जकात–२ : व्यापारी देवघेवींमुळे जो माल राष्ट्राची हद्द ओलांडतो, त्यावर शासनाने बसविलेला कर. एखाद्या राष्ट्रातील मार्गावरून ने-आण होत असलेल्या मालावर किंवा राष्ट्राच्या निर्यातीवर जकात घेतली जाते परंतु मुख्यत्वे जकातीचे स्वरूप म्हणजे आयातीवरील कर. जकात लादण्याचा हेतू लक्षात घेऊन जकातीचे उत्पन्न-कर आणि संरक्षक-कर असे एक वर्गीकरण करतात. सरकारी उत्पन्नात भर पडावी म्हणून आयातीवर बसविलेले कर ते उत्पन्न-कर आणि देशी उद्योगांना संरक्षण मिळावे म्हणून आयातीवर बसविलेले ते संरक्षक-कर. खरे पाहिले, तर उत्पन्न-करांची पातळी उंच असल्यास त्यांच्यापासून सुद्धा देशी उद्योगांना संरक्षण मिळू शकते व संरक्षक-करापासूनही सरकारला भरपूर उत्पन्न मिळणे शक्य असते. जकात आकारणीच्या पद्धतीवरून जकातीचे दुसरे एक वर्गीकरण करतात : मूल्यानुसार कर व विनिर्दिष्ट कर. जेव्हा कर आकारणीची रक्कम मालाच्या मूल्यावरून ठरवितात, तेव्हा त्याला मूल्यानुसार कर म्हणतात. उदा., मूल्याच्या २० टक्के कर. जेव्हा कर आकारताना मूल्याऐवजी मालाचे परिमाण (वजन, लांबी, एककांची संख्या) विचारात घेतात, तेव्हा त्यास विनिर्दिष्ट कर म्हणतात. उदा., दर मीटरास ६० पैसे किंवा दर किलोस ३ रु. काही वेळा कर आकारताना या दोन्ही पद्धतींचे मिश्रण करतात. उदा., मालाच्या मूल्यानुसार विनिर्दिष्ट कराचा दर वेगळा असू शकतो. आयात करांची अनुसूची म्हणजे एक गुंतागुंतीचा लेख असतो. त्यात अनेक प्रकारचे आयात कराचे दर असतात : (१) करारानुसारी, (२) सर्वसाधारण, (३) अधिमान्य. ज्या राष्ट्राशी व्यापाराबाबत करारनामे झालेले असतात, त्यांच्याकडून आयात होणाऱ्या मालावर करारानुसारी दराने कर आकारतात. इतर राष्ट्रांमधून येणाऱ्या मालावर सर्वसाधारण कर आकारला जातो. काही राष्ट्रांकडून आयात होणाऱ्या मालावर अधिमान्य दरानेही जकात आकारली जाते.

  सर्वसाधारणपणे युद्धकाळी जकात दर वाढवून राष्ट्रे आपल्या उत्पन्नात भर टाकतात. मंदीच्या काळातही संरक्षक-करात वाढ होते. या उलट शांततेच्या व भरभराटीच्या काळात राष्ट्रांची खुल्या व्यापाराकडे प्रवृत्ती होते. औद्योगिक दृष्ट्या मागासलेली आणि विकसनशील राष्ट्रे जकातीचा वापर मुख्यतः देशी उद्योगधंद्यांना संरक्षण देण्यासाठी करतात. प्रगत औद्योगिक राष्ट्रांनी शेतमालाला संरक्षण म्हणून जकातीचा अवलंब केल्याचे आढळते.

  आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण करण्याचे इतर मार्ग राष्ट्रांना उपलब्ध असल्यामुळे जकातीचे त्या बाबतीतील महत्त्व हल्ली बरेच कमी झाले आहे. 

धोंगडे, ए. रा.