जटिल पट्टिताश्म समूह : राजस्थानातील ⇨आर्कीयन  खडकांच्या एका गटाचे नाव. यात कृष्णाभ्रकी पट्टिताश्म, ग्रॅनाइट आणि कृष्णाभ्रकी व क्लोराइटी सुभाजा (सहज भंगणारा रूपांतरित खडक) यांचे एकाआड एक पट्टे आढळतात. अशा पट्टित खडकांच्या समूहामध्ये हॉर्नब्‍लेंड सुभाजा, अँफिबोलाइट, एपिडायोराइट, गार्नेटयुक्त ग्रॅन्युलाइट तसेच पेग्मटाइट व ॲप्लाइट या खडकांच्या अनेक भित्ती आणि शिरा आहेत. निरनिराळ्या काळांमध्ये झालेल्या अनेक अग्निज अंतर्वेशनांमुळे (घुसण्यांमुळे) व रूपांतरणांमुळे त्यांचे मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. अशा जटिल समूहाचे सापेक्ष वय ठरविणे अवघड असते. अरवली संघ याच्यावर विसंगतपणे पसरलेला असल्याने ते अरवली संघापेक्षा जुने आहेत. ज्ञात धारवाड गाळापेक्षा जुने असलेले काही आदिम गाळ या समूहामध्ये आहेत म्हणून काहींच्या मते हे भारतातील सर्वांत जुने खडक असावेत. काही ठिकाणी हे बेराच ग्रॅनाइटापेक्षा जुने असल्याचे दिसून आले आहे. धारवाड आणि बेराच ग्रॅनाइट दोन्ही अरवली संघाहून जुने असल्यामुळेही जटिल पट्टिताश्म समूह अरवली संघापेक्षा जुना ठरतो. चितोडजवळीत बुंदेलखंडी पट्टिताश्माशी त्याचा सहसंबंध जोडण्यात येतो. मेवाड, अजमेर-मेरवाड इ. भागांत हा समूह आढळतो.

ठाकूर, अ. ना.