जठरपेषणी : शेवंडे, चिमोरे, झिंगे, खेकडे इ. कवचधारी (क्रस्टेशियन) प्राण्यांच्या जठरात अन्नाचे बारीक चूर्ण करण्याकरिता असणाऱ्या यंत्रणेला जठरपेषणी हे नाव दिलेले आहे. येथे दिलेली माहिती शेवंड्याच्या जठरपेषणीची आहे परंतु चिमोरे, खेकडे वगैरे प्राण्यांच्या जठरपेषणीलाही ती लागू पडणारी आहे.
शेवंड्याच्या आहारनालाचे (अन्नमार्गाचे) तीन भाग पडतात : (१) अग्रांत्र, (२) मध्यांत्र आणि (३) पश्चांत्र. अग्रांत्र आणि पश्चांत्र हे भाग बाह्यस्तराच्या अंतर्वलनाने (आतल्या बाजूला वळून) तयार झालेले असल्यामुळे त्यांना आतून उपचर्माचे (त्वचेवर असणाऱ्या निर्जीव संरक्षक स्तराचे) अस्तर असते. मध्यांत्राला अंतःस्तराचे अस्तर असते. अग्रांत्रामध्ये मुख, ग्रासिका (मुखगुहा आणि जठर यांच्यामध्ये असणारा आहारनालाचा भाग) आणि जठर यांचा समावेश होतो. शीर्षाच्या अधर पृष्ठावर मुख असून ते मुखांगांनी वेढलेले असते. ते आखूड ग्रसिकेत उघडते आणि ग्रसिका एका मोठ्या स्नायुमय कोशात उघडते. या कोशाला जठर म्हणतात. एका संकोचनाने जठराचे दोन असमान भाग पडलेले असतात मोठ्या अग्र भागाला उपहृद्-कोष्ठ म्हणतात आणि ग्रसिका यात उघडते लहान पश्च भागाला निजठरकोष्ठ म्हणतात. उपहृद्-कोष्ठाच्या उपचर्मीय अस्तरावरील काही जागा कॅल्शियममय होऊन कठीण अस्थिका (दात असलेले कॅल्शियममय पट्ट) तयार झालेल्या असतात. उपहृद्-कोष्ठाच्या उत्तर भित्तीत अशा आठ अस्थिका असतात आणि त्यांची मांडणी षट्कोणासारखी असते. उपहृद्-कोष्ठाच्या मागच्या अर्ध्या भागाच्या छतात एक मध्य, रुंद, तिकोनी, आडवी पट्टिका असते, ती अपहृद्-अस्थिका (कार्डीॲक ऑस्सिकल) होय या अस्थिकेच्या मध्यावरून निघून तिच्याशी काटकोन करणारी एक अनुदैर्घ्य (लांब) मध्य अस्थिका असते, तिला पुच्छउपहृद्-अस्थिका (यूरोकार्डिॲक ऑस्सिकल) म्हणतात. उपहृद्-अस्थिकेच्या बाहेरच्या दोन्ही टोकांपासून दोन लहान पार्श्व (बाजूकडील) पक्षअस्थिका (टेरोकार्डिॲक ऑस्सिकल) निघतात. पक्ष-अस्थिकांपासून प्रत्येक बाजूला एक युग्म-पार्श्व-अस्थिका (झायगोकार्डिॲक ऑस्सिकल) निघते. या अस्थिका लांब, कानशीसारख्या आणि मजबूत असतात. उपहृद्-कोष्ठाच्या पश्च भागाच्या छतात चौकोनी निजठर-अस्थिका (पायलॉरिक ऑस्सिकल) असते. या अस्थिकेचा इतर कोणत्याही अस्थिकेशी संबंध नसतो. उपहृद्- व निजठर-कोष्ठाच्या मधील भित्तीच्या पृष्ठीय खळग्यास इंग्रजी ‘Y’ या अक्षराच्या आकाराची पूर्व-निजठर-अस्थिका (प्रीपायलॉरिक ऑस्सिकल) असते. पुच्छ-उपहृद्-अस्थिकेच्या पश्च टोकाला ती जोडलेली असते. पूर्व-निजठर-अस्थिकेवर एक मोठा, पिवळा, मध्य दात असतो आणि प्रत्येक युग्म-पार्श्व-अस्थिकेवर एक पार्श्व दात असतो. प्रत्येक पार्श्व दाताखाली एक लहान अणकुचीदार दात असतो. वर उल्लेख केलेल्या मुख्य अस्थिकांखेरीज आणखी काही क्षुल्लक अस्थिका असतात.
