शहरात अनेक सुंदर उद्याने-उपवने, मंदिरे असून शहरभर कालव्याचे जाळे पसरले आहे. येथील शाही राजवाडा, विविध संग्रहालये, बुद्धमंदिरे प्रेक्षणीय आहेत. क्योटोहून राजधानी टोकिओला हलली असली, तरी राज्यारोहणाचे समारंभ अद्यापही क्योटोतच होतात. बुद्धप्रतिमा व बुद्धमंदिरे यांसाठी हे प्रसिद्ध असून नो व काबुकी नाट्यप्रकारांची खास रंगमंदिरे येथेच आहेत. ओसाका हे टोकिओ खालोखाल मोठे शहर असून उद्योगधंद्यांच्या प्रचंड वाढीमुळे याला जपानचे ‘शिकागो’ व कापड उद्योगाच्या एकत्रीकरणामुळे ‘मँचेस्टर’ असेही म्हणतात. म्हणूनच ही पश्चिम जपानची आर्थिक व व्यापारी राजधानी समजली जाते. येथील सुंदर बागबगीचे व बुद्धमंदिर तसेच शिटेनोजी मंदिर प्रेक्षणीय आहेत. येथे १९७० चे एक्स्पो प्रदर्शन भरले होते. कीटा-क्यूशू अवजड उद्योगधंद्यांचे प्रचंड औद्योगिक केंद्र असून कोबे आंतरराष्ट्रीय व्यापारी उलाढालीत पहिल्या क्रमांकाचे उत्कृष्ट बंदर आहे. कावासाकी हे गेंजी मंदिरासाठी प्रसिद्ध व महत्त्वाचे औद्योगिक शहर व बंदर असून तेथे अनेक भारी उद्योगधंदे चालतात. आमागासाकी हे औद्योगिक, व्यापारी शहर असून दुसऱ्या महायुद्धात याची अतोनात पडझड झाली पण आता पुनर्वसन झाले आहे. योकोहामा हे उत्तम प्रतीचे बंदर आहे. येथे उद्योगधंद्यांचे एकत्रीकरण झाले असून १९४५ च्या बाँबहल्ल्यात हे उद्ध्वस्त झाले होते. आता त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. नागोया हे प्रसिद्ध औद्योगिक शहर असून येथील सतराव्या शतकातील किल्ला, विद्यापीठ, बुद्धमंदिर प्रेक्षणीय आहेत. बाँबवर्षावात याचेही अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा नवे शहर अस्तित्त्वात आले आहे. कानाझावा येथील केनरोकुएन उद्यानाची गणना जपानमधील सर्वोत्तम उद्यानांत करण्यात येते, तर येथील लाखकाम आणि कुटानीनामक चिनीमातीची भांडी प्रसिद्ध आहेत. तसेच जुन्या वेशी, किल्ल्यातील इमारती व कोटाचा भाग अद्यापही आपले पुरातन अस्तित्व टिकवून आहे. दुसऱ्या महायुद्धात जगातील पहिल्याच अणुबाँबचे लक्ष्य ठरलेल्या हीरोशीमाची त्या वेळी अतोनात प्राणहानी, वित्तहानी होऊन सबंध शहर उद्ध्वस्त झाले. आता नव्याने शहर उभारण्यात आले असून नानाविध उद्योगांचे येथे केंद्रीकरण झाले आहे. रशिया-जपान युद्धात येथे लष्करी तळ होता. साप्पोरो हे सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र असून १९७२ चे हिवाळी ऑलिंपिक सामने येथेच भरले होते. १९२८ मध्ये येथे होक्काइडो विद्यापीठाची स्थापना झाली.

कापडी, सुलभा

संदर्भ : 1. Aynsawa, Iwao, A History of Labour in Modern Japan, Honolulu, 1966.

2. Beasley, W. G. The Modern History of Japan, London, 1963.

3. Bergamini, David, Japan’s Imperial Conspiracy, New York, 1972.

4. Buck, P. S. The People of Japan, London, 1966.

5. Cressey, G. B. Asia’s Lands and Peoples, New York, 1963.

6. Datta, Amlan, A Century of Economic Development of Russia and Japan, Calcutta, 1967.

7. Dening, Sir Esler, Japan, London, 1960.

8. Dore, R. P. Land Reform in Japan, London, 1959.

9. Ginsburg, N. S. Ed. Pattern of Asia, New York, 1958.

10. Hall, R. B. Jr. Japan : Industrial Power of Asia, New York, 1963.

11. Isida, Ryuziro, Geography of Japan, Tokyo, 1961.

12. Ogura, Takekazu, Ed. Agricultural Development in Modern Japan, Tokyo, 1963.

13. Ohkawa, Kazushi Klein, Lawrence, Ed. Economic Growth : The Japanese Experience Since the Meiji Era, Homewood, 1968.

14. Reischauer, E.O. Japan: Past and Present, New York, 1965.

15. Robinson, H. Monsoon Asia, London, 1966.

16. Storry, Richard, A History of Modern Japan, London, 1963.

17. Tanaka, K. Building a New Japan: A Plan for Remodelling the Japanese Archipelago, Tokyo, 1973.

18. The Ministry of Foreign Affairs of Japan, Japan in Transition: One Hundred Years of Modernization, Tokyo, 1968.

19. Trewartha, G. T. Japan : A Physical, Cultural and Regional Geography, Madison, 1963.

20. Tsunoyama, Sakae, Concise Economic History of Japan, Mystic, 1965.

21. Ward, R. E. Ed. Political Development in Modern Japan, Princeton, 1968.


जपान
मुरूजी पॅगोडा, नारा

फुजियामा पर्वत

जपानी कुटुंबाचे भोजनआंतरराष्ट्रीय सभागृह, क्योटोजपानमधील भातलावणीकूरोबे नदीवरील कूरो-योन धरण, होन्शू

जपानी बाहुल्यांचा खेळमोटोमाची येथील मोटार कारखाना, होन्शूमिकी कोळसा खाण, क्यूशूयांत्रिक कापणी व मळणी

रेशीमकिड्यांचे संवर्धनकेंद्र