करमुक्ति : करमुक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीस किंवा संस्थेस कर देण्याच्या जबाबदारीतून मुक्त करणे. ह्यालाच करमाफी असेही म्हणतात. करव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे कर असतात. काही विशिष्ट कारणांसाठी एखाद्या कराचा भार विवक्षित व्यक्तींवर किंवा संस्थांवर पडू नये, असे धोरण असल्यास त्यांना कर भरण्याच्या जबाबदारीतून संपूर्ण मुक्त करतात. उदा., भारतात व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ६,००० रु. किंवा त्यांहून कमी असल्यास तिला प्राप्तिकर भरावा लागत नाही.

करमुक्ती अनेक कारणांसाठी दिली जाते. व्यक्तीची किंवा संस्थेची करदानक्षमता करभार सहन करण्याइतकी नसल्यास, त्यांच्यासाठी करमुक्तीची सोय करतात. उदा., भारतात वार्षिक प्राप्ती ६,००० रु. किंवा त्यांहून कमी असणार्‍या हिंदू अविभक्त कुटुंबांना प्राप्तिकरापासून मुक्त केले आहे. एकूण करवसुलीच्या मानाने वसुलीचा खर्च व खटाटोप वाजवीपेक्षा जास्त होईल, असे वाटल्यास करमुक्तीची तरतूद करून खर्च व खटाटोप मर्यादित करता येतात. उदा., भारतात वार्षिक विक्री विशिष्ट रकमेपेक्षा कमी असल्यास विक्रेत्यांना राज्य सरकारे करमुक्ती देतात. वस्तूंवर कर बसविल्याने झालेल्या किंमतवाढीचा बोजा उपभोक्त्यांना सहन करावा लागू नये, यासाठीही काही वेळा करमुक्ती देण्यात येते. उदा., सामान्यतः ज्या राज्यांत एकबिंदू विक्रीकर आकारण्यात येतो, तेथे कच्चा माल व जीवनावश्यक गरजा करमुक्त असतात. एखाद्या उद्योगधंद्यास उत्तेजन द्यावयाचे असल्यासही करमुक्तीचा अवलंब करतात. उदा., भारतात कुटीरोद्योग व ग्रामोद्योग वस्तूंचे विक्रेते विक्री-करापासून मुक्त असतात. नवीन उत्पादनसंस्था अस्तित्वात याव्यात, म्हणून त्यांना काही ठराविक काळापर्यंत प्राप्तिकरातून व कंपनीकरातून मुक्त करण्यात येते. संपत्तीच्या वाटणीतील विषमता कमी करण्याच्या उद्देशाने बसविलेल्या करांचा भार फक्त विशिष्ट पातळीपेक्षा जास्त संपत्ती धारण करणाऱ्यांवरच टाकावयाचा असतो म्हणून त्या पातळी पेक्षा कमी संपत्ती असलेल्या व्यक्ती करमुक्त असतात. उदा., भारतात १,००,००० रु. हून कमी संपत्तिधारकांना संपत्तिकरापासून व ५०,००० रु. हून कमी वारसा हक्क मिळणाऱ्यांना वारसा करापासून करमुक्ती मिळते.

करमुक्ती व करसूट किंवा करसवलत या दोहोंत फरक आहे. करमुक्तीचा उद्देश संबंधित व्यक्तीस अगर संस्थेस करापासून पूर्णतया मुक्त करण्याचा असतो, तर करसूट देताना कर पूर्णतः वसूल न करता काही प्रमाणात सवलत दिली जाते, म्हणजेच कर कमी भरावा लागतो. उदा., भविष्यनिर्वाह निधीसाठी व्यक्तीने भरलेली रक्कम किंवा आयुर्विम्यासाठी भरलेले हप्ते यांची काही अटींवर विशिष्ट प्रमाणात प्राप्तीतून वजावट करून प्राप्तिकरात सूट देण्यात येते.

धोंगडे, ए. रा.