जठरपेषणी आपले कार्य अनेक बाह्य आणि आभ्यंतर स्नायूंच्या साहाय्याने पार पाडते. बाह्य स्नायू उपहृद्-कोष्ठाच्या भित्तींपासून निघून बहिःकंकालाच्या (बाहेरच्या कठीण आवरणाच्या) आतल्या पृष्ठाला चिकटलेले असतात आभ्यंतर स्नायू अस्थिकांपासून निघतात आणि जठराच्या भित्तींवर त्यांचे निवेशन (बसविणे) झालेले असते. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे उपहृद्-कोष्ठाच्या भित्ती, अस्थिका आणि ह्यांच्यावरील दातांची हालचाल होते.
शेवंडा आपल्या भक्ष्याचे (कृमी, मृदुकाय प्राणी, लहान मासे इ.) जंभांनी तुकडे करतो. हे अन्न मुखातून ग्रसिकेत व तेथून उपहृद्-कोष्ठात जाते. अन्न उपहृद्-कोष्ठात गेल्यावर ग्रसिकेचे द्वार झडपेने बंद होते. कोष्ठाच्या अस्तरावरील कायटिनी दृढरोमांच्या (कायटिन या कंकाल द्रव्यापासून तयार झालेल्या ताठ केसांच्या) हालचालींमुळे ते कोष्ठाच्या पश्च भागात वरच्या बाजूला ढकलले जाते. अन्न या भागात आल्यावर अस्थिकांच्या स्नायूंचे आकुंचन होते व त्यामुळे तिन्ही मजबूत दात मध्य रेषेवर जोराने एके ठिकाणी येतात. या स्नायूंच्या शिथिलनाने (सैल होण्यामुळे) दात एकमेकांपासून दूर जातात. अशा प्रकारे जलद होणाऱ्या दातांच्या एकांतरित (आलटून पालटून होणाऱ्या) हालचालींमुळे कोष्ठातील अन्नाचे चूर्ण होते. अन्नाचे चुर्ण करणाऱ्या या सगळ्या उपकरणाला जठरपेषणी हे नाव दिलेले आहे.
अन्न उपहृद्-कोष्ठातून निजठर-कोष्ठात जाते. निजठर-कोष्ठाच्या प्रवेश द्वारात तीन घड्यांपासून निघालेल्या लांब कायटिनी रोमांचे एक गाळणे असते. निजठर-कोष्ठात शिरताना अन्न या गाळण्याने गाळले जाते. अतिशय बारीक कण निजठर-कोष्ठात जातात व जाड कण किंवा बारीक तुकडे उपहृद्-कोष्ठात राहून जास्त बारीक केले जातात. निजठर-कोष्ठात अन्नाचे पचन होते.
कवचधारी प्राण्यांखेरीज आणखीही काही प्राण्यांत पेषणी असते. गांडुळाच्या आठव्या व नवव्या खंडांतील आहारनालाच्या भागाचे रुपांतर होऊन पेषणी बनलेली असते. हिची भित्ती जाड, स्नायुमय असून हिला आतून उपचर्माचे अस्तर असते. झुरळाच्या पेषणीची भित्तीदेखील स्नायुमय व जाड असून आतील उपचर्माच्या अस्तरावर सहा मोठे कायटिनी दात असतात. पक्ष्यांच्या जठराचे दोन भाग असतात, एक अग्र व दुसरा पश्च. अग्र भागाला ग्रंथिल (ग्रंथिमय) जठर आणि पश्च भागाला पेषणी म्हणतात. ग्रंथिल जठराच्या भित्तीपासून पाचक रस उत्पन्न होतो. पेषणीची भित्ती जाड आणि स्नायुमय असते. तिच्या आतले अस्तर कठीण असते. पेषणीमध्ये लहान लहान खडे सापडतात ते पक्ष्याने गिळलेले असतात. अन्न ग्रंथिल जठरात आल्यावर त्यात पाचक रस मिसळतो हे अन्न नंतर पेषणीत जाते. पेषणीच्या भित्तीच्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणाने आणि कठीण अस्तर व खडे यांच्या साहाय्याने अन्नाचे चूर्ण होते.
मुठे, प्र. त्र्यं.
“