परिव्यय: विशिष्ट परिमाणात एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उत्पादन घटकांवर करावा लागणारा खर्च. उत्पादनाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिव्ययाविषयीची माहिती व्यवस्थापकांना अनेक प्रकारे उपयोगी पडते. आपल्या उत्पादनाच्या योजना अंमलात आणताना कर्मचाऱ्यांचे संचालन करण्याकरिता त्यांना परिव्ययमाहितीचा आधार घेता येतो. त्या माहितीचा उपयोग करून कर्मचाऱ्यांना संस्थेची नियोजित उद्दिष्टे गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा देता येते. विविध विभागांच्या प्रगतीचे मूल्यन करण्यासाठीसुद्धा व्यवस्थापकांना परिव्यय माहितीचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठीदेखील ही माहिती आवश्यकच असते. परिव्ययविषयक माहितीचा विविध मार्गांनी उपयोग करून घेण्यासाठी परिव्यय लेखांकन पद्धतींचा वापर करणे आधुनिक व्यवस्थापनात अपरिहार्य समजले जाते.

उद्योगसंस्थेच्या तपशीलवार परिव्ययांचा व्यवस्थापकांसाठी सारांश काढता यावा, म्हणून त्यांचे वर्गीकरण आवश्यक असते. हे वर्गीकरण कार्यानुसार करता येते. उदा., उत्पादन, विक्रय, वितरण, संशोधन व विकास आणि प्रशासन. प्रत्येक कार्यातील परिव्यय केंद्रांसाठी व परिव्यय एककांसाठी केलेला खर्च एकत्रित दाखवावा लागतो. परिव्यय केंद्र म्हणजे ज्यावरील खर्च निश्चित करता येतो असे स्थान, व्यक्ती किंवा साधनसामग्री. परिव्यय एकक म्हणजे ज्याचा खर्च निश्चित करता येतो, असा उत्पादित वस्तूचा किंवा सेवेचा वा उत्पादनकालाचा एकक. सर्व परिव्यय केंद्रांचा परिव्यय अखेरीस परिव्यय एककाकडे संविभाजित करता येतो. परिव्यय नियंत्रणासाठी परिव्ययाचे प्रथमतः परिव्यय केंद्राना अनुलक्षून वर्गीकरण करण्यात येते. परिव्यय केंद्रावरील व परिव्यय एककांवरील परिव्ययाचे परिव्ययमूलतत्वांमध्ये विभाजन केले जाते. ही मूलतत्त्वे तीन आहेत: (१) सामग्री परिव्यय (पुरविण्यात आलेल्या सामग्रीचा खर्च), (२) श्रमिक परिव्यय (कर्मचाऱ्यांचे वेतन, पगार, अधिलाभांश, अडत इ. खर्च) व (३) इतर परिव्यय (उदा., पाणी व वीज यांवरील खर्च किंवा घसारा खर्च). या मूलतत्त्वांपैकी प्रत्येकाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असेही वर्गीकरण करण्यात येते. ‘प्रत्यक्ष परिव्यय’ म्हणजे ज्याचे विल्हेवार वाटप संपूर्णतः एका परिव्यय केंद्राकडे किंवा परिव्यय एककाकडे करता येते तो. ‘अप्रत्यक्ष परिव्यय’ म्हणजे ज्याचे विल्हेवार वाटप कोणत्याही एककाच्या उत्पादनाकडे किंवा परिव्यय केंद्राकडे प्रत्यक्षतः करता येणे अशक्य असल्यामुळे कोणत्यातरी उचित आधारावर करावे लागते, असा खर्च. उदा., एखाद्या परिव्यय एककासाठी लागणाऱ्या सामग्रीवरील परिव्ययाचे वाटप त्या एककाचा ‘प्रत्यक्ष सामग्री परिव्यय’ म्हणून करता येते. परंतु कारखान्यासाठी द्याव्या लागणाऱ्या भाड्याचे काही उचित तत्त्वांनुसार विविध परिव्यय केंद्रांमध्ये ‘अप्रत्यक्ष इतर परिव्यय’ म्हणूनच संविभाजन करावे लागते. एखाद्या परिव्यय एककासाठी किंवा कालखंडातील एकूण उत्पादनासाठी केलेल्या प्रत्यक्ष सामग्री, श्रमिक आणि इतर परिव्यय मिळून होणाऱ्या खर्चास ‘प्राथमिक उत्पादन परिव्यय’ असे म्हणतात. अप्रत्यक्ष उत्पादन परिव्यय, विक्रय परिव्यय, वितरण परिव्यय, संशोधन व विकास खर्च आणि प्रशासन खर्च एकत्र केल्यास त्यास ‘उपरि-परिव्यय’ (नियत परिव्यय) असे नाव आहे. वस्तुगणिक उपरि- परिव्यय ‘स्थिर’ किंवा ‘अस्थिर’असू शकतो. परंतु ज्यामध्ये या दोहोंचेही मिश्रण असते, त्याला ‘अर्ध अस्थिर’ परिव्यय म्हणतात. स्थिर परिव्यय हा कालखंडावर अवलंबून असतो, म्हणजेच कालक्रमणानुसार तो वाढत जातो. परंतु उत्पादनाच्या परीमाणाशी त्याचा काहीही संबंध नसतो. उदा., भाडे व पट्टी यांवरील खर्च, कार्यालयीन पगार, विमाखर्च इत्यादी. अर्थात हा परिव्ययही कायमचा स्थिर असतो असे नाही. कारण भावपातळीतील बदल, बाजारातील टंचाई इ. कारणांनुसार निरनिराळ्या कालखंडात हे परिव्ययही बदलणे शक्य असते. दीर्घकालीन उत्पादनाचा विचार केला, तर संस्थेच्या विकासाबरोबर होणाऱ्या उत्पादनवाढीमुळे सर्वच परिव्यय अस्थिर मानावे लागतात. जो परिव्यय उत्पादनाच्या परिमाणानुसार बदलतो परंतु ज्यांचे वाटप प्रत्यक्षत: परिव्यय एककाकडे करता न आल्याने सुयोग्य संविभाजनच करावे लागते, त्याला ‘अस्थिर उपरि-परिव्यय’ म्हणतात. एखाद्या परिव्यय एककावरील प्राथमिक परिव्यय व उपरि–परिव्यय मिळून ‘एकूण उत्पादन परिव्यय’ होतो. वरील परिव्यय वर्गीकरण पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल :

परिव्ययाचे वर्गीकरण 

प्रत्यक्ष परिव्यय 

रु. 

रु. 

प्रत्यक्ष सामग्री 

 

प्रत्यक्ष वेतन 

६ 

 

प्रत्यक्ष इतर खर्च (उदा., क्रेनचे भाडे)

१ 

 

प्रथमिक परिव्यय 

 

१२ 

उपरि–परिव्यय 

   

उत्पादन उपरि–परिव्यय 

   

अप्रत्यक्ष सामग्री (उदा., वंगण)

१ 

 

अप्रत्यक्ष श्रमिक (उदा., भांडारपालाचे वेतन)

१ 

 

अप्रत्यक्ष इतर खर्च (उदा., भाडेपट्टी, घसारा)

३ 

 

उत्पादन परिव्यय

 

५ 

विक्रय व वितरण परिव्यय

२ 

१७ 

संशोधन व विकास परिव्यय

१ 

 

प्रशासन परिव्यय

१ 

 
   

४ 

एकूण परिव्यय

 

२१ 

जेव्हा दोन किंवा अधिक वस्तूंचे उत्पादन एकाचवेळी किंवा एका क्रियेने अथवा एकाच प्रकारच्या कच्च्या मालापासून होते, तेव्हा प्राथमिक उत्पादन परिव्यय संयुक्तपणे होत असल्यामुळे त्याला ‘संयुक्त परिव्यय’ म्हणतात. अशा वेळी निरनिराळ्या उत्पादित वस्तूंमध्ये त्याचे संविभाजन करण्याचा प्रश्र उद्भवतो. तो सोडविण्यासाठी कोणतीही शास्त्रीय पद्धत उपलब्ध नसल्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यात येतो.

परिव्यय ही संज्ञा अनेकार्थी आहे. एखाद्या वस्तुसमूहाचा परिव्यय म्हणजे त्यासाठी केलेला एकूण उत्पादन परिव्यय असू शकेल परंतु त्यातील एककाचा खर्च म्हणजे सरासरी उत्पादन परिव्यय विचारात घ्यावा लागेल. एखादी संस्था दर आठवड्यास जर ५०० खुर्च्या निर्माण करीत असेल व तिने दर आठवड्यास ५०१ खुर्च्या निर्माण करण्याचे ठरविले, तर ५०१ या खुर्चीसाठी करावा लागणारा परिव्यय ५००  खुर्चीच्या सरासरी परिर्व्यांपेक्षा कमी असू शकेल किंवा काही विशिष्ट परिस्थितीत सरासरीहून अधिकही असू शकेल. त्या परिव्ययास ‘ सीमांत परिव्यय’ असे म्हणतात. उत्पादन वाढत गेल्यास सीमांत परिव्यय कायम राहील अथवा वाढत जाईल किंवा कमी होत जाईल. उत्पादनविषयक अर्थशास्त्री विवेचनात सीमांत परिव्यय ही संकल्पना फार महत्त्वाची मानतात.


‘वैकल्पिक परिव्यय’ या संकल्पनेसदेखील व्यावस्थापनविषयक निर्णय घेताना फार महत्त्व आहे. अनेक निर्णयांपैकी एखादा निर्णय निवडताना जे वैकल्पिक मार्ग सोडून दिलेले असतात, त्यांतील सर्वांत फायदेशीर असलेला मार्ग सोडल्यामुळे जी झीज सोसावी लागते, तिला स्वीकृत निर्णयाचा वैकल्पिक परिव्यय म्हणतात. उदा., समजा, एखाद्या व्यावस्थापकासमोर अ, ब व क असे तीन वैकल्पिक मार्ग आहेत व ते अवलंबिल्यास कंपनीला अनुक्रमे रु. १०,००० रु. ६००० व रु. ३,००० इतका अधिक फायदा मिळू शकेल. अशा परिस्थितीत जर त्या व्यवस्थापकाने अ मार्गाचा अवलंब न करता ब मार्ग अनुसरला, तर ब चा वैकल्पिक परिव्यय रु.४०००(रु.१०,०००– रु.६,०००) हा होईल. यालाच ‘वास्तविक परिव्यय’  असेही नाव आहे.

संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये बदल केल्यामुळे एकूण परिव्ययात जो बदल होतो, त्याला ‘विभेदक परिव्यय’ म्हणतात. क्रिया परिमाणात किंवा प्रकारात बदल केल्याने संस्थेला जो अधिक खर्च करावा लागतो, त्याला अर्थशास्त्रात ‘वाढीव परिव्यय’ म्हणतात. एखादा नवीन निर्णय घेतल्यामुळे परिव्ययात जो बदल होतो, त्याला त्या निर्णयाचा विभेदक परिव्यय किंवा वाढीव परिव्यय म्हणतात. उत्पादन-परिमाणात वेगवेगळे बदल केल्यास त्यांचे आर्थिक परिणाम काय होतील, याचा अंदाज घेण्यासाठी विभेदक परिव्यय व एकून प्राप्तीमध्ये होणारी वाढ या दोहोंची तुलना करावी लागते व त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येतो. निर्णय घेतेसमयी पूर्वी केलेला परिव्यय हा ‘अप्रस्तुत’ असतो परंतु पुढे होणारा परिव्यय हाच ‘ प्रस्तुत’ असल्याने त्याचाच विचार व्यावस्थापनात केला जातो. व्यावस्थापकीय निर्णयासाठी प्रस्तुत व अप्रस्तुत परिव्यय हे वर्गीकरणही महत्त्वाचे मानतात.

परिव्यय लेखांकन पद्धतीमध्ये ‘प्रमाणित परिव्यय’ या संकल्पनेचाही वापर केला जातो. ‘प्रमाणित परिव्यय’ म्हणजे एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी किंवा विक्रय व वितरणासाठी पुर्वनिर्धारित केलेला परिव्यय. प्रमाणित परिव्ययात दोन घटक असतातः (१) परिमाणात्मक घटक–उदा., कच्च्या मालाचे वस्तुगणिक लागणारे परिमाण, विशिष्ट प्रक्रियेसाठी लागणारे प्रमाणित श्रमिक-तास इत्यादी. (२) भावात्मक घटक–उदा., कच्च्या मालाची प्रमाणित किंमत, प्रमाणित वेतनदर इत्यादी. परिमाणात्मक घटक हे उत्पादन अभियंत्यांनी दिलेल्या विनिर्देशांवर व कारखान्याच्या पूर्वानुभवावर आधारलेले असतात, तर भावात्मक घटक ज्या काळात प्रामाण्ये निर्धारित करतात, त्या काळातील प्रत्यक्ष भावांवर आधारतात. प्रत्यक्ष उत्पादनातील परिमाणांचा व प्रमाणित भावांचा गुणाकार करून प्रमाणित परिव्यय किती असावयास पाहिजे, याची कल्पना येते. या प्रमाणित परिव्ययाशी प्रत्यक्षात झालेल्या परिव्ययाची तुलना करून त्यांच्यातील तफावत काढता येते. या तफावतीचे विश्र्लेषण करून अप्रमाणित परिव्ययाची जबाबदारी कोणाकडे, याची निश्चित करता येते व परिव्ययसुधारणा करण्यासाठी विशेष लक्ष कोठे पुरवावे, हे समजू शकते. अशा रीतीने प्रमाणित परिव्यय ही संकल्पनी व्यवस्थापन क्षेत्रात अतिशय उपयोगी पडते.

‘अंदाजित परिव्यय’ व प्रमाणित परिव्यय यांमध्ये फरक आहे. दोन्ही परिव्यय निश्चित करण्याच्या पद्धतींत साम्य असले, तरी त्यांचे उद्देश वेगवेगळे असतात. अंदाजित परिव्यय ठरविताना प्रत्यक्षात पूर्वी झालेल्या खर्चांच्या आधारे पुढील खर्चाचे अंदाज केलेले असतात. प्रत्यक्षात नंतर झालेला खर्च जर अंदाजित परिव्ययाप्रमाणे झाला, तर अंदाज बरोबर होते, असा निष्कर्ष निघतो. तसे नसल्यास भविष्यात अंदाज करताना अंदाजित परिव्ययात जरूर ते फेरफार करण्यात येतात. प्रमाणित परिव्ययाची निश्चिती करताना सबंध उत्पादनप्रक्रिया व कारखान्यातील उत्पादन घटक अतिशय कार्यक्षम असल्यास निरनिराळ्या प्रकारचे परिव्यय किती असतील, याचा विचार केला जातो. उत्पादन सुरू करण्यापूर्वी निश्चित केलेली ही प्रामाण्ये जणू काही कार्यक्षमतेची मोजमापक यंत्रे म्हणून वापरली जातात. प्रमाणित परिव्ययाचा उपयोग प्रत्यक्षात होणाऱ्या परिव्ययाशी तुलना करण्यासाठी केला जातो. प्रमाणित परिव्ययांच्या वापरापासुन पुढील फायदे संभवतातः (१) भाव व उत्पादनविषयक धोरण ठरविण्यासाठी व्यवस्थापकांना प्रमाणित परिव्ययांचा उपयोग होतो. (२) परिमाणात्मक व कालमापनाची प्रामाण्ये कर्मचाऱ्यांची व उत्पादनकेंद्राची कार्यक्षमता मोजण्यास उपयोगी पडतात. (३) व्यवस्थापकांना आपले काम करताना आवश्यक तेथेच लक्ष पुरवावे लागत असल्याने व्यवस्थापनाचे कार्य सुकर होते. (४) कर्मचारी, पर्यवेक्षक व प्रशासक यांना प्रामाण्य प्रेरणात्मक ठरतात. (५) परिव्यय लेखांकन पद्धतीत प्रमाणित परिव्यय ही संकल्पना एक कमी खर्चाचे साधन म्हणून वापरता येते.

नियतव्यय: उत्पादनसंस्थेला वस्तूच्या उत्पादनासाठी अपरिहार्य स्वरूपाचा करावा लागारा खर्च. वस्तूच्या उत्नादनाचे काही खर्च ‘अविभाज्य’ असतात. म्हणून ते खर्च अपरिहार्य स्वरूपाचे असतात. उत्पादन बंद पडले वा मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी नियतव्यय कायम राहतो. उत्पादनाचे प्रमाण काहीही असो, नियतव्ययाचे प्रमाण बदलत नाही. उत्पादनसंस्थेच्या स्थायी भांडवलावरील घसारा, भांडवलदारांना किंवा भागीदारांना द्यावा लागणारा कमीत कमी नफा किंवा भांडवली खर्चासाठी घेतलेल्या कर्जाऊ रकमेवरील व्याज, हे खर्च अटळ असतात. म्हणून त्यांचा वस्तू उत्पादनाच्या नियतव्ययास समावेश होतो.

आधुनिक यंत्रयुगामध्ये विज्ञान आणि तंत्रविषयक प्रगती फार झपाट्याने होत असल्याने उत्पादनखर्चात नियतव्ययाचे महत्त्व वाढले आहे. वस्तूच्या एकूण उत्पादनखर्चात नियतव्ययाचा बराच मोठा भाग असतो. वस्तूच्या उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या बदलत्या व्ययामध्ये नियतव्ययाचा भाग मिळवून वस्तूची किंमत ठरविण्याचा काळ कधीच निघून गेला आहे. आजच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक युगामध्ये उत्पादनसंस्था स्थापन करावी की नाही हे वस्तूच्या किंमतीमध्ये नियतव्यय भरून काढता येईल की नाही, याचा विचार करून ठरवावे लागते. म्हणून उत्पादनसंस्थेला दूरदृष्टी ठेवून नियोजन करावे लागते. वस्तूच्या मागणीतील संभाव्य वाढीचा आणि मागणीच्या स्थैर्याचा विचार करावा लागतो. रेल्वे, वीजउत्पादन, मोटार वाहतूक यांसारखे समाजाला उपयुक्त उद्योगधंदे आणि लोखंड व पोलाद उत्पादन, ॲल्युमिनियमचे उत्पादन, यंत्रसामग्रीचे उत्पादन यांसारख्या अफाट भांडवलाची आवश्यकता असणाऱ्या अवजड उद्योगधंद्यांच्या उत्पादनखर्चात नियतव्ययाचा भाग बराच मोठा असतो. या उद्योगधंद्यांत वस्तूंचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मोठ्या परिमाणाच्या बचती प्राप्त होतात. एकंदर नियतव्यय कायम राहतो त्यामुळे वस्तूच्या उत्पादनवाढीबरोबर सरासरी नियतव्यय कमीकमी होत जातो. उद्योगधंद्यांत नवीन उत्पादनसंस्थेचा प्रवेश होणे फारच अवघड असल्यामुळे अस्तित्वात असलेल्या उत्पादनसंस्थेची मक्तेदारी चालू राहते. म्हणून उत्पादनसंस्था मूल्यभेद तत्त्वाचा आश्रय घेऊन वस्तूचे भाव ठरवून देते व एकंदर नियतव्यय भरून काढला जातो. कित्येक वेळा उत्पादनसंस्थेच्या उत्पादित वस्तूचे किंवा सेवारूप वस्तूच्या प्रत्येक नगाचे मूल्य खालच्या पातळीत सर्व उपभोक्त्यांना सारखे ठेवावे लागते. अशा बाबतीत उत्पादनसंस्था अन्य मार्गांनी नियतव्यय भरून काढण्याचा प्रयत्न करते. उदा., वीजकंपन्या वीजवापराचे दर प्रत्येक अंशाप्रमाणे ठरवितात मात्र विजेच्या बिलात मीटरचे भाडे वेगळे आकारले जाते. वीज कमीजास्त वापरली तरी मीटरचे भाडे कायम राहते.

पहा: उत्पादकता उत्पादन परिव्यय सिद्धांत.

संदर्भ: 1. Lewis, W. Arthur, Overhead Costs, New York, 1949.

2. Makin, F.B. Overhead Costs in Theory and Practice, London, 1949.

3. Troxel, C. E. Economics of Public Utilities, New York, 1947.

धोंगडे, ए. रा. सुर्वे, गो. चिं